महर्षी दयानंद सरस्वती

दयानंद सरस्वती : (? १८२४–३० ऑक्टोबर १८८३). आधुनिक वेदमहर्षी, निर्भय धर्मसुधारक, महापंडित, कुशल संघटक व आर्यसमाजाचे संस्थापक. काठेवाडमधील मोरवी राज्यातील टंकारा या गावी दयानंदांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करसनजी तिवारी असे होते. हे पिढिजात सावकार व जमीनदार होते. तसेच ते महसूल खात्यात मोठे सरकारी अधिकारीही होते. करसनजी हे सामवेदी औदिच्य ब्राह्मण होते. ते शैवपंथी होते. समाजात त्यांना बराच मान होता. अशा कुलीन कुळात दयानंद जन्मले. त्याचे नाव मूलशंकर असे ठेवण्यात आले. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी संस्कृत ग्रंथांच्या अभ्यासास सुरुवात केली. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी वेदाध्ययनास प्रारंभ केला. सामवेदी असूनही त्यांनी प्रथम शुक्‍ल यजुर्वेदाचे अध्ययन केले चौदाव्या वर्षी त्यांनी वेदाध्ययन पूर्ण केले. मुंजीनंतर त्यांनी शैल पंथाची दीक्षा घेऊन पार्थिवपूजा स्वीकारली. अतर वेदांतील काही भाग आणि संस्कृत व्याकरणाचे ग्रंथ यांचेही अध्ययन केले.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल होण्याचा काळ आला. शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जागरण करीत असता, शिवाच्या पिंडीवर उंदीर फिरताना त्यांनी पाहिला व देव म्हणजे मूर्ती नाही, हे त्यांना उमगले. वडिलांना त्यांनी हा प्रश्न विचारला पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. देव आणि धर्म यांच्यासंबंधी विचारांना मात्र चालना मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची धाकटी बहीण व प्रेमळ चुलते अंबाशंकर यांचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला. मृत्यूच्या भीतीतून सोडविणारा मोक्ष कसा मिळेल याचाच मूलशंकर सतत विचार करू लागले. अनेकांना त्यांनी या संबंधी प्रश्न विचारले. योगाभ्यास केल्याशिवाय याचे उत्तर मिळणार नाही, हे त्यांना समजले. मुलाच्या मनात वेगेळेच विचार चालले आहेत हे लक्षात येताच वडिलांनी त्यांच्या विवाहाचा घाट घातला परंतु हे समजताच मूलशंकरांनी १८४५ मध्ये गृहत्याग केला, तो कायमचाच.

मूलशंकर संन्याशांच्या समूहात दाखल झाले. तेथे ब्रह्मचर्याची दीक्षा घेऊन त्यांनी ‘शुद्ध चैतन्य’ हे नाव धारण केले. यानंतर त्यांनी सु.पंधरा वर्षे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटन केले. अनेक संन्याशांची, ज्ञानी पुरुषांची त्यांनी भेट घेतली तसेच अनेक शास्त्रांचे सखोल ज्ञान संपादन केले आणि ते त्यांनी तपासूनही पाहिले. तांत्रिक आचार, कर्मकांड, मूर्तिपूजा, अज्ञानमूलक धर्माचरण, अंधश्रद्धा इ. अनेक गोष्टींचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले. पूर्णानंद नावाच्या स्वामींपासून त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली व दयानंद सरस्वती हे नाव धारण केले. १८६० साली मथुरेस अत्यंत चिकित्सक व ज्ञानी असलेल्या स्वामीविरजानंद या अंध गुरूकडे ते आले. विरदानंदांजवळ ते तीन वर्षे राहिले. याच काळात त्यांच्या धार्मिक व सामाजिक सुधारणेच्या विचारांचा पाया विरजानंदांशी विचारविनिमय होऊन घातला गेला व पुढील अनेकविध सुधारकिय कार्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली.

