पुराणकथा : (माइथॉलजी). आदिम व प्रगत अशा सर्व धार्मिक समाजांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निश्चितपणे आढळणारी विशिष्ट प्रकारची पवित्र कथा. पुराणकथांमधील विषयांच्या आत्यंतिक विविधतेमुळे त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांचा निर्देश करणारी म्हणजेच सर्वसमावेशक अशी व्याख्या करणे हे जवळजवळ अशक्य आहे परंतु साधारणपणे असे म्हणता येते, की विश्वातील म्हणजे आकाश, अंतरिक्ष व पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, मानव इत्यादिकांच्या जीवनातील घडामोडी कशा झाल्या व होतात किंवा कालचक्र व ऋतुचक्रानुसार विश्वातील विविध पदार्थांच्या नानाविध अवस्था कशा अस्तित्वात आल्या व येतात यासंबंधी, त्याचप्रमाणे निसर्गातील परंतु निसर्गनियंत्रण अशा अलौकिक शक्तींची विविध रूपे, चरित्रे, विग्रह व लीला यांच्यासंबंधी धार्मिक श्रद्धेने केलेले निवेदन म्हणजे पुराणकथा होय. या संदर्भात धर्माची कर्मकांडादी अंगे, यातुक्रिया व तत्संबंधी अलौकिक शक्ती यांचा महिमा वा माहात्म्य सांदितलेले असते हेही पुराणंकथेत अंतर्भूत होते. धर्मनिष्ठ लोकांना पुराणकथा  ही श्रद्धेय आणि पवित्र वाटते परंतु वास्तववादी, वैज्ञानिक वा विवेकवादी दृष्टीने पुराणकथा म्हणजे केवळ कल्पनाविलास असतो. पुराणकथेस दैवतकथा, पुराकथा, दिव्यकथा किंवा मिथ्यकथा असेही म्हणतात.

येथे ‘पुराणकथा’ हा शब्द इंग्रजीतील ‘मिथ’ या शब्दाचा प्रतिशब्द म्हणून घेतलेला आहे. हिंदूंच्या पुराणातील कथा असा मर्यादित अर्थ येथे अभिप्रेत नाही. पुराणकथा ह्या केवळ हिंदूंपुरत्या मर्यादित नाहीत. कारण पुराणकथा हे सर्वच धर्मांचे अंग असते. व्यापक अर्थाने पुराणकथा हे कमीजास्त प्रमाणात अखिल मानवी संस्कृतींचे एक अंग आहे. पुराणकथानिर्मितीची प्रवृत्ती ही सार्वत्रिक आणि सार्वकालिक असून ती मानवाची एक गरज आहे, असेही आजपर्यंतच्या पुराणकथांच्या  इतिहासावरून काही तत्तवेत्त्यांचे मत झाले आहे परंतु विवेकवाद, वस्तुवाद वा वैज्ञानिक दृष्टिकोन हा मानवी संस्कृतीवरील पुराणकथेची पकड कमी करण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजीमध्ये पुराणकथासमुच्चय व पुराणकथाविद्या (पुराणकथांचा शास्त्रीय व ऐतिहासिक अभ्यास) या अर्थांनी ‘मिथ’ या शब्दापासून बनलेला ‘माइथॉलजी’ हा स्वतंत्र शब्द वापरला जातो. प्रस्तुत संदर्भात मात्र पुराणकथा ही एकच संज्ञा पुराणकथा, पुराणकथासमुच्चय आणि पुराणकथाविद्या या तीनही अर्थांची वाचक म्हणून वापरलेली आहे.

पुराणकथांच्या स्वरूपाची समग्र चर्चा करावयास प्रारंभ करताना आधी पुराणकथेची काही महत्त्वाची उदाहरणे पाहणे योग्य ठरेल. अर्थातच केवळ दोन-तीन उदाहरणांवरून पुराणकथांची सर्व वौशिष्ट्ये कळणे शक्य नाही तथापि प्रारंभी पुराणकथेची सूचक अशी सामान्य रूपरेषा आपल्यासमोर असावी. उदा., विश्वोत्पत्तीच्या काही पुराणकथा. वैदिक हिंदू, यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम या मोठ्या विद्यमान धर्मांतील विश्वोत्पत्तीच्या वा धर्मोत्पत्तीच्या पुराणकथा या संदर्भात लक्षात घ्याव्यात. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात (१०·९०) आलेली पुराणकथा अशी : देवांनी केलेल्या आद्य यज्ञात पुरुषाची आहुती देण्यात आली, त्या पुरुषाच्या मनापासून चंद्र, डोळ्यांपासून सूर्य, मुखापासून इंद्र व अग्नी, प्राणापासून वायू, नाभीपासून अंतरिक्ष, मस्तकापासून तारकागणांनी भरलेले आकाश (द्युलोक), पायांपासून भूमी आणि कानांपासून दिशा निर्माण झाल्या. तो पुरुष पुन्हा प्रकट झाला. त्याचे मुख म्हणजे ब्राह्मण, त्याचे बाहू म्हणजे क्षत्रिय, त्याच्या मांड्या म्हणजे वैश्य आणि त्याचे पाय म्हणजे शुद्र होत. देवांनी यज्ञाच्या योगाने यज्ञपुरुषाची पूजा केली. त्या यज्ञातील आचार हेच प्रथमधर्म ठरले. याचे तात्पर्य असे, की ते आचार उत्तरकालीन मानवांच्या दृष्टीने अनुकरणीय पूर्वोदाहरण ठरले. बायबलच्या ‘जुन्या करारा’त म्हटले आहे, की ईश्वराने शून्यातून मनुष्याकरिता सृष्टी निर्माण करून नंतर मनुष्य निर्माण केला. जो पहिला मनुष्य निर्माण केला त्याची बरगडी कापून तिच्यापासून स्त्री निर्माण केली. कालांतराने मोझेसला देवाने धर्माच्या नियमांचा उपदेश केला. बायबलच्या ‘नव्या करारा’ त म्हटले आहे, की देवाने आपला प्रिय पुत्र येशू याला मानवाचे पापापासून तारण करण्याकरिता पृथ्वीवर पाठविले. या देवपुत्राने सर्व मानवजातीला पापापासून मुक्त करण्याकरिता आत्मयज्ञ केला. इस्लाम धर्मामध्ये अशी कथा सांगतात, की मुहंमदला देवाचा उपदेश ऐकू आला, तो उपदेश म्हणजेच कुराण हा धर्मग्रंथ होय.

पुराणकथांची निर्मिती व कार्य : विविध कारणांनी व उद्देशांनी पुराणकथा निर्माण झाल्याचे दिसते. (१) जग कोणी बनवले? सूर्य, चंद्र व तारे सदैव का फिरतात? भूकंप, ग्रहणे,  धूमकेतूंचे प्रकट होणे, वादळे, मृत्यू इ. घटना का घडतात? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्राचीन मानवांनी पुराणकथा निर्माण केल्या विविध पदार्थांच्या अवस्था कशा अस्तित्वात आल्या याचे स्पष्टीकरण करणे, हा पुराणकथांचा एक उद्देश वा कार्य असते, असे काही पुराणकथाशास्त्रज्ञांचे मत आहे. (२) परंतु काही शास्त्रज्ञांचे मत असे आहे, की मुख्यतः आधीच निर्माण झालेल्या कर्मकाडांचे समर्थन व स्तवन करण्यासाठी पुराणकथा निर्माण झाल्या. कर्मकाडांत वर्षातून निरनिराळ्या निमित्तांनी होणारे सामाजिक उत्सव, जन्मोत्सव, नामकरण, उपनयन, विवाह, अंत्यकर्म इ.संस्कार यज्ञ, पूजा, नवस, व्रते इत्यादींचा अंतर्भाव होतो. (३) वर्तमान समाजव्यवस्था, पवित्र मानलेल्या चालीरिती, समाजातील उच्च-नीच पदे इत्यादींचे समर्थन करणे, हाही पुराणकथांचा एक उद्देश असतो. राजे, धर्मगुरू, शामान इ. लोक अशा कथांचा उपयोग करून घेतात. (४) सर्वसामान्य मानवाला धार्मिक आचारविचारांचे, शुभाशुभ कर्मांचे किंवा नीतिअनीतीचे महत्त्व समजण्याकरिता केवळ बुद्धी व इंद्रिये यांचा उपयोग होत नाही. पुराणकथेचे त्यांचे महत्त्व मनात बिंबते. स्वर्ग व नरक, पुनर्जन्म, देव, असुर, राक्षस, भूत, पिशाच इत्यादिकांच्या पुराणकथेतील वर्णनाने धार्मिक आचारांचे महत्त्व पटते.

पुराणकथांच्या रचनेवर परिस्थितीचा प्रभाव : आजूबाजूच्या वातावरणाचा आणि विशिष्ट प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीचा पुराणकथांच्या रचनेवर आणि स्वरूपावर प्रभाव पडतो. उदा., अरण्यात राहणाऱ्या स्लाव लोकांनी अनेक अरण्यदेवता मानल्या होत्या. कृषिसंस्कृतीमधील लोकांत पाऊस, वारा, सूर्य, पीक इ. कृषीशी संबद्ध अशा घटनांच्या कथा असतात. शिकारीशी निगडित अशा पशुविषयक पूराणकथा व्याध संस्कृतीत प्रचलित सतात. पशुपालन संस्कृतीत पशुविषयक व मत्स्यव्यवसाय करणाऱ्या लोकांत मत्स्यव्यविषयक कथा आढळतात. या कथा त्यांच्या सामाजिक उत्सवाच्या कर्मकांडाशी निगडित केलेल्या दिसतात. आफ्रिकन लोक काळ्या लोकांच्या उत्पत्तिविषयक कथा सांगतात. इंडोनेशिया, मेलानीशिया, पॉलिनीशिया इ. समुद्रसन्निध विभागातील लोक विश्वनिर्मितीपूर्व सर्वत्र समुद्रच होता, असे आपल्या पुराणकथांमध्ये सांगतात. पुराणकथा ज्या काळात व संस्कृतीच्या ज्या अवस्थेत निर्माण होतात, त्या काळाचा व अवस्थेचाही त्यांच्या रचनेवर प्रभाव पडतो.

पुराणकथा व कर्मकांड : पुराणकथा व कर्मकांड या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित असतात. किंबहुना पुराणकथेशिवाय कोणतेही कर्मकांड पूर्ण होतच नाही. पुराणकथा (मिथ) ही कर्मकांडाची फलश्रुती सांगत असते. विशिष्ट कर्मकांड चालू असताना त्याच्याशी संबंधित अशी पुराणकथा अनेक वेळा सांगितली जाते. उदा., वैदिक सोमयाग. यज्ञमंडपाकडे सोम आणण्याचे कर्म चालू असताना सोम हा स्वर्गातून कसा आला याचे वर्णन यात करतात. ख्रिस्ती लोक प्रभुभोजन (युखॅरिस्ट) धार्मिक समारंभ करतात. या कर्मकांडाचा येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर झालेल्या वधाच्या कथेशी संबंध असतो. या भोजनातील ब्रेड वा भाकरी हे ख्रिस्ताचे मांस आणि द्राक्षारस हा ख्रिस्ताचे रक्त मानून त्यांचे सेवन करतात. रामकृष्णादींच्या जयंती प्रसंगी त्यांच्या जन्मकथा सांगितल्या जातात. काही पुराणकथा शास्त्रज्ञांचे असे मत आहे, की कर्मकांड हे मनुष्याच्या स्वभावधर्माशी निगडित आहे. म्हणून कर्मकांड प्रथम आणि पुराणकथा कालांतराने निर्माण होते.  वेदांत म्हटले आहे की, प्राचीन काळी देवांनी स्वर्गामध्ये जी पवित्र कृत्ये केली, त्यांचेच अनुकरण मानवी कर्मकांडामध्ये होत असते. देवाने माणसास अनुकूल अशी विश्वनिर्मिती केली आणि ती योग्य अवस्था तशीच रहावी, या उद्देशानेही वेळोवळी कर्मकांड केले जाते आणि तत्संबद्ध पुराणकथांचे निवेदनही केले जाते. उदा., ईश्वराने प्रथम पाऊस सुरू केला तसाच पर्जन्यकाळ चालू रहावा म्हणून विशिष्ट कर्मकांड केले जाते आणि ह्या प्रसंगी ईश्वराच्या त्या कृत्याची पुराणकथा सांगितली जाते. प्रतिवर्षी विशिष्ट काळी जी धार्मिक कर्मे नियमाने केली जातात, त्यांमध्ये पूर्वीच्या अनुकूल अशा योग्य स्थितीचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. असे नूतनीकरण केले नाही, तर जग सामर्थ्यहीन होईल वा नष्ट होईल असे लोकांना वाटते. सर्व प्राण्यांची प्रतीकात्मक पुनर्निर्मिती करण्याचा विधीही काही जमातींमध्ये करतात व त्यामध्ये पुराणकथेचे कथन होते.

