ज्यूनो : प्राचीन रोमन व लॅटिन देवतासमूहातील एक प्रमुख स्त्रीदेवता. ग्रीकांच्या हेरा नावाच्या देवतेशी तिचे खूपच साम्य असून हेरा व ज्यूनो ह्या देवता एकच होत, असे अभ्यासक मानतात. हेरा ही क्रोनस व रीया यांची मुलगी. आर्‌गॉस, स्पार्टा व मायसीनी ही हेराच्या उपासनेची प्रमुख ग्रीक केंद्रे होती. स्वर्गाचा सम्राट मानल्या गेलेल्या ज्यूपिटर ह्या रोमन देवाची ज्यूनो ही पत्नी. स्त्रीजीवनाच्या सर्वच अंगोपांगाशी, विशेषतः वैवाहिक जीवनाशी, ज्यूनोचा संबंध असल्याचे दिसते. स्त्रियांचे कल्याण करणारी व त्यांना सुख देणारी देवता म्हणून तिला विविध नावे प्राप्त झालेली आहेत. ‘ज्यूनो प्रोन्यूबा’ ह्या नावाने ती वधूची सखी म्हणून ‘–इंटरड्यूका’ नावाने ती वधूस नव्या घरी आणणारी म्हणून ‘–ओपिजेना’ नावाने ती प्रसूत होणाऱ्या स्त्रीची सुटका करणारी म्हणून ‘–ल्यूसिना’ नावाने ती नवजात बालकाला ह्या जगाचा प्रकाश दाखविते तसेच ती बालकाचे संरक्षण करते म्हणून ‘ल्यूसेटिआ’- नावाने ती आकाशातील प्रकाशाचे स्त्रितत्त्व म्हणून ‘–मॉनेटा’ नावाने ती रोमनांची संरक्षक व संकटाची सूचना देणारी देवता म्हणून ‘–सॉस्पिटा’ नावाने ती कैद्यांची व प्रसूत होणाऱ्या स्त्रियांची  सुटका करणारी तसेच त्यांचे रक्षण करणारी देवता म्हणून पूजिली जात होती.

ज्यूनो सॉस्पिटा : एक शिल्प, व्हॅटिकन संग्रहालय, रोम

स्त्रियांची संरक्षक देवता म्हणून ज्यूनोची  रोमन साम्राज्यात सर्वत्र उपासना होत होती. जीवनातील स्त्रीतत्त्वाचे ती प्रतिनिधित्व करते. स्त्रियांशी असलेल्या तिच्या घनिष्ठ संबंधावरून तिचा चंद्राशी संबंध  

जोडला जातो. उदा., ‘ज्यूनो कॉव्हेल्ला’. यावरूनच ती चंद्रदेवता आहे, अशी चुकीची समजूत रूढ झाली, असे काही अभ्यासक मानतात.

ज्यूनोचा उपासनासंप्रदाय जसजसा विस्तारत व विकसित होत गेला, तसतसे तिला अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊन ती रोमनांची प्रमुख देवता बनली. मुळात ती स्त्रीसंरक्षक देवता असली,  तरी नंतर तिला रोमन साम्राज्याची तारक देवता म्हणूनही महत्त्व प्राप्त झाले. इट्रुस्कन राजांच्या कारकीर्दीत रोम येथे ‘ज्यूनो रेजीना ’ नावाने स्वर्गाची सम्राज्ञी, ज्यूपिटरची पत्नी तसेच रोम येथील कॅपिटोलाइन टेकडीवरील मंदिरातील ज्यूपिटर, मिनर्व्हा व ज्यूनो ह्या ‘त्रयी’तील एक देवता म्हणून ती पूजिली जात होती. रोमच्या ॲव्हन्टाइन टेकडीवरील मंदिरातही तिची ह्याच नावाने उपासना होई. कामिलस याने तिचा उपासना संप्रदाय इ. स. पू. ३९२ मध्ये व्हेई हे नगर जिंकून तेथून ॲव्हन्टाइन येथे आणला. ‘ज्यूनो मॉनेटा’चे मंदिर इ. स. पू. ३४४ मध्ये बांधले गेले. ह्या मंदिरातच पुढे रोमन टाकसाळ उघडली गेली. इ. स. पू. ७३५ मध्ये ‘ज्यूनो ल्यूसिना’चे एक मंदिर रोमच्या एस्क्विलाइन टेकडीवर बांधल्याचे दिसते. लान्यूव्हिअम (सध्याचे लानूव्ह्यो) येथे ‘ज्यूनो सॉस्पिटा’चे मंदिर होते.

एक मार्च रोजी ‘मॅट्रिनालिआ’ नावाचा आणि सात जुलै रोजी ‘नोनी कॅप्रोटीनी ’ नावाचा असे ज्यूनोचे दोन मोठे वार्षिक उत्सव रोमन साम्राजात साजरे होत. ह्या दोन्हीही उत्सवात सर्व स्त्रिया ज्यूनोची मनोभावे उपासना करीत.

विविध पुराणकथांच्या अनुरोधाने ज्यूनोचा कला-साहित्यातही आविष्कार झालेला दिसतो. हेराप्रमाणेच तिची उभी सुंदर शिल्पे निर्माण करण्यात आली. वीरांगनेच्या स्वरूपातील (ज्यूनो सॉस्पिटा) हातांत भाला व ढाल धारण केलेली तिची काही द्विभुज शिल्पेही आढळतात. ‘ज्यूनो रेजिना’ची शिल्पे उभी व चतुर्भुज आहेत. बालसंरक्षक देवता म्हणून ‘ज्यूनो ल्यूसिना’चीही शिल्पे आहेत. 

सुर्वे, भा. ग.