विवाहविधि : मनुष्याच्या जीवनात, त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत क्रमाने येणारे विशिष्ट टप्पे आपापल्या धार्मिक श्रद्धेनुसार विविध धार्मिक संबद्ध करण्याची निरनिराळ्या धार्मिक-सांस्कृतिक लोकसमूहांची प्रवृत्ती असते. विवाह हा व्यक्तीच्या जीवनातील असाच एक महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे कोणत्या-ना कोणत्या तरी स्वरुपात असतातच. आपापल्या धर्मांच्या अधिष्ठानी असलेल्या देव-देवतांचा आशीर्वाद आपल्या विवाहाला मिळावा, हा धार्मिक विवाहविधींनुसार विवाह करणाऱ्या व्यक्तींचा हेतू असतो. विवाहविधी हे जसे पूर्णतः धार्मिक असू शकतात. संबंधित शासकीय कार्यालयात जाऊन केला जाणारा नोंदणी पद्धतीचा विवाह हा तर सर्वस्वी कायद्याच्या कार्यपद्धतीवर आधारलेला असून तो पूर्णतः लौकिक स्वरूपाचा म्हणता येईल. विवाहाला कायद्याची मान्यता आवश्यकच असली, तरी समाजाची मान्यता असणेही महत्त्वाचे मानले जाते. विवाह ही एक सामाजिक यंत्रणा असून तिच्या आधारे विवाहित दांपत्याच्या संततीचे समाजाशी असलेले नाते निश्चित होत असते. विवाहाला समाजमान्यता प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने विवाह हा समाजाच जाहीर व्हावा लागतो म्हणून विवाह हा सामान्यतः निमंत्रितांच्या समोर करण्याची प्रथा आहे.

विवाह करणाऱ्या व्यक्ती अविवाहितपणाच्या स्थितीतून विवाहितपणाच्या नव्या स्थितीत प्रवेश करीत असतात. म्हणून विवाह हे एक स्थित्यंतर आहे. जीवनात विवाहासारखी जी महत्त्वाची स्थित्यंतरे घडून येत असतात,. त्यांच्या दरम्यानच्या काळातही काही विधी केले जातात. त्यांना ‘स्थित्यंतराच्या मार्गावरील विधी’ (‘राइट्स ऑफ पॅसेज’) असे म्हटले जाते. त्या त्या समाजाच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि संकेत ह्यांनुसार ह्या विशिष्ट विधींचे स्वरुप वेगवेगळे असू शकते. वाङ्निश्चय वा वाग्दान, सीमांतपूजन आणि मधुपर्क हे हिंदू विवाहापूर्वी होणारे विधी संस्कृतीतील अशा प्रकारचे विधी म्हणता येतील. विवाहासाठी वधूगृही येणाऱ्या वराची पूजा वधूपित्याने गावाच्या सीमेवर करण्याचा विधी म्हणजे सीमांतपूजन. कायदेशीर हुडांबंदी येण्यापूर्वी वरपित्याला हुंड्याची रक्कम ह्याच वेळी दिली जात असे. विवाहाचा एक आर्थिक पैलू ह्या विधीत समाविष्ट होता.

