अमरत्व : ज्याप्रमाणे माणूस एक वस्त्र टाकून दुसरे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा एक देह टाकून दुसरा धारण करतो देह मरतो पण आत्मा मरत नाही म्हणजे आत्मा अमर आहे, अशी श्रद्धा अतिप्राचीन काळापासून बहुतेक सर्व समाजांमध्ये व धर्मांमध्ये दृढमूल झालेली दिसते. परंतु प्राचीन भारतातील लोकायतासारखे संप्रदाय व आजही भारतात व अन्यत्र आढळणारे जडवादी किंवा भौतिकवादी तत्त्ववेत्ते आणि राजकीय पक्ष व सत्ता आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व व अमरत्व मानत नाहीत.

मृताचे अंत्यसंस्कार करण्याची प्रथा रानटी जमातींच्या धर्मांमध्ये जशी आढळते, तशीच ती हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध, मुसलमान, यहुदी, पारशी इ. सुधारलेल्या समाजांच्या धर्मांतही आढळते. या अंत्यसंस्कारांच्या मुळाशी अशी भावना असते, की व्यक्तीचा स्थूल देह जरी नष्ट झालेला दिसत असला, तरी अदृश्य स्वरूपात ती व्यक्ती जिवंत असते म्हणजे व्यक्तीच्या आत्म्याला जाणीव, इच्छा वा अनेक प्रकारच्या गरजा असतात. त्या व्यक्तीला वा आत्म्याला यापुढे चांगली गती मिळावी, हा अंत्यसंस्कारांचा एक मूळ उद्देश असतो. स्थूल देह व आत्मा एकच देहाहून पृथक् असे आत्म्याचे अस्तित्व नसते, असे मानणारेही अंत्यसंस्कार करतातच. परंतु त्यांच्या मुळाशी मृताविषयीचे प्रेम, आदर इ. भावना व्यक्त करणे एवढाच उद्देश असतो [®अंत्यविधि व अंत्यसंस्कार].

देहाहून भिन्न पण देहात राहूनच त्याद्वारा सर्व जीवनव्यवहार करणारा, देह वा इंद्रिये यांस साधन म्हणून वापरणारा आणि ती निरुपयोगी ठरल्यावर त्यांचा त्याग करणारा जीवात्मा अवध्य व अमर्त्य असतो ह्यास‘अमरत्वाचा सिद्धांत’म्हणतात. स्थूलमानाने पाहता अमरत्वाचा अर्थ दोन प्रकारांनी लावण्यात आला आहे. ख्रिती किंवा इस्लामी धर्मश्रद्धेप्रमाणे ईश्वर अमर असा मानवी आत्मा निर्माण करतो, ईश्वराने निर्माण करीपर्यंत अर्थात आत्म्याला अस्तित्व नसते आत्म्याला पुनर्जन्मही नसतो. भारतीय श्रद्धेप्रमाणे आत्मा अनिर्मित, अनादी असतो आणि मोक्षप्राप्ती होईपर्यंत जन्ममरणाच्या फेऱ्यातून जात असतो. दुसरीही एक गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे. अमरत्व हा आत्म्याचा स्वाभाविक धर्म आहे हे मत जसे आढळते, त्याचप्रमाणे आत्म्याने किंवा मानवी व्यक्तीने अमरत्व प्राप्त करून घ्यायचे आहे, ते एक साध्य आहे व साधता येते, असेही एक मत आढळते. अमरत्वाच्यापौराणिक कल्पनेप्रमाणे देवलोकात ð अमृतनामक पेय आहे व त्याचे पान केल्यामुळे देव हे अमर बनतात. योगशास्त्राप्रमाणे माणसाचा देहही योगसाधनेने अमर बनतो म्हणजे सतत योगसाधनेने कुंडलिनी शक्ती जागृत होते व त्या शक्तीच्या योगाने योग्याचा देह अमर बनतो. तसेच योग्यांच्या परंपरेतील पारदविद्येच्या साधनेने मानवी देह अमर बनतो, निदान दीर्घकालपर्यंत देह तरूण ठेवता येतो, असे माधवाचार्यांनी सर्वदर्शनसंग्रहातील ‘रसेश्वरदर्शन’या प्रकरणात सांगितले आहे. पारद म्हणजे पारा. पाऱ्याचा औषधी उपयोग आयुर्वेदात अनेक प्रकारे सांगितला आहे.

आत्म्याचे अमरत्व ही विशिष्ट प्रकारची एक श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणण्याचे कारण, अशा अमरत्वाची निश्चित सिद्धी करणारे वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही. मात्र ही केवळ अंधश्रद्धाही नव्हेकारण काही विशिष्ट प्रकारच्या विचारप्रणालींवर अमरत्वाची श्रद्धा आधारलेली आहे व म्हणूनच मानवी मनावर तिची पकड फार मोठी आहे. आपल्या बौद्धिक आणि नैतिक व्यवहारांचा उलगडा करण्यासाठी देहाहून भिन्न असा आणि जाणीव, स्मृती, बुद्धी इ. मानसिक शक्ती व नैतिक सद्‌‌गुण धारण करणारा असा आत्मा कल्पावा लागतो. भौतिक सृष्टीपलीकडील असा हा आत्मा अमर असला पाहिजे.

स्पिनोझा (१६३२-७७) हा तत्त्वज्ञानी आत्म्याचे अमरत्व मान्य करतो परंतु जीवात्मा म्हणजे व्यक्ती अमर आहे, असे तो मानत नाही. त्याच्या दृष्टीने सर्व विश्वच चैतन्यात्मक आहे व व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचे मर्यादित चैतन्य अमर विश्वचैतन्यात विलीन होते.

प्राचीन भारतीय हिंदू, जैन व बौद्ध तत्त्वज्ञाने व्यक्तीचा जीवात्माच अमर आहे, असे मानतात. त्यांपैकी अद्वैत वेदान्ताप्रमाणे एवढाच फरक आहे, की मोक्षाच्या स्थितीत मात्र जीवात्मा शुद्ध परमात्मरूप बनतो व त्याचे जीवत्व किंवा व्यक्तित्व नष्ट होते. कारण ते जीवत्व मिथ्या असते. लोकायत वगळल्यास सर्व प्राचीन भारतीय दर्शने आत्म्याचे अमरत्व कर्मसिद्धांतांच्या आधारावर स्वीकारतात.

पहा : आत्ममीमांसा.

संदर्भ : 1. Campbell, Joseph, Ed. Man and Transformation, Vol. V, New York, 1964.

         2. Vesey, G. N. A. Ed. Body and Mind, London, 1964.

३. ब्रह्मसूत्रशांकरभाष्यम्.

जोशी, लक्ष्मणशास्त्री