कित्येकदा कर्मकांड व पुराणकथा यांचा संबंध कालांतराने क्षीण वा नष्ट होतो. हा संबंध क्षीण वा नष्ट झाल्यानंतर कित्येकदा पुराणकथेचे कथन हेच कर्मकांड बनते. काळाच्या ओघात त्या कथेतील पावित्र्य जेव्हा उरत नाही तेव्हा ती एक रंजक कथा म्हणूनच शिल्लक राहते. कर्मकांड लुप्त झाले, तरी कित्येकदा केवळ पुराणकथाच उरलेली असते. अशा वेळी पुराणकथेवरून कर्मकांडाचे अनुमान करता येते, असे जे.जी. फ्रेझरने म्हटले आहे. काही वेळा तर कर्मकांड लुप्त होते, त्याबरोबर पुराणकथाही लुप्त होते.

पुराणकथा व कल्पनाशक्ती : तर्कशक्ती, बुद्धिवाद, वैज्ञानिक दृष्टीकोन इत्यादींच्या आधारे विश्वाचे स्पष्टीकरण जेव्हा मिळत नव्हते, तेव्हा स्वैर व बेलगाम कल्पनाशक्तीच्या द्वारे असे विश्वाचे स्पष्टीकरण करण्याचे काम पुराणकथांनी केलेले आहे. लहान मुलांमध्ये बुद्धीपेक्षा कल्पनेला अधिक स्थान असते. आदिम मानवही एक प्रकारे संस्कृतीच्या बाल्यावस्थेतच असल्यामुळे तो वैश्विक घटनांची स्पष्टीकरणे कल्पनेच्या आधारेच करीत असे आणि त्यासाठी पुराणकथा रचीत असे. अनेकदा पुराणकथा ही नेमकी कोणत्या व्यक्तीने प्रचलित केली हे माहीत नसते परंतु ती समाजाने परंपरने मान्य केलेली असते. पुराणकथा व विज्ञान यांच्यातील कल्पनाशक्तीचे कार्य भिन्नभिन्न पद्धतीने घडत असते. तर्कशक्ती व बुद्धिवाद यांच्या द्वारेच विज्ञानाची वाढ होते. विज्ञानाच्या निर्मितीतही कल्पनाशक्तीचे साहाय्य महत्त्वाचे ठरते परंतु विज्ञानात मानवी कल्पनाशक्ती विवेकबुद्धीने मर्यादित केलेली असते. पुराणकथेमध्ये मात्र प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेल्या अशा विवेकबुद्धीने कल्पनाशक्तीवर घातलेल्या मर्यादा नाहीशा झालेल्या असतात. स्वैर कल्पनाशक्ती जेव्हा पुराणकथांची निर्मिती करते तेव्हा ती अनुभवातील पदार्थ घेऊनच आपले मानसिक विश्व निर्माण करते. उदा., नेहमी पाहिलेला मानव आणि सिंह या दोन पदार्थांच्या अवास्तव मिश्रणाने नरसिंहाची पुराणकथा तयार होते. कल्पनेची प्रक्रिया समजण्यास पुराणकथेइतका दुसरा उत्तम विषय नाही, असे ई. बी. टायलरने या संदर्भात म्हटले आहे.

पुराणकथा व नीतिमूल्ये : सर्व विश्व हे जाणीव असलेल्या शक्तींनी वा मनुष्यसदृश व्यक्तींनी भरलेले आहे, अशी भावना बऱ्याच पुराणकथांच्या मुळाशी असते. अशा शक्ती व व्यक्ती म्हणजे देव, असुर, राक्षस, य़क्ष, देवदूत ग्रहनक्षत्रादिकांच्या देवता, पिशाच इ. होत. उदा., सूर्य  हाच प्रजापतिरूप देव आहे, झ्यूस हा आकाशरूप देव आहे, अरण्ये ह्या देवता आहेत, अशा कल्पना पुराणकथेत असतात. त्यांमध्ये देवदेवतांचे मानवीकरणही असते. परंतु मानवी समाजातील ठराविक नैतिक संकल्पना घेऊन त्यांच्या आधारे भौतिक पदार्थ, वनस्पती, प्राणी यांच्यासंबंधी रूपकात्मक पुराणकथा तयार होत नाहीत. उलट, मानवी नैतिक संकल्पना कमीजास्त प्रमाणावर बाजूस सारूनच त्या तयार होतात. सृष्टीत उत्पत्तिस्थितिलयांचे चक्र सुरू असते. त्यावर जननक्रिया व मृत्यूची प्रक्रिया, स्त्रीपुरुषसंबंध, मानवी नातेसंबंध इ. मानवी जीवनप्रवृत्तींचा कल्पनाशक्तीच्या द्वारे आरोप करून पुराणकथा तयार होतात. परंतु पुराणकथा तयार करणारे मन हे आरोप व सत्य यांतील फरकाचे महत्त्व मानीत नाही. कारण मानवसमाजाच्या वर्तुळाबाहेरचा विश्वप्रपंच हा पुराणकथेचा विषय असतो. म्हणून आपण रूपकात्मक भाषेत विश्वप्रपंचाची कथा सांगत आहोत, याचीही कथाकाराला स्पष्ट जाणीव नसते असे हे पुराणकथेचे मानसशास्त्र आहे. हे लक्षात घेतले म्हणजे अत्यंत अनैतिक वर्तनाने भरलेल्या कथांचा उलगडा करता येतो. अनेकदा पुराणकथांमधून  आधुनिकांच्या नीतिकल्पनेला धक्का देणाऱ्या मनुष्यहत्या, नरमांसभक्षण, फसवणूक, व्यभिचार, अगम्य आप्तसंभोग इ. घटना आढळतात. उदा., देवांनी दानवांना फसविल्याच्या हिंदू कथा किंवा याकोबाने थोड्याशा अन्नाच्या मोबदल्यात आपला भाऊ ईसॉ याचा वारसाहक्क घेतला, ही हिब्रू कथा आज अनैतिक वाटते. ग्रीक, ईजिप्त, जपान, इस्राएल इ. कितीतरी देशांच्या पुराणकथांतून बाप व मुलगी वा भाऊ व बहीण यांच्यातील विवाहांच्या अनेक कथा आढळतात. सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी त्याची बायको झाली किंवा ग्रीकांचा प्रमुख देव झ्यूस याची बहीण हेरा ही त्याची पत्नी झाली. अगम्य आप्तसंभोगाची इतर उदाहरणे आढळतात. उदा., हिब्रू कथेनुसार ईश्वराने सडोम हे गाव नष्ट केले, तेव्हा अब्राहमच्या पुतण्या लॉट व त्याच्या दोन मुली वाचल्या. सगळे जग नष्ट  झाले, अशा समजुतीमुळे लॉटच्या मुलींनी मानवजात टिकावी, या उद्देशाने वडिलांना मद्य पाजून त्यांच्या नकळत त्यांच्याकडून पुत्रोत्पती करून घेतली आणि त्या पुत्रांपासूनच मोबाइट आणि ॲमोनाइट लोक निर्माण झाले, असे सांगितले आहे. आपला थोरला भाऊ ओसायरिस याच्यापासून आपल्याला अपत्य व्हावे, असे नेफ्थिसला वाटत होते म्हणून तिने त्याला मद्य पाजून त्याच्याशी व्यभिचार केला व मग तिला अनुबिस झाला, अशी ईजिप्ती कथा आहे. ब्राझीलमधील बोरारो लोकांच्या पुराणकथांत अगम्य आप्तसंभोग सांगितलेला दिसतो. ट्यूटॉनिक लोकांचा मुख्य देव ओडिन याची पत्नी फ्राइना हिने एक सुंदर हार मिळविण्यासाठी चार बुटक्यांशी व्यभिचार केला होता. ग्रीक देवतांचे अनैतिक आचरण पाहूनच त्यांच्या कथा मुलांना सांगू नयेत, असे प्लेटोने म्हटले आहे परंतु या बाबतीत अनेक नीतिमूल्ये ही  सार्वत्रिक व सार्वकालिक नसतात आणि यांतील काही कथा ह्या निसर्गघटनांवरची रूपके आहेत असे मानले, तर या कथा अनैतिक आहेत असे म्हणण्यापेक्षा त्या नीतिभिन्न (एमॉरल) आहेत, असे म्हणणे शक्य आहे. यातुक्रिया, धार्मिक कर्मकांड इत्यादींशी निगडित राहून काही गूढ कार्यक्षमता व्यक्त करणे, हे पुराणकथांचे स्वरूप असते. म्हणूनच आधुनिक नीतिमूल्यांवर ठेवणाऱ्या धर्मनिष्ठ माणसांनाही या कथा अनैतिक वाटत नाहीत.

याउलट, पुराणकथांतील अनेक घटनांना नैतिक आदर्श आणि मार्गदर्शक तत्त्व या दृष्टींनीही मूल्य असते. उदा., मोठे पाप करणाऱ्या लोकांमुळे प्रलय होतो परंतु मोठे पुण्य करणारे लोक असले म्हणजे जग तरते, सुखसमृद्धी होते, अशा अर्थाच्या अनेक पुराणकथा असतात. या कथांचा व त्यांतून मिळणाऱ्या संदेशांचा माणसाच्या आचरणावर निश्चितच प्रभाव पडत असतो. लॉर्ड बेकनने ग्रीक पुराणकथांना नैतिक रूपककथा म्हटले आहे. त्या कथांच्या द्वारा पारलौकिक शक्तीचे अस्तित्व स्पष्टपणे जाणवण्यास मदत होते आणि त्यामुळे माणसाच्या स्वैराचाराला आपोआपच मर्यादा पडतात.

पुराणकथांचे संरक्षण सामर्थ्य : पुराणकथांचे विधिपूर्वक उच्चारण व श्रवण करणाऱ्या व्यक्तींचे, सामाजिक गटांचे वा समाजांचे संकटांपासून रक्षण करण्याचे गूढ सामर्थ्य ह्या पुराणकथांमध्ये असते, असे मानले जाते. उदा., सूर्यनिर्मितीच्या पुराणकथेमुळे पुन्हा सूर्यपूर्व अंधाराची अवस्था येण्याचे संकट टळते. दीक्षा, विवाह, राज्याभिषेक इ. प्रसंगी उच्चारल्या जाणाऱ्या पुराणकथांमुळे व्यक्तींचे रक्षण होते. अशा प्रसंगी पुराणकथांची पवित्र शक्ती व्यक्तीच्या वा समाजाच्या पाठीशी उभी केली नाही, तर त्यांच्यावर विविध संकटे येण्याचा धोका असतो. उदा., तरुण-तरुणी वयात येण्याच्या वेळी विधिपूर्वक पुराणकथा उच्चारल्या नाहीत, तर त्यांना नव्या लैगिंक जीवनापासून संकटे प्राप्त होतात, असे मानले जाते आलेली संकटेही पुराणकथांमुळे दूर होतात. उदा., ईजिप्तमधील एका कथेनुसार इसिस या देवतेला रा या देवाइतके सामर्थ्य मिळवावयचे असते त्यासाठी  त्याचे गूढ नाव कळावे आणि त्यावर ताबा मिळवावा, म्हणून तिने त्याला सर्पदंश घडविला. नंतर त्याने नाव सांगितल्यावरच तिने त्याचे विष उतरविले. ही कथा सांगणे अथवा कापडावर लिहून गळ्यात बांधणे, हा ईजिप्तमध्ये सर्पविषावरचा उतारा मानला जात असे. अशा प्रकारच्या इतर अनेक कथाही ईजिप्तमध्ये रूढ होत्या. होरसची कथा विंचू व साप यांच्या दंशावरचा उपाय म्हणून सांगितली जात असे. आस्तिक ऋषीचे  नाव उच्चारल्यामुळे सापांपासून संरक्षण मिळते, असे हिंदू मानतात. साप, अग्नी इत्यादींवर  पुराणकथांमुळे नियंत्रण ठेवता येते. युद्ध, जन्म, मृत्यू, विवाह, दीक्षा इ. महत्त्वाच्या प्रसंगी पुराणकथांचे पठण हे संरक्षक म्हणून उपयोगी पडते, असे मानले जाते.

पुराणकथा व अद्‌भुतता : पुराणकथांतून ‘ईश्वराने शून्यातून सृष्टी निर्मिली’, ‘नारायण ऋषीच्या मांडीपासून उर्वशी जन्मली’ वा ‘गांधारीला १०१ अपत्ये झाली’ यांसारख्या अलौकिक, अद्‌भूत व अविश्वासार्ह घटना आढळतात. अयोनिज जन्म, पशुपक्ष्यांचे संभाषण, मानवांचा मानवेतर पदार्थ व प्राणी यांच्याशी विवाह व समागम, स्त्रीच्या अंड्यातून पक्ष्याचा जन्म, समुद्रप्राशन, समागमानंतरही स्त्रीचे अखंडित कौमार्य, तारुण्य व वार्धक्य यांची देवाणघेवाण, अनेक हात व मस्तके असणे इ. असंख्य घटना या प्रकारात मोडतात. सर्वसामान्य व्यवहारात अनुभवाला येणारे कार्यकारणभावाचे नियम या घटनांना मुळीच लागू पडत नाहीत. विज्ञानाधिष्ठित नियमांच्या आधारे अशा घटनांचे समर्थन करता येत नाही. बहुतेक वेळा या घटना मानवी अनुभवांच्या विरुद्धच असतात परंतु धर्म व कर्मकांड त्यांच्याशी निगडित असल्यामुळे सश्रद्ध माणसांकडून त्यांच्या  सत्यतेविषयी शंका व्यक्त केली जात नाही.