विवाहविधींचा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. त्यांतील विधीही गुंतागुंतीचे वा अत्यंत साधे असू शकतात. तथापि बहुतेक धार्मिक विधींप्रमाणेच विवाहविधींचेही एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांची  प्रतीकात्मकता हे होय. ही प्रतीकात्मकता अनेक प्रकारची असू शकते. उदा., स्त्री-पुरुषांचे शारीरिक संबंध नियमित करण्याबरोबरच प्रजोत्पादन हा विवाहाचा एक मुख्य हेतू होय. प्रजोत्पादन आणि वंशसातत्य ह्यांचे महत्त्व सर्व मानवी समाजांना वाटत आलेले आहे. हिंदू विवाहात ऐरणीदान म्हणून एक विधी असतो. वधू आपल्या आई वडिलांच्या घरातून वराच्या घरी जाण्यास निघताना हा विधी करतात. जळते दिवे ठेवलेल्या वेळूच्या मोठ्या परडीतून वरमातेला विविध वस्तू दान करण्याचा हा विधी असतो. वेळूच्या म्हणजे वंशवृक्षाच्या द्वारा वराचा वंश पुढे चालत राहावा, ही इच्छा त्यातून सूचित होते. मुद्दाम मारून ठेवलेल्या काही गाठी सोडवणे ही क्रियाही काही विवाहविधींमध्ये आढळते. विवाहानंतर होणाऱ्या अपत्याचा जन्म सुलभपणे व्हावा, म्हणून ही प्रतिकात्मक क्रिया केली जाते. वधूवरांना त्यांच्या संसारात अन्नधान्याची तूट पडू नये, तसेच संततिसौख्य लाभावे ही सदिच्छा त्यांच्या मस्तकांवर उधळल्या जाणाऱ्या तांदळाच्या अक्षतांतून व्यक्त केली जाते. एक घर उभे करणे, हा विवाहामागचा एक हेतू असतो, हे ज्यूंच्या विवाहविधीतील एका क्रियेतून दाखविले जाते. त्यांचा विवाहविधी एका छताखाली वा चांदव्याखाली केला जातो. हा चांदवा म्हणजे घराचे प्रतीक असते. विवाह हे एक पवित्र बंधन आहे, हे दर्शविणाऱ्या काही विधींचाही प्रतीकात्मकतेच्या संदर्भात निर्देश करता येईल : वधूवरांनी परस्परांच्या हातात हात देणे, त्यांनी परिधान केलेलल्या वस्त्रांची एक गाठ मारणे, त्यांनी एकमेकांना अंगठ्या देणे इत्यादी. ब्रह्मदेशातील बौद्ध विवाहविधीत वधूवरांनी परस्परांचे हात एकमेकांत गुंतवून ते एका वाडग्यातल्या पाण्यात बुडवायचे असतात. त्यांच्यातील एकात्मता पाण्याप्रमाणेच अभंग राहावी, अशी भावना ह्या विधीमागे असते.

विवाहामुळे व्यक्तींमध्ये जे एक सामाजिक स्थित्यंतर घडत असते, त्याचा एक भाग म्हणजे विवाह करणाऱ्या स्त्री-पुरुषांपैकी एक वा कधीकधी दोघेही आपल्या जुन्या कुटुंबाचा त्याग करून नव्या कुटुंबाची उभारणी करीत असतात. जुन्या कुटुंबापासून विवाहितांचीविशेषतः स्त्रियांचीही जी फारकत होते, ती काही प्रतिकात्मक क्रियांमधून व्यक्त केली जाते. उदा., काही विवाहांच्या प्रसंगी वरपक्षाकडील मंडळी आणि वधूपक्षाकडील लोक ह्यांच्यात लुटुपुटीच्या लढाया खेळल्या जातात. विवाहाची वरात वा मिरवणूक अजविणे, मडकी किंवा काचेचा चषक फोडणे ह्या क्रियाही फारकत दर्शविणाऱ्या होत.

भुतेखेते, काळी जादू, कमनशीब अशा अनेक अतिमानुष शक्तींमुळे वैवाहिक जीवनात संकटे येतात, अशी अनेकांची श्रद्ध असते. ही संकटे टाळण्यासाठी काही काळजी घेण्यात येते. विवाह हा सुमुहूर्तावर झाली पाहिजे असा सामान्यतः प्रयत्न असतो. त्यात विवाहासाठी काही वेळा शुभ्र, तर काही अशुभ असतात हे गृहीत घरलेले असते. ऋग्वेदातील उल्लेखांवरून असे दिसते, की चंद्र मघा नक्षत्रांत असेल तेव्हा विवाह करावा, तसेच रोहिणी, मृगशीर्ष, उत्तरा, स्वाती आणि फाल्गुनी ही नक्षत्रे विवाहाला शुभ असल्याचे बौधायनाने सांगितले आहे. विवाहविधी घटिकापळांच्या हिशेबात एका विशिष्ट टप्प्याला येईपर्यंत वधूवरांनी एकमेकांचे दर्शन घेऊ नये, असा संकेत काही समाजांत पाळला जातो. तसेच लग्नांनंतर काही काळ विवाहित दांपत्याने शरीरसंबंध ठेवू नयेत, असा दंडकही काही समाजांत आढळतो. हिंदू विवाहात विवाहाच्या रात्री वधूला ध्रुवाचा आणि अरुंधतीचा तारा दाखविला जातो. ‘माझा पती जिवंत राहो आणि मला अपत्यांची प्राप्ती होवो,’ असे वधूने ह्यावेळी म्हणवयाचे असते. अथर्ववेदाच्या चौदाव्या कांडातील विवाहमंत्र गर्भसंभव, गर्भवतीच्या गर्भाचे संरक्षण, पुत्रप्राप्ती इत्यादींसाठी रचलेले आहेत.

