वसिष्ठ : वसिष्ठ हे नाव एक वंशप्रवर्तक, ॠग्वेदातील सूक्तकर्ता, यज्ञकर्मे पार पाडणारा ॠत्विज, राजगुरू, राजपुरोहित, ब्राह्मण्याचा आदर्श असलेला महर्षी अशा विविध नात्यांनी वैदिक साहित्यात, त्याचप्रमाणे पुराणादी उत्तरकालीन साहित्यात येते. ज्या विविध घटनांशी वसिष्ठांचे नाव जोडले जाते, त्यांच्यांतील काळाचे अंतर अनेक पिढ्यांचे, शेकडो वा हजारो वर्षांचे दिसते. त्यामुळे वसिष्ठांच्या चरित्राविषयी अनेक प्रश्ननिर्माण होतात. त्यांच्या चरित्रात ऐतिहासिक भाग किती आणि पुराणकथांमधून रंगविलेला कल्पित भाग किती, हा त्यांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न  होय. त्याचप्रमाणे वसिष्ठ हे आडनाव होते, की पिढ्यान्‌पिढ्या चालणारे एखादे पीठ वा पद होते, की वसिष्ठ हे नाव धारण करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या जीवनांतील घटना एकमेकींत मिसळून वसिष्ठांचे चरित्र तयार झाले आहे, हेही अचूकपणे सांगणे अवघड आहे.  

वसिष्ठ हे ‘वसु’ ह्या शब्दांचे तमभाववाचक रूप आहे. वसु म्हणजे संपन्न वा समृद्ध. तेव्हा ‘वसिष्ठ’ म्हणजे ‘सर्वांत अधिक समृद्ध असलेला’. वसिष्ठांकडे अद्‍भुत सामर्थ्य असलेली कामधेनू नावाची एक गाय होती, ही कथा त्यांच्या ह्या नावाच्या अर्थाशी सुसंगत आहे. सर्व वस्तूंचे नियंत्रण करीत असल्यामुळे त्यांना ‘वसिष्ठ’ म्हणतात, असेही उल्लेख आहेत. वसिष्ठांविषयी मिळणारी माहिती अशी :  

वसिष्ठांचा जन्म मित्र व वरुण ह्या दोन देवांपासून झाला, असे ॠग्वेदात म्हटले आहे. त्यामुळेच त्यांना मैत्रावरुण किंवा मैत्रावरुणी असेही म्हटले जाते. ह्या संदर्भातील कथा अशी :  एकदा मित्र व वरुण ह्यांनी उर्वशी ह्या अप्सरेला पाहिले आणि त्यांचे रेतःस्खलन झाले. हे रेत त्यांनी एका कुंभात ठेवले. त्यातूनच आधी अगस्ती ॠषींचा आणि नंतर वसिष्ठांचा जन्म झाला. विश्वेदेवगणाने दैव्य स्तोत्राच्याद्वारे निळ्या कमलपुष्पात त्यांचे संगोपन केले (ॠग्वेद ७.३३, ११ व १३). तथापि उर्वशीपासून वसिष्ठांचा जन्म झाला, असा निर्देशही ॠग्वेदात आला आहे  (७.३३.१२). ह्या जन्मी वसिष्ठांचा बंधू अगस्त्य होता, तर पत्‍नी नारदांची बहीण अरुंधती ही होती. ॠग्वेदाच्या सातव्या मंडलाच्या रचनेचे श्रेय वसिष्ठकुलाला दिले जाते.  

ह्या मंडलात वसिष्ठपुत्रांचे वर्णन आहे. उजव्या बाजूस कलत्या जटा बांधणारे, शुभ्रवस्त्रधारी आणि पवित्र विचारांचे प्रवर्तक, असे त्यांचे शब्दचित्र काढलेले आहे. वसिष्ठपुत्र हे अत्यंत आकर्षक दिसत असले पाहिजेत. दाशराज्ञ युद्धात सुदास राजाला इंद्राचे साहाय्य मिळाले ते वसिष्ठपुत्रांमुळे, असेही ह्या मंडलात नमूद आहे. त्यांना अग्नी, वायू आणि आदित्य ह्यांचे ज्ञान होते. त्यांचा महिमा सूर्याप्रमाणे निर्विवाद आणि समुद्राप्रमाणे अगाध असल्याचेही म्हटले आहे.  

