दसरा : हिंदूचा एक प्रमुख सण व शुभ दिवस. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे ⇨नवरात्र  असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले. दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात. आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच ‘विजय’ नावाचा मुहूर्त असतो व त्यावेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते, असे पुराणांत सांगितले आहे. चैत्री पाडवा (चैत्र शुद्ध प्रतिपदा), अक्षय्य तृतीया (वैशाख शुद्ध तृतीया), विजयादशमी व दिवाळीचा पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा, अर्धा मुहूर्त) या हिंदूंच्या साडेतीन विशेष शुभ मुहूर्तातील हा एक आहे.

जयपूर येथील दसरा-मिरवणूक

या दिवशी शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात. शमी वृक्षाजवळच भूमीवर अपराजिता देवीची मूर्ती रेखाटून तिचीही पूजा करतात. रावणाचा वध करण्यासाठी रामाने याच दिवशी शमीचे पूजन करून प्रस्थान ठेवले. अर्जुनाने अज्ञातवास संपवून याच दिवशी शमीचे पूजन केले व आपली शस्त्रे पुन्हा हातात घेतली. हा विजयोत्सव असल्याने राजांनी आपल्या घोड्यांना सुशोभित अलंकार घालावे, निराजन नावाचा विधी करावा, शस्त्रास्त्रांचे पूजन करावे व विजयासाठी प्रस्थान करावे असे सांगितले आहे. कौत्सास चौदा कोटी सुवर्णमुद्रा देण्यासाठी रघुराजाने कुबेरावर स्वारी केली. त्यामुळे भयग्रस्त होऊन कुबेराने याच दिवशी शमीच्या झाडावर सुवर्णवृष्टी केली. आवश्यक तेवढे सोने रघुराजाने कौत्सास देऊन बाकीचे त्याने नागरिकांना वाटले अशी कथा स्कंदपुराणात आहे. या दिवशी सोने लुटण्याच्या प्रथेचा संबंध या कथेशी दिसतो.

भारतात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. उत्तर भारतात या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. कुलू खोऱ्यातील लोक आपल्या रघुनाथ या देवतेचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी साजरा करतात. रघुनाथाची रथयात्रा, नृत्य, बलिदान इ. विधी करतात. महाराष्ट्रात या दिवशी सीमोल्लंघन करून आपट्याची पूजा करतात व त्याची पाने सोने म्हणून परस्परांना देतात. ऐतिहासिक काळात या दिवशी सीमोल्लंघन करून मराठा सरदार नव्या मोहिमेवर निघत. म्हैसूर संस्थानाचा दसऱ्याचा उत्सव भारतात प्रसिद्ध आहे. चंडीने किंवा चामुंडेने महिषासुराचा वध म्हैसूरजवळ केला, असे मानले जाते. राजस्थानातही या दिवशी राजपूत राजे आपल्या गुरूच्या दर्शनास जात आणि तेथे शमीचे पूजन करीत. ठाकूर स्त्रिया या दिवशी दसरानृत्य करतात.

हा दिवस शुभ असल्यामुळे हिशेबाच्या वह्या, जुन्या पोथ्या, यंत्रे, शस्त्रे इ. वस्तूंचे पूजनही या दिवशी करतात. पावसाळा संपून नवीन धान्य घरात आलेले असते. म्हणून शेतकरीवर्गही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो.

संदर्भ : त्रिपाठी, रामप्रताप, हिंदुओंके व्रत पर्व और त्यौहार, अलाहाबाद, १९६६.

भिडे, वि. वि.