पुनरुत्थान : (रिझरेक्शन). ज्यू, ख्रिस्ती व इस्लाम धर्मांतील एक श्रद्धेय संकल्पना. तिचा अर्थ मृतावस्थेतून पुन्हा जिवंत होणे, असा होतो. परमेश्वर आपल्या लोकांना मृतावस्थेतून पुन्हा उठविणार आहे, असे स्पष्ट भाकित ज्यू भविष्यवाद्यांनी व प्रेषितांनी केले आहे (बायबल –यशया २६:१९ होशेय ६: १-२). ज्यू धर्मगुरूंपैकी परोश्यांचा (ख्रिस्तकालीन कर्मठ यहुदी लोकांचा वर्ग) पुनरुत्थानावर विश्वास होता (बायबल – प्रेषितांची २३:८१). येशू ख्रिस्ताने या विश्वासाचा वारंवार उल्लेख केला व स्वतःच्या बाबतीत हे भविष्य खरे होणार, असे सांगितले (बायबल –योहान ६: ४०, ४४ ११: २५). लॅझारस या व्यक्तीला येशूने अनेक लोकांसमक्ष मृतावस्थेतून जिवंत केले (बायबल – योहान ११ : १४–४४). पुनरुत्थानाच्या कल्पनेची ज्यू परंपरा, येशू ख्रिस्ताने स्वतःच्या संदर्भात केलेले पुनुरूत्थानाचा उल्लेख व लॅझारसचे त्याने केलेले पुनरुत्थान यांमुळेच येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले आहे, यावर त्याच्या शिष्यांचा व इतर लोकांचा विश्वास बसला. येशूने पुनरुत्थानानंतर कित्येक व्यक्तींना दर्शन दिले एवढेच नव्हे, तर त्याच्या शिष्यांपैकी सेंट टॉमस (जो पुढे भारतात आला) याने त्याच्या अंगावरच्या जखमांच्या खुणा तपासून खात्रीही करून घेतली, असे मानले जाते.

येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान : एल ग्रेकोचे प्रसिद्ध चित्र, सु. १५८४–९४.

येशू ख्रिस्त वधस्तंभावरून तिसऱ्या दिवशी (रविवारी) परत जिवंत झाल्याचे स्मरण म्हणून ⇨ ईस्टर साजरा करतात. चारही गॉस्पेल्समध्ये ख्रिस्ताच्या मृत्यूचे तसेच त्यानंतर झालेल्या त्याच्या उत्थानाचे व त्याने दिलेल्या दर्शनाचे वर्णन सापडते तथापि पुनरुत्थानाच्या प्रत्यक्ष घटनेबाबत मात्र कोठेच वर्णन नाही. ‘येशू मेलेल्यांतून सदेह उठला आहे’, ह्या विश्वासाचे प्रतिबिंब नव्या करारातील प्रत्येक पानावर दिसते.

येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासंबंधीचा वाद त्या घटनेपासूनच सुरू आहे (बायबल– प्रेषिताची कृत्ये २३) तथापि पुनरुत्थानाच्या घटनेमुळेच येशूच्या शिष्यांना धैर्य प्राप्त झाले व ते अनन्वित अत्याचार सहन करू शकले. सेंट पॉलने याच घटनेला ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू मानले आहे व याच केंद्रबिंदूभोवती ख्रिस्ती धर्माची उभारणी झाली आहे.

इस्लाम धर्मातही ‘अल्-कियाम’ वा ‘कियामत’च्या दिवशी सर्व मृतात्मे आपापल्या कबरींतून बाहेर येऊन आपापल्या पापपुण्याचा पाढा ईश्वराजवळ वाचतील व त्याप्रमाणे त्यांना गती प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पहा : निवाड्याचा दिवस.

संदर्भ : Bowen, C. The Resurrection of Jesus, 1911.

आयरन, जे. डब्ल्यू.