अर्धनारीनटेश्वर : शिवाचे एक रूप. शिवाच्या शरीराचा उजवा अर्धा भाग पुरुषरूप व डावा अर्धा भाग स्त्रीरूप असल्यामुळे ‘अर्धनारी’ आणि गांधर्ववेदाचा तो निर्माता तसेच नृत्यप्रिय असल्याने ‘नटेश्वर’ असे त्यास म्हणण्यात येते. मैथुनोपायाने प्रजानिर्मिती करण्याकरिता ब्रह्मदेवाने शिवाची प्रार्थना केल्यामुळे शिव या रूपात अवतरला. नंतर त्याचे पुरुष व स्त्री असे वेगवेगळे भाग झाले त्यानंतर पुरुषरूपाचे अकरा व स्त्रीरूपाचे अनेक भाग झाले ब्रह्मदेवाच्या क्रोधापासून ‘अर्धनारीरूद्र’ उत्पन्न झाला इ. कथा पुराणांत आढळतात.

अर्धनारीनटेश्वर : मेलकडंबूर, जि. तंजावर येथील ब्राँझ, १२ वे शतक.

 

‘अर्धनारीश्वर’ ही एक तांत्रिक देवताही आहे. शिव-शक्ती, पुरुष-स्त्री, लिंग-योनी यांचा संयोग हे सृष्टिनिर्मितीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच ‘अर्धनारीनटेश्वरा’स तसा प्रतीकात्मक अर्थ आहे. वेदांतही सोम व अग्नी यांना विश्वाचे माता-पिता कल्पिले आहे. अर्धनारी, अर्धनारीश, अर्धनारीश्वर इ. अर्धनारीनटेश्वराचीच पर्यायी नावे आहेत. इ.स.च्या सु. पहिल्या शतकापासून भारतात अर्धनारीनटेश्वराची अतिशय सुंदर शिल्पे कोरलेली आढळतात. वेरूळ व घारापुरी येथील त्याची शिल्पे प्रख्यात आहेत.

केळकर, गोविंदशास्त्री