सीता : विदेह देशाचा ( नेपाळातील आजचे जनकपूर ) राजा जनक ह्याची कन्या आणि अयोध्येचा इक्ष्वाकू कुलातील राजा दशरथ ह्याचा पुत्र ⇨राम ह्याची पत्नी. हिंदूंनी प्रातःस्मरणीय मानलेल्या पाच साध्वी स्त्रियांमध्ये सीतेचा समावेश केला जातो. सीता ही जनक राजाची कन्या मानली जात असली, तरी ती जनकाला भूमीतून मिळालेली आहे. यज्ञभूमी तयार करण्यासाठी तो जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराला लागून ती वर आली, असे आज उपलब्ध असलेल्या वाल्मीकिरामायणा च्या बालकांडात म्हटलेले आहे. जनकाला सीतेची ही प्राप्ती उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर झाली. सीता ह्या शब्दाचा अर्थ ‘नांगर चालविल्याने भूमीवर उमटलेली रेषा ’ असा सांगितला जातो. भूमी नांगरताना मिळालेली कन्या, म्हणून तिचे नाव सीता ठेवले गेले. जनकाने तिला आपली कन्या मानल्यामुळे जानकी जनक हा विदेह देशाचा राजा म्हणून वैदेही तसेच विदेहाचे एक नाव मिथिला असल्याने मैथिली ही नावेही सीतेचीच आहेत. वाल्मीकिरामायणानंतर रचिल्या गेलेल्या आनंद रामायण, अद्‌भुत रामायण अशा काही रामायणांतूनही सीतेच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा दिलेल्या आहेत. त्यांतील एका कथेत सीता ही रावणकन्या म्हणूनही दाखविलेली आहे मात्र ह्या सर्व कथांतून रावण हा दुष्ट प्रवृत्तीचाच दाखविलेला असून रावणाचा नाश सीतेच्या जन्माशीच कसा निगडित झालेला होता, हे ह्या कथांतून दिसते. वाल्मीकिरामायणात सीतेच्या स्वरुपाचे वर्णन चंद्रवदना, शुद्घस्वर्णवर्णा, कोलांगिनी, रतीचे प्रतिरुप, आपल्या प्रभेने सर्व दिशांना प्रकाशित करणारी अशी विशेषणे वापरुन केलेले आहे. आपल्याकडे असलेले आणि कोणालाही पेलता न आलेले शिवधनुष्य जो सज्ज करील, त्यालाच मी सीता देईन, हा राजा जनकाने जाहीर केलेला ‘ पण ’ रामाने जिंकला. त्याने ते धनुष्य केवळ उचललेच नाही, तर त्याला दोरी चढवून तो ते वाकवीत असता त्या शिवधनुष्याचा भंग झाला. त्यानंतर रामाचा सीतेशी विवाह झाला. सीतेचा त्यानंतरचा काही काळ रामाच्या सहवासात आनंदाने गेला असला, तरी पुढे तिला अनेक दुःखांना तोंड द्यावे लागले. रामाला यौवराज्याभिषेक करावा, असे दशरथाच्या मनात असूनही त्याची एक पत्नी आणि रामाची सावत्र आई कैकेयी हिच्या हट्टामुळे रामाच्या वाट्याला यौवराज्याभिषेकाऐवजी चौदा वर्षांचा वनवास आला. ह्या वनवासात ती रामाच्या बरोबर गेली. पुढे राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण सीतेच्या आसपास नसतील अशी परिस्थिती एका कपटव्यूहानुसार निर्माण करुन, रावणाने सीतेचे अपहरण करुन तिला लंकेत नेले आणि आपले वैभव दाखवून तो तिच्याशी लग्न करण्यासाठी तिचे मन वळवण्याचे प्रयत्न करु लागला. त्याच्या विनंतीला धुडकावून सीतेने आपल्या पतीबद्दलचे निस्सीम प्रेम आणि निष्ठा प्रकट केली. राक्षसिणींच्या पहाऱ्यामध्ये तिला ठेवले होते. पुढे रामाने लंकेत रावणाशी युद्घ करुन आणि त्याला ठार मारुन तिची मुक्तता केली असली, तरी इतके दिवस तू परपुरुषाच्या घरी राहिलीस, असे म्हणून रामाने तिच्या चारित्र्याविषयी शंका व्यक्त केल्यामुळे तिला अग्निदिव्य करुन आपल्या पतीच्या मनातली शंका दूर करावी लागली. पुढे रामासह अयोध्येत आल्यानंतर आणि राम अयोध्येचा राजा झाल्यानंतरही सीतेच्या आयुष्यातली दुःखे संपली नाहीत. ती गर्भवती असताना तिच्या चारित्र्याबद्दल काही लोक शंका घेत आहेत, असे कळल्यावरुन रामाला दुःख झाले. तरी लोकांचा संशय विचारात घेऊन त्याने सीतेचा त्याग केला. आपले शरीर केवळ दुःख भोगण्यासाठीच निर्माण झाले आहे, अशी वेदना व्यक्त करुन राजाने राजधर्माप्रमाणे वागून प्रजेवर प्रेम करावे, हीच इच्छा सीतेने व्यक्त केली. त्यानंतर ती वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात राहिली तिथेच तिने लव-कुश ह्या जुळ्या पुत्रांना जन्म दिला. पुढे ही मुले कुमार वयाची झाली. रामाने केलेल्या अश्वमेध यज्ञप्रसंगी त्यांची आपल्या पित्याशी –रामाशी– भेट झाली. कुश-लव आपले पुत्र असल्याचे समजल्यावर सीता शुद्घाचरणी असल्याचे सिद्घ करण्यासाठी तिला पाचारण करण्याविषयी मुनिश्रेष्ठींकडे रामाने निरोप पाठविला व तिला वाल्मीकींच्या आश्रमातून आणण्यात आले. प्रत्यक्ष वाल्मीकींनी रामाला सीतेच्या शुद्घतेची खात्री दिली. रामाला ती होतीच परंतु प्रजेच्या समाधानासाठी सीतेने पुन्हा एकदा अग्निदिव्य करावे अशी अपेक्षा रामाने व्यक्त केली. अनेक दुःखे सहन केल्यानंतर जीवन संपवून टाकावे असे सीतेला वाटत होते. त्यामुळे ‘मी शुद्घ असेन तर देवी वसुंधरे, तू मला तुझ्या पोटात आश्रय दे ’ अशी प्रतिज्ञा तिने उच्चारली आणि पृथ्वीने सीतेला पोटात घेतले.

‘ मूर्तिमंत दुःख ’ अशीच सीतेची रामायणा तून प्रकट होणारी प्रतिमा आहे. रामकथेचा उत्तरार्ध सांगण्यासाठी ⇨ भवभूती ने लिहिलेल्या ⇨उत्तररामचरिता त रामसीता एकत्र आलेले दाखविले आहे. लोकमत आणि प्रजानुरंजन म्हणजे केवळ प्रजेला खूष करणे असे नाही, तर राजाने निःपक्षपातीपणे न्यायाधिशाची भूमिका बजावली पाहिजे, असा विचार भवभूतीने ह्या नाटकातून दिला आहे. आधुनिक स्त्रीवादी दृष्टिकोणातूनही सीतेच्या संदर्भातल्या रामाच्या वर्तनाची चिकित्सा केली गेली आहे.

पहा : राम रामायण.

कुलकर्णी, अ. र.