दैत्य : देवांचे विरोधक. दक्ष प्रजापतीची कन्या दिती हिला कश्यपापासून झालेली संतती. दक्ष प्रजापतीला अदिती, दिती, दनू, कद्रू, अरिष्टा इ. अनेक मुली होत्या. त्या त्याने कश्यपाला दिल्या. दितीला जे पुत्र झाले ते दैत्य होत. अथर्ववेदात (१५·१८·४) दितीच्या मुलांचा उल्लेख आहे. भागवतपुराणात (७·७·१) दितीच्या मुलांना देवशत्रू म्हटले आहे. हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष, सिंहिका हे सर्व दितिपुत्र होत.

देवांनी दितीच्या पुत्रांचा नाश केला म्हणून दितीला दुःख झाले. अमर असा पुत्र देण्याविषयी तिने कश्यपाजवळ वर मागितला. कश्यपाने तो वर मान्य केला पण शंभर वर्षेपर्यंत अत्यंत पावित्र्यात राहून व तपाचरण करून तो गर्भ उदरात बाळगण्याची अट कश्यपाने घातली. दितीने कठोर तप आचरले, त्यामुळे इंद्र घाबरला. शेवटच्या वर्षात दितीच्या हातून एक अपवित्र गोष्ट घडली. एका रात्री पाय न धुता ती झोपी गेली. ही संधी साधून इंद्राने आपल्या वज्राच्या साहाय्याने तिच्या उदरातील गर्भाचे सात तुकडे केले ते रडू लागले तेव्हा त्याने त्या प्रत्येक तुकड्याचे आणखी सात तुकडे केले व ‘रडू नका’ असे त्यांना सांगितले. यातून ‘मरुतां’चा जन्म झाला. तथापि दितीच्या तपःसामर्थ्याने इंद्र संतुष्ट झाला व मरुतांना आपल्याजवळ ठेवण्याचे त्याने मान्य केले (महाभारत–आदिपर्व १३२·५३ शांतिपर्व २०७·२). अशा प्रकारे मरुत हेही मुळात दैत्यच परंतु तपाचरणातून जन्माला आल्यामुळे ते देव ठरले.

कश्यपाला दनूपासून झाले ते दानव. वृत्र हा दानव होता, असे शतपथब्राह्मणात (१·५·२·९) म्हटले आहे. मारीच नमुची, नरक, तारक, शंबर हे सर्व दनुपुत्र म्हणजे दानव होते. हे सर्व दुष्ट प्रवत्तीचे होते म्हणून त्यांना दैत्य असेही म्हणता येईल. दानवांनी तप केले व ब्रह्मदेव आणि शिव यांच्याकडून वर मिळविले. ते यज्ञविरोधी होते. देवांचे शत्रू होते. दानवांचा रसातल नावाचा प्रदेश होता असे भागवतपुराणात (२.७.१३) म्हटले आहे. दैत्य व दानव यांचा उल्लेख असुर म्हणूनही केला जातो. असुर ही एक अनार्य जमात होती आणि त्यांचे आर्यांशी म्हणजे देवांशी वैर होते. असुर, दानव, दैत्य हे शब्द एकाच अर्थी वापरले जात असले, तरी प्राचीन काळी या वेगवेगळ्या जमाती होत्या, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

दैत्य म्हणजे दुष्ट प्रवत्तीचे लोक अशा अर्थाने कालयवन, कंस, रावण इत्यादींचाही उल्लेख दैत्य म्हणून केला जातो. अमरत्व प्राप्त होण्यासाठी अमृत मिळविले पाहिजे या उद्देशाने देव व दैत्य एकत्र आले व त्यांनी समुद्रमंथन केले. त्यातून बाहेर आलेले अमृत देवांनी घेतल्यामुळे देव व दैत्य यांच्यात सतत संघर्ष सुरू झाला. यात दैत्यांचा गुरू शुक्राचार्य होता व देवांचा गुरू बृहस्पती होता. शुक्राचार्यांजवळ संजीवनी विद्या होती. ती कचाच्याद्वारे देवांनी मिळविली अशी कथा आहे. मनुष्यरूपात जन्माला आलेल्या सु. ७५ दैत्यांची नावे महाभारतात (आदिपर्व ६१) आली आहेत. वैकुंठातील द्वारपाल जयविजय सनत्कुमाराच्या शापामुळे हिरण्यकशिपू-हिरण्याक्ष, नंतर रावण-कुंभकर्ण व नंतर शिशुपाल-दंतवक्त्र म्हणून जन्माला आले अशी ही कथा आहे.

दैत्य किंवा असुर या दुष्टांच्या विनाशासाठी विष्णूने नरसिंह, राम, कृष्ण इ. दहा अवतार घेतले. तसेच दुर्गेनेही वेगवेगळी रूपे घेऊन महिषासुर, शुंभ इ. राक्षसांचा वध केला. दुष्ट प्रबळ होतात तेव्हा परमेश्वर अवतार घेतो, असे भगवद्‌गीतेत म्हटले आहे.

ख्रिस्ती धर्मात दैत्य या अर्थाने ‘डीमन’ शब्द वापरला आहे. हे परमेश्वराचे शत्रू असतात व त्याला त्रास देतात. काही धर्मामध्ये देवदूतांची कल्पना असून त्यांमध्ये काही वाईट देवदूतही असतात, अशा कथा आहेत. सैतान (सेटन) हा एक दैत्य होता असे बायबलमध्ये म्हटले आहे.

भिडे, वि. वि.