यानंतर दयानंदांनी पुन्हा भारतभर परिभ्रमण केले. यावेळी त्यांनी मूर्तिपूजा, रूढिप्रियता, जन्मतः जातिभेद, हिंसात्मक यज्ञ इ. गोष्टींवर टीका करणारी अनेक व्याख्याने दिली. दयानंद हे केवळ संहिता ग्रंथांनाच वेद मानत. कारण त्यांत जन्मसिद्ध जातिभेदास आधार नाही. वेदांचा आधार घेऊन त्यांनी नवे विचार मांडण्यास सुरुवात केली. अस्खलित संस्कृतात शास्त्रीपंडितांबरोबर त्यांनी वादविवाद केले. १८६९ साली काशीला पंडितांबरोबर शास्त्रार्थ केला. दयानंदांचा उदात्त हेतू लक्षात न घेता पंडितांनी केवळ शब्दप्रामाण्याच्या आधारावर त्यांना उत्तरे दिली. यानंतर दयानंदांनी प्रयाग, कलकत्ता, मुंबई, पुणे इ. ठिकाणी व्याख्याने देऊन आपले नवे धर्मसुधारणेचे विचार प्रभावीपणे मांडले. त्यामुळे केशवचंद्र सेन, लोकहितवादी, न्या. रानडे यांसारख्यांनी त्यांची स्तुती केली. आपल्या विचारांना मूर्तस्वरूप देण्यासाठी १८७५ साली मुंबई येथे त्यांनी ⇨आर्यसमाजाची स्थापना केली. आपल्या वैदिक धर्मविचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश इ. प्रांतात दौरे केले व हिंदीभाषेत व्याख्याने देऊन धर्मजागृती केली.


आर्यसमाजाच्या प्रचारासाठी त्यांनी ग्रंथलेखनास प्रारंभ केला. दयानंद हे कट्टर वेदनिष्ठ होते. त्यांनी यजुर्वेद  व ऋग्वेद  यांवर संस्कृतात भाष्ये लिहिली. ऋग्वेदाच्या काही भागावर भाष्यही केले. पण त्यांचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सत्यार्थप्रकाश  हाच होय. यात त्यांनी वेदांतील ज्ञानभांडार हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडले. सत्यार्थप्रकाश हा आर्यसमाजाचा प्रमाणग्रंथ समजला जाऊ लागला. दयानंदांनी याशीवाय संस्कारविधि, पंचमहायज्ञविधि, गोकरुणानिधि  इ. ग्रंथ लिहून आपले विचार जनतेसमोर मांडले. त्यांत त्यांनी शुद्ध वैदिक धर्माचे स्वरूप स्पष्ट केले, पाखंडी मतांचे खंडन केले, रूढीव भ्रममूलक कल्पनांचा निषेध केला, मूर्तीपूजेचा धिक्कार केला, स्त्रियांना व शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार आहे हे सिद्ध केले, स्त्रीशिक्षणास प्रोत्साहन दिले, जातिभेदावर टीका केली व ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी इ. धर्मांतील दोष उघड करून दाखविले.

