थिऑसॉफी : ‘थिऑस’ व ‘सोफिया’ या दोन ग्रीक शब्दांपासून ‘थिऑसॉफी’ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ईश्वरविषयक ज्ञान असा आहे. धर्माची दोन प्रमुख रूपे आहेत : एक बाह्य व दुसरे आंतरिक. धर्माचे बाह्य रूप म्हणजे कर्मकांड आणि आंतरिक रूप म्हणजे ईश्वराचे ज्ञान. हे ज्ञान साक्षात ज्ञान ह्या स्वरूपात अभिप्रेत आहे. सर्व उच्च धर्मांमध्ये ईश्वराचे ज्ञान किंवा त्याचा साक्षात्कार ह्या अंगाला महत्त्व आहे. हिंदूंमधील ‘ब्रह्मज्ञानी’, ख्रिस्ती धर्मातील ‘नॉस्टिक्स’, इस्लामी सूफींमधील ‘शेख’ हे सर्व साक्षात्कारवादीच आहेत. थिऑसॉफीमध्ये ईश्वरविषयक ज्ञान हे कोणत्याही धर्माच्या द्वारा किंवा धार्मिक संघटनेबाहेरही केवळ वैयक्तिक प्रयत्‍नांच्या साहाय्याने प्राप्त होऊ शकते, असे मानले आहे. व्यक्ती ही ईश्वराचाच आविष्कार असल्याने स्वतःचे ज्ञान, आत्मज्ञान म्हणजेच ईश्वराचे ज्ञान. ईश्वर हा सर्वव्यापी असून पुन्हा त्या पलीकडेही आहे. सर्व भूतमात्र हा ईश्वराचाच आविष्कार असल्याने स्वाभाविकपणेच त्यात बंधुभाव असतो, असे थिऑसॉफी मानते. त्यामुळे ईश्वराचे ज्ञान करून घेणे आणि आपण व आपल्याभोवतीचे विश्व एकच आहे, असा साक्षात्कार होणे हा थिऑसॉफीचा गाभा आहे. ज्यांना ईश्वराचे ज्ञान झाले आहे किंवा जे ते मिळविण्याचा प्रयत्‍न करतात, त्यांना ‘थिऑसॉफिस्ट’ ही संज्ञा लावली जाते.

ऐतिहासिक दृष्टीने पाहिल्यास थिऑसॉफी म्हणजे जीव, जगत व ईश्वर ह्यांच्याविषयीच्या सत्याचा शोध, असा अर्थ होतो. पारंपरिक विचारसरणीनुसार जीवनविषयक ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान, ईश्वरविषयक ज्ञान म्हणजे धर्म आणि जगाविषयीचे ज्ञान म्हणजे विज्ञान, असे स्थूल मानाने म्हणता येईल. जगातील निरनिराळ्या देशांमध्ये अनेक प्रकारच्या ज्ञानपरंपरा अस्तित्वात होत्या व त्यांमध्ये थिऑसॉफीचे प्राचीन स्वरूप आपणास दिसून येते. भारतातील हिंदूंची उपनिषदे, महाकाव्य, पुराणे, दर्शने चीनमधील ताओ मत व लाव् ज याचे लेखन ईजिप्तमधील द बुक ऑफ द डेड ॲसिरिया व खाल्डिया येथील अवशेष पारशी लोकांच्या गाथा ज्यूंच्या कब्बाला पंथाचे ग्रंथ व टॅलमुड इस्लाममधील सूफी साहित्य ह्या सर्वांमधून आपणास ईश्वरविषयक ज्ञानाची परंपरा दिसते. त्या सर्व ज्ञानाची सुसंगत रीतीने मांडणी करून आणि त्यातील नको असलेला भाग टाळून ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ ने (स्था. १८७५) त्या ज्ञानाचे पुनरुज्‍जीवन करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र थिऑसॉफीतील तत्त्वे मुळात विविध ठिकाणी अस्तित्वात होतीच. त्यांची केवळ नवी मांडणी थिऑसॉफिकल सोसायटीने केली. हिमालयातील अदृश्य धर्माचार्यांशी संबंध प्रस्थापित करणे, हा गुढवादी विचार या सोसायटीने मांडला.

सर्व धर्म हे दैवी ज्ञानापासून निर्माण झाले असून त्यांच्या संस्थापकांना दैवी प्रेरणा लाभलेली होती. त्या सर्वांचे ज्ञान एकाच प्रकारचे असल्याने आपणास विविध धर्मांमध्ये साम्यस्थळे आढळून येतात. ती साम्यस्थळे शोधून थिऑसॉफीची आधुनिक रचना करण्यात आली.