ॠग्वेदातवसिष्ठांच्या ज्या कुटुंबियांचे नावाने उल्लेख आलेले दिसतात, त्यांत शक्ती, पराशर, मूळीक, चित्रमहस् आणि गौरवीती ह्यांचा अंतर्भाव होतो. शक्ती हा ॠग्वेदाच्या सातव्या आणि नवव्या मंडलांतील काही सूत्रांचा द्रष्टा आहे. त्याच्या पत्‍नीचा उल्लेख महाभारतात अदृश्यंती ह्या नावाने आलेला आहे. पराशर हा ॠग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ६५ ते ७३ ह्या सूक्तांचा द्रष्टा होय. ॠग्वेदाच्या सातव्या मंडलात त्याचे निर्देश आहेत. मूळीक हा ॠग्वेदाच्या नवव्या व दहाव्या मंडलांत सूक्तकर्ता म्हणून येतो. अनुक्रमणीमध्ये मूळीक हा वसिष्ठांचा पुत्र असल्याचे म्हटले आहे पण ॠग्वेदात ह्याला पुष्टी सापडत नाही. चित्रमहस् हा ॠग्वेदाच्या दहाव्या मंडलातील १२२ व्या सूक्ताचा द्रष्टा. अनुक्रमणीनुसार हाही वसिष्ठपुत्र होय. गौरवीती हा ॠग्वेदातील काही सूक्तांचा द्रष्टा आहे. अनुक्रमणीनुसार हा शक्तीचा पुत्र होय. ऐतरेय ब्राह्मण आणि पंचविंश ब्राह्मणात त्याचा निर्देश सूक्तद्रष्टा म्हणून येतो.  

वसिष्ठ आणि त्यांची पत्‍नी अरुंधती ह्यांचा उल्लेख महाभारतात आदरपूर्वक आलेला आहे. वसिष्ठांची जशी अरुंधती, तशी तू पांडवांची पत्‍नी हो, असा आशीर्वाद कुंती द्रौपदीला देते. ‘जी आपल्या पतीला कधीही सोडून जात नाही आणि त्याला कधीही विरोध करीत नाही ती असा ‘अरुंधती’ ह्या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. अरुंधतीने देवांना, ॠषींना धर्मोपदेश केला, असे भीष्म महाभारतात सांगतात परंतु सूक्तकर्त्री म्हणून वा तत्त्वविवेचक म्हणून अरुंधतीचा निर्देश वेदांत कोठे आल्याचे दिसत नाही. सूत्रसाहित्यातील हिरण्यकेशी ॠषितर्पणात तिचा उल्लेख ‘ॠषिका’ असा केलेला दिसतो. सप्तर्षी ह्या तारकासमूहातील ‘वसिष्ठ’ नावाच्या ताऱ्याजवळ असलेल्या एका लहानशा ताऱ्याला ‘अरुंधती’ हे नाव समर्पकपणे देण्यात आलेले आहे.  

वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या दहा मानसपुत्रांपैकी एक होत, असेही मानले जाते. ब्रह्मदेवाच्या एका प्राणापासून ते उत्पन्न झाले, असे भागवतात म्हटले आहे. दक्ष प्रजापतीची कन्या ऊर्जा ही ह्या जन्मातील वसिष्ठांची पत्‍नी. दक्षयज्ञाच्या वेळी अपमानित झाल्यामुळे शिवाने ज्यांचा वध केला, त्यांत वसिष्ठांचाही अंतभार्व होता. ह्या जन्मात वसिष्ठांनी ऊर्जेप्रमाणेच कर्दम प्रजापतीची कन्या अरुंधती हिच्याशीही विवाह केला होता, असा उल्लेख मत्स्यपुराणात वाढळतो. ऊर्जेला वसिष्ठांपासून चित्रकेतू, सुरोची, विरजा, मित्र, उल्बण, वसुभृद्यान आणि द्युमान असे सात पुत्र झाले, असे भागवतात म्हटले आहे. तथापि ऊर्जेच्या सात पुत्रांची नावे अन्यत्र वेगळी दिलेली आहेत. ती अशी : रक्षस् (रत्न), गर्त, ऊर्ध्वबाहू, सवन, पवन, सुतपस् आणि शंकू. त्याचप्रमाणे ह्या वसिष्ठांना पुंडरिका नावाची एक कन्याही झाली, असा निर्देश ब्रह्मांडपुराणात आढळतो. अरुंधतीला वसिष्ठांपासून शंभर पुत्र झाले. त्यांत शक्ती हा ज्येष्ठ, असेही भागवतात म्हटले आहे. शक्तीला पराशर हा पुत्र झाला आणि पराशराला मत्स्यगंधेपासून कृष्णद्वैपायन व्यास हा पुत्र झाला.  

दक्षयज्ञाच्या वेळी ज्यांचा वध झाला, ते वसिष्ठ ब्रह्मदेवाच्या यज्ञाग्नीतून पुन्हा एकदा जन्माला आले. अक्षमाला ही त्यांची ह्या जन्मातील पत्‍नी. अक्षमाला हा अरुंधतीचाच पुनरावतार होता. वसिष्ठांच्या ह्या जन्माची अखेर अयोध्यापती इक्ष्वाकू राजाचा पुत्र निमी ह्याने दिलेल्या शापामुळे झाली. निमीने एक हजार वर्षे चालणारा एक यज्ञ करायचे ठरविले व त्याचे पौरोहित्य करण्याची विनंती त्याने वसिष्ठांना केली. तथापि वसिष्ठ हे त्या वेळी इंद्राने आयोजिलेल्या आणि पाचशे वर्षे चालणाऱ्या एका यज्ञात गुंतलेले असल्यामुळे तो यज्ञ पूर्ण होईपर्यंत थांबण्याची सूचना वसिष्ठांनी निमीला केली. पण निमीने वसिष्ठांची वाट न पाहता गौतम ॠषींना प्रमुख ॠत्विज करून आपला यज्ञ सुरू केला. इंद्राचा यज्ञ संपवून वसिष्ठ जेव्हा निमीच्या घरी आले, तेव्हा त्यांना हे कळले. ते संतापले आणि ‘तू विदेही होशील’ असा शाप त्यांनी निमीला दिला. ह्या वेळी निमी आपल्या शयनगृहात निजलेला होता. तो जागा झाल्यावर त्याला हे कळले. त्यानेही ‘माझ्याप्रमाणेच तुम्हीही विदेही व्हाल’ असा शाप त्यांना दिला. विदेही झाल्यावर वसिष्ठ ह्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाने त्यांना मित्रावरुणीच्या अंशापासून जन्म घेण्यास सांगितले, अशी माहिती भागवत, विष्णुपुराण, मस्त्यपुराण ह्यांतून मिळते.


ॠग्वेदाच्या सातव्या मंडलातील उल्लेखांवरून वसिष्ठ व त्यांचे कुटुंबीय आरंभी सरस्वती नदीच्या काठी वास्तव्य करून असावेत आणि नंतर परुष्णी नदीमार्गे यमुनातीरापर्यंत गेले असावेत, असा काही अभ्यासक तर्क करतात. विपाशा नदीच्या तीरावर वसिष्ठांचे दोन आश्रम होते, असा निर्देश गोपथ ब्राह्मणात आलेला आहे. येथेच वसिष्ठांनी तपश्चर्या केली.

