केशवपन : केशवपन म्हणजे मस्तकाचे केस वस्तऱ्याने किंवा कात्रीने काढून टाकणे. श्मश्रू म्हणजे दाढीमिशा व डोक्यावरील केस वस्तऱ्याने काढून टाकणे, यास मुंडन म्हणतात. क्षौर म्हणजे वस्तऱ्याने डोक्याचे केस काढणे. क्षुर म्हणजे वस्तरा.

पहिल्या किंवा तिसऱ्या वर्षी किंवा आपापल्या कुलाचाराप्रमाणे योग्य मुहूर्तावर लहान बालकाचे वस्तऱ्याने किंवा कात्रीने केस कापण्याचा विधी, हा हिंदूंचा एक पवित्र संस्कार आहे. यास ‘चौल’ किंवा ‘चूडाकर्म’ म्हणतात. चूडा किंवा चूला म्हणजे डोक्यावरील केशसंभार. उपनयन संस्काराचे प्रारंभीही क्षौरकर्म करावयाचे असते. चौल संस्कारानंतर शेंडी ठेवण्याची हिदूंमध्ये चाल आहे. मनुस्मृतीमध्ये ब्रह्मचाऱ्याने मुंडन, जटाधारण किंवा शिखाधारण करावे, असा विकल्प सांगितला आहे. त्यावरून ब्रह्मचाऱ्याने शेंडी न ठेवता संन्याशासारखे मुंडन करण्याचीही प्रथा त्यावेळी असावीसे दिसते.

मातापित्याच्या व तत्सम व्यक्तीच्या मरणानंतर केशवपन करावे, असे धर्मशास्त्र सांगते व तशी चालही आहे. गया, प्रयाग, काशी इ. तीर्थक्षेत्री क्षौरविधी करावयाचा असतो. पापाचे प्रायश्चित्त घ्यावयाच्या प्रसंगीही क्षौर करावयाचे असते. अग्निहोत्र घेताना किंवा सोमयागादी यज्ञांची दीक्षा घेताना प्रारंभ क्षौरकर्म करावयाचे असते म्हणजे डोक्याचे केस व दाढीमिशा काढावयाच्या असतात. वरील विशिष्ट धार्मिक प्रसंग सोडल्यास केवळ डोक्याचे केस व दाढी काढून, मिशा आणि शेंडी ठेवण्याची पद्धत सर्वसाधारण हिंदू जातींमध्ये रूढ आहे. संन्यासदीक्षा घेतल्यावर मात्र सबंध मुंडनच करण्याचा धर्मशास्त्राचा दंडक आहे.

विधवांचे केशवपन म्हणजे मुंडन करण्याची चाल उच्चवर्णीय हिंदू जातीत रूढ आहे. पतिनिधनानंतर लगेच केशवपन करणे हा उत्तम पक्ष समजतात परंतु तरुण विधवांना ते जड जाते. त्या काही महिन्यांनी वा वर्षांनी तरी मुंडन करतातच. सकेशा विधवांना अपवित्र मानतात त्यांच्या हातचा स्वयंपाक देवपितृकार्यात चालत नाही. अलीकडे ही विधवाकेशवपनाची चाल बंद पडत चालली आहे. गया व तिरुपती या तीर्थक्षेत्री सौभाग्यवती उच्चवर्णीय स्त्रियांनीही केशदान करण्याकरिता पवित्र कर्म म्हणून केशवपन करण्याची धर्मशास्त्रोक्त प्रथा आहे. 

संदर्भ : उपाध्याय, काशिनाथ, संपा. खेमराज श्रीकृष्णदास, धर्मसिंधु, मुंबई, १९६४.  

जोशी, लक्ष्मणशास्त्री