जैन मंदिर : जैन साधूंना वर्षा ऋतूत हिंसेच्या भीतीने फिरणे शक्य नसे. त्यामुळे ते एका ठिकाणी राहत. सुरुवातीच्या काळात जैन साधू मनुष्यवस्तीपासून दूर असलेल्या गिरिकंदरात राहून तप करीत. नंतरच्या काळात डोंगरात कोरलेल्या लेण्यांमध्येते राहूलागले. ही लेणी म्हणजे जैन मंदिरेच होती. इ. स. पू. दुसऱ्या शतकात ओरिसा राज्यात उदयगिरीवर कोरलेले राणी गुंफा नावाचे जैन लेणे प्रसिद्ध आहे. सर्व भारतात अशी सु. २०० जैन लेणी किंवा गुहामंदिरे आहेत.

शांतिनाथ-मंदिर : झालर पाटण, राजस्थान, सु. ११ वे शतक.

अनेक ठिकाणीजैन साधूंच्या समाधीवर स्तूप किंवा चैत्य बांधलेले असून अशा स्मारकांच्या कडेने दगडी कठडे, नक्षीची प्रवेशद्वारे, दगडी छत्र्या, कोरीव काम केलेले दगडी खांब आणि अनेक पुतळे आढळतात. हीच त्यांची प्राचीन वास्तु-शिल्पकला.

जैनांमध्ये नंदराजांच्या काळी म्हणजे सु. २,५०० वर्षांपूर्वी मूर्तिपूजा सुरू झाली असावी. या मूर्ती मुख्यतः तीर्थंकरांच्या असतात पण त्यांच्या प्रभावळीमध्ये यक्ष, यक्षिणी, गणपती, अंबिका, लक्ष्मी, सरस्वती, शिव, विष्णू यांच्या मूर्तीही परिवारदेवता म्हणून असतात. सर्व तीर्थंकरांच्या मूर्ती सारख्याच असतात पण त्यांच्या सिंहासनांवर त्यांची जी चिन्हे कोरलेली असतात तसेच त्यांच्या सन्निध असलेल्या क्षेत्रपाल, यक्ष, यक्षिणी  व त्यांची वाहने यांवरून ती मूर्ती कोणत्या तीर्थंकराची आहे, हे ठरविता येते. त्यांच्या काही मूर्ती फारच भव्य आहेत. मध्य प्रदेशात चूलगिरी पर्वतावर कायोत्सर्ग अवस्थेतील एक जिनमूर्ती सु. २६ मी. उंच आहे. श्रवणबेळगोळ येथील बाहुबली वा ⇨गोमटेश्वराचा अखंड दगडी पुतळा सु. १८ मी उंच असून तो गंगराज राछमल्ल याचा अमात्य चामुंडराय याने ९८३ उभारला.

जैन मंदिर, कलकत्ता.

जैन मंदिरांची रचना प्रायः हिंदू मंदिरांप्रमाणेच असते. मंदिराच्या आवाराभोवती तटबंदी असून तिच्या अनेक कोनाड्यांतून जैनमूर्ती असतात. प्रवेशद्वार किंवा द्वारमंडप व तेथील तोरण नक्षीकामाने पूर्णपणे व्यापलेले असते. मंदिरासमोर अखंड पाषाणाचे व नक्षीचे ब्रह्मस्तंभ व मानस्तंभ उभे असतात. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्याचा सुशोभित मार्ग असतो. प्रथम आपण देवकुलिकेमध्ये प्रवेश करतो. समोरच अनेक नक्षीदार स्तंभांवर आधारलेला सभामंडप किंवा मुखमंडप असतो. त्यातील छत व भिंती कोरीव किंवा रंगवलेल्या वेलबुट्टीने आणि चित्रांनी भरलेल्या असतात. त्यात जैन पुराणांतील कथा व तीर्थंकरांच्या जीवनातील प्रसंग चित्रित केलेले असतात. त्यानंतर गूढमंडप लागतो. त्याला अंतराळ असेही म्हणतात. तेथून आपण गर्भगृहात (गाभाऱ्यात) जातो. तेथील मूर्तींची षोडशोपचार पूजा होत अते. दिगंबरांच्या मूर्तींना मुकुट व कुंडले नसतात. तसेच त्यांच्या पूजेत हिंसा टाळण्यासाठी फुलेही वापरत नाहीत. श्वेतांबर मात्र फुले वापरतात व मूर्तीच्या नऊ अवयवांची पूजा करतात. दिगंबर फक्त चरणपूजा करतात. काही जैन मंदिरांची शिखरे आमलक (कलाशाकार) पद्धतीची असतात, तर काहींना एक उंच शिखर व बाजूंनी उपशिखरे असतात. उत्तरकालीन जैन मंदिरांवर क्वचित इस्लामी शैलीचा घुमट बांधलेला असतो.

कर्नाटकात ऐहोळे येथील जैनांचे मेघुटी मंदिर ६३४ च्या सुमारास बांधले गेले. ते द्राविडी शैलीचे आहे पण त्यावर गुप्तकालीन शैलीचा प्रभावही पडलेला आहे. विजयानगरकालीन मुडबिद्रिचे चंद्रनाथ मंदिर हा उत्कृष्ट द्राविडी शैलीचा नमुना आहे. जैनांची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे पट्टदकल, हळेबीड, देवगढ, खजुराहो, सोनागिरी, मुक्तागिरी, कुंडलपूर, चितोड, अबूचा पहाड, शत्रुंजय पर्वत, गिरनार, पालिताणा, चंपा, पावापुरी इ. ठिकाणी आहेत.

संदर्भ : Brown, Percy, Indian Architecture, Bombay, 1959.

कोपरकर, द. गं.