अंगिरस, काश्यप, वसिष्ठ आणि भृगू अशी मुळात फक्त चार गोत्रे होती. ह्या चार गोत्रांत वसिष्ठ अंतर्भूत आहेतच परंतु महाकाव्ये, पुराणे आणि सूत्रे ह्यांतून सप्तर्षीच्या ज्या सूची उपलब्ध होतात, त्यांत वसिष्ठांचे नाव निरपवादपणे समाविष्ट केलेले असते. वैदिक घराण्यांमध्ये वसिष्ठांच्या घराण्याला केवढे महत्त्व होते, हे ह्यावरून दिसून येईल.

ॠग्वेदाखेरीज अन्य वेदांतही वसिष्ठांचे उल्लेख येतात. एक व्यक्ती  म्हणून अथर्ववेदात त्यांचा पाच वेळा निर्देश आलेला आहे. अथर्ववेदातील काही सूक्तांचे द्रष्टे म्हणूनही वसिष्ठ हे अथर्ववेदात येतात. त्यांतील एक सूक्त (१.२९) ब्रह्मणस्पतीला उद्देशून रचिले असून लोकांची समृद्धी व्हावी (राष्ट्राभिवर्धनम्), प्रतिस्पर्ध्यांचा नाश व्हावा, हा ह्या सूक्ताचा हेतू आहे. ह्या सूक्तावरून असे दिसते, की वसिष्ठ हे आपल्या मंत्रसामर्थ्याने राजा व प्रजा ह्यांना सुखसमृद्धी प्राप्त करून देत होते आणि त्यामुळे राजाप्रमाणे सर्वसामान्यांचा विश्वासही त्यांनी संपादन केला होता.

वसिष्ठांनी ॠग्वेदात वरुणाला उद्देशून लिहिलेल्या सूक्तांचे महत्त्व मोठे आहे. उत्कट भावनेने भारलेली ही उदात्त सूक्ते पाहता, वसिष्ठ हे भक्तीपंथाचे प्रवर्तकच ठरतात, असे मत काही अभ्यासक व्यक्तवितात. उदा., ॠग्वेदाच्या सातव्या मंडलातील शहाऐंशीव्या सूक्तात वसिष्ठ स्वतःला पापमुक्त करावे, म्हणून वरुणाची याचना करीत आहेत. वरुण त्यांच्यावर रुष्ट झाल्याचे त्यांना कळले आहे. हे सूक्त भक्तीपंथाच्या परंपरेत बसणाऱ्या एखाद्या उत्कट, भावपूर्ण रचनेसारखे वाटते. सर्वभावे देवाला शरण जाण्याची भावना आणि देवाच्या सान्निध्याची ओढ, ही भक्तिभावनेची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये ह्या सूक्तांतून प्रत्ययास येतात. वरुण आणि भक्त ह्यांचे संबंधही अत्यंत निकटचे असल्याची कल्पना ह्या सूक्तांवरून येते. वरुणाचे आपल्या भक्तांवर नितांत प्रेम आहे. अनेकदा अज्ञान आणि मोह ह्यांमुळे चुका करणाऱ्या बालकाची भूमिकाही कधीकधी घेतली जाते. उदा., भक्त हा धेनुवत्स आणि वरुण हा धेनुवत्सपालक गोपाल.

प्राचीन वरुण पंथ आणि नवा इंद्रपूजा पंथ ह्यांच्यांत समझोता घडवून आणण्याची कामगिरीही कामगिरीही वसिष्ठांनी केल्याचे दिसते. इंद्रपूजा पंथाचा विजय झाल्यानंतरही वैदिक काळातील काही जनसमूह प्राचीन वरुण पंथालाच चिकटून होते, परंतु बदलत्या काळाची जाणीव ठेवून समन्वयवादी भूमिका घेण्यात आली. इंद्र हा युद्धात विजय मिळवितो आणि युद्धोत्तर काळात सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम वरुण करतो, अशी ही भूमिका होती. ही भूमिका निर्माण करण्याच्या कामी वसिष्ठांनी विशेष पुढाकार घेतला, असे दिसते (ॠग्वेद-७.८३.९).

