आदम व ईव्ह

आदम व ईव्ह : बायबलमधील जेनेसिस ह्या भागात सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन आलेले आहे. ईश्वराने प्रथम मातीचा एक मनुष्य घडवून त्याच्या कुडीत प्राण ओतला (जेने. २.७). ह्या आद्य पुरुषाचेच नाव ‘आदम’ (आदाम) होय. हिब्रू भाषेत ‘आदम’ म्हणजे ‘पुरुष’. आदमची सहचरी ईव्ह. हिच्या निर्मितीबाबत बायबलमध्ये दोन वृत्तांत आहेत : (१) आदम व ईव्ह ह्या दोघांनाही ईश्वराने एकदमच निर्माण केले. (२) ईश्वराने आदमला गाढ निद्रा लावून, त्याची एक फासळी काढून घेतली आणि तिच्यापासून जी स्त्री बनविली, तीच ईव्ह होय. काही भाष्यकारांच्या मते विवाहसंस्थेचे मूळ या वृत्तांतात सापडते. हिब्रू भाषेतील‘हव्वा’ या शब्दापासून ‘ईव्ह’ हा शब्द आला. युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांच्या दुआबातील ईडन-नंदनवनात आदम व ईव्ह होते पण सर्परूपी सैतानाने प्रवृत्त केल्यामुळे ईव्हने ईश्वरी आदेश मोडून पापपुण्याचे ज्ञान देणाऱ्या तेथील वृक्षाचे अर्धे फळ स्वतः खाल्ले व अर्धे आदमला दिले. अशा प्रकारे ईश्वरी आदेशाचा भंग केल्यामुळे मनुष्याच्या पापमय जीवनास आरंभ झाला. इस्लाम धर्मात आदम हा मानवजातीचा जनक व आद्य प्रेषित मानला आहे.

आयरन, जे. डब्ल्यू. (इं.); साळवी, प्रमिला (म.)