अब्दुल कादिर जीलानी:(सु. १०७८-११६६). इस्लामी धर्मशास्त्रवेत्ता, विद्वान व सूफी संत. इराणमधील जीलान विभागातील एका खेड्यात त्याचा जन्म झाला. बगदाद येथे त्याने तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र वकुराणाचा(कुर्अान सखोल अभ्यास केला. बगदाद येथे शिक्षण घेतल्यावर काही वर्षे त्याने प्रवासात घालविली. ११२८ मध्ये तो परत बगदादला आला आणि तेथे धार्मिक प्रवचने व भाषणे देऊ लागला. सूफींमधील ‘कादिरीया’ ह्या उपपंथाचा तो प्रवर्तक असून, त्याच्या नावावरूनच ह्या पंथाचे नाव ‘कादिरीया’ असे पडले [→ सूफी पंथ]. ‘पीरे पिरान्’ ‘गौसुल आशम’ ‘महबूब सुभानी’ ‘मोहिओद्दीन’ इ. आदरार्थी नावांनी त्याचा उल्लेख केला जातो. त्याच्या प्रवचनांचे आणि भाषणांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले असून, त्यांचे स्वरूप प्रामुख्याने धार्मिक आहे. त्याचे तत्कालीन कायद्याचे ज्ञानही उत्तम होते. त्यामुळे खलीफा व वजीर त्याचा कायदेविषयक सल्ला घेत. त्याने केलेल्या अद्‍भुत चमत्कारांविषयी अनेक आख्यायिका रूढ आहेत. त्यांच्या प्रवचनांच्या वभाषणांच्या संग्रहांवरून तो श्रेष्ठ धर्मशास्त्रवेत्ता व कुशल प्रचारक असल्याचे दिसते. त्याची प्रवचने ऐकून अनेक ख्रिस्ती व ज्यू लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे सांगतात. बगदादमध्ये त्याला अत्यंत आदराचे स्थान होते व त्याच्या प्रवचनांना हजारो लोक उपस्थित राहत. इस्लाममधील एक श्रेष्ठ सूफी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो.

त्याने प्रवर्तित केलेल्या कादिरीया पंथाचे अनेकजण अनुयायी बनले. त्यांनी ह्या पंथाचा अरबस्तान, तुर्कस्तान, येमेन, सिरिया, मोरोक्को, ईजिप्त, भारत व आफ्रिकेतील काही देश येथे प्रभावी प्रचार करून पंथाची केंद्रे स्थापन केली. ही केंद्रे आजही तेथे विद्यमान असून त्यांच्या स्वतंत्र धार्मिक संघटनाही आहेत.

मुहंमद घौस (गौस-मृ. १५१७) नावाच्या अनुयायाने १४८२ मध्ये ह्या पंथाचे एक केंद्र हिंदुस्थानात पंजाबमधील’उच'(सध्या पाकिस्तानात) येथे स्थापन केले. पुढे शेख दाउद आणि शेख मुहंमद ह्या दोन अनुयायांनी पंथाचा प्रभावी प्रचार केला. मुहंमद मीर ह्या कादिरीया संताला शहाजहान (१५९२-१६६६) बादशहाचा आश्रय लाभला होता. दारा शुकोह आणि राजकन्या जहाँ आरा ह्यांनी तर मुहंमद मीरचे शिष्यत्वही पत्करले होते. ह्या पंथाचे लोक मुस्लिमेतरांना मोठ्या औदार्याने वागवत. सर्वधर्मसमानतेच्या तत्त्वावर आधारलेल्या ह्या पंथाचा दारा शुकोहवर खूपच परिणाम झाला होता. अौरंगजेबाने मात्र  ह्या पंथाचा बीमोड करण्याचा  प्रयत्न केला. तथापि गेल्या शतकापर्यंत ह्या पंथाची लोकप्रियता टिकून होती. अजूनही भारत-पाकिस्तानातील मुसलमानांना अब्दुल कादिर जीलानीबद्दल कमालीचा आदर असून बगदाद येथील जीलानीची कबर त्यांचे एक महत्त्वाचे यात्रास्थान आहे. भारतात व पाकिस्तानातही जीलानीच्या कबरीचे’छल्ले'(दुय्यम कबरी) अनेक ठिकाणी असून ते’महबूब सुभानीचे छल्ले’म्हणून ओळखले जातात. 

सुर्वे, भा. ग.