वसिष्ठ-विश्वामित्र वाद : वेदकालीनच नव्हे, तर एकूणच प्राचीन भारतीय सामाजिक इतिहासाच्या संदर्भात वसिष्ठ-विश्वामित्र वाद फार महत्त्वाचा आहे. वसिष्ठ गोत्राच्या व्यक्तीशी विश्वामित्र गोत्राच्या व्यक्तीचा विवाह निषिद्ध मानलेला आहे. ॠग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील त्रेपन्नाव्या सूक्ताचे ॠषी विश्वामित्र गाथिन असून त्यातील ॠचा (२१ ते २४) ‘वसिष्ठद्वेषिणी ॠचा’ म्हणून निर्देशिल्या जातात. वसिष्ठगोत्रीय लोक त्यांचे श्रवण वा पठण निषिद्ध मानतात. वसिष्ठ-विश्वामित्रांमधील शत्रुत्त्वाची वर्णने वेदोत्तर साहित्यात आढळतातच परंतु त्याची काही सूचना ॠग्वेदातूनही मिळते. पैजवन सुदास ह्या राजाचे वसिष्ठ हे पुरोहित होते आणि सुदासासाठी त्यांनी इंद्राची मदतही मिळवून दिली होती. पण सुदास आणि विश्वामित्र ह्यांचे संबंधही यजमान आणि पुरोहित असे असल्याचे दिसते. निरुक्तात विश्वामित्र हे सुदासाचे पुरोहित असल्याचा निर्देश मिळतो (२.२४). हे दोन्ही ॠषी एकाच वेळी एकाच यजमानाचे पुरोहित असतील, हे संभवत नाही. विश्वामित्रांच्या जागी सुदासाने वसिष्ठांना नेमले असल्याची शक्यता दिसते. वादाचे हे मुख्य कारण असावे. ॠग्वेदात प्रत्यक्ष उल्लेख नसला, तरी त्यातून अप्रत्यक्षपणे ह्या वादाची कल्पना येते.

महाभारताच्या वनपर्वात एक कथा येते. वसिष्ठांना अरुंधतीपासून झालेल्या शक्तीचा पुत्र पराशर ह्याला आपल्या आईकडून-अदृश्यंतीकडून- समजते, की विश्वामित्रांनी एका राक्षसाकरवी आपल्या पित्याचा वध केला. संतापलेला पराशर सर्व राक्षसांचा नाश करण्यासाठी राक्षससत्राचे आयोजन करतो. पण वसिष्ठ त्याला त्यापासून परावृत्त करतात.

ॠग्वेदाच्या सातव्या मंडळातील १०४ क्रमांकाचे रक्षोघ्‍न सूक्त ह्या संदर्भात महत्त्वाचे आहे. बृहद्‌देवता ह्या ग्रंथात म्हटले आहे, की सुदासाच्या पुत्रांनी वसिष्ठांच्या शंभर पुत्रांना ठार मारल्यानंतर दुःख-क्रोधाने तप्त झालेल्या वसिष्ठांनी हे सूक्त रचिले. वसिष्ठांच्या मदतीने दाशराज्ञ युद्धात विजय मिळविल्यानंतर वसिष्ठांबद्दल सुदासवंशीय राजे फारसा आदर ठेवीनासे झाले असावेत. हे ताणलेले संबंध लक्षात येताच विश्वामित्रांनी सुदासाच्या वंशजांचा विश्वास पुन्हा एकदा संपादून त्यांना वसिष्ठांविरुद्ध चिथावून सोडले असणे शक्य आहे. ते काहीही असले, तरी वसिष्ठांच्या वंशजांचा मोठ्या प्रमाणावर नाश करण्यात आला, हे निश्चित दिसते. वैदिक साहित्यात तत्संबंधीचे उल्लेख अनेकवार येतात. ॠग्वेदाच्या सातव्या मंडलातील प्रार्थना शूर संतती आणि तिचे रक्षण ह्यांवर भर देणाऱ्या आहेत, हेही लक्षणीय आहे. उपर्युक्त रक्षोघ्‍न सूक्तातील दोन ॠचांवरून (१५, १६) असे दिसते, की वसिष्ठांना उद्देशून ‘यातुधान’ हा निंदाव्यंजक शब्द वापरण्यात आला होता. विश्वामित्रांचे वा त्यांनी चिथावलेल्या लोकांचे हे कर्म असावे. वसिष्ठांनीही ह्या निंदकांना ‘राक्षस’ म्हणून संबोधिले आहे. तैत्तिरीय संहितेनुसार (३.१.७) एका बाजूला वसिष्ठ आणि दुसऱ्या बाजूला विश्वामित्र आणि जमदग्नी  असेही भांडण होते. जमदग्नीने ॠग्वेदाच्या दहाव्या मंडलातील विहव्य सूक्ताचा (१२८.१) वापर करून आपल्या शत्रूला-वसिष्ठांना-शक्तिहीन केले.