अशा अद्‌भूत घटनांमध्ये मृताने पुन्हा जिवंत होणे, वृद्धाने तरुण होणे, मर्त्य व्यक्तींना अमरत्व लाभणे, कल्पवृक्षादींमुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होणे, अंगी प्रचंड सामर्थ्य असणे इ. घटनांचा समावेश असतो. या घटनांची वर्णने अतिशयोक्तीने भरलेली असतात. वस्तुतः मानवाच्या इंद्रियगम्य दैनंदिन जीवनात अशा घटना घडत नसतात. परंतु फ्रँझ बोॲसने म्हटल्याप्रमाणे अशा घटना घडाव्यात , ही माणसाची मनोमन इच्छा असते. कल्पनेच्या साहाय्याने पुराणकथा या इच्छेलाच साकार करण्याचे काम करीत असते. शाप, वर, आशीर्वाद इ. गोष्टी म्हणजे मानवाचे मनातील वासनांतून निर्माण केलेल्या पुराणकथाच होत. प्राचीन मानवाच्या मनात कोणत्या आशाआकांक्षा होत्या आणि मानवी मन कोणकोणत्या अवस्थांतून प्रवास करीत होते, हे या पुराणकथांवरून उत्तम रीतीने कळू शकते.

पुराणकथा, जडप्राणवाद व मानवीकरण : जड वस्तूंनाही प्राण (जीव) असतो, या समजुतीने त्या वस्तूंचे मानवीकरण करण्याची प्रवृत्ती, हे दैनंदिन जीवनातील घटनांचे पुराणकथांत रूपांतर करण्यामागचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे, असे ई. बी. टायलरने मानले आहे. त्यामुळेच वृक्षपाषाणादी निर्जीव वस्तूंकडून इजा झाल्यास त्या वस्तूंवर सूड घेण्याची पद्धत अनेक ठिकाणी दिसते, असे तो म्हणतो. सूर्य, चंद्र, पर्वत, नद्या इत्यादींना देवता मानण्यामागे जडप्राणवाद व मानवीकरण या प्रवृत्तीच असतात. सामान्यतः निसर्गातील असाधारण पदार्थांचे मानवीकरण करण्याची प्रवृत्ती आढळते. देवांच्या आचारविचारांमध्ये मानवी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब दिसते. म्हणूनच झीनॉफनीझने असे म्हटले होते, की घोड्याने देवांची चित्रे काढली असती, तर ती घोड्यांसारखीच काढली असती.

पुराणकथांची प्रतीकात्मकता : पुराणकथा ही रूपककथा असते, ती चित्रभाषा असते आणि तिच्यामधून काही तरी गूढ सत्य व्यक्त केले जाते, म्हणजेच तिच्यात चित्रात्मकता वा प्रतीकात्मकता असते, असे माक्स म्यूलरप्रभृती मानतात. बहुतेक पुराणकथा या निसर्गघटनांवरची रूपके आहेत, हा माक्स म्यूलरचा एक महत्त्वाचा सिद्धांत होता. या बाबतीत, सर्व पुराणकथा ह्या सूर्यावरची रूपके आहेत, ती चंद्रावरची रूपके आहेत, ती वनस्पती व पशू यांच्या विकासक्रमावरची रूपके आहेत इ. प्रकारची मतेही आढळतात. वृत्र म्हणजे पाणी अडवून ठेवणारा मेघ, इंद्र म्हणजे झंझावात आणि वज्र म्हणजे वीज, असे इंद्र-वृत्रकथेमध्ये रूपक आहे, असे काहीजण मानतात. वृत्र म्हणजे हिवाळा आणि इंद्र म्हणजे वासंतिक सूर्य, वृत्र म्हणजे अंधार व इंद्र म्हणजे सूर्य, अश्विनीकुमार म्हणजे स्वर्ग व पृथ्वी, दिवस व रात्र किंवा सूर्य व चंद्र इ. प्रकारे या कथांतून रूपकात्मकता असल्याचे  सांगिततले जाते. ग्रीकांचा अग्निदेव हीफेस्टस याचे लंगडेपण म्हणजे विजेचे नागमोडी रूप असे मानले जाते. बी. मॅलिनोस्कीला मात्र हे मत असमाधानकारक वाटते.  काही पुराणकथांतून प्रतीकात्मकता असते आणि काहींतून नसते, या दृष्टीने दोन्ही मतांतून आंशिक सत्य आहे, असे म्हणता येते. विविध धार्मिक प्रतीके पुराणकथांतून घेतलेली असतात, या दृष्टीनेही पुराणकथांचा प्रतीकात्मकतेशी संबंध असतो. पुराणकथांचे स्वरूप प्रतीकात्मक मानल्यामुळे एरव्ही त्या कथांतून आढळणारी विसंगती व अनैतिकता नाहीशी होते. उदा., रावणाला दहा मुखे होती, हे रावणाचे हेर सर्व दिशांनी संचार करीत होते,  या तथ्यावरचे रूपक मानले, म्हणजे दशमुखत्वाची शरीररचनेशी येणारी विसंगती दूर होते. प्रजापतीला आपल्याच कन्येचा मोह पडला, या गोष्टीचे स्पष्टीकरण प्रजापती म्हणजे सूर्य आणि सरस्वती म्हणजे उषा मानून केले, म्हणजे या कथेतील अनैतिकता नष्ट होते. तसेच इंद्र हा सूर्य,गौतम हा चंद्र व अहल्या ही रात्र अशी प्रतीके घेतली असता, इंद्राने अहल्येशी व्यभिचार केला, या कथेतील अनैतिकता दूर होते. काव्य व पुराणकथा यांतील प्रतीकात्मकतेत काही बाबतींत भिन्नता असते. कवी एखाद्या पदार्थाला दुसऱ्या पदार्थाचे प्रतीक मानतो, तेव्हा त्याला दोन्ही पदार्थांच्या भिन्न स्वरूपाची जाणीव असते आणि तो त्याच्यांतील भिन्नता लपविण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु पुराणकथेत मात्र अशी जाणीव असतेच, असे नाही. मूळ पदार्थाचे वास्तव स्वरूप ध्यानात आलेले नसल्यामुळे त्या पदार्थाच्या स्वरूपात प्रतीक म्हणून मानलेल्या दुसऱ्या पदार्थाच्या स्वरूपाचे खरोखरच दर्शन घडणे, हे पुराणकथेतील प्रतीकांचे स्वरूप असते. म्हणूनच, पुराणकथेतील एखादी देवता ही कोणत्या मूळ पदार्थाचे प्रतीक आहे, हे स्पष्ट करताना अभ्यासकांत मतभेद होतात.

पुराणकथांतून अनेकदा इंद्रधनुष्य हा पूल, धनुष्य वा शिडी आहे, अशा अर्थाच्या उपमा आढळतात. मुका व बहिरा मनुष्यही आपल्या शब्दहीन विचारात अशा उपमा करू शकतो, म्हणून त्याच्यातही पुराणकथानिर्मितीची प्रवृत्ती आढळते, असे ई. बी. टायलरने म्हटले आहे. संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत अशाच शब्दहीन परंतु इंद्रियगम्य उपमांनी पुराणकथा बनत असत. संस्कृतीच्या प्रगत अवस्थेत पुराणकथांतून शब्दबद्ध रूपके आढळू लागली, असे मत आहे.

पुराणकथांतील परिवर्तने : पुराणकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरने संक्रांत होत असताना किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जात असताना तिच्यात क्रमाक्रमाने बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळेच एकाच कथेची अनेक रूपांतरे आढळतात. पुराणकथेत झालेले हे बदल बहुधा नकळत घडलेले असतात, ते जाणीवपूर्वक किंवा हेतूपुरस्पर केलेले नसतात. कारण, काही पुराणकथांतील घटना हे मानवापुढे अनुकरणीय असे पूर्वोदाहरण आहे, अशी समजूत असल्यामुळे ती कथा जशीच्या तशी जपण्याचे शक्य तितके प्रयत्न केले जातात परंतु इतके असूनही काळाच्या ओघात अशा कथांतून बदल होणे, हे अटळच असते. शिवाय, कधीकधी पुरोहित, भाट, शामान इ. लोक विशिष्ट हेतूंनी पुराणकथांमध्ये जाणीवपूर्वक बदल करतानाही आढळतात. असामान्य अशी सर्जनशील प्रतिभा असलेल्या व्यक्तींच्या प्रभावानेही पुराणकथा बदलतात. पुराणकथेत बदल होत असताना तिच्यात स्थानिक, प्रादेशिक व कालानुरूप नवी वैशिष्ट्ये निर्माण होतात. एखाद्या पुराणकथेत मूळचा तद्देशीय भाग कोणता आणि विदेशी प्रभावातून निर्माण झालेला भाग कोणता, हे ठरविणे अनेकदा अवघड असते. काळाच्या दृष्टीनेही आधीच्या व नंतरच्या भागांतील वेगळेपणा दाखविणे अवघड असते.

आधुनिक काळात पुराणकथा : प्राचीन काळात जशा अनेक भव्य पुराणकथा निर्माण झाल्या, तशा नंतरच्या काळात निर्माण झाल्या नाहीत. आधुनिक काळात तर नव्या पुराणकथांची निर्मिती खूपच कमी होत चालली आहे. पुराणकथांच्या निर्मितीला आवश्यक असे वातावरण व मनोवृत्ती  आजच्या समाजात उरलेली नाही. कारण, विश्वातील विविध घटनांचा कार्यकारणसंबंध विज्ञानाच्या आधारे पाहण्याची वृत्ती वाढली आहे. पूर्वजांच्या कृत्यांचे तंतोतंत अनुकरण करण्याची प्रवृत्ती संपली असून सत्याची नवी व अपूर्व रूपे शोधण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. ही प्रवृत्ती पुराणकथांच्या निर्मितीला मारक आहे. अर्थातच, धर्मश्रद्धा पूर्णपणे नष्ट झालेली आहे, असे नव्हे. म्हणूनच अजूनही साधुसंत, त्यांचे चमत्कार इत्यादींविषयी लहानमोठ्या पुराणकथा निर्माण होतात  व पुढेही होतील परंतु व्यापक, अत्यंत प्रभावी वैश्विक सत्याचे दर्शन घडविणाऱ्या भव्य पुराणकथा मात्र निर्माण होत नाहीत.

पुराणकथांचा प्रभाव : प्राचीन काळी पुराणकथांतील घटना हे परिपूर्ण सत्य आहे, अशी लोकांची धारणा असल्यामुळे पुराणकथांचा जनमानसावर कमालीचा प्रभाव होता. मानवी विचारांना हवे ते वळण देण्याचे वा त्यांत आमूलाग्र बदल करण्याचे  सामर्थ्य त्या पुराणकथांत होते. पुराणकथांच्या प्रभावामुळे मानवी जीवन व संस्कृती यांना विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे. पुराणकथांवरील श्रद्धेमुळेच माणूस विशिष्ट प्रकारचे आचरण करण्यास प्रवृत्त होतो, निषिद्ध कृत्ये टाळतो, सुखांचा त्याग करून यातना सोसतो. थोडक्यात म्हणजे माणूस पुराणकथा जगत असतो. आधुनिक मानवाचे मन जसे फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या घटनांनी बनले आहे, तसे प्राचीन मानवाचे मन पुराणकथांनी बनले होते, असे जे मीर्शा ईलिआने म्हटले आहे, ते सार्थच आहे. आधुनिक काळात वैज्ञानिक प्रगतीमुळे पुराणकथांचे सामर्थ्य निश्चितच क्षीण झाले आहे. तरीदेखील आधुनिक काळातील साहित्यादी विविध कलाकृतींवर अजूनही प्राचीन पुराणकथांचा प्रभाव आढळतो. लहान मुलांना अजूनही पुराणकथा सांगितल्या जातात. व्यक्ती, विमाने, जहाजे इत्यादींचे नामकरण पुराणकथांच्या आधारे केले जाते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अजूनही कर्मकांडरहित पुराणकथा व्यक्त होतात. चित्रपट, वृत्तपत्रे, मुद्रणालये, दूरदर्शन, आकाशवाणी इ. माध्यमांमुळे त्यांची प्रभावक्षमता काही प्रमाणात वाढलीही आहे. आधुनिक काळात नाझींनी स्वमतपुष्ट्यर्थ प्राचीन पुराणकथांचा आधार घेतला होता, हे सर्वश्रुत आहेच. पुराणकथांचा प्रभाव आणि सामर्थ्य असे प्रचंड असल्यामुळेच संस्कार करण्याचे एक शैक्षणिक साधन म्हणून पुराणकथांचे स्थान अनन्यसाधारण असते. आजही आदिवासी लोकांच्या जीवनाचा अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते.

