रैदास : (सु. पंधरावे-सोळावे शतक). उत्तर भारतातील एक मध्ययुगीन संत. रविदास असेही त्यांचे एक नामांतर आढळते. महाराष्ट्रात ‘रोहिदास चांभार’ म्हणून ओळखले जाणारे संत हेच असावेत, असे दिसते.

ते काशीचे राहणारे होते. त्यांच्या वडिलांचे नाव राहू, आईचे नाव करमा व पत्‍नीचे नाव लोना होते. त्यांना विजयदास नावाचा पुत्र असल्याचा उल्लेख परमानंदस्वामिरचित रविदास पुराण ह्या ग्रंथात आढळतो.

सत्संगतीचा परिणाम होऊन ते बाराव्या वर्षापासूनच राम व सीता यांच्या मूर्तीची पूजा करू लागले. त्यांच्याकडून संसार नीट होणार नाही, असे पाहून वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. ते निःस्पृह व समाधानी होते. त्यांच्या जीवनाशी अनेक दंतकथा निगडित आहेत. ते मोबदला न घेताच साधुसंतांना चपलांचे जोड देत असत, अशा कथाही सांगतात.

ते ⇨ रामानंदांचेशिष्य असल्याचे म्हटले जाते परंतु त्यांच्या कोणत्याही पदात तसा उल्लेख नाही. ते ⇨ कबीर (सु. १३९८-सु. १५१८) यांचे समकालीन असल्याचा उल्लेख आढळतो. मीराबाईंनी आपल्या अनेक पदांतून रैदास हे आपले गुरू असल्याचे म्हटले आहे. स्वतः रैदास ⇨ मीराबाईंचे गुरू होते, की रैदासी संप्रदायातील रैदासांच्या अनुयायांपैकी कोणी त्यांचे गुरू होते, हे संदिग्ध आहे. चितोडची झालारानी वा झालीरानी त्यांची शिष्या असल्याचे सांगितले जाते आणि ती राणासंगाची वा राणा कुंभाची पत्‍नी असल्याची मतेही आढळतात. तिच्या निमंत्रणावरून ते चितोडला गेले होते.

ते बहुधा अशिक्षित असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. त्यांची काही पदे ⇨ ग्रंथसाहिबमध्ये आढळतात. त्यांच्या रचनांचा एक संग्रह प्रयागहून रैदासजी की बानी या नावाने प्रकाशित झाला आहे. राजस्थानमध्ये त्यांच्या काही रचना हस्तलिखित स्वरूपात आहेत, असे म्हणतात. त्यांच्या नावावर सांगितली जाणारी आणखी एक रचना प्रहलाद लीला असून ती अप्रकाशित आहे. त्यांच्या भाषेवर फार्सीचा प्रभाव दिसतो.

भक्तीसाठी परमवैराग्याची आवश्यकता आहे, असे ते मानत असत. अनिर्वचनीय, एकरस, अक्षर व अविनाशी असे परमतत्त्व हेच सत्य असून ते प्रत्येक जीवामध्ये अवस्थित असते, असा तत्त्वज्ञानविषयक विचार त्यांनी मांडला आहे. त्यांचे सदाचरण व आध्यात्मिक साधना पाहून सर्व वर्णांचे लोक आपला वर्णाहंकार विसरून त्यांच्यापुढे नम्र होत असत.

ते १२० वर्षांवर जगले, असे मानले जाते. त्या वेळचे एक प्रसिद्ध महात्मा म्हणून कबीरांनीही (संतनिमें रविदास संत) त्यांना गौरविले. नाभादास, प्रियादास, धन्ना भगत, मीराबाई इ. संतांनीही त्यांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. त्यांनी प्रवर्तित केलेला पंथ ‘रैदासी पंथ’ म्हणून प्रसिद्ध होता. महाराष्ट्र , गुजरात, पंजाब, राजस्थान या प्रदेशांत या पंथाचे अनुयायी आढळतात.

संदर्भ : चतुर्वेदी, आचार्य परशुराम, उत्तरी भारत की संतपरंपरा अलाहाबाद, १९६४. 

साळुंखे, आ. ह.