तुलसीपूजन : हिंदू धर्मात स्त्रियांना सौभाग्य व पुत्रपौत्रादी संपत्ती प्राप्त करून देणारे साधन म्हणून तुलसीपूजनास फार महत्त्व आहे. हिंदूंच्या धार्मिक कृत्यांत तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. विष्णूला ⇨ तुळस अत्यंत प्रिय आहे. ‘भवमोक्षप्रदा’, ‘हरिप्रिया’ असे तुळशीचे वर्णन आहे. तुळशीची पूजा विशेषतः स्त्रियांना करावयास सांगितली आहे. तुलसीपूजनाच्या संकल्पात ‘अखंडितसुखसौभाग्यसंतत्यारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थ’ असा उल्लेख असतो. प्रायः

‘तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।

नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ।।’

हा श्लोक म्हणून स्त्रिया तुळशीची पूजा करतात. भक्तांच्या हृदयात, तुळशीजवळ आणि संतांच्या मेळाव्यात माझा नित्य वास असतो, असे भगवान कृष्णाने सांगितले आहे.

तुलसीपूजा

ब्रह्मवैवर्त, पद्म, शिव इ. पुराणांत तसेच देवीभागवतादी ग्रंथांत तुळशीच्या उत्पत्तिकथा आलेल्या आहेत. तुळशीच्या केवळ दर्शनानेही पाप नाहीसे होते. ती वृंदावनात राहते. विष्णूला ती अत्यंत प्रिय म्हणून तुलसीपत्राशिवाय केलेली विष्णुपूजा व्यर्थ आहे, असे पद्मपुराणा  म्हटले आहे. पुराणग्रंथांत तुलसीमाहात्म्य वर्णिले आहे. हिंदूंच्या घरात तुलसीवृंदावन असते आणि स्त्रिया वृंदावनातील तुळशीची मनोभावे दररोज पूजा करतात, सायंकाळी तिच्यापुढे वात लावून तिला प्रदक्षिणा घालतात.

वैष्णव संप्रदायात तसेच वारकरी संप्रदायात तुळशीच्या काष्ठमण्यांची माळ करून ती नेहमी गळ्यात धारण करतात. तुलसीमाला धारण करणाऱ्यास पदोपदी अश्वमेधाचे फल प्राप्त होते, असे ब्रह्मवैवर्तपुराणा  म्हटले आहे. पंढरीची वारी करणाऱ्या वारकरी स्त्रिया आपल्या डोक्यावरून पितळी तुलसीवृंदावन पंढरपुरास नेतात. निधनसमयी मृताच्या मुखात, कपाळावर व दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवतात. गणपतीचा अपवाद सोडल्यास सर्वच देवतापूजनात तुलसीपत्र व मंजिऱ्या विहीत मानल्या आहेत.

तुलसी उपनिषद नावाचे एक नव्य उपनिषद आहे. त्यात तुळस ही जन्ममृत्यूचा नाश करणारी अमृतोद्‌भवा, विष्णुवल्लभा असून तिच्या दर्शनाने पापानाश व सेवनाने रोगनाश होतो, असे म्हटले आहे.

‘तुलसीलक्षपूजा’ नावाचे एक काम्य व्रत असून ते मुख्यत्वे स्त्रिया आचरतात. लक्ष तुलसीपत्रांनी विष्णूची पूजा करणे हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘तुलसीलक्षप्रदक्षिणा’ नावाचेही एक व्रत असून त्यात चातुर्मासात तुळशीस लक्ष प्रदक्षिणा घालतात.

कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतच्या काळात कुठल्याही दिवशी, विशेषतः द्वादशीस, तुलसीविवाहाचा पूजाउत्सव साजरा करतात. या वेळी बाळकृष्ण व तुळस यांचा विवाहविधी यथासांग साजरा करतात.

जोशी, रंगनाथशास्त्री