अभ्यासाची साधने : एखाद्या समाजाच्या पुराणकथा जाणून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. मौखिक परंपरने आलेल्या या कथा अजूनही मौखिक चर्चे द्वारा लोकांकडून प्राप्त करता येतात. प्राचीन काळातील मंदिरे, मूर्ती, शिल्पे, चित्रे, वास्तू इत्यादींवरून पुराणकथांच्या स्वरूपाचे अनुमान करता येते. आधुनिक काळात होत असलेल्या उत्खननामुळेही पुराणकथाविषयक ज्ञानात भर पडते. लोककथा व लोकगीते यांच्या अभ्यासातूनही कितीतरी पुराणकथात्मक वाङ्‌मय प्राप्त होते. विविध रूढी, धार्मिक व सामाजिक लोकाचार, उपासनामार्ग, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, कर्मकांड, यातुक्रिया इत्यादींवरून अनेक पुराणकथांचे अनुमान करता येते. ललित साहित्यकृतींचाही पुराणकथांच्या अभ्यासाला उपयोग होतो. हिंदू, बौद्ध इत्यादींच्या पुराणकथा प्रामुख्याने त्यांच्या पवित्र धर्मग्रंथांतून आढळतात. बायबलच्या ‘जुन्या करार’त अनेक पुराणकथा आहेत, तथापि इझ्राएलच्या धर्माने त्यापूर्वीच्या जुन्या पुराणकथांवर टीका केल्य़ाचेही दिसते. बायबलच्या ‘नव्या करारा’तही पूर्वीच्या पुराणकथांना देवहीन आणि वेडपट कल्पना म्हटले आहे. अल्लाला सर्वश्रेष्ठ मानण्याची इस्लामची प्रवृत्तीही पुराणकथाविरोधी मानली जाते. परंतु असे असले, तरी या सर्व धर्मग्रंथांतून पुराणकथांचे अस्तित्व कमीअधिक प्रमाणात आढळतेच. आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास हा पुराणकथांच्या अभ्यासाला अत्यंत पूरक आहे. आजपर्यंच्या अभ्यासावरून पुराणकथांच्या समग्र आशय उलगडलेला नाही आणि पुढेही तो पूर्णपणे उलगडेल असे वाटत नाही . कारण, पुराणकथांच्या विकासातील अनेक दुवे कायमचे हरवले आहेत.

मानवी संस्कृतीच्या विविध अंगांशी पुराणकथांचा निकटचा संबंध असतो, हे पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल.

पुराणकथा आणि धर्म व संस्कृती : पुराणकथा हे धर्माचे एक महत्त्वाचे अंग असल्यामुळे आणि विशिष्ट समाजाचे धार्मिक विचार हे त्याच्या पुराणकथांतून व्यक्त होत असल्यामुळे, पुराणकथांचा धर्माशी अत्यंत निकटचा संबंध आहे. पुराणकथा स्वतः धर्मभावनेतून जन्मलेल्या असतात आणि त्या धर्मभावनेला पुष्टही करतात. त्याचप्रमाणे, पुराणकथा हा आजपर्यंतच्या विज्ञानयुगपूर्व मानवी संस्कृतीचा एक मूलभूत व अविभाज्य घटक असून त्यांच्या अभ्यासामुळे मानवी संस्कृतीचा इतिहास समजावयास मदत होते. पुराणकथा या त्यांच्या नायक-नायिकांचा इतिहास सांगत नाहीत, तर कथानिर्मात्याच्या मनाचा इतिहास सांगतात, असे म्हटले जाते. कारण ज्यांनी या कथा निर्माण केल्या आणि पिढ्यानपिढ्या जपल्या, त्या लोकांचे आचारविचार, जीवनपद्धती, आशा-आकांशा इ. त्या कथांतून प्रतिबिंबित झाल्या आहेत, असे दिसते. तात्पर्य, एखाद्या समाजाची प्राचीन काळातील सांस्कृतिक अवस्था काय होती, हे त्याच्या पुराणकथांवरून कळते. कला, धर्म, कर्मकांड, यातुक्रिया इत्यादींना उत्तेजन देऊन संस्कृतीला समृद्ध करण्यामध्ये पुराणकथांचा वाटा मोठा असतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सांस्कृतिक एकात्मता निर्माण करण्यामध्ये पुराणकथांचा वाटा फार मोठा आहे.

पुराणकथा व विज्ञान : आधुनिक मानवाप्रमाणेच आदिम मानवाच्या मनातही विश्वाच्या स्वरूपाविषयी जिज्ञासा होती. पाऊस कसा पडतो, ग्रहणे का होतात, जग कोणी निर्माण केले इ. प्रश्नांची उत्तरे शोधण्याची त्या मानवाचीही धडपड चालू होती. सत्याचा शोध घेता घेता त्याने पुराणकथेतून या प्रश्नांना उत्तरे दिली असल्यामुळे पुराणकथा हे आदिम मानवाचे विज्ञान होते, असे एक मत आहे. परंतु आदिम मानवाच्या पुराणकथांना त्याचे विज्ञान मानणे , ही मानवी संस्कृतीच्या अभ्यासातील एक घोडचूक आहे, असे बी. मॅलिनोस्कीने म्हटले आहे. कर्मकांड, श्रद्धा, नैतिक आचरण आणि सामजिक संस्था यांना मान्यतेची सनद प्राप्त करून देणे,  म्हणजेच त्यांच्यासाठी एक पूर्वोदाहरण घालून देणे, हे पुराणकथांचे स्वरूप  असते प्रश्नांची उत्तरे  वा स्पष्टीकरणे देणे हे त्यांचे उद्दिष्ट नसते म्हणूनच त्यांची विज्ञानाशी तुलना करता येणार नाही, असे त्याचे मत आहे. पुराणकथांचा धर्माशी असलेला संबंध पाहता त्याच्या मतात बरेचसे तथ्य आहे, हे नाकारता येत नाही. कारण, पुराणकथा व विज्ञान या दोहोंचा प्रवास अत्यंत भिन्न दिशांनी चाललेला असतो. पुराणकथेत एक वैश्विक व अंतिम असे सत्य शाश्वत काळासाठी व्यक्त झाले आहे, असे मानून त्या पुराणकथेतील घटनेत काहीही बदल न करता तिचीच तंतोतंत पुनरावृत्ती करीत रहाणे, हे पुराणकथेत आभिप्रेत असते. याउलट, पूर्वी सापडलेल्या सत्यातील दोष व अपूर्णता दूर करून त्याला सदैव नवे रूप देत जाणे, हे विज्ञानाचे स्वरूप असते. दोहोंतील या भेदामुळेच पुराणकथा या विज्ञानाच्या प्रगतीला खीळ घालू शकतात.

पुराणकथा व तत्त्वज्ञान : पुराणकथा म्हणजे आदिम मानवाचे प्राथमिक तत्त्वज्ञान होते, असेही म्हणता येते. तत्त्वज्ञानात जसा वैश्विक सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो, तसाच पुराणकथांतूनही आढळतो. पुराणकथांतील सत्य हे आध्यात्मिक असते आणि त्यात सत्, असत्, आभासात्मक इ. शब्द आढळत नसले, तरी त्यात शब्दांमागचा आशय मात्र उपस्थित असतोच, असे मीर्शा ईलिआने म्हटले आहे. परंतु हे भारतीय पुराणकथांना लागू नाही. ऋग्वेदात ‘सत्य व अनृत’ वा ‘सत् व असत्’ ही द्वंद्वे याच शब्दांनी सांगितली आहेत. धर्म व तत्त्वज्ञान यांतील बहुसंख्य सिद्धांतावर आधारलेल्या वा त्या सिद्धांतानांच नाट्यरूप देऊन तयार झालेल्या अनेक पुराणकथा असतात. या कथांमुळे त्या सिद्धांताला पुष्टी मिळते आणि ते जनमानसात रूजतात. उदा., पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, देवक, पाप-पुण्य, पितर, स्वर्ग-नरक, देवासुरांची रूपे, अखेरचा निवाडा इ. विषयांवर असंख्य पुराणकथा निर्माण झाल्याचे आढळते. शिवाय, तत्त्वज्ञानातील हे आणि इतर अनेक सिद्धांत स्वरूपतः पुराणकथात्मकच असतात. उदा., भारतीय वेदान्तात जगाचे कारण म्हणून मानलेले ब्रह्म म्हणजे पुराणकथेतील एक भव्य संकल्पनाच होय.

पुराणकथा व कला : निर्मिती, विषय, अभिव्यक्तीची पद्धत इ. अनेक दृष्टींनी विविध कलांचा व पुराणकथांचा घनिष्ठ संबंध असून  पुराणकथा हे कलांचे अक्षय प्रेरणास्थान आहे. पुराणकथांमुळे कलांची निर्मिती होण्यास मदत झाली आणि उलटपक्षी कलांमुळे पुराणकथांचे अस्तित्व प्रभावी झाले, असे म्हणणे शक्य आहे. पुराणकथा व कला याचा हा संबंध अजूनही पूर्णपणे खंडित झालेला नसून , आजही पुराणकथांचा आशय घेऊन श्रेष्ठ कलाकृती निर्माण होत आहेत. ग्रीक पुराणकथांचा कर्मकांडाशी असलेला संबंध तुटलेला असूनही साहित्यकृती व इतर कलाकृतींमुळे त्या शेकडो वर्षे टिकून राहिल्या आहेत. पुराणकथा प्रारंभीच्या काळात मौखिक परंपरांनी आलेल्या असल्या तरी, त्या काळातही त्यांच्यामध्ये  आनुषंगिक म्हणून का होईना, कथेचे आणि रंजकतेचे तत्त्व होतेच. त्यामुळे पुराणकथांचा प्रथमपासूनच साहित्य़ाशी संबंध होता. होमरची ओडिसी  व इलिअड ही महाकाव्ये, भारतातील रामायण, महाभारत ही आर्ष महाकाव्ये, कालिदासाचे रघुवंश, भारवीचे किरातार्जुनीय इत्यादींवरून पुराणकथा व साहित्य यांचा संबंध किती निकटचा होता, हे दिसून येते. महाकाव्यातील नायकनायिकांच्या चरित्रांत पुराणकथांतील देवदेवींची प्रतिबिंबे आढळतात, यावरूनही हा संबंध स्पष्ट होतो. कल्पनाविलास, प्रतीकात्मकता, सूचकता, अतिशोयक्ती इ. तत्त्वे काव्य व पुराणकथा या दोहोंतही असल्यामुळे दोहोंचा संबंध घनिष्ठ असल्याचे स्पष्ट होते. नाट्यकलेवर विषय आणि तो सादर करण्याची पद्धत या दोन्ही दृष्टींनी पुराणकथांचा फार मोठा प्रभाव होता. टेओडोर गास्टर या अमेरिकन विचारवंताने पूर्व भूमध्य समुद्रालगतच्या देशांतील प्राचीन संस्कृतींचा अभ्यास करून पुराणकथा व कर्मकांड यांच्या संबंधातून नाटक निर्माण झाले, असे मत मांडले आहे. प्राचीन काळी देवांनी स्वर्गात जी कृत्ये केली, ती नाट्याच्या रूपाने पृथ्वीवर दाखविण्याच्या प्रयत्नातून प्रारंभीची नाट्यकला निर्माण झाली, असे दिसते. ग्रीक शोकांतिका, जपानमधील ‘नो’ नाटके व जावामधील ‘वायांग’ नाटके ही पुराणकथांतूनच निर्माण झाली.  भारतातील भास, कालिदास इत्यादींच्या नाटकांचे विषय व वातावरण पुराणकथांशी संबद्ध होते. विशिष्ट घटना नाट्यात्मक शैलीत मांडण्याच्या पद्धतीमुळेही पुराणकथांचा नाट्याकलेशी संबंध  येतो. नृत्यकलेचा प्रारंभ शंकर, पार्वती इ. देवतांपासून झाला, या अर्थाच्या हिंदू पुराणकथा असून आदिम मानव कर्मकांडाच्या वा समारंभाच्या प्रसंगी केल्या जाणाऱ्या नृत्यांतून पुराणकथांचाच आशय व्यक्त  करीत असे. इंद्राने पाऊस पाडावा म्हणून जेव्हा यज्ञ केला जाई, तेव्हा कुमारिका डोक्यावर घट घेऊन अग्नीभोवती नृत्य करीत असत. पशूंचे चर्म वा मुखवटे धारण करून जी नृत्ये केली जातात, त्यांतून पुराणकथांतील वातावरणाची निर्मिती केली जाते. संगीताचा नृत्याशी असलेला संबंध, ऑपेरासारख्या संगीतप्रकारातून असलेले पुराणकथात्मक विषय, यक्षगंधर्वादींचे संगीतप्रेम इ. मार्गांनी संगीत हे पुराणकथांशी निगडित असते.  स्थापत्यकला, शिल्पकला, मूर्तिकला, चित्रकला, वास्तुकला इत्यादींची समृद्धी तर  पुराणकथात्मक विषयांमुळेच झाली आहे. इतकेच नव्हे, तर पुराणकथांच्या अध्ययनाखेरीज या कलांचे अध्ययनच पूर्ण होऊ शकत नाही. इमारतीचा पाया खोदताना तो पृथ्वी धारण करणाऱ्या शेषादींच्या मस्तकावर आणण्याचा प्रयत्न करणे वा स्वर्गीय मंदिराची प्रतिकृती म्हणून पृथ्वीवर मंदिर तयार करणे इ. असंख्य प्रकार पुराणकथा व उपरिनिर्दिष्ट कला यांचा संबंध दर्शविणारे आहेत.

पुराणकथा व समाजशास्त्र : पुराणकथांचा अभ्यास करताना त्यांचा सामजिक संदर्भ अत्यंत महत्त्वाचा असतो आणि पुराणकथा म्हणजे अस्तित्वात असलेल्या सामाजिक संस्थांच्या दृष्टीने मान्यतेची सनदच असते, असे बी. मॅलिनोस्कीने म्हटले आहे. भाषा, विज्ञान, धर्म इत्यादींचा आणि समाजाचा जसा परस्परसंबंध असतो, तसाच पुराणकथांचा व समाजाचाही निकटचा संबंध असतो. पुराणकथांचा समाजरचनेवर परिणाम होतो, तर समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब पुराणकथांतून दिसू शकते. पुराणकथांच्या प्रभावाने मानवाच्या मनात विशिष्ट श्रद्धा निर्माण होतात आणि त्यातूनच तो विविध कृती करतो.  उदा., मानवामध्ये व्रतांचे आचरण करण्याची व निषिद्ध कृत्ये वर्ज्य करण्याची प्रवृत्ती दृढमूल होण्यास पुराणकथांचे साहाय्य होते. पुराणकथांचे सामर्थ्य जसे त्यांच्या धार्मिक गूढतेत असते, तसेच विविध सामाजिक संस्था, कला, आर्थिक व्यवहार इत्यादींवर होणाऱ्या त्यांच्या परिणामातही असते. शिकार, पशुपालन, कृषी, मद्यपान, स्त्रियांचा दर्जा, नरमांसभक्षणप्रथा, कर्मकांड, यातुक्रिया, नीतिकल्पना, आशाआकांक्षा, पितृपूजा , राजा-प्रजादींचे परस्परसंबंध आणि अनेक प्रकारच्या चालीरीती, रूढी व परंपरा यांचे ज्ञान पुराणकथांवरून होते. उदा., हिंदू समाजातील अत्यंत महत्त्वाची अशी जी वर्णव्यवस्था, ती पुरुषसूक्तातील पुराणकथेशी निगडित आहे. मानवशास्त्राच्या अभ्यासाखेरीज पुराणकथांचा अभ्यास निष्फळ आहे, असे जे क्लोद लेव्ही-स्ट्रोउसने म्हटले आहे, तेही महत्त्वाचे आहे.

पुराणकथा व इतिहास : इतिहास (विशेषतः प्राचीन इतिहास) आणि पुराणकथा या दोहोंमध्ये भूतकालीन घटनांचे निवेदन  असल्यामुळे त्या दोहोंचे वेगळेपण  दाखविणे अवघड असते. शिवाय इतिहासाच्या अभ्यासकांना इतिहास जितका सत्य वाटतो, तितक्याच, किंबहुना त्याहून अधिक प्रमाणात श्रद्धाळू लोकांना पुराणकथांची सत्यता पटत असल्यामुळेही काही अडचणी निर्माण होतात. अर्थात अभ्यासकांच्या दृष्टीने इतिहासात वास्तवाचे व पुराणकथेत कल्पिताचे दर्शन घडते, हा फरक असतोच. शिवाय, भूतकाळातील घटनांचे अचूक ज्ञान प्राप्त करणे, हा इतिहासाचा उद्देश असतो, तर पूर्वोदाहरणानुसार कर्म करणे हा पुराणकथांचा उद्देश असतो. ज्ञान हा त्यांचा उद्देश नसतो. मानवजातीने दीर्घकाळपर्यंत इतिहासाविना आपला प्रवास केला आहे परंतु तिने पुराणकथांची सोबत मात्र नेहमीच घेतली आहे. असे असले, तरी व्यवहारात भूतकाळातील घटनांची अचूक वास्तवता निश्चित करणे, हे अवघड असते. कारण, एकीकडे अलौकिकतेमुळे काही  ऐतिहासिक घटनांना व अलेक्झांडर, कृष्ण इ. पुरुषांच्या जीवनांना पुराणकथांचा रंग प्राप्त होतो, तर दुसरीकडे देवविषयक काही कल्पित पुराणकथा समाजात इतक्या जिवंतपणे रूजलेल्या असतात, की त्या कथा म्हणजे वीरांची ऐतिहासिक चरित्रे, असे वाटू लागते. काही वेळा एकाच घटनेच्या निवेदनात इतिहास व पुराणकथा यांचे मिश्रण झालेले दिसते. ऐतिहासिक घटनांचे पुराणकथांत रूपांतर होताना कोणत्या प्रक्रिया घडतात, याविषयी मीर्शा ईलिआने केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते कोणतीही ऐतिहासिक घटना दीर्घकाळापर्यंत जशीच्या तशी लोकांच्या स्मरणात राहू शकत नाही. त्यांच्यापुढे ईश्वर, पूर्वज वा एखादा वीर यांनी प्राचीन काळात केलेल्या महकृत्यांचे आदर्श वा मूलबंध (आर्किटाइप्स) असतात. लोक हळूहळू ऐतिहासिक घटनेचा प्रवाह त्या मूलबंधाशी एकरूप करून टाकतात. मग ता वीरपुरुष वा त्याचे महत्कृत्य स्वतःच्या ऐतिहासिक स्वरूपात शिल्ल्क न राहता, त्या मूलबंधाशी सुसंगत अशी व्यक्ती वा घटना बनून लोकांच्या स्मरणात राहते. कृष्णाला वा शिवाजीला मानव न मानता विष्णूचा वा शिवाचा अवतार मानण्यात हीच प्रवृत्ती दिसते,  असे म्हणता येईल. सर्व पुराणकथांचे मूळ ऐतिहासिक घटनांमध्ये असते, असे मत इ.स.पू. ३०० च्या सुमारास होऊन गेलेल्या यूहेमरस या ग्रीक विद्वानाने मांडले होते. मूळचे मानव असलेले झ्यूस वगैरे लोक आपल्या  महत्कृत्यांंमुळे देव मानले गेले, संस्कृतीला उत्तेजन देणारा झ्यूस हा राजा, क्रीट येथे मरण पावल्यावर तेथे त्याची कबर बांधलेली आढळते. प्रॉमीथिअस मातीतून स्त्री-पुरुष निर्माण करीत होता, याचा अर्थ तो प्रत्यक्षात मातीच्या मूर्ती तयार करीत होता इ. विचार त्याने व त्याच्या अनुयायांनी मांडले होते. आधुनिक काळात हर्बर्ट स्पेन्सरने या मताला काहीशी प्रतिष्ठा मिळवून दिली तथापि हे मत आता मागे पडले आहे. त्याच्या आधी काही काळ ईजिप्तमधील  हेकॅटेउसने क्रोनस, रीया, झ्यूस, हेरा या ग्रीक

एक ग्रीक चषकचित्र : ऑलिंपसवरील देवतासमूह-डावीकडून अनुक्रमे दुसरा डायोनायसस, अथीना , झ्यूस,अमृत ओतणारा गॅनिमीडीस, हेस्टिला व ॲफ्रोडाइटी, इ.स.पू.सु. ५१५.

देवता आणि इसिस व ओसायरिस या ईजिप्ती देवता मूळच्या मानव असल्याचे मानले होते. भारतातही वैदिक देवतांचे स्वरूप स्पष्ट करताना ‘वृत्र हा त्वष्ट्याच्या पुत्र होता’, अशा पद्धतीने विवेचन करणारे ऐतिहासिक होते, असे निरुक्तात म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र, पुराणकथांना इतिहास मानल्यामुळे पुराणकथा व इतिहास दोहोंपैकी कशाचेच यथार्थ ज्ञान होत नाही. तसेच, एका व्यक्तीला जो पवित्र इतिहास वाटतो, ती दुसऱ्याला कल्पित कथा वाटण्याची शक्य़ता असल्यामुळे पुराणकथेला इतिहास व इतिहासाला पुराणकथा म्हटले जाण्याचा धोका संभवतो.

पुराणकथा व मानसशास्त्र : कार्ल युंग या स्विस मानसशास्त्रज्ञाच्या मते पुराणकथांतील सत्य हे मानसशास्त्रीय असते. त्याच्या मते पुराणकथा म्हणजे मनाचे स्वरूप स्पष्ट करणारा विशिष्ट आविष्कार होय. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, चंद्राच्या कला, सूर्योदय, सूर्यास्त इ. निसर्गघटनांविषयीच्या पुराणकथा या त्या निसर्गघटनांचे स्पष्टीकरण करण्याऱ्या नसतात, तर त्या कथा मानवाच्या अबोध अंतर्मनात चाललेल्या नाट्याचे प्रतीकात्मक आविष्कार असतात म्हणजेच, मानवी भावनांचे निसर्गघटनांवर प्रक्षेपण झालेले असते किंवा त्या निसर्गघटनांत मानवी भावना प्रतिबिंबित झालेल्या असतात. त्याच्या मते, आदिम मानवाचे मन पुराणकथा निर्माण करीत नव्हते, तर ते पुराणकथा जगत होते. पुराणकथा हे आदिम जमातींचे भावनिक जीवनच होय. त्या  जीवनाला पुराणकथांचा मिळणारा वारसा नाहीसा झाला, तर ते जीवन नष्ट होऊन जाते. सिग्मंड फ्रॉइडच्या आधीचे अभ्यासक पुराणकथांच्या सांस्कृतिक इतिहासाला महत्त्व देत होते परंतु फ्रॉइडने या अभ्यासात मानवाच्या जैविक रचनेला महत्त्व दिले. मनोविश्लेषण करणारा शास्त्रज्ञ रूग्णांच्या स्वप्नांचा उलगडा करताना ज्याप्रमाणे अनुभवांची पुन्हा रचना करतो, त्याप्रमाणेच पुराणकथांच्या अभ्यासकाला अनुभवांची पुन्हा रचना करावी लागते, असे त्याने मानले होते. त्याच्या मते रुग्णांच्या स्वप्नांवरून त्यांच्या दडपलेल्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा लहानपणीच्या अनुभवांची पुन्हा रचना करताना ज्याप्रमाणे मूळ अनुभवात विपर्यास झाल्याचे आढळून येते, त्याप्रमाणेच ऐतिहासिक घटनांतून पुराणकथा तयार होताना मूळ घटनांत विपर्यास झाल्याचे आढळते. तसेच,त्याच्या मते कोणत्याही पुराणकथेच्या आशयावरून आपण अंतिम सत्याकडे जाऊ शकतो. उदा., ग्रीक पुराणकथेनुसार ऑलिंपस पर्वतावर असलेले झ्यूसचे निवासस्थान, ही सत्य घटना आहे, असे नव्हे. परंतु झ्यूस व हेरा यांच्या कथेवरून ग्रीकांना काय व्हावे असे वाटत होते, त्यांना कोणत्या गोष्टीविषयी निराशा वाटत होती आणि ते झ्यूसच्या प्रतिमेत कशाचे प्रक्षेपण करीत असत, यांचा अभ्यास करता येतो. लूत्स्यान लेव्ही ब्र्यूूल या फ्रेंच तत्त्ववेत्त्याने पुराणकथांचा संबंध तर्कपूर्व मनःस्थितीशी (प्रिलॉजिकल मेंटॅलिटी) जोडला आहे.

मनोविश्लेषणाच्या आधारे पुराणकथांतून काही सत्ये स्पष्ट होतात, हे थीओडोर राइकने स्पष्ट केले आहे. उदा., बायबलच्या ‘जुन्या करारा’तील आदमच्या बरगड्यांपासून ईव्हची निर्मिती झाली, ही कथा स्त्रीला पुरुषापेक्षा कमी लेखले जात असल्याची द्योतक आहे.

पुराणकथा व भाषा : पुराणकथांची निर्मिती व अभ्यास यांमध्ये भाषेचाही मोठा वाटा असतो. उदा., भाषेच्या व्याकरणानुसार शब्दांना असलेल्या लिंगांचा पुराणकथांतील देवादिकांच्या  स्वरूपावर प्रभाव पडतो. कारण, पदार्थाचे मानवीकरण व दैवतीकरण करताना व्याकरणातील लिंगाचा विचार करावाच लागतो. ज्या लोकांनी सूर्याला पुरुष मानले त्यांच्या भाषेत सूर्य या अर्थाचा शब्द पुल्लिंगी होता आणि ज्यांनी सूर्याला स्त्री मानले त्यांच्या भाषेत तो शब्द स्त्रीलिंगी होता, असे दिसते. देवादिकांची नावे आणि पुराणकथांतील इतर शब्दांच्या  व्युत्पत्तींवरून पुराणकथांचे मूळ आणि स्वरूप समजायला मदत होते. पुराणकथा व भाषा ही दोन्ही विशिष्ट आशयाचे निवेदन करणारी संदेशवहनाची साधने असल्यामुळेही त्यांचा निकटचा संबंध आहे. तुलनात्मक भाषाशास्त्रातून तुलनात्मक पुराणकथाविद्येचा जन्म झालेला आहे. माक्स म्यूलरच्या मते संस्कृतमध्ये प्रारंभी सूर्य, पर्जन्य, उषा इ. शब्द होते. परंतु पुढे ती भाषा रोगयुक्त बनून या शब्दांचे मूळचे अर्थ विस्मृत झाले आणि ते शब्द देवतावाचक मानून त्यांच्याभोवती पुराणकथा गुंफण्यात आल्या. म्हणून त्याच्या मते पुराणकथा म्हणजे भाषेचा रोग होय.

पुराणकथा व साहित्यप्रकार : इतर साहित्यिक कथांप्रमाणेच पुराणकथांतही कथानक, व्यक्तिचित्रण, मनोरंजन इ. वाङ्‌मयीन तत्त्वांना स्थान असते. पुराणकथांमध्ये असे तत्त्व असल्यामुळेच त्यांतून विविध प्रकारच्या ललित साहित्याला प्रेरणा मिळते. परंतु या दोन प्रकारच्या कथांमध्ये आढळणारे हे साम्य वरवरचे व गौण असून त्यांमध्ये असणारे भेद मात्र अत्यंत मूलगामी व महत्त्वाचे आहेत. पुराणकथा पवित्र मानल्या जात असल्यामुळे स्त्रिया , मुले इ. अदीक्षितांना त्या सांगितल्या जात नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या उपस्थितीत त्या दीक्षित व पात्र व्यक्तींनाही सांगितल्या जात नाहीत. त्या विधिपूर्वक व विशिष्ट प्रसंगीच सांगितल्या जातात. इतर कथा मात्र पवित्र मानल्या जात नसल्यामुळे त्या केव्हाही व कोणालाही सांगितल्या जातात. पुराणकथांच्या बाबतीतील निषिद्धे त्यांना लागू पडत नाहीत. पुराणकथा सांगणारे व ऐकणारे लोक त्या कथांना अंतिम सत्य म्हणून स्वीकारतात याउलट इतर कथांच्या बाबतीत मात्र त्या कल्पनेने निर्मिलेल्या असत्य कथा आहेत, याची जाणीव असते. एखादी कथा आनंददायक असूनही जर जी कल्पित आहे असे जाणवत असेल, तर ती पुराणकथा ठरत नाही. उदा., पंचतंत्र, हितोपदेश, इसापच्या कथा, अरबी भाषेतील सुरस गोष्टी इ. पुराणकथा नव्हेत. पुराणकथा कर्मकाडांशी निगडित असतात, इतर कथांचा कर्मकाडांशी संबंध नसतो. पुराणकथांत मनोरंजन असले, तरी ते आनुषंगिक व गौण तत्त्व असते. इतर कथांत मात्र त्यालाच प्राधान्य असते. पुराणकथांना जशी एक अधिकृतता असते, तशी ती इतर कथांना नसते.

पुराणकथा व लोककथा यांचे विषय अनेकदा एकच असतात. दोन्ही कथा परंपरागत असतात परंतु दोहोंपैकी कोणाची निर्मिती आधी झाली आणि कोणी कोणाच्या विषयांची उसनवारी केली, हे ठरविणे अवघड असते. दोहोंतील सीमारेषा आखणेही अवघड असते. काही लोककथा म्हणजे तयार होत असलेल्या पुराणकथा असतात, तर काही लोककथा या भग्न पुराणकथांचे अवशेष असतात. पुराणकथा व परीकथा या दोहोंत असामान्य घटना व व्यक्ती यांचे वर्णन असते. परंतु पुराणकथेची सुरुवात ‘विश्वाच्या प्रारंभी’ अशा शब्दांत होत असल्यामुळे ती मानवी अनुभवकक्षेत न येणाऱ्या प्राचीन काळातील घटनांचे वर्णन करीत असते. परीकथेची सुरुवात मात्र ‘एकदा’ या शब्दात होत असल्यामुळे ती इतक्या प्राचीन घटनांचे वर्णन करत नाही. पुराणकथांतील पात्रे व घटना घेऊन मनोरंजनार्थ परीकथा तयार केल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. बोधकथांप्रमाणे पुराणकथांमधूनही संदेश मिळू शकतो परंतु बोधकथा सत्य मानल्या जात नाहीत. उदा. इसापच्या बोधकथा कल्पित आहे, याची जाणीव असते. वीरगाथा वा ‘सागा’ या पुराणकथांप्रमाणेच सत्यकथन करण्याचा प्रयत्न करतात. वारगाथांतील घटनांचे स्थलकाल निश्चित असतात. महाकाव्य आणि आख्यायिका यांतील घटनांचा काळही निश्चित असतो. पुराणकथांतील घटनांच्या बाबतीत मात्र तसे आढळत नाही. एखाद्या दीर्घ व अनेकदा सांगितल्या गेलेल्या कथेत सर्व कथातत्त्वांचे मिश्रण झाल्याचेही आढळू शकते.

पुराणकथांचे विषय : विश्वातील अक्षरशः कोणताही विषय पुराणकथांनी वर्ज्य मानलेला नसल्यामुळे त्यांचे स्वरूप विश्वव्यापक असते. अर्थातच काही प्रधान विषयांवरील कथा सार्वत्रिक असतात, तर काही विषयांवरील कथा या स्थानिक असतात. जगभर आढळणाऱ्या पुराणकथांतील विषयांची व्यापकता ध्यानात यावी आणि त्यांचे मुख्य विषय कोणते असतात हे स्पष्ट व्हावे, यासाठी काही मुख्य विषयांवरील पुराणकथांची उदाहरणे पुढे दिली आहेत.

महाप्रलयात वटपत्रावर पहुडलेला नारायण

विश्व, देवदेवता, मानव, पशुपक्षी, पृथ्वी, समुद्र, पर्वत, नदी, सरोवर इत्यादींची निर्मिती कशी झाली, याविषयीच्या कथा बहुतेक सर्व समाजांतून आढळतात. पुरुषसूक्तातील कथा ही या प्रकारचीच होय. शून्यातून, जलातून वा अंड्यातून जग निर्माण झाले एखाद्या देवाने, पक्ष्याने वा आणखी कोणीतरी ते निर्माण केले मूळच्या एखाद्या देवदांपत्यापासून पुढचे सर्व देव निर्माण झाले चिखल, खडक, धूळ इत्यादींपासून मानवाची निर्मिती झाली देवतेचे अश्रू वा घाम यांपासून नद्या निर्माण झाल्या इ. अर्थाच्या असंख्य पुराणकथा आढळतात. विश्व आणि त्यातील विविध पदार्थ आता ज्या अवस्थेत आहेत, त्या अवस्थेत ते पूर्वी अस्तित्वात नव्हते,विशिष्ट व्यक्ती व घटना यांच्यामुळे ते अस्तित्वात येऊन त्यांना सध्याची अवस्था प्राप्त झाली, असा या सर्व कथांचा  आशय असतो. एका ग्रीक कथेनुसार प्रॉमीथिअसने जमीन व पाणी यांच्यापासून किंवा स्वतःच्या अश्रूंपासून पहिले मानवशरीर निर्माण केले आणि अथीनाने त्यात प्राण भरले. एका चिनी कथेनुसार जेड या सर्वश्रेष्ठ देवाने मानवजात निर्माण केली. त्याने मातीच्या मानवी मूर्ती तयार करून त्या उन्हात वाळत ठेवल्या होत्या. त्याच वेळी पाऊस आल्याने काही मूर्ती भिजल्या व बिघडल्या. भिजून बिघडलेल्या मूर्ती म्हणजे पृथ्वीवरचे आजारी लोक आणि न भिजलेल्या मूर्ती म्हणजे आरोग्यसंपन्न लोक, असे मानले जाते.

जलप्रलय, अग्निप्रलय इ. मार्गांनी आधी जगाचा नाश होऊन पुन्हा नवी निर्मिती झाल्याच्या कथा जगात सगळीकडे आढळतात. मानवांनी केलेल्या पापांबद्दल शिक्षा म्हणून देवाने प्रलय घडविला, असे काही वेळा मानले जाते. जुने झालेले जग सामर्थ्यहीन बनलेले असते, त्याच्यामध्ये नवे चैतन्य निर्माण करण्यासाठी त्याचा एकदा नाश होऊन पुन्हा नवी निर्मिती घडणे आवश्यक आहे, अशी धारणा काही वेळा प्रलयकल्पनेमागे असते. प्रलयामुळे प्रचंड नाश होत असला, तरी सर्व पदार्थांची प्रातिनिधिक बीजे त्या प्रलयातून वाचलेली असतात व त्यांच्यापासून पुन्हा निर्मिती होते. भारतातील मनुमत्स्यकथा ही प्रलयकथा म्हणून प्रसिद्ध आहे. याच प्रकारच्या प्रलयकथा ग्रीक, हिब्रू, अमेरिकन इंडियन इ. विविध लोकांत आढळतात.[→प्रलय].

आदम व ईव्ह यांचे अध:पतन : मायकेल अँजेलो, सिस्टाइन चॅपेल.

भारतीय प्रलयकल्पना इतिहासाच्या चक्राकार गतीवर अधिष्ठित आहे. अव्यक्त विश्व व्यक्त वृद्धिंगत होते आणि नंतर क्षीण होऊन प्रलयाच्या रूपाने अव्यक्तात लीन होते, अशी ही इतिहासाची चक्राकार गती आहे. अव्यक्तात लीन झाल्यावर पुन्हा व्यक्त होणे व पुन्हा अव्यक्तात लीन होणे हा क्रम म्हणजेच प्रलय, उत्पत्ती आणि पुन्हा प्रलय हा चक्राकार क्रम सदैव चालू राहतो.  सेमिटिक परंपरेतील यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांनी मात्र इतिहासाच्या सरळ रेषेतील आकृतिबंध स्वीकारलेला असून त्यांच्या मते निर्मिती, मानवाचा अधःपात, प्रेषितांचे आगमन, भविष्यात अखेरचा निवाडा आणि त्यानंतर पुण्यवंतांना शाश्वत स्वर्ग व पाप्यांना शाश्वत नरक असा क्रम घडणार आहे. सरळ रेषेच्या या आकृतिबंधात चक्राकार क्रमाला वाव नाही.

इतिहासाचा चक्राकार आकृतिबंध स्वीकारताना भारतीयांनी युगे, कल्प व मन्वंतरे अशा स्वरूपात कालविभागणी केली आहे. इतर संस्कृतींमधूनही युगांच्या कल्पना व कालविषयक पुराणकथा आढळतात. [→कल्प युग].

कालविषयक पुराणकथांप्रमाणेच स्थलविषयक पुराणकथाही असतात आणि त्या वैश्विक भूगोल मांडण्याचा प्रयत्न करतात. पृथ्वी, द्युलोक, अंतरिक्ष इ . विविध लोकांत या विश्वाची विभागणी केलेली आढळते.

प्राचीन काळी सुवर्णयुग असताना चिरतारुण्य, अमरत्व, देवांशी संभाषण यांसारखी अनेक सुखे उपभोगणारा मानव अहंकार, ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन, स्त्रीचा मोह, सैतानाच्या सल्ल्याप्रमाणे वागणे, निषिद्ध कर्म करणे, निष्काळजीपणा, मूर्खपणा, कलह, दुष्टता इ. कारणांनी अधःपतित झाला आणि तेव्हापासून या जगात मृत्यू, रोगराई इ. दुःखांना प्रारंभ झाला, अशा अर्थाच्या कथा जगात सर्वत्र आढळतात. जोपर्यंत एखादा देव मानवात रहात होता, तोपर्यंत मानव सुखी होता. परंतु तो रागावून निघून गेल्यावर मानव दुःखी झाला, अशाही कथा आढळतात. अंदमानी लोकांच्या मते पुलुगा, ईजिप्ती लोकांच्या मते रा आणि दक्षिण ऑस्ट्रेलियन लोकांच्या मते मुंगन हे देव पृथ्वीवरून निघून गेल्यामुळे मानव दुःख भोगू लागला. अधःपतित लोकांना देव प्रलयवादी मार्गांनी शासन करतो, असे मानले जाई. सापाच्या सांगण्यावरून देवाची आज्ञा मोडून ज्ञानवृक्षाचे फळ खाल्ल्यामुळे आदम व ईव्ह या आद्य मानवी दांपत्याचा अधःपात झाल्याची बायबलच्या ‘जुन्या करारा’तील कथा प्रसिद्ध आहे. देवाने मानवांना निर्माण केल्यावर त्यांना ‘अमर रहाल’, असे सांगितले होते. परंतु माणसांच्या चुकीमुळे त्यांचे अमरत्व लुप्त झाले, अशा अर्थाच्या कथा आढळतात. यांखेरीज, लोकांनी देवाला मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे देवाने त्यांचे अमरत्व कात टाकणाऱ्या प्राण्यांना दिले प्रॉमीथिअसने फसवल्यामुळे रागावलेल्या झ्यूसने पँडोरा या देवीला मानवात पाठविले व तिने भांड्यावरील झाकण काढल्यामुळे त्यातील दुष्ट शक्ती मानवात शिरल्या देवाने मानवाला पेटीतून  अमरता देताना पेटी उघडू नकोस म्हणून सांगितले होते परंतु त्याच्या पत्नीने पेटी उघडल्यामुळे मृत्यू सुरू झाला, ईश्वराऐवजी सैतानाला विश्वनिर्माता मानल्यामुळे त्याचा अधःपात झाला इ. असंख्य कथा आढळतात.

याउलट, एखाद्या मानवाने मृत्यूला जिंकले, अशा अर्थाच्या कथाही आढळतात. यमाकडे जाऊन आणि मृत्यूचे रहस्य जाणून परत आलेल्या नचिकेताची वैदिक कथा प्रसिद्ध आहे. सावित्रीने मृत सत्यवानाला यमाकडून परत आणले, ही कथाही विख्यात आहे. पॉटॉक या वीराने पत्नीच्या प्रेताबरोबर खड्ड्यात उतरून मृत्युदूत असलेल्या सापाचे मस्तक तोडले आणि पत्नीसह परत येऊन दीर्घायुष्य भोगले, अशी एक स्लाव कथा आहे. एका ग्रीक कथेनुसार सिसिपस या वीराने मृत्यूनंतर माझी अंत्यक्रिया करू नकोस, असे पत्नीला सांगितले होते. मृत्यूनंतर पाताळात गेल्यावर एका क्षणासाठी परत जाऊन येतो, अशी थाप मारून तो परत आला आणि नंतर त्याने पाताळात जावयाचे नाकारले. फिन्नो-उग्रिक पुराणकथेतील वैनामोइनेन हा वीर मृत्युलोकात जाऊन परत आला होता.

आकाश ही माता व पृथ्वी हा पिता मानणाऱ्या ईजिप्ती कथेचा अपवाद वगळता, जगात इतर बहुतेक सर्व ठिकाणी पृथ्वी ही माता व स्वर्ग वा आकाश हा पिता मानलेला आहे. त्यांच्या विवाहाच्या कथा व उत्सव आढळतात. या बाबतीत अनेक ठिकाणी आढळणारी एक गोष्ट म्हणजे आलिंगनबद्ध असलेल्या या मातापित्यांना कोणीतरी जबरदस्तीने अलग केले, ही कल्पना होय. हिटाइट लोकांत करवत वा सुरीने त्यांना अलग केल्याची कथा होती. आलिंगनबद्ध असलेले वरचे विशाल पुरुषजलतत्त्व आणि खालचे स्त्रीजलतत्त्व यांना येहोवा या ईश्वराने अलग केले, अशी हिब्रू कथा आहे. बॅबिलोनियातील मार्डुकने तैमातचे दोन भाग केले, याचा अर्थ तिला वर असलेल्या अप्सू या जलदेवापासून अलग केले. रंगी हा आकाशदेव पपा या पृथ्वीदेवीशी आलिंगनबद्ध असल्यामुळे मधले देव वगैरे चिरडले जाऊ लागले, म्हणून देवांनी त्यांना अलग केले, अशी कथा न्यूझीलंडमध्ये होती. गेब (पृथ्वी) आणि नट (आकाश) आलिंगनबद्ध असताना शू या त्यांच्या पित्याने त्यांना अलग केले, अशी ईजिप्ती कथा आहे.

सुफलतेच्या देवतांविषयी विविध प्रकारच्या कथा आढळतात. भारतातील लिंगपूजा विख्यातच आहे. ईजिप्तीमध्ये सुफलतेचा देव मिन हा नेहमी उत्थितलिंग अवस्थेत दाखविला जात असे. ईजिप्तीमधील ख्नुम हा दुसरा एक सुफलतेचा देव मातांच्या उदरांत गर्भाला आकार देण्याचे काम करतो, असे मानले जाई. अमेरिकेतील माया संस्कृतीत आक्त हा देव मातांच्या गर्भांत मुलांना आकार देतो, असे मानतात.

देवतांच्या दोन पिढ्यांचा संघर्ष दाखविणाऱ्या कथा ग्रीस, बॅबिलोनिया इ. ठिकाणी आढळतात. ग्रीक कथेनुसार यूरानस या आकाशदेवाला आपल्या मुलांचे भय वाटल्यामुळे त्याने त्यांना जन्मल्याबरोबर जमिनीत लपवले. नंतर जीआ (पृथ्वी) या त्याच्या पत्नीने दिलेला कोयता घेऊन त्याचा पुत्र क्रोनस याने वडिलांचे जननेंद्रिय तोडले. पुढे, आपल्या मुलांपैकी एकजण आपली सत्ता घेणार आहे, या भविष्यवाणीमुळे क्रोनसने आपल्या मुलांना गिळून टाकण्यास सुरुवात केली. परंतु रीया या त्याच्या पत्नीने  वाचविलेल्या झ्यूस या त्याच्या पुत्राने शेवटी त्याचा पराभव केला. ट्यूटॉनिक कथेत देव व त्यांचे पूर्वज जायंट यांचे युद्ध आढळते. आद्यपिता अप्सू आणि आद्यमाता तैमात यांच्यापासून निर्माण झालेल्या देवांशी तैमातने युद्ध केले, तेव्हा मार्डुक या देवाने तिला ठार मारून तिच्या देहाचे दोन तुकडे केले, अशी बॅबिलोनियन कथा आहे. नोआचा पुत्र हॅम अथवा हॅमचा पुत्र कॅनॉन याने नोआ याला नपुंसक बनविले, अशी हिब्रू कथा आहे. कुमार्बीने आपल्या दातांनी आपला पिता अनू याचे जननेंद्रिय तोडल्याची आणि अनूनेही अलालू या आपल्या पित्याला स्वर्गातून हाकलल्याची कथा हिटाइट लोकांत होती. पुढे तेशुब या पुत्राने कुमार्बीचेही राज्य हिरावून घेतले. यांपैकी बऱ्याच कथांतून पित्याला वा अन्य देवाला नपुसंक बनविल्याची वर्णने आहेत. ईजिप्ती कथेत सेतने ओसायरिसचे तुकडे केल्यावर इसिसने ते जुळविले परंतु त्याचे लिंग तेवढे एका खेकड्याने खाल्ल्यामुळे सापडले नाही, असे वर्णन आहे. वरुणाला नपुंसकत्व आले होते, अशा अर्थाची एक वैदिक कथा आहे.

मारलेल्या व बळी म्हणून अर्पिलेल्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरापासून विश्वाची निर्मिती झाली, अशा अर्थाच्या अनेक कथा  आहेत. यज्ञात बळी दिलेल्या पुरुषाच्या शरीरापासून विविध सृष्टी निर्माण झाली, अशी कथा ऋग्वेदातील पुरुषसूक्तात आहे. जपानी कथेनुसार अग्निदेव जन्मला तेव्हा त्याची आई ईझॅनमी मेली आणि तिची ओकारी व मलमूत्र यांपासून काही देव निर्माण झाले. अग्निदेवाचा पिता ईझॅनगी याने रागाने मुलाचा शिरच्छेद केला आणि त्याच्या रक्ताच्या थेंबापासून आठ आणि शरीराच्या भागापासून आठ देवता निर्माण झाल्या. ट्यूटॉनिक कथेनुसार देवांनी इमीर या जायंटला मारले. त्याच्या रक्ताने पोकळी भरली व समुद्र बनला. त्याच्या मांसापासून पृथ्वी, हाडांपासून पर्वत, केसांपासून वृक्ष आणि कवटीपासून स्वर्ग बनला. ग्रीक कथेनुसार क्रोनसने वडिलांचे जननेंद्रिय तोडले, तेव्हा रक्ताच्या थेंबापासून फ्यूरीझ नावाचे जायंट आणि मीलिआ नावाच्या निंफ्स जन्मल्या. तसेच, समुद्रात टाकलेल्या भागापासून पांढरा फेस निर्माण झाला आणि त्यापासून ॲफ्रोडाइटी  ही देवी निर्माण झाली. तैमातच्या देहाच्या दोन तुकड्यांपासून स्वर्ग व पृथ्वी निर्माण झाल्याची बॅबिलोनियन कथा आहे. एका ट्यूटॉनिक कथेनुसार ओडिन या देवाने स्वतःच्या भाल्याने स्वतःला जखमा करून दिव्य वृक्षाला टांगून घेतले आणि या आत्मबलिदानातून त्याला नवजीवन प्राप्त झाले.

चोरून वा अन्य मार्गाने पृथ्वीवर अग्नी (व इतर काही पदार्थ) कसा आणला गेला, याविषयीही अनेक कथा आहेत. ग्रीक कथेनुसार यज्ञातील कोणता भाग देवांना द्यावा, हे ठरविण्यासाठी एकदा देव व मानव यांची सभा भरली होती. निवाडा करताना प्रॉमीथिअसने फसवणूक केल्याचे ध्यानात येताच झ्यूसने पृथ्वीवरील मानवांचा अग्नी अडवून ठेवला परंतु प्रॉमीथिअसने तो चोरून पुन्हा मानवात आणला. स्वर्गातून, अधोलोकातून वा साप, कांगारू इत्यादींकडून चोरून, जबरदस्तीने वा युक्तीने अग्नी आणल्याच्या व कित्येकदा तो पुन्हा गमावला गेल्याच्या कथा न्यूझीलंड वगैरे ठिकाणी आहेत. कधी एखाद्या पक्ष्याने, तर कधी एखाद्या वीराने अग्नी आणलेला असतो. सोमादी पदार्थ स्वर्गातून आणले, अशा अर्थाच्या कथाही आढळतात. गरुडाने स्वर्गातून अमृत आणले, अशी हिंदू कथा आहे. सुलभप्रसूतिकारक वनस्पती स्वर्गातून आणण्यासाठी एटना या वीराने गरुडाची मदत घेतली, अशी एक बॅबिलोनियन कथा आहे. सुटुंग या जायंटकडे असलेले कवित्वाचे पेय ओडिन या देवाने गरुड बनून पळवून आणले, अशी ट्यूटॉनिक कथा आहे. पारिजातक वृक्ष देवांकडून आणला, अशी हिंदूंची कथा आहे. काही वृक्ष अधोलोकातून आणले, काही वृक्षांचे बीज सूर्य व चंद्रावरून आले इ. कथा मध्य बोर्निओमध्ये आढळतात.

पशू हा मानवांचा पूर्वज आहे, मृतात्मे पशूंमध्येच प्रवेश करतात, नवजात बालकाचा आत्मा पक्ष्याच्या रूपात असतो, मानवाचा एक आत्मा शरीराबाहेर पशूत वा पक्ष्यात राहतो इ. समजुतींवर आधारलेल्या अनेक पुराणकथा असतात. अर्धे रूप मानवी व अर्धे रूप पाशवी असलेले अनेक प्राणी पुराणकथांतून आढळतात. दुष्ट वा हितकारक ड्रॅगन, तीन डोकी असलेला कुत्रा, राखेतून उठणारा फीनिक्स, सात सात फणा असलेला नाग, पंख असलेला सर्प, आठ पायांचा ऑक्टोपस इ. अनेक विचित्र पशू पुराणकथांतून आढळतात. पशूंची उत्पत्ती वा त्यांचे विशिष्ट रूप यांविषयी अनेक कथा आहेत. हत्ती, कासव, बेडूक, बैल इ. प्राण्यांच्या आधारामुळे पृथ्वी स्थिर झाली आहे, अशा अर्थाच्या कथा सर्वत्र आढळतात. माशी, डास इ. चावल्यामुळे वा अन्य कारणाने या प्राण्यांनी हालचाल केली म्हणजे भूकंप होतो, असे मानले जाते. सर्पाविषयीच्या अनेक कथा असून काही ठिकाणी सर्पदंशामुळे स्त्रियांच्या ऋतुस्रावाचा प्रारंभ झाला, अशी कथा आढळते. देवांची गरुडादी वाहने पशुपक्ष्याच्या रूपात कल्पिलेली आढळतात. ईजिप्तीमध्ये बैल, पक्षी, मेंढा इत्यादींमध्ये ओसायरिसचा आत्मा अवतरलेला आहे, असे मानत. एपिस हा बैल तेथे अत्यंत पवित्र मानला जाई. देवाने स्वर्गीय अग्नीच्या रूपात एका कालवडीशी समागम केला आणि मग तो एपिस या बैलाच्या रूपाने स्वतःच तिच्या उदरी प्रकट झाला, असे मानले जाई.

पाण्यात बुडविणाऱ्या दुष्ट जलशक्तींविषयी कथा असतात. वृद्ध पुरुष वा नग्न स्त्री बनून लोकांना पाण्यात ओढून नेणाऱ्या व्होड्यानोई नावाच्या जलशक्ती स्लाव लोक मानतात. पाण्यात बुडून मेलेली युवती रुझाल्का बनते आणि ती लोकांना भुरळ पाडून वा जबरदस्तीने पाण्यात ओढून नेते, असे सर्व स्लाव मानतात. जपानी लोकांनीही पाण्यात ओढून नेणाऱ्या देवतांची कल्पना केलेली आहे.

वर मुळे व खाली फांद्या असलेला हिंदूंचा अश्वत्थ हा संसारवृक्ष, ज्याच्याखाली बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले तो बोधिवृक्ष, देवस्वरूप बनलेला वैदिक सोम, पारशांचा हओम इ. वृक्ष-वनस्पतींना पुराणकथांत महत्त्वाचे स्थान आहे. बोर्निओतील पुराणकथांत वर मुळे व पृथ्वीकडे फांद्या असून स्वर्ग व पृथ्वी यांना जोडणारा एक प्रचंड वृक्ष  कल्पिलेला आहे . ट्यूटॉन लोकातील निर्मितीविषयक  एका कथेनुसार हे विश्व म्हणजे यग्ड्रॅसिल नावाचा एक प्रचंड वृक्ष होय. त्यांच्या फांद्या आकाशात आणि मूळ अधोलोकात आहे. जर्मन लोकांच्या घराला झाडांच्या बुध्यांचा आधार असे. त्यामुळे विश्वालाही झाडाचा आधार आहे, असे ते मानत असत. बायबलमधील ज्ञानवृक्षाच्या फळाची कथा प्रसिद्धच आहे. नद्या,जलाशय इत्यादींचे दैवतीकरण करण्याची पद्धतही सर्वत्र आढळते. भारतात गंगा, यमुना, नर्मदा इत्यादींच्या बाबतीत हे आढळते. भारतात ज्याप्रमाणे गंगा स्वर्गातून आल्याचे मानले जाते, त्याप्रमाणे  नाईल नदी ही ‘नन’ या आद्य समुद्रात उगम पावते, असे ईजिप्तमध्ये मानले जात होते.

देवादिकांजवळ स्वतःच्या वा इतरांच्या शरीराचे पशू, पक्षी, दगड इत्यादींमध्ये रूपांतर करण्याचे सामर्थ्य असते, अशा समजुतीवर आधारलेल्या पुराणकथा जगात सर्वत्र आढळतात. पतीच्या शापाने अहल्या शिळा बनली होती. पांडूने मृगाचे रूप घेऊन प्रणयक्रीडा केली होती. कोकिळ पक्ष्याचे रूप घेऊन आपल्या हेरा या बहिणीकडे गेलेला झ्यूस थंडीने गारठलेला पाहून हेराने त्याला छातीशी धरले आणि त्याने आपले मूळ रूप प्रकट करून तिच्याशी विवाह केला. डीमीटरने पोसायडनला चुकविण्यासाठी घोडीचे रूप घेतले परंतु त्याने घोड्याचे रूप घेऊन तिच्याशी संबंध केला. झ्यूसनेही बैल बनून तिला फसवले.

भाकित जाणण्यासाठी, असिरो-बॅबिलोनियन सूर्यदेवता शमश याची प्रार्थना करणारे भक्त : सिप्पार येथील शिल्प इ.स.पु. ९ वे शतक

सूर्य वा इतर कोणता तरी देव रागावून लपल्याच्या कथा अनेक ठिकाणी आढळतात. हिटाइट कथेतील सुफलतेचा देव तेलिपिनू एकदा रागवला आणि पृथ्वीवरून निघून गेला. काहींच्या मते तो सूर्यदेव वा दुसरा कोणता तरी देव होता. तो निघून गेल्यावर दुष्काळ पडून उपासमार होऊ लागली. प्राण्यांमध्ये गर्भधारणा होईना आणि आधीच झाली असल्यास प्रसूती होणे अशक्य झाले. सूर्याने पाठविलेला गरुड त्याला आणण्यात अयशस्वी झाला परंतु एका मधमाशीने त्याला परत आणले. जपानी कथेतील अमतेरसू ही सूर्यदेवी एकदा सुसनॉ या भावाच्या भीतीने दडून बसली व अंधार झाला. ही कथा म्हणजे ग्रहण अथवा हिवाळ्याचा प्रारंभ यावरील रूपक असावे, असे म्हटले  जाते. रा या सूर्यदेवाचा डोळा पळवून नेल्याची आणि तो अन्होर या देवाने परत आणल्याची कथा ईजिप्तमध्ये होती. रा हा देव लोकांवर चिडून स्वर्गात निघून गेला, अशीही कथा तेथे आहे. वैदिक वाङ्‌मयात अग्निदेवता लपल्याची कथा आहे. इश्तार ही बॅबिलोनियन देवता मृतलोकात गेल्यानंतर पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांचे लैंगिक जीवन संपुष्टात आले आणि शेवटी ईआ या देवतेने दूत पाठवून तिला परत आणले.

राजा, वीरपुरुष, ऋषिमुनी वा एखादा वंश यांची निर्मिती चंद्र वा सूर्य यांच्यापासून झाल्याच्या कथा अनेक ठिकाणी आढळतात. सूर्य हा रामाच्या रघुवंशातील पूर्वज होता. भारतात सोमवंशही प्रख्यात होता. ईजिप्तमध्ये फेअरो राजाला त्याची प्रजा सूर्यदेव मानत असे. तो प्रत्यक्ष रीत्या सूर्याचा पुत्र असल्याचे मानले जाई.  ह्यात राजाच्या पत्नीशी स्वतः सूर्यदेव रा समागम करतो आणि त्यांचा पुत्रच पुढचा राजा बनतो, अशी परंपरा होती. अमेरिकेतील इंका हे लोक इन्तीपासून म्हणजे सूर्यापासून आपला वंश सुरू झाला, असे मानतात. ग्वातेमालामध्ये सूर्य व चंद्र यांना आजोबा व आजी आणि सूर्यपुत्र इतझमन याला संस्कृतिनिर्माता म्हटले जाई. जपानमध्ये अमतेरसू ही सूर्यदेवी काही मानववंशांची पूर्वज मानली जाई.

ग्रहताऱ्यांविषयी विविध प्रकारच्या कथा आढळतात. चंद्रसूर्य त्या दांपत्याने भांडताना एकमेकांना जखमी केल्यावर लज्जित झालेला सूर्य हा पती लोकांनी आपल्याकडे पाहू नये म्हणून तेजस्वी बनला, परंतु पत्नीने मात्र आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला नाही लोकांना रात्री झोपता यावे म्हणून चंद्राने तेजाचा त्याग केला चंद्र या सूर्यपत्नीने पुरुषांचे काही रहस्य ऐकल्यामुळे सूर्य रागावला व भिऊन पळणार्‍या पत्नीचा पाठलाग करू लागला सूर्य अदृश्य दोरीला टांगलेला आहे आकाशगंगा म्हणजे आकाशसर्प, आत्म्यांचा मार्ग किंवा म्हशींच्या स्पर्धेमुळे उडालेली धूळ होय तारे म्हणजे पक्षी, ध्रवादी मृत व्यक्ती वा आकाशस्थ लोकांच्या शेकोट्या होत आपापली मुले खावयाची असे ठरविल्यावर सूर्य या स्त्रीने आपली मुले खाल्ली परंतु चंद्र या स्त्रीने ती लपवून ठेवली इ. पुराणकथा आढळतात. चंद्रकलेच्या पुराणकथा, नाशानंतरचे पुनर्जीवन सूचित करतात. चंद्र व सूर्य यांच्यावर कोणत्या तरी प्राण्याने वा राहुकेतूसारख्या एखाद्या राक्षसाने हल्ला केल्यामुळे ग्रहणे होतात, असे मानले जाते. त्या प्राण्याला हाकलून देण्यासाठी नगारे वाजविणे, गोंगाट करणे वा त्याच्या अंगावर कुत्री सोडणे इ. प्रकार केले जातात. खेकडा, साप, पक्षी, ड्रॅगन, लांडगा इत्यादींमुळे ग्रहणे होतात, या अर्थाच्या कथा विविध लोकांत आढळतात.

दिशांचे रक्षण करण्यार्‍या दिक्‌पालांची कल्पना अनेक ठिकाणी आढळते. भारतात पूर्वेचा इंद्र, उत्तरेकडचा कुबेर, आग्नेय दिशेचा अग्नी इ. प्रकारे ⇨ अष्टदिक्‌पाल मानले आहेत. जपानातील बौद्ध पुराणकथांत चार दिशांचे धृतराष्ट्रादी चार दिक्‌पाल मानले आहेत. ईजिप्तमध्ये न्यायदानाच्या वेळी ओसायरिसच्या  पुढे  उभे  असलेले  व मृतांचे रक्षक असलेले होरसचे चार पुत्र हे चार दिशांचेही रक्षक मानले जात. मेक्सिकन लोकांनीही चार दिशांचे चार देव मानले आहेत. अमेरिकेतील अल्गाँक्वियन लोकांनीही चार दिशांना चार देवता मानल्या होत्या.

गर्भस्थ अथवा नवजात अवस्थेतच विशेष कृत्ये करणाऱ्या व्यक्तींच्या काही कथा आढळतात. याकोब व ईसॉ हे जुळे  भाऊ तसेच झराह व पीरेझ हे जुळे भाऊ गर्भातच एकमेकांशी भांडत होते, अशी हिब्रू कथा आहे. हर्मीझने जन्मलेल्या दिवशीच पाळण्यातून जाऊन अपोलोच्या ५० गायी पळविल्या, अशी ग्रीक कथा आहे. हिब्रू कथेनुसार अब्राहम जन्मल्यावर पहिल्या दहा-वीस दिवसांत मोठा होऊन चालू-बोलू लागला. लीहच्या गर्भातील मुलाचे ईश्वराने दिनाह या मुलीत रूपांतर केले, अशी हिब्रू कथा आहे. देवकीच्या गर्भातील बलरामाला कंसापासून वाचविण्यासाठी रोहिणीच्या गर्भात नेण्यात आले, अशी हिंदू कथा आहे. शक्राच्या आज्ञेवरून देवनंदेच्या गर्भातील महावीराला सिद्धार्थाची पत्नी त्रिशला हिच्या गर्भात नेण्यात आले, अशी जैन कथा आहे.

एखाद्या भविष्यवाणीमुळे नवजात मुलाची हत्या वा त्याग करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु त्यातून ते मूल वाचते व त्याच्या आयुष्यात काही  विशेष घटना घडतात, अशा अर्थाच्या अनेक कथा आहेत. हिब्रू कथेत अब्राहमच्या जन्माच्या वेळी धूमकेतू दिसल्यामुळे तो निमरोद या राजाचे साम्राज्य घेईल, अशी भविष्यवाणी झाली. राजाने त्याला ठार मारावयाचे ठरविल्याने तेराह या अब्राहमच्या पित्याने एका गुलाम स्त्रीचा मुलगा राजाच्या स्वाधीन केला आणि अब्राहमला गुहेत ठेवून वाचवले. ईडिपस हा आपल्या वडिलांना ठार मारेल अशी भविष्यवाणी असल्यामुळे जन्मल्याबरोबर त्याचा त्याग करण्यात आला, अशी ग्रीक कथा आहे. कृष्ण, येशू इत्यादींच्या कथाही अशा प्रकारच्या आहे.

प्रारंभी एखाद्या देवतेचे विशेषण म्हणून वापरलेला शब्द नंतरच्या काळात स्वतंत्र देवतेचा वाचक बनल्याच्या घटना अनेक पुराणकथांत आढळतात. रोमन ज्यूपिटरचे विशेषण असलेला टर्मिनस हा नंतर सीमांचा देव बनला. हाथर या ईजिप्ती देवीला सामर्थ्यशाली या अर्थाचे सेख्मेत हे विशेषण देण्यात आले आणि नंतर सेख्मेत ही स्वतंत्र देवी बनली. सविता हे प्रारंभी वैदिक सूर्यदेवतेचे विशेषण होते परंतु नंतर सविता हा स्वतंत्र देव बनला.

अनेक ठिकाणी नरमांसभक्षणाच्या कथा आढळतात. क्रोनस या ग्रीक देवाने आपली मुले खाल्ली होती. पॉलिनीशियामध्ये तेन व इतर देव नरभक्षक मानले आहेत. पारशी कथेनुसार आद्य मानवी दांपत्य माश्या आणि माश्योई यांनी आपली दोन मुले खाऊन टाकली. हे त्यांचे अधःपतन मानले जाते. याच प्रकारच्या कथा फिजी, न्यूझीलंड इ. ठिकाणीही आढळतात.

स्वर्ग व पृथ्वी यांमध्ये पूल वा शिडी यांचे अस्तित्व मानणाऱ्या अनेक कथा आहेत. स्वर्ग व पृथ्वी यांच्यातील पुलावरून पूर्वी देवांची ये-जा चालत असे परंतु एकदा देव झोपलेले असताना तो समुद्रात पडला, अशी जपानी कथा आहे. इंद्रधनुष्य म्हणजे पूल, अशा अर्थाच्या कथा अनेक ठिकाणी आढळतात.

पोलंड, बल्गेरिया, रशिया इ. अनेक देशांतून हंसींच्या रूपात आढळणाऱ्या तरुणींच्या कथा आढळतात. वैदिक वाङ्‌मयतील उर्वशीने व तिच्या सख्यांनी पक्षिणीचे रूप घेतल्याच्या कथा आढळतात. नागकन्या, मत्स्यकन्या इ. रूपांतील तरुणींच्या कथाही आढळतात. अर्धे रूप मानवी व अर्धे रूप मानवेतर प्राण्यांचे असे या व्यक्तींचे स्वरूप असते. त्यांना इच्छेनुसार दोन्हीपैकी कोणत्याही एका प्राण्याचे रूप घेता येते, असेही मानले जाते.

याखेरीज संस्कृतिनिर्माते महापुरुष, पराक्रमी वीर व वीरांगना, महान राजे, संत, तपस्वी, धर्मसंस्थापक इत्यादींविषयी अनेक पुराणकथा तयार होतात. दिवस-रात्र, उन्हाळा-हिवाळा, चंद्राच्या कला इ. कालिक अवस्थांविषयी अनेक कथा असतात. पुनर्जन्म, पूर्वजन्माचे स्मरण, मृत्यूनंतरचे जीवन, स्वर्ग-नरक, देवदूत, पितर, पिशाचे, अप्सरा, योगी चित्‌शक्ती, राक्षस, दैत्य, ड्रॅगन, पर्वत, विविध आचार, रूढी इ. असंख्य विषयांवर पुराणकथा असतात.

ईडिपस व भविष्य वर्तवणारा स्फिंक्स : ग्रीक चषकचित्र, इ.स.