गौतमी, कृशा : (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक). सिद्धार्थ गौतम राजपुत्र होता, तेव्हा नगरात रथातून फिरत असताना कृशा गौतमी (किसा गौतमी) नावाच्या तरुण स्त्रीने त्याला पाहिले. त्याचे सौंदर्य अवलोकन करून ती अत्यंत संतुष्ट झाली व तिने उद्‌गार काढले, की ज्या मातापित्यांचा हा सुंदर राजबिंडा पुत्र आहे व ज्या स्त्रीचा हा पती आहे, ते मातापिता व ती स्त्री खरोखरच दुःखक्लेशरहित (निब्बुत) व सुखी असली पाहिजेत. अशा रीतीने दुःखक्लेशविरहित स्थितीसंबंधीचे उद्‌गार ऐकून सिद्धार्थ ती स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता जास्त उत्कंठित झाला. आपल्याला ह्या स्थितीची आठवण करून दिली म्हणून त्या कृशा गौतमीला त्याने स्वतःच्या गळ्यातील एक मौल्यवान हार भेटीदाखल पाठविला. ही कथा जानक अट्‌ठकथेतील प्रास्ताविक भागात (निदानात) आलेली आहे. 

बापट, पु. वि.