दयानंदांच्या धर्मविचारांनी प्रभावित झालेले ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ चे संस्थापक ऑलकट यांनी १८७९ मध्ये दयानंदांची सहारनपूर येथे भेट घेतली व एकत्र कार्य करण्याची योजना ठरली. थिऑसॉफिकल सोसायटीच्या श्रीमती ब्‍लाव्हॅट्‌स्की यांनीही दयानंदांसंबंधी प्रशंसोद्‍गार काढले. तथापि या दोन संस्थांचे एकीकरण होऊ शकले नाही. ब्राह्मोसमाज, प्रार्थना समाज यांतीलही कार्यकर्ते दयानंदांकडे आकृष्ट झाले पण तेही समाज आर्यसमाजात मिसळू शकले नाहीत. दयानंदांनी आपल्या आर्यसमाजाचे संघटन अत्यंत चिकाटीने व प्रभावीपणे केले. आर्यसमाजातर्फे त्यांनी वैदिक पाठशाळा काढल्या. फिरोजपूर येथे अनाथाश्रम उघडला. ठिकठिकाणी आर्यसमाजाच्या शाखा त्यांनी उघडल्या. जाति–पंथ–भाषा इ. कोणतेही भेद लक्षात न घेता कोणालाही आर्यसमाजाचे सदस्य होता येत असे. आर्यसमाजाच्या सदस्यांसाठी नियम तयार केले गेले. दर रविवारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वेदाध्ययन केले पाहिजे. प्रत्येकाने रोज संध्या, होम, गायत्री जप व वेदपाठ या गोष्ठी अवश्य केल्या पाहिजेत. या गोष्टी करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते. ब्रह्मचर्य, सत्य, भक्ती, तप इ. प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. सर्व सत्यांचे मूळ परमेश्वर आहे, वेद हा सत्यमूलक ग्रंथ आहे, सत्याचा विचार करूनच धर्माचरण केले पाहिजे, सर्वांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे इ. विचार लक्षात घेऊन प्रत्येक आर्यसमाजी सदस्याने वागले पाहिजे असे दयानंदांनी म्हटले आहे.

दयानंद हे स्वतः शरीराने, मनाने व वाणीने दणकट होते. अत्यंत विरूद्ध वातावरणात आपली मते मांडण्यात ते कधीही माघार घेत नसत. काशीत जाऊन ‘मूर्तिपूजा सिद्ध करा, नाहीतर विश्वेश्वरांची मूर्ती फोडून टाका’ असे म्हणून ते वादास उभे राहिले. अनेक संकटे आली तरी त्यांनी ती तेजस्वीपणे स्वीकारली व त्यांवर मात केली. ख्रिस्ती, इस्लाम धर्मांच्या पंडितांशी वाद घालून त्यांनी त्यांना नामोहरम केले. परधर्मात जाऊ पाहणाऱ्या हिंदूना वैदिक धर्म पटवून दिला. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. वैदिक धर्माला त्यांनी पुन्हा तेजस्वी बनविले. शाहपूरचे महाराज नहरसिंग, जोधपूरचे महाराज जसवंतसिंग यांसारख्या अनेक राजेरजवाड्यांना त्यांनी आर्यसमाजाची दीक्षा दिली. सहस्रावधी लोकांना समाजाच्या कार्याकडे प्रवृत्त केले. आर्यसमाजाचा परदेशातही प्रचार व्हावा, भारतातील अनाथ व गरीब लोकांस विद्या आणि आश्रय मिळावा या हेतूने दयानंदांनी उदेपूर येथे ‘परोपकारिणी सभा’ या नावाची आणखी एक संघटना उभारली.

दयानंद १८८३ साली जोधपूरास आले. तेथील महाराजांची त्यांच्यावर श्रद्धा बसली व ते त्यांचे अनुयायी बनले. तेथे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे सांगतात. विषप्रयोगामुळे दयानंदांची प्रकृती बिघडली व अजमेर येथे ते निधन पावले.

आधुनिक भारताच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले. निष्प्रभ वैदिक धर्माला त्यांनी तेजस्वी बनविले. समाजाला समर्थपणे संघटित केले. परधर्मीयांचे आक्रमण परतवून लावले व हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान दिले. आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनात त्यांचा वाटा फार मोठा आहे.

संदर्भ : 1. Rai, Lala Lajpat, The Arya Samaj, London, 1915.

           2. Singh, Bawa Chhajju, The Life and Teachings of Swami Dayanand Saraswati, 2. Vols, Lahore, 1903

           ३. फडके, स. कृ. नवा वैदिक धर्म अथवा आर्यसमाजाचा विवेचक इतिहास, पनवेल, १९२८.

भिडे, वि. वि.