बुंदहिश्न : विश्वाच्या उत्पत्तीविषयी प्राचीन इराणी लोकांच्या कल्पना वर्णन करणारा पेहलवी भाषेतील ग्रंथ. विश्वाच्या उत्पत्तीबरोबरच ह्या ग्रंथात काही पुराणकथा आणि इराणचा पौराणिक इतिहास आढळतो. मूळ ग्रंथाची सध्या दोन संस्करणे आढळतात: इराणी ३०,००० शब्दांचे (३६ प्रकरणांचे) व भारतीय १३,००० शब्दांचे. भारतीय संस्करण त्रोटक व मूळ ग्रंथातील उताऱ्यांच्या स्वरूपाचे आहे.

सृष्टीच्या आरंभी सुष्ट तत्त्व (गुड स्पिरीट) हे अनंत प्रकाशात असते, तर दुष्ट तत्त्व (ईव्हल स्पिरीट) हे घन अंधारात असते. सुष्ट तत्त्व सर्वज्ञ, दुष्ट तत्त्व अल्पज्ञ असते. ही दोन तत्त्वे आपापली सृष्टी निर्माण करतात. पहिली सहा हजार वर्षे लोटल्यावर त्यांच्यात द्वंद्व सुरू होते. ह्या संघर्षात दुष्ट शक्ती चांगल्या सृष्टीचा संहार करू पाहात असतात. ग्रंथाच्या अखेर पुनरुत्थानाचे वर्णन आहे.

ह्या ग्रंथाच्या पहिल्या शब्दावरून त्याचे झन्द आकासीह असेही नाव आहे. हा ग्रंथ अरबांच्या इराणवरील आक्रमणानंतर काही काळाने, म्हणजे नवव्या शतकात, लिहिला गेला असल्याचे मानले जाते. कदाचित मूळ ग्रंथ पुनरुत्थानाच्या हकीकतीपाशी संपला असावा आणि सध्या आढळणारा पुढचा भाग तेवढा अरबी आक्रमणानंतर जोडला गेला असावा, असेही काही अभ्यासक मानतात.

पाश्चात्त्य राष्ट्रांना ह्या ग्रंथाची ओळख प्रथम आंकेतिल द्युपेरों ह्या फ्रेंच अभ्यासकाने १७७१ मध्ये करून दिली. नंतर ह्या ग्रंथाची अनेक जर्मन भाषांतरे झाली आहेत. इंग्रजी भाषांतर ई.डब्ल्यू. वेस्ट यांचे असून ते सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट ह्या मालेतील पाचव्या खंडात प्रसिद्ध झाले आहे.

पहा : अवेस्ता पारशी धर्म पेहलवी साहित्य.

संदर्भ : 1. Mueller, Max, Ed. and Trans. West, E. W. The Sacred Books of East, Vol. V. Part I : Pahlavi Texts, Delhi, 1965.

2. Zaehner, R. C. The Dawn and Twilight of Zoroastrianism, London, 1961.

तारापोर, जे. सी. (इं) मेहेंदळे, म. अ. (म.)