अपोलो : एक प्रमुख ग्रीक देवता. औषधी, संगीत (विशेषत: लायर ह्या तंतुवाद्यावरील) धनुर्विद्या, भविष्यकथन इ. विद्या-कलांचा अपोलो स्वामी आहे. ⇨झ्यूस व लेटो (झ्यूसची प्रेयसी) यांचा तो पुत्र. अपोलो

‘अपोलो बेल्व्हेदेअर’ चे प्रसिद्ध शिल्प

व त्याची बहीण आर्टेमिस (⇨डायना  हे तिचे रोमन नाव) ह्या जुळ्या  मुलांना लेटोने इजीअन समुद्रातील डिलॉस बेटावर जन्म दिला. तेथे थेमिस ह्या देवतेने बाल अपोलोला देवलोकातील अमृतावर वाढविले.

अपोलोचा अद्‌भुत पराक्रम म्हणजे त्याने पीथन नावाच्या सपक्ष सर्परूपधारी राक्षसास ठार मारून त्याच्यापासून डेल्फॉय शहर काबीज केले आणि ते आपल्या पूजेचे केंद्र बनविले. अपोलो, झ्यूस व पाल्लास ह्या ग्रीक देवतांना ग्रीक पुराणकथेतील ‘त्रिमूर्ती’ म्हणावयास हरकत नाही. व्हॅटिकन येथील वस्तुसंग्रहालयात अपोलो वेल्व्हेदेअर या नावाचे जे शिल्प आहे त्यालाच ‘पीथियन’ असेही म्हटले जाते. त्यात अपोलो पीथन राक्षसाचा वध करीत आहे, असा  प्रसंग शिल्पित केलेला आहे. प्रस्तुत शिल्प, मानवी आकृतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून अनेक कला-तज्ञांनी  वाखाणले आहे. अपोलोची इतरही अनेक सुंदर शिल्पे कोरलेली आढळतात.

हंबर्ट, जॉ. (इं) पेठे, मो. व्यं (म.)