ऑगस्टीन,सेंट : (१३ नोव्हेंबर ३५४–२८ ऑगस्ट ४३०). एक ख्रिस्ती संत. लॅटिन अथवा रोमन चर्चच्या चार श्रेष्ठ धर्मगुरूंपैकी (फादर्सपैकी)

सेंट ऑगस्टीनतो एक होता. त्याचा जन्म न्युमिदिया म्हणजे सध्याच्या अल्जीरियातील तागॅस्ती येथे झाला. ऑरीलियस ऑगस्टायनस हे त्याचे लॅटिन नाव. त्याचे वडील पॅट्रिशिअस हे पेगनधर्मीय होते, तर आई मोनिका ही ख्रिस्ती धर्माची कट्टर अनुयायी होती. कार्थेज येथे त्याचे उत्तम प्रकारे शिक्षण झाले. काही काळ त्याने भौतिक-द्वैतवादी विचारसरणी असलेला मणिसंप्रदायही (मॅनिकेइझम) स्वीकारला होता तथापि ह्या संप्रदायाची मते त्याला पटली नाहीत. तसेच फॉस्टस ह्या संप्रदायप्रमुखाशीही त्याचे न पटून त्याने हा संप्रदाय सोडून दिला. यानंतर त्याने काही काळ कार्थेज येथे साहित्यावर व्याख्याने दिली. नंतर तो इटलीत मिलान येथे गेला. तेथे साहित्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली. सिसेरोच्या हॉर्टेन्शस ह्या ग्रंथाच्या वाचनामुळे त्याचा दृष्टिकोन सर्वस्वी बदलला आणि तो तत्त्वज्ञानाकडे वळला. इटलीतील त्याच्या वास्तव्यात तो संशयवादाकडून नव-प्लेट मताकडे वळला आणि नंतर नव-प्लेटोमताच्या अभ्यासातूनच तो ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाला. मिलान येथे सेंट अँब्रोझच्या संपर्कात तो आला आणि ३८७ मध्ये त्याने अँब्रोझकडून ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. यानंतर तो आफ्रिकेत आपल्या जन्मग्रामी आला. ३९१ मध्ये त्याची हिप्पो (सध्याचे बोना) येथील धर्मोपदेशक (प्रिस्ट) म्हणून नेमणूक झाली. ३९५ मध्ये तो तेथील धर्मगुरूचा (बिशप) साहाय्यक म्हणून नियुक्त झाला आणि ३९६ मध्ये तो हिप्पोचा धर्मगुरू झाला. हिप्पो येथेच त्याने यानंतरचे आपले सर्व जीवन व्यतीत केले.

त्याच्या विद्वत्तेची व धार्मिक विचारांची लवकरच सर्व ख्रिस्ती जगात कीर्ती पसरली. त्याने विपुल लेखन केले आहे. लॅटिन साहित्यातील महत्त्वाच्या साहित्यिकांत त्याची गणना केली जाते. तत्कालीन रूढीला अनुसरून त्याने आपले सर्व लेखन लॅटिन भाषेत केले असून त्यातील महत्त्वाच्या लेखनाची इंग्रजीत व इतर यूरोपीय भाषांत भाषंतरेही झाली आहेत. त्याची २२० पत्रे, २३० पदे आणि अनेक धार्मिक प्रवचने हे स्फुट लेखन संग्रहित केले गेले. या स्फुट लेखनाव्यतिरिक्त त्याने Confessions (३९७- ४०१, इं. शी. कन्फेशन्स) हा आध्यात्मिक अनुभव व्यक्त करणारा आत्मचरित्रपर ग्रंथ लिहिला आहे. ह्या ग्रंथाची गणना जगातील अभिजात साहित्यात केली जाते. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेईपर्यंतचे (३८७ पर्यंतचे) त्याचे आत्मचरित्र त्यात आले आहे. आणखी त्याचे दोन महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे De civitate Dei (४१३-४२६, इं. शी. द सिटी ऑफ गॉड) व De Trinitate (४००-४१७, इं. शी. ऑन द ट्रिनिटी) हे होत. यांपैकी पहिल्या ग्रंथात त्याने जगाच्या इतिहासाचे सार व कॅथलिक चर्चचे स्वरूप यांबाबत आपले विचार मांडले आहेत, तर दुसऱ्यात त्याने ईश्वराच्या स्वरूपाबाबतचे विवेचन केले आहे. समतोल शैलीचा त्याच्या ग्रंथात परमोत्कर्ष आढळतो. मानवी हृदयाला स्पर्श करून धार्मिक भावना जागृत करण्याचे त्याच्या लेखणीतील सामर्थ्य अन्यत्र क्वचितच पहावयास मिळते. तत्त्ववेत्ता व ईश्वरविद्यावेत्ता अशा दोन्हीही भूमिकांतून त्याची योग्यता मोठी मानली जाते. त्याने आपल्या ईश्वरविद्येत नव-प्लेटोमताचा आणि ख्रिस्ती धर्माचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.

एक थोर विचारवंत आणि ख्रिस्ती धर्माच्या आरंभीच्या काळातील एक थोर ईश्वरविद्यावेत्ता म्हणून ऑगस्टीन प्रसिद्ध आहे. तत्कालीन ईश्वरविद्या आणि तत्त्वज्ञान यांतील सर्वच महत्त्वाच्या समस्यांचा त्याने ऊहापोह केलेला आहे. ख्रिस्ती तत्त्वज्ञानात त्याचे विचार अनेक शतके प्रभावी व मार्गदर्शक ठरले. तत्कालीन अभिजाततावादाचा प्रभाव त्याच्यावर असला आणि त्याने त्यातील परिभाषाही आपल्या लेखनात वापरली असली, तरी त्याच्या विचारसरणीचे अधिष्ठान ख्रिस्ती धर्मश्रद्धा हेच आहे. ह्या धर्मश्रद्धेतूनच त्याने नीतिशास्त्र, ज्ञानमीमांसा, सत्ताशास्त्र, इतिहासाचे तत्त्वज्ञान इत्यादींबाबतची आपली मते मांडली आहेत. ख्रिस्ती धर्मातील ‘त्रयी सिद्धांत’ (डॉक्ट्रिन ऑफ ट्रिनिटी) हा त्याच्या तत्त्वज्ञानाचा गाभा होय. त्याने आपल्या De Trinitate ह्या प्रसिद्ध ग्रंथातही हा ‘त्रयी सिद्धांत’च मूलभूत मानला आहे. त्याची विचारसरणी ऑगस्टीनवाद म्हणून ओळखली जाते.

संदर्भ : 1. Bonner, G. St. Augustine-Life and Controversies, London, 1963.

            2. Gilson, E. Trans. Lynch, L. E. M. The Chiristian Philosophy of Saint Augustine, London, 1961.

            3. Ryan, J.K. Trans. The Confessions, New York 1960.

सुर्वे, भा. .