माजी (मग) : प्राचीन इराणमधील पुरोहितांचा विशिष्ट वर्ग. हे लोक भारतात मग, मगी वा मगी ब्राह्मण या संज्ञेने ओळखले जात. पौरोहित्य करणे हा व्यवसाय असल्यामुळे हे लोक बॅबिलोनिया, इराण, भारत इ. विविध देशांतील विविध धर्मीय लोकांचे पौरोहित्य करीत असावेत, असा अभ्यासकांचा तर्क आहे.

डरायसच्या सुप्रसिद्ध बेहिस्तून शिलालेखात डरायसने त्यांचा पराभव केल्याचा आणि त्यांनी नष्ट केलेली मंदिरे दुरुस्त केल्याचा निर्देश आहे. हीरॉडोटस या ग्रीक इतिहासकारानेही त्यांचा उल्लेख केला आहे. 

हे लोक मीडियन, अकेडियन किंवा मंगोलियन असल्याची मते आढळतात. हे लोक मूळचे आर्येतर होते आणि इराणमध्ये आर्यांचे वर्चस्व झुगारून देण्यामध्ये अयशस्वी झाल्यामुळे त्यांच्यात समाविष्ट झाले, असा काही विद्वानांचा तर्क आहे.

जरथुश्त्री गाथांमध्ये ‘मग’ हा शब्द आढळतो. अवेस्तामध्ये हा शब्द जादू वा तत्सम शक्ती या अर्थाने आलेला दिसतो. अवेस्तामध्ये न आढळणारी अहरिमनची पूजा करीत असल्यामुळे हे लोक पारशी धर्मातील द्वैतमतवादी असावेत, असे ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकरांनी म्हटले आहे. जरथुश्त्राच्या धर्माशी त्यांचा नेमका कोणता संबंध होता, हे संदिग्धच आहे. हे लोक स्वप्नांचे अर्थ व भविष्य सांगत. त्यांच्या नावावरूनच जादू या अर्थाचा ‘मॅजिक’ हा शब्द बनला असल्यामुळे त्यांचा जादूटोण्याशी संबंध होता, हे स्पष्ट आहे.

कृष्णपुत्र सांबाला कृष्णाच्या वा दुर्वासाच्या शापामुळे महारोग झाला, तेव्हा तो दूर करण्यासाठी त्याने शाकद्वीपातून १८ मग ब्राह्मणांना आणले आणि त्यांच्याकरवी सूर्योपासना करून रोग दूर केला, अशी कथा भविष्यपुराणात आली आहे. सांबाने भोजकांच्या मुलींची या ब्राह्मणांशी लग्ने लावून दिली व पुढे त्यांची अपत्ये मग ब्राह्मण व भोजक ब्राह्मण या दोन्ही नावांनी ओळखली जाऊ लागली. त्या १८ ब्राह्मणांसाठी सांबाने मुलतानजवळ सूर्यमंदिर बांधले होते. केतकरांच्या मते मग लोक आर्यांच्याही आधी भारतात आले असावेत तसेच, ते बंगालच्या उपसागरातून भारतात आले असावेत, असाही त्यांचा तर्क आहे. मगध हे ‘मगांना धारण करणारा’ या अर्थाचे प्रादेशिक नाव मगांवरूनच आले आहे आणि ही घटना त्यांचा प्रभाव स्पष्ट करणारीही आहे. वेद, पुराणे, रामायण, महाभारत इ. ग्रंथांतून मगांचा निर्देश आहे. बृहत्संहितेचा कर्ता वराहमिहिर हा मग ब्राह्मण होता, असे अनुमान करण्यात आले आहे. काही अभ्यासकांच्या मते इ.स. सहाव्या शतकात भारतात त्यांचा मोठा प्रभाव होता. मगांना चातुर्वर्ण्यव्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठीच व्रात्यस्तोम नावाचा वैदिक विधी निर्माण झाला असावा, असे विद्वान मानतात. मग लोक ‘सापाची कात’ असा अर्थ असलेले आणि पारशांच्या कस्त्रीसारखे असलेले अव्यंग धारण करीत असत. तसेच, ते गुडघ्याच्या खाली जाईल असा कंचुक (चोगा) धारण करीत. ते भोजन करताना मौन पाळत असत. आराकानमध्ये मग नावाची बौद्ध धर्मीय जात असल्याचा उल्लेख केतकरांनी केला आहे.

बायबलमध्येही त्यांचा उल्लेख आहे. सेंट मॅथ्यू यांच्या मते ⇨ येशू ख्रिस्ताची पूजा करण्यासाठी तीन (काहींच्या मते बारा) मगी एका ताऱ्याच्या मार्गदर्शनानुसार पूर्वेकडून बेथलीएम येथे आले होते. ‘तीन शहाणे पुरूष’ या विख्यात शब्दावलीने ते ओळखले जातात. प्रारंभी मगी हे विद्वान म्हणून ओळखले जात परंतु इ.स. पहिल्या शतकापासून ते जादूगार (विशेषतः बॅबिलनमधील जादूगार) म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

संदर्भ : 1. Ghose, N. The Aryan Trail in Iran and India, Calcutta, 1937.

           २. केतकर, श्री. ब्यं. प्राचीन महाराष्ट्र-शातवाहन पर्व, विभाग पहिला, पुणे १९३५.

साळुंखे, आ. ह.