सुफलताविधि : जननक्षमता, सुपीकता वा प्रसवशक्ती वृद्घिंगत व्हावी, म्हणजेच सुफलन व्हावे, ह्या हेतूने निरनिराळ्या मानवी समाजांत त्या त्या समाजाच्या धर्मकल्पनांचे वलय असलेले काही धार्मिक विधी केले जातात त्यांना सुफलताविधी असे म्हणतात. जननक्षमतेचा संबंध विपुल संततीशी असतो. अनेक मुलांना जन्म देण्याची स्त्रीची क्षमता कृषिव्यवसाय करणाऱ्या समाजांत अनेकदा प्रतिष्ठेची बाब मानली जाते कारण अनेक मुले जन्माला येणे म्हणजेच शेतांवर काम करण्यासाठी मोठी श्रमशक्ती निर्माण होणे. ह्या मानवी श्रमशक्तीची शेतकऱ्यांना जशी नितान्त गरज असते, तशीच पशूंच्या श्रमांचीही असते. शिवाय पशूंपासून जसे कष्ट करुन घेता येतात, तसेच त्यांच्यापासून दूध, मांस ह्यांसारखे अन्नपदार्थही मिळविता येतात. म्हणून जनावरेही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली पाहिजेत. असे असले, तरी शेतीपासून मिळणाऱ्या धान्यरुपी उत्पादनाचा मूलस्रोत जमीन हा आहे. भूमीची सुपीकता वा प्रसवक्षमता जेवढी मोठी, तेवढीच तिच्यापासून निर्माण होणारी धान्यनिर्मितीही मोठी असण्याची शक्यता असते. ह्यातूनच काही पुराणकथांमध्ये पृथ्वीमातेची (अर्थ मदर) कल्पना सुफलतेशी निगडित केलेली आहे. तेथे पृथ्वी ही आकाशपुरुषाची पत्नी आहे. आरंभी आकाशपुरुष तिला सुफलित करतो आणि त्यानंतर भूमीवर निर्मिती झालेली दिसते. जमिनीची सुपीकता, स्त्रियांकडून होणारे प्रजनन आणि विपुल अन्नपुरवठा ह्यांवर सत्ता असणाऱ्या काही देवता मानल्या गेल्या आहेत. उदा., सेदना ही एस्किमोंची देवता. एस्किमोंच्या जमातीकडून जर काही पापे घडली, तर ही देवता त्या जमातीला अन्नासाठी आवश्यक असणारा समुद्री प्राण्यांचा पुरवठा थांबवते, अशी ह्या जमातीची समजूत आहे. भारत, यूरोप, आफ्रिका आणि जगाच्या इतर भागांतही संतती व्हावी, ह्यासाठी त्याबाबतीत निरांश असलेल्या स्त्रिया विविध स्त्रीदेवतांची उपासना करतात.

प्राचीन ग्रीसमध्ये थॅस्मोफोरिआ ह्या नावाचा खास स्त्रियांचा असा एक वार्षिक उत्सव असे. नांगरणी आणि पेरणी करण्याच्या काळात हा उत्सव होई, हे लक्षणीय आहे. धान्याची देवता डीमीटर आणि तिची कन्या पर्सेफोनी ह्यांच्या सन्मानार्थ हा उत्सव होई. पिकांची आणि स्त्रियांची सुफलता हा ह्या उत्सवाचा विषय असे. हा उत्सव तीन दिवस चाले. पहिल्या दिवशी स्त्रिया डीमीटरच्या पवित्र उपवनात जात. तिथे त्या पुरुषांच्या पूर्ण दृष्टिआड राहत आणि काही प्राथमिक विधी करीत. दुसऱ्या दिवशी त्या उपवास करीत आणि विनीतभावाने जमिनीवर बसून राहत. मुख्य विधी होण्याआधी आत्मशुद्घी करण्याचा हेतू ह्यामागे असण्याचा संभव आहे. तिसऱ्या दिवशी भरगच्च डाळिंबाचे दाणे खाणे, अश्लील थट्टामस्करी असे प्रकार चालत. ह्यांतून सुफलतेचा, गर्भधारणेचा प्रतीकार्थ प्रकट केला जाई. डुकरांची पिले मारुन त्यांचे काही भाग शिजवून खाल्ले जात. मात्र काही विशिष्ट अवयव भूमीवरील खोल खड्डयात फेकले जात. गव्हाच्या पिठाचे सर्पाकृती किंवा पुरुषाच्या इंद्रियाच्या आकाराचे केकही ह्या खड्ड्यांत फेकले जायचे. ह्या आहुती होत. नंतर कॅलिजेनिआ ह्या देवतेस आवाहन केले जाई. ‘सुजन्म’ हा तिच्या नावाचा अर्थ. अन्य स्त्रिया टाळ्या वाजवीत असताना काही स्त्रिया त्या खड्ड्यांत उतरुन आदल्या वर्षी खड्ड्यांत सोडलेल्या आहुतींचे कुजलेले अवशेष वर आणीत. ते समारंभपूर्वक देवीच्या वेदीवर ठेवले जात. हे अवशेष शेतकऱ्याने जर आपल्या बियाण्यात मिसळले, तर त्याच्या शेतात उत्तम पीक येते, अशी समजूत होती.

फ्रोडाइटी ही ग्रीक देवता मुळात सुफलतेची देवता होती. बाल्टिक धर्मात पीर कॉन्स हा देव सुफलतेचा देव होता. तो शेतकऱ्यांसाठी पाऊस आणतो, ही समजूत होती. व्हर्गो हीसुद्घा सुफलतेची एक देवता. अनेक प्राथमिक स्वरुपाच्या आदिम धर्मांत लिंगाची वा योनीची पूजा प्रचलित असल्याचे दिसते. ही पूजा म्हणजे स्त्री-पुरुषांची प्रजोत्पादन करण्याची क्षमता, तसेच निसर्गाची सुफलता आणि सर्जन ह्यांचे प्रतीक आहे.

ॲझटेक, ईजिप्शियन, फिनिश, जर्मनिक इ. अनेक संस्कृतींमध्ये सुफलतेची स्वाभाविक आकांक्षा आणि तिच्याशी संबंधित असे विधी आढळतात. भारतात हिंदू संस्कृतीत हत्तीला फार महत्त्वाचे स्थान आहे. काळ्या, पावसाळी ढगासारखा दिसणारा हत्ती भूमी सुफल करणारा पाऊस आणतो अशी समजूत आहे. सुफलतेसाठी उगाळलेल्या चंदनाने हत्तीचे चित्र काढून त्याची मिरवणूक काही ठिकाणी काढतात. अशा मिरवणुकांतून पुरुष स्त्रियांचा पोषाख घालून काही अश्लील शब्द उच्चारतात. सुफलतेची सुप्त शक्ती जागृत करण्याचा हा विधी असणे शक्य आहे.

कुलकर्णी, अ. र.