वसिष्ठ-विश्वामित्र वादावर ब्राह्मणग्रंथ मात्र जवळपास मौनच बाळगून असल्याचे दिसते. वसिष्ठांची संतती मारली गेल्याचा निर्देश येतो पण ह्या दुर्दैवी घटनेला विश्वामित्र जबाबदार होते, असे मात्र ब्राह्मणग्रंथांत कुठेही म्हटलेले नाही. नीतिमंजरीत म्हटले आहे, की वसिष्ठपुत्र शक्तीला अग्नीत फेकण्यात आले परंतु वसिष्ठांनी केलेल्या इंद्रस्तुतीमुळे तो वाचला.


वसिष्ठ-विश्वामित्रांचा वाद कामधेनू नावाच्या एका अद्‍भुत गायीवरून झाल्याचे निर्देश महाकाव्यांतून आणि पुराणांतून येतात. ही कथा अशी : विश्वामित्र हे मुळात एक क्षत्रिय राजे होते. एकदा त्यांनी वसिष्ठांच्या आश्रमाला भेट दिली. तेव्हा त्यांच्या मोठ्या लवाजम्याच्या मेजवानीची व्यवस्था त्वरित झाल्याचे त्यांनी पाहिले. चकित झालेल्या विश्वामित्रांनी ह्याबद्दल वसिष्ठांकडे चौकशी केली असता कामधेनू कोणतीही इच्छा पूर्ण करते, असे त्यांना कळले. विश्वामित्रांनी वसिष्ठांकडे ही गाय मागितली आणि वसिष्ठांनी नकार देताच ती जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्‍न केला. पण त्या गायीच्या शरीरातून शक, पल्लव आदींचे सैन्य उत्पन्न होऊन त्या सैन्याने विश्वामित्रांचा पराभव केला. तेव्हा क्षत्रियाच्या बळापेक्षा ब्रह्मतेजाचे बळ हेच मोठे अशी खात्री पटून विश्वामित्रांनी ब्रह्मर्षी होण्यासाठी तपश्चर्या सुरू केली (वाल्मीकि रामायण, बालकांड, सर्ग ५१ ते ५६).

वसिष्ठ-विश्वामित्र वादाबाबत आणखीही एक कथा आहे. इक्ष्वाकू कुळाचा वंशज त्रिशंकू हा सदेह स्वर्गात जाऊ इच्छित होता. त्यासाठी त्याने वसिष्ठांना यज्ञ करण्याची विनंती केली. वसिष्ठांनी ती नाकारल्यावर तो शंभर वसिष्ठपुत्रांकडे गेला. त्यांनीही झिडकारल्यावर त्याने विश्वामित्रांची मदत मागितली. विश्वामित्रांनी ती देण्याचे ठरवून ॠषींना यज्ञार्थ बोलावले. वसिष्ठ सोडून बाकी सर्व आले. पण यज्ञात निमंत्रित केलेल्या देवताच येईनात. अखेरीस विश्वामित्रांनी स्वतःच्या तपःसामर्थ्यांने त्रिशंकूला स्वर्गात नेण्याचा प्रयत्‍न चालविला. पण त्रिशंकू वर जाताच सर्व देवांनी त्याला खाली ढकलला. हे पाहून विश्वामित्राने स्वतःच नवा स्वर्ग बनविण्यास आरंभ केला. त्यानंतर देवांनी विश्वामित्रांस विनंती केली की, राशिमंडलमार्गाच्या बाहेर असलेल्या अनेक नक्षत्रांमध्ये एक तारा होऊन हा त्रिशंकू राहू दे. तेव्हा विश्वामित्रांनी त्यास मान्यता दिली (वाल्मीकि रामायण, बालकांड, सर्ग ५७-६१).