गोंगाट करणे, बंदुकीचे बार काढणे, एखादे शस्त्र परजणे, वधूवरांवर पाणी शिंपडणे, अग्नी पेटवणे, मशाली नाचवणे, वराचा मुक्काम असलेल्या जागेला वा चर्चला प्रदक्षिणा घालणे, वधूवरांनी खाण्यापिण्याच्या आणि इतर काही कृतींच्या बाबतींत काही काळ स्वतःवर निर्बंध घालून घेणे ह्या क्रियाही वैवाहिक जीवनातील संकटे टाळण्यासाठी केल्या जातात. विवाहसमारंभात सहभागी होणाऱ्या काहींनी विरुद्धलिंगी व्यक्तींचेस्त्रियांनी पुरुषांचे आणि पुरुषांनी स्त्रीयांचेपोशाख करणे, काहींनी आपले चेहरे रंगवणे हे प्रकारही ह्याच हेतूने केले जातात, असे मानले जाते.

काही संख्या अशुभ असतात, असा समज असल्यामुळे एखाद्या अचेतन वस्तूशी विवाह केला जातो. उदा., दुसरे लग्न दुर्दैवी ठरते, अशी समजूत असलेला विधुर आपले दुसरे लग्न एखाद्या अचेतन वस्तूशीउदा., एखाद्या फुलाच्या गुच्छाशी, तलवारीशी-करतो. त्यानंतर एखाद्या स्त्रीशी त्याचा होणारा विवाह हा त्याचा तिसरा विवाह ठरतो.

वैवाहिक जीवनात स्त्रीचे वा पुरुषाचे वर्चस्व दाखविणारे काही विधी असतात. वराला भेट म्हणून चाबूक दिला जाणे, वराने वधूच्या कानांवर गुद्दे लगावण्याचा अभिनय करणे हे त्यांतील काही. वधूचे वरावरील वर्चस्व व्यक्तविणारे अशाच प्रकारचे काही विधी असतात. उदा., वधूने पल्याणावर वा खोगीरावर बसून घोड्यावरून रपेट करणे. त्यातून तिची नवऱ्यावर सत्ता प्रस्थापित होईल, अशी समजूत व्यक्त होते.

काही विशिष्ट विधी झाल्याखेरीज विवाहाची परिपूर्ती झाली, असे मानले जात नाही. हिंदूंमध्ये ‘सप्तपदी’ झाल्याखेरीज विवाह पूर्ण होत नाही. ह्या विधीत वर वधूला त्याच्यासह सात पावले टाकावयास सांगतो. अग्नीच्या उत्तरेकडे हा विधी करतात. तांदळांच्या सात पुंज्या घातलेल्या असतात. वर तिला त्या सातही पुंज्यांवरून तिच्या उजव्या पावलाने चालण्यास सांगतो. दक्षिण अमेरिकेतील मुंडुरुक जमातीत वर त्याने केलेली शिकार आपल्या जवळच्या नात्यातल्या कोणा स्त्रीकडे आणून देण्याऐवजी ती आपल्या वधूकडे आणून देतो. हे झाल्यानंतर त्या दोघांचा विवाह झाल्याचे मानले जाते. ज्यू विवाहविधी हा राबींचे भाषण आणि काचेचा चषक फोडण्याचा विधी झाल्यावर पूर्णत्वास जातो.

विवाहविधींमधील प्रतिकात्मकता ही बरीच वैविध्यपूर्ण असून विवाहाचे विविध पैलू सामावून घेणारी आहे. विवाहसंस्थेशी संबद्ध अशा बाबींवर ती प्रकाश टाकत असल्यामुळे विवाहविधींची प्रतिकात्मकता मानवशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेते. तथापि ही प्रतिकात्मकता अनेकदा संदिग्ध असते आणि मानवशासत्रज्ञ तिच्यातून निश्चित स्वरूपाच्या कल्पना शोधू पाहतात. त्यामुळे तिचा अर्थ लावण्यात काही वेळा चूक होऊ शकते. ह्या संदिग्धतेमुळे निरनिराळ्या विवाहविधींचा अर्थ अनेक प्रकारे लावण्यात येतो.

कुलकर्णी, अ. र.


 खिस्ती विवाह : वधूवरांच्या मस्तकी फुलांच्या माळा घाळण्याचा विधी.                                                                   बौध्द विवाहातील साक्षगंधा - विधी

पारंपारिक हिंदु विवाहातील एक दृश्य                                           हिंदु विवाहविधीतील सप्तपदी.