ज्योतिर्लिंग : भारतातील प्रख्यात बारा शिवस्थाने ज्योतिर्लिंगे म्हणून ओळखली जातात. ह्या बारा ज्योतिर्लिंगांच्या स्वरूपाबाबत व उत्पत्तीबाबत अभ्यासकांत विविध मते आढळतात. ज्योतिर्लिंगांतील शाळुंका ह्या यज्ञवेदींची आणि लिंगे ही यज्ञशिखांची प्रतीके बारा आदित्यांची प्रतीके एकाच शिवलिंगाचे बारा विविध ठिकाणी पडलेले खंड व्यापक ब्रह्मात्मलिंग किंवा व्यापक प्रकाश सुप्तावस्थेत असलेली ज्वालामुखीची उद्रेकस्थाने इ. उपपत्ती अभ्यासकांनी ज्योतिर्लिंगांबाबत मांडलेल्या आहेत.

ह्या बारा ज्योतिर्लिंगांची नावे आणि स्थाने शिवपुराणात आलेली आहेत. यांतील काही नावांच्या स्थानांबाबत विकल्पही आढळतो. ही नावे पुढीलप्रमाणे : (१) सोमनाथ – सौराष्ट्रात वेरावळजवळ (२) मल्लिकार्जुन – आंध्र प्रदेशात श्रीशैलम् पर्वतावर (३) महाकालेश्वर – उज्जैन (४) ओंकार वा अमलेश्वर-नर्मदातटाकी ओंकारमांधाता (५) केदारनाथ – हिमालयात केदारपुरी (६) भीमाशंकर – डाकिनी क्षेत्र, खेड तालुका, पुणे जिल्हा (७) विश्वेश्वर-काशी (८) त्र्यंबकेश्वर – नासिकजवळ त्र्यंबकेश्वर (९) वैद्यनाथ वा वैजनाथ – परळी, बीड जिल्हा (१०) नागनाथ – औंढा, परभणी जिल्हा (११) रामेश्वर – सेतुबंधाजवळ रामेश्वर व (१२) घृष्णेश्वर – वेरूळ, औरंगाबाद जिल्हा. भारताच्या पवित्र सागरकिनारी, नदीतटाकी, पर्वतशिखरावर अगर पायथ्याशी, निसर्गरम्य स्थानी ही शिवस्थाने विराजमान आहेत.

१ सोमनाथ-मंदिर : सोरटी सोमनाथ, सौराष्ट्र. २ मल्लिकार्जुन-मंदिर : श्री शैलम्, आंध्र प्रदेश. ३ महाकालेश्वर-मंदिर उज्जैन. ४ रामेश्वर-मंदिर:रामेश्वर. ५ त्र्यंबकेश्वर-मंदिर : त्र्यंबकेश्वर, जि. नासिक. ६ केदारनाथ-मंदिर : केदारपुरी, उत्तर प्रदेश. ७ विश्वेश्वर-मंदिर : काशी. ८ वैद्यनाथ वा वैजनाथ-मंदिर : परळी, जि. बीड. ९ ओंकार–अमलेश्वर-मंदिर : ओंकारमांधाता, मध्यप्रदेश. १० घृष्णेश्वर-मंदिर : वेरूळ, जि. औरंगाबाद. ११ नागनाथ-मंदिर : औंढा, जि. परभणी. १२ भीमाशंकर-मंदिर : डाकिनी क्षेत्र, जि. पुणे.

ह्या ज्योतिर्लिंगांबाबत स्थानमाहात्म्य सांगणाऱ्या वेगवेगळ्या पौराणिक कथा असल्या, तरी त्यांचा भर शिवमाहात्म्य सांगण्यावर तसेच पार्वतीच्या तपाने साक्षात शिवच त्या त्या स्थानी प्रगट झाला, हे सांगण्यावर असल्याचे सामान्यतः दिसून येते. भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेची जडणघडण करणारी ही ज्योतिर्लिंगे भारतात आसेतुहिमाचल विखुरलेली आहेत. ती हिंदूंची पवित्र पुण्यक्षेत्रे मानली जातात. दरवर्षी लाखो भाविक ह्या स्थानांच्या यात्रा करून कृतकृत्य होतात.

संदर्भ : १. कुलकर्णी, द. दि. द्वादश ज्योतिर्लिंग वर्णन, पुणे, १९७५.

   २. मुळे, भा. आ. ज्योतिर्लिंग, ठाणे, १९४९.                            

करंदीकर, ना. स.