वसिष्ठ आणि विश्वामित्र ह्यांच्यातील वितुष्ट हरिश्चंद्र राजाच्या रोहित ह्या पुत्राच्या प्रकरणातही दिसून येते. हरिश्चंद्राला रोहित झाला, तो वरुणाच्या कृपेने. तो मी तुला बळी देईन, असे वचन हरिश्चंद्राने वरुणाला दिले होते. पुढे रोहिताने मात्र बळी जाण्याचे नाकारले आणि तो रानात पळून गेला. त्याच्या ऐवजी शुनःशेप नावाच्या ब्राह्मणकुमाराला बळी देण्याचा प्रयत्‍न झाला परंतु विश्वामित्रांनी त्या ब्राह्मणकुमाराचे रक्षण केले.

महाभारताच्या शल्यपर्वात म्हटले आहे, की एकदा विश्वामित्रांनी सरस्वती नदीला आज्ञा केली, की तिने आपल्या प्रवाहाबरोबर वसिष्ठांना वाहत आणावे. सरस्वतीला हे रुचले नाही परंतु विश्वामित्रांच्या शापाच्या भयाने तिने त्यांच्या आज्ञेनुसार वसिष्ठांना आपल्या प्रवाहाबरोबर विश्वामित्रांच्या आश्रमापर्यंत वाहत आणले पण विश्वामित्रांच्या हवाली मात्र केले नाही. ती वसिष्ठांना वेगवान प्रवाहाबरोबर पुढे घेऊन गेली. त्यामुळे संतापून विश्वामित्रांनी तिला शाप दिला, की तुझा रंग रक्ताचा होईल.

महाभारतातून, तसेच पुराणांतून वसिष्ठांच्या तीन वेगवेगळ्या वंशावळी मिळतात. अरुंधती शाखा व्याघ्री शाखा आणि धृताची शाखा, अशा त्या आहेत. वसिष्ठ कुलातील प्रमुख व्यक्ती पार्गिटरने सांगितल्या, त्या अशा : (१) वसिष्ठ देवराज, (२) वसिष्ठ आपव, (३) वसिष्ठ अथर्वनिधी, (४) वसिष्ठ  श्रेष्ठमाज, (५) वसिष्ठ अथर्वनिधी (दुसरा), (६) वसिष्ठ ब्रह्मर्षी (७) वसिष्ठ मैत्रावरुण, ह्यांपैकी वसिष्ठ ब्रह्मर्षी हे अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याचा पुत्र राम ह्यांच्या कारकीर्दीत राजपुरोहित होते. वाल्मीकी रामायणात त्यांच्यासंबंधी बरेच उल्लेख आहेत. कपिंजली धृताची ही वसिष्ठ मैत्रावरुणाची पत्‍नी असून तिला इंद्रप्रमती (किंवा कुणीती वा कुशीती) हा पुत्र झाला, अशी महिती ब्रह्मांडपुराण, वायुपुराण, लिंगपुराण इ. पुराणांतून मिळते. व्याघ्री ही कोणत्या वसिष्ठांची पत्‍नी होती, हे सांगता येत नाही. शिवाय वर म्हटल्याप्रमाणे वसिष्ठांच्या चरित्रात वा चरित्रविषयक माहितीत ऐतिहासिक भाग कोणता आणि कल्पिताचा कोणता हे नेमके सांगणे कठीण आहे.

पहा : विश्वामित्र.

संदर्भ : Rahurkar, V. G. The Seers of Rgveda, Pune, 1964. 

कुलकर्णी, अ. र.