कामधेनु :हिंदू पुराणकथांत, सर्व इच्छा पूण करणारी धेनू म्हणून कामधेनूचा उल्लेख आहे. देवासुरांनी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून वर आलेल्या ⇨ चौदा रत्नांतील कामधेनू ही एक होय. दुसऱ्या एका कथेत दक्षकन्या सुरभी आणि कश्यपप्रजापती यांच्या रोहिणी नावाच्या मुलीस शुन:शेपापासून (अथवा शूरसेनापासून) कामधेनू झाली, असा उल्लेख आहे. नंदिनी असेही तिचे नाव आहे. शंकराचे वाहन असलेला नंदी कामधेनूस वेताळापासून झालेला पुत्र होय. कामधेनू रंगाने पांढरी असून चार वेद तिचे पाय व चार पुरुषार्थ तिचे स्तन आहेत. शबला नावाची एक कामधेनू वसिष्ठाकडे होती कालिदासाने रघुवंशात तिचा उल्लेख ‘नंदिनी’ असा केला आहे. सुवर्णाची कामधेनू दान करणे हे एक महादान असून त्यामुळे सर्व पापांचा नाश होतो व स्वर्गप्राप्ती होते. कामधेनुव्रत नावाचे एक व्रतही आहे.

जोशी, रंगनाथशास्त्र