धर्माच्या दृष्टीने पाहता थिऑसॉफीमध्ये पुढील महत्त्वाची तत्त्वे दिसतात : ईश्वर हा एकमेव आहे. ईश्वराचा आविष्कार इच्छा, ज्ञान व मन ह्या तीन तत्त्वांतून होतो. थिऑसॉफी पुनर्जन्म व आत्म्याचे अमरत्व ह्यांवर भर देते. जीवांमध्ये कसलेच भेद नसून त्यांची श्रेणी एकच असल्याचे थिऑसॉफी मानते. देव, मानव, भुतेखेते, पऱ्या ह्यांसारख्या जीवांच्या विविध कोटी आहेत. अशा रीतीने जीवांच्या कोटी असल्या, तरी सर्व विश्वामध्ये बंधुभाव आहे, असे थिऑसॉफीमध्ये मानले जाते. मात्र थिऑसॉफीतील बंधुभावाचे तत्त्व हे राज्यशास्त्रीय बंधुभावाच्या तत्त्वाहून मूलतःच भिन्न आहे.

थिऑसॉफी अतींद्रिय गोष्टींचा शोध घेण्याचा शास्त्रीय पद्धतीने प्रयत्‍न करते. थिऑसॉफीच्या दृष्टीने जग हे सात द्रव्यांचे बनले आहे. ती द्रव्ये म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जीव व ईश्वर. थिऑसॉफी पुनर्जन्म मानते त्याचप्रमाणे कर्मसिद्धांतही मानते. कर्मसिद्धांतानुसार चांगल्या कर्मांची चांगली व वाईट कर्मांची वाईट फळे मिळतात. हा कर्मसिद्धांत केवळ भौतिक पातळीवरच नव्हे, तर भावना, विचार आणि आत्मा ह्यांच्या पातळ्यांवरही लागू पडतो. म्हणून सत्कर्माइतकेच सद्‌विचारांनाही महत्त्व आहे. मानसिक आरोग्यावरच शारीरिक आरोग्य अवलंबून असते, ह्याचेही स्पष्टीकरण आपणास कर्मसिद्धांतातच मिळते. त्याचप्रमाणे अनेक जन्म घेत घेत प्रयत्‍न केल्यास परिपूर्ण अवस्थेची प्राप्ती होऊ शकते, ह्याही कल्पनेचा आधार कर्मसिद्धांत हाच आहे. हिंदूंचा अवतारवाद थिऑसॉफीने स्वीकारला आहे.


थिऑसॉफीचे नीतिशास्त्र आजवरच्या संतमहात्म्यांच्या व श्रेष्ठ धर्मग्रंथांच्या शिकवणुकीवर आधारलेले आहे. त्या महात्म्यांनी किंवा ग्रंथांनी सांगितलेले वर्तनविषयक नियम थिऑसॉफी स्वीकारते. त्याचप्रमाणे थिऑसॉफीचा मूल्यविचार दैवी इच्छेवर आधारलेला आहे. दैवी इच्छेला अनुकूल ते चांगले व प्रतिकूल ते वाईट, असे थिऑसॉफी मानते.

वरील विचारांच्या आधारावरच थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना १७ नोव्हेंबर १८७५ रोजी न्यूयॉर्क येथे झाली. ह्या संस्थेचे संस्थापक एच्. पी. ब्‍लाव्हॅट्स्की (१८३१–९१) आणि हेन्‍री स्टील ऑलकट (१८३२–१९०७) हे दोघे होते. ऑलकटच्या मृत्यूनंतर १८९६ मध्ये ॲनी बेझंट थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर अरुंडेल व सी. जिनराजदास हे या संस्थेचे अध्यक्ष झाले. नीलकंठ श्रीराम हे आता या संस्थेचे अध्यक्ष आहेत. १८८२ साली या संस्थेचे कार्यालय कायम स्वरूपात अड्यारला स्थापन झाले. अमेरिकेस स्थापन झालेल्या या संस्थेचा प्रसार मात्र भारतात झाला. या संस्थेच्या शाखा निरनिराळ्या ५५ देशांत स्थापन झाल्या असून सदस्यसंख्या ३५ हजारांवर आहे. सत्यशोधनाची इच्छा असणाऱ्या कुणाही व्यक्तीला थिऑसॉफिकल सोसायटीचे सभासद होता येते. ‘सत्यान्नास्ति परो धर्मः’ (सत्यापरता नाही धर्म) असे थिऑसॉफिकल सोसायटीचे ब्रीद आहे. संस्थेच्या बोधचिन्हातही हे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळेच सभासदांना वैयक्तिक मतस्वातंत्र्य असते. सोसायटीचे उद्देश पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहेत : जात, धर्म, लिंग, वर्ण ह्यांसारखे भेद बाजूला ठेवून मानवजातीच्या बंधुत्वाचे एक केंद्रस्थान तयार करणे धर्म, तत्त्वज्ञान व भौतिक शास्त्रे ह्यांच्या तौलनिक अध्ययनास प्रोत्साहन देणे आणि अज्ञात सृष्टिनियम व मनुष्याच्या अंतरंगातील शक्ती ह्यांचे संशोधन करणे सेवा, सहिष्णुता, आत्मविश्वास व समभाव या गुणांनी युक्त असा मानवसमाज निर्माण करण्याचे सोसायटीचे ध्येय आहे.

संदर्भ : 1. Besant, Annie, The Ancient Wisdom: An Outline of Theosophical Teachings, London, 1897.

           2. Blavatsky, Helena P. Isis Unveiled, 2. Vols., 1877.

           3. Leadbeater, C. W. An Outline of Theosophy, 1902.

थिटे, ग. उ.