जोतिबा : दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रख्यात दैवत. कोल्हापूरपासून वायव्येस सु. १४ किमी.वर पन्हाळा तालुक्यात पायथ्यापासून सु. ३०५ मी. उंचीचा जोतिबाचा डोंगर असून त्यावर जोतिबाचे ठाणे आहे. या डोंगराला ‘रत्नागिरी’ असेही नाव आहे. जोतिबाच्या मंदिराजवळ गुरवांची वस्ती असून ते जोतिबाचे पुजारी आहेत. ही गुरवांची वस्ती ‘वाडी-रत्नागिरी’ म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळापासून हा डोंगर एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. वाडी-रत्नागिरी ह्या खेड्यात काही प्राचीन मंदिरांचा समूह असून त्यांतील केदारलिंग, केदारेश्वर,रामलिंग आणि चर्पटांबा किंवा चोपडाई ह्या देवतांची मंदिरे विशेष महत्त्वपू्र्ण आहेत. यांतील केदारलिंगाचे किंवा जोतिबाचे मंदिर प्रमुख असून मध्यभागी आहे. जोतिबा हा मूळचा ज्योतिर्लिंग केदरनाथ मानला जातो. कोल्हापूरच्या अंबाबाईला किंवा महालक्ष्मीला कोल्हासुर, रत्नासुर इ. दैत्यांच्या संहारकार्यात मदत करण्यासाठी प्रत्यक्ष केदारनाथच हिमालयातून जोतिबा डोंगरावर येऊन राहिला आणि त्याने दैत्यसंहार करून तेथे आपल्या केदारलिंगाची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. अंगापूरकरविरचित मराठी केदार विजयात (सु. १७७९) ही कथा आलेली आहे. केदारेश्वर, केदारलिंगे, केदारनाथ, खळेश्वर इ. जोतिबाचीच नावे आहेत. जोतिबा हे उच्चारसुलभ लौकिक रूप ज्योतिर्लिंग ह्या शब्दापासूनच बनले असावे.

ज्योतिबाची मुर्ती

केदारलिंगाचे मूळ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम किवळ या गावचा पाटील नावजी ससे (रावजी साया असाही उल्लेख आढळतो) याने केल्याचे सांगतात. नंतर १७०३ मध्ये राणोजीराव शिंदे यांनी त्याचा पुन्हा जीर्णोद्धार करून सध्याचे मंदिर बांधले. सध्याची केदारेश्वर व रामलिंग ही मंदिरे अनुक्रमे दौलतराव शिंदे आणि मालजी निकम पन्हाळकर यांनी अनुक्रमे १८०८ व १७८० मध्ये बांधली. चोपडाईचे मंदिर प्रीतिराव चव्हाण हिंमतबहाद्दर यांनी १७५० मध्ये बांधले. केदारेश्वर मंदिरापुढे काळ्या पाषणाचे दोन नंदी आहेत. वाडीच्या बाहेर उत्तरेकडे थोड्या अंतरावर यमाईचे मंदिर असून तेही राणोजीराव शिद्यांनी बांधले. यमाईच्या मंदिरासमोरच दोन कुंडे वा तीर्थे असून त्यांतील एक तीर्थ जिजाबाईसाहेब यांनी १७४३ मध्ये बांधले असून दुसरे ‘जमदग्न्य तीर्थ’ राणोजीराव शिंद्यांनी बांधले आहे. डोंगरावर आणखीही काही तीर्थे व दोन पवित्र झरे आहेत. एका झरा कुशावर्त कुडांतून निघतो, तो ‘गोडा’ म्हणून आणि दुसरा उत्तरेकडून येणारा व वारणेला मिळणारा झरा ‘हैमवती’ नावाने ओळखला जातो. जोतिबा डोंगरावरील मंदिरे डोंगरावरच सापडणाऱ्या निळसर रंगाच्या उत्तम दगडांनी बांधली असून त्यांची रचना हिंदू पद्धतीची आहे.

