इंद्र : वैदिक देवताविद्येत इंद्राला मुख्य स्थान आहे. वैदिक भारतीयांचा इंद्र हा सर्वश्रेष्ठ व प्रमुख असा राष्ट्रीय देव आहे. जवळजवळ एक चतुर्थांश ऋग्वेद इंद्राला वाहिलेला आहे. इंद्र हा युद्धदेव आहे. ऋग्वेदकाळी भारतीय निरंतर संग्रामस्थ होते. इंद्र अश्वरथात बसून त्यांना युद्धात विजयी करी. तो स्वतः विश्वातील राक्षसी शक्तींशी नरंतर युद्ध करून त्या शक्तींचा निःपात करतो. त्याच्या अतुलनीय सामर्थ्याची, युद्धातील यशस्वी कर्तृत्वाची वर्णने ऋग्वेदातील ऋषी वारंवार करतात. तो आपल्या भयंकर वज्राने व धनुष्यबाणांनी लढाई करून दस्यूदानवांचा विध्वंस करतो. विशेषतः त्याचा मुख्य शत्रू वृत्र होय. वृत्रनाशाच्या पराक्रमावर रचलेली पुष्कळ सूक्ते ऋग्वेदात आहेत. वृत्र हा दानव जलप्रवाह अडवतो आणि अनावृष्टी व दुर्भिक्ष्य निर्माण करतो.

वज्रधारी इंद्र : दक्षिण भारतातील एका लाकडी मूर्तीवरून केलेले रेखाटन.

इंद्राचे बाहू बलशाली आणि अत्यंत लांबलचक आहेत. अनंत विस्तार असलेला द्यूलोक आणि प्रचंड पृथ्वी ही त्याच्या एका मुठीत मावतात (ऋग्वेद १.८०.८ ४.२१.९ ६.१९.३). त्याचे केस व दाढी सोनेरी आहे आणि शरीराचा रंगही सोनेरी-गोरा आहे. त्याचे शरीर द्यूलोक आणि पृथ्वी ही पासंगालाही पुरणार नाहीत, एवढे मोठे आहे. सोमपानाच्या योगाने आणि स्तोत्रमंत्रांनी त्याचे सामर्थ्य- अत्यंत भरतीस येते. चार किंवा तीस तळी भरतील इतका सोमरस पिऊन तो पचवितो. इंद्राने कधी एका बैलाचे, कधी वीस बैलांचे तर कधी शंभर रेड्यांचे मांस पचविले आहे (ऋग्वेद १०·२७, २८, ८६ ६·१७). त्याची ‘पुरभिद्’, ‘वृत्रहन्’ आणि ‘मघवन्’ अशी विशेषणे वारंवार येतात. मरुद्‌गण हे त्याचे युद्धातले सहकारी होत. दानवशत्रूंची वसती असलेली दगडांची धातूंची नव्वद किंवा नव्व्याण्णव किंवा शंभर पुरे त्याने फोडून टाकली, म्हणून त्यास ‘पुरभिद्’ म्हणतात. सर्प असलेला वृत्र हा त्याचा शत्रू. हा शत्रू पर्वतात वसती करून नद्यांचे प्रवाह स्वतःच्या अंगाने अडवतो. इंद्र वृत्राला अशा स्थितीत वज्राने जर्जर करून मारतो व अडवलेले जलप्रवाह मोकळे करतो (ऋग्वेद ८·६·६) म्हणून त्यास ‘वृत्रहन्’ म्हणतात. भक्तांना युद्धात विजय मिळवून देऊन ‘मघ’ म्हणजे वैभव देतो म्हणून त्याला वैभवशाली म्हणजे ‘मघवन्’ असे विशेषण लावले आहे.

सायण व काही पश्चिमी पंडीत पाऊस अडविणारा दानव म्हणजे वृत्र होय, असा अर्थ करतात. तो पर्वतात राहतो याचा अर्थ तो पर्वतासारख्या मेघांमध्ये राहतो, असा केला आहे. अफगाणिस्तानपासून काश्मीरपर्यंतच्या हिमालयीन प्रदेशात आर्य राहू लागले, त्यावेळच्या तेथील बर्फमय प्रदेशातील परिस्थितीत उपासिलेला इंद्र हा देव होय असे मानले, तर इंद्र-वृत्र युद्धाची वर्णने अधिक समर्पक ठरतात, असे काहींचे मत आहे. शीतकाळी पाण्याचे प्रवाह गोठतात. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. हा शीतकाळ संपू लागला म्हणजे बर्फ वितळू लागतो. पर्वतातील बर्फ व हिमनद्या वितळविणारा सूर्य म्हणजेच इंद्र होय आणि शीतकाळ हा वृत्र होय, अशी उपपत्ती अधिक योग्य दिसते.

