वसंतपंचमी : माघ शुक्ल पंचमी ही वसंतपंचमी म्हणून ओळखली जाते. वसंत ॠतूच्या शुभारंभाची ही तिथी होय. चैत्र व वैशाख हे वसंत ॠतूचे महिने मानले गेले आहेत, परंतु माघ महिन्यामध्ये उत्तरायणाबरोबर वसंताची चाहूल लागते व वातावरण उत्साहवर्धक होऊ लागते. ॠतुराज वसंताच्या आगमनाप्रीत्यर्थ पाच ॠतूंनी आपल्या कालावधीतील प्रत्येकी आठ दिवस भेट म्हणून दिले आहेत. पाच ॠतूंचे प्रत्येकी आठ दिवस मिळून झालेले हे ४० दिवस चैत्र बलिप्रतिपदेपूर्वी, म्हणजे वसंतपंचमीपासून सुरू होतात, असे एक कविकल्पनात्मक स्पष्टीकरण दिले जाते. प्रारंभी हा दिवस वसंतॠतूच्या संदर्भातच साजरा होत असावा परंतु नंतर हिंदुधर्मशास्त्रकारांनी तसेच पुराणकारांनी वसंतपंचमीच्या उत्सवाशी काही धार्मिक कथा जोडलेल्या आढळतात.

वसंतपंचमीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात. श्रीचा (लक्ष्मीचा) हा जन्मदिवस म्हणून ही श्रीपंचमी असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे श्रीसरस्वतीपूजनोत्सवाचा हा दिवस असल्यामुळे ही श्रीपंचमी, असेही म्हणतात. बंगाली लोक ह्या दिवशी सरस्वतीच्या प्रतिमा पूजतात. सरस्वतीचा नवसही करतात. मुलांचा विद्यारंभ या तिथीपासूनच होतो. काही धर्मशास्त्रकारांच्या मते कामदेव व वसंत ॠतू ह्यांचे निकटचे नाते पुराणांमध्ये वर्णिले असल्याने या दिवशी कामदेव-रतीचीही पूजा व प्रार्थना करावी, अशी प्रथा आहे. तथापि त्याप्रीत्यर्थ खास देवालये नसल्यामुळे लक्ष्मी व विष्णू यांची विविध उपचारांनी पूजा व प्रार्थना करून हा दिवस साजरा करण्यात येतो. आपले पारिवारिक जीवन सुखाचे व समृद्धीचे जावे, यासाठी लोक कामदेव-रतीची पूजा करीत असावेत. काही ठिकाणी वसंतपंचमीला नवान्नेष्टी करतात. शेतातून नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या देवतेला अर्पण करून नंतर भक्षण करावयाच्या असतात.  

वसंतपंचमीच्या दिवशी धार्मिक व्रतविधी फारसे नसतात. ह्या सणाचे लौकिक अंग अधिक ठळकपणे उठून दिसते. वसंत ॠतूत निर्माण होणाऱ्या चैतन्यदायी वातावरणामुळे उल्हसित झालेल्या मनांचा आविष्कार विविध प्रकारच्या मनोरंजक कार्यक्रमांतून व्यक्त होतो. आनंदप्रकटीकरण हाच या सणाचा उद्देश दिसतो. या दिवशी मुलांना कोणाच्याही बागेत जाऊन फळे तोडण्याची मुभा असते. काही ठिकाणी उत्साही मुलेहोळीसाठी लाकडे, गवत वगैरे गोळा करण्यास वसंतपंचमीपासून सुरुवात करतात.  

वसंतपंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. प्राचीन काही वसंत ॠतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती. या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा इ. मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून, रंग व गुलाल उडवून हा वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ॠतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. त्या पानाफुलांनी बहरतात. त्याप्रमाणेच लोकांच्या मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होऊ लागतात. हा उत्सव ह्या संक्रमणस्थितीचा द्योतक आहे. निसर्गसृष्टीप्रमाणेच मानवी जीवनात आनंद व उत्साह वृद्धिंगत व्हावा, या उद्देशानेच हा उत्सव साजरा करण्याची प्रथा असावी. 

दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. राजस्थानमधील राजपुतांमध्ये हा उत्सव विविध प्रकारे उत्साहाने साजरा केला जातो. समाजातील सर्व थरांतील लोक यामध्ये सहभागी होतात. रथसप्तमीच्या (राजस्थानातील ‘भानुसप्तमी’) दिवशी सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते. हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे. फाल्गुन महिन्यातील वसंतोत्सव ‘फाग’ ह्या नावाने ओळखला जातो. फाल्गुन पौर्णिमेला वसंतोत्सव समाप्त होतो.  

पोळ, मनीषा