येथील प्रमुख देव जोतिबा असून तो पौगंडद ऋषीचा मुलगा म्हटला जातो. परंपरेनुसार रत्नासुर नावाच्या दैत्याचा त्याने या ठिकाणी वध केल्यामुळे हे स्थान रत्नागिरी म्हणून ओळखले जाते. जोतिबामंदिरातील गाभारा पितळी पत्र्याने मढविलेला असून जोतिबाच्या मागील कमान व त्याचे आसन चांदीचे आहे. जोतिबाची मूर्ती चतुर्भुज व काळ्या पाषाणाची असून ती १·०६ मी. उंच आहे. हातात खड्‌ग, पानपात्र, त्रिशूळ व डमरू आहे. मस्तकावर गंगा असून वाहन अश्व आणि उपवाहन सर्प आहे. भैरव, खंडोबा व कोकणातील रवळनाथ यांच्याशी जोतिबाचे बरेच साम्य आहे. मंदिराच्या परिसरात अनेक दीपमाळा आहेत. जोतिबाची भार्या यमाई. तिची मूर्ती ओबडधोबड, दगडी व शेंदूर फासलेली आहे. चैत्री पौर्णिमेला जोतिबाची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी जोतिबाची पितळी उत्सव मूर्ती पालखीत बसवून समारंभपूर्वक लग्नासाठी यमाईच्या मंदिराकडे नेतात. जोतिबा व यमाई यांच्या विवाहसमारंभाचा एक भाग म्हणून त्यांच्यामध्ये शिक्काकट्यार ठेवतात. ‘ज्योतिबाचा चांग भले’ अशा भाविकांच्या गजराने डोंगर दुमदुमून जातो. रा. चिं. ढेरे यांनी जोतिबा हे खंडोबाप्रमाणेच क्षेत्रपाळ दैवत असल्याने मत मांडले आहे.

 चैत्री पौर्णिमेला हा जोतिबाच्या वार्षिक यात्रेचा प्रमुख दिवस असला, तरी दर रविवारी, दर पौर्णिमेस तसेच श्रावण शुद्ध षष्टीसही तेथे लहान स्वरूपाच्या यात्रा भरतात. या दिवशी जोतिबाची मूर्ती पालखीत घालून तिची मोठ्या समारंभपूर्वक मंदिराभोवती प्रदक्षिणा करवितात.

चैत्री पौर्णिमेच्या यात्रेची सुरुवात चैत्र शु. अष्टमीपासूनच होते. उत्तर भारतातून (ग्वाल्हेर परिसर) तसेच सर्व महाराष्ट्रातून दीड-पावणेदोन लाखांवर लोक यात्रेसाठी जमतात. जोतिबा हे जागृत आणि शक्तिशाली दैवत मानले जाते. जोतिबा हा नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुत्रप्राप्ती, रोगनिवारण, धनप्राप्ती संकटनिवारण इ. हेतूंनी जोतिबाला भक्त नवस बोलतात व फलप्राप्तीनंतर मोठ्या श्रद्धेने ते फेडतात. बगाडाचीही प्रथा येथे पूर्वी होती. सोन्या-चांदीचे दागिने, सोन्या-चांदीच्या लहान अश्वप्रतिमा, सोन्या-चांदीचे हात, मिठाई, नारळ इ. ते जोतिबाला वाहतात. चैत्र शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत दररोज जोतिबाची पालखी निघते. पालखी निघाली म्हणजे भाविक लोक नारळ वाहतात व गुलाल-खोबरे उधळतात. महाराष्ट्रातील सर्व जातिजमातींचे लोक जोतिबाचे उपासक असून अनेक कुटुंबांचे जोतिबा हे कुलदैवत आहे. ग्वाल्हेरच्या शिंद्यांचेही ते कुलदैवत आहे. 

संदर्भ :

1. Government of India, Census of India 1961, Vol. X. Part VII-B, Fairs and Festivals in Maharashtra, Delhi, 1969.

२. ढेरे, रा. चिं. “जोतिबा : शोध आणि बोध ”, नवभारत, वर्ष २९, अंक चौथा, वाई, जानेवारी, १९७६.        

सुर्वे, भा. ग.