इंद्र ही देवता वेदपूर्वकालीन आर्यांमध्येही पूजनीय होती. बोगाझकई येथे सापडलेल्या इ. स. पू. चौदाव्या शतकातील दोन आर्य राजांत झालेल्या शांततेच्या तहनाम्यात उल्लेखिलेल्या देवतांमध्ये वरूण, मित्र, नासत्य यांच्याबरोबर इंद्राचाही निर्देश आहे. अवेस्तामध्ये दुष्ट देव म्हणून इंद्र उल्लेखिलेला आहे. ‘वृत्रहन्’ या विशेषणाच्याऐवजी त्याच अर्था ‘वृत्रघ्‍न’ (वेरेथ्रघ्‍न) हे नाव असलेली निराळी देवता अवेस्तात सांगितली आहे. आर्य भारतात आल्यानंतर आर्यांच्या युद्धव्यवसायामुळे इंद्राचे माहात्म्य वाढले, असे म्हणता येईल.

ब्राह्मणग्रंथांत यज्ञांचे महत्त्व देवतांच्यापेक्षाही अधिक वाढले व देव यज्ञांग म्हणून दुय्यम ठरले. त्याबरोबरच इंद्राचेही महत्त्व कमी झाले. इंद्राने केलेल्या ब्रह्महत्येची कथा ब्राह्मणग्रंथांत आली आहे. देवत्वष्टा याचा पुत्र विश्वरूप हा ब्राह्मण होता. त्याची हत्या इंद्राने केली त्या ब्रह्महत्येच्या पातकातून सुटका होण्याकरता इंद्राने भूमी, जल, वृक्ष व स्त्रिया यांच्यामध्ये ते पातक वाटून दिले (भागवत ६.९ स्कंदपु. माहेश्वर १.१५ लिंगपु. २.५१).

पुराणग्रंथांमध्ये इंद्राचे माहात्म्य पुष्कळच घटले. विष्णू वा शिव या देवांचा देवाधिदेव म्हणून महिमा स्थापित झाला. ऋग्वेदामध्ये इंद्र हा द्यावा- पृथ्वीचा पुत्र किंवा त्वष्ट्याचा पुत्र म्हणून विर्दिष्ट केला आहे. परंतु इंद्र हा पुराणांप्रमाणे कश्यप व अदिती यांचा पुत्र होय. पुराणांप्रमाणे त्वष्ट्याने पुत्रनाशाच्या दुःखाने संत्रस्त होऊन इंद्राला मारणारा पुत्र होण्यासाठी यज्ञ केला. त्यात ‘इन्द्रशत्रुर्वधस्व स्वाहा’ असा मंत्र म्हणताना चुकीचा स्वरोच्चार केला. ‘इन्द्रशत्रु’ या सामासिक पदाचा स्वरभेद झाल्यामुळे तत्पुरुष समास म्हणजे ‘इंद्राचा शत्रू’ म्हणजे ‘इंद्राचे हनन करणारा’ असा होण्याच्या ऐवजी बहुव्रीही समास होऊन ‘इंद्र ज्याचे हनन करतो तो’ असा अर्थ झाला. इंद्राला वध्य असलेला वृत्र त्यामुळे उत्पन्न झाला. वृत्राच्या वधासाठी दधीची ऋषीच्या अस्थी मिळवून त्याची आयुधे तयार केली व त्यांच्या योगाने वृत्राला मारले. इंद्राला सहस्रनेत्र आहेत. त्याचा पुरोहित बृहस्पती, पत्‍नी इंद्राणी व पुत्र जयंत, ऋषभ व मीढ्‌वान हे होत. त्याचा अश्व-उच्चैःश्रवा, गज-ऐरावत, नगरी-अमरावती, उद्यान-नंदनवन व पेय-सोमरस होय. पुराणातील इंद्राची दुसरी प्रसिद्ध कथा इंद्र व अहल्या यांच्या संबंधाची होय. अहल्या ही गौतम ऋषीची पत्‍नी. गौतम ऋषीच्या आश्रमात, गौतम ऋषी गैरहजर असताना, इंद्राने गौतमाचे रूप घेऊन प्रवेश केला व तिचा संभोग घेतला. गौतमाने इंद्राला व अहल्येला शाप दिला. त्यामुळे इंद्राचे सहस्रनेत्र नष्ट होऊन त्याला त्या ठिकाणी सहस्र भगे म्हणजे छिद्रे पडली आणि अहल्या शिळा होऊन पडली (ब्रह्मपु. ८७, १२२).

जोशी, लक्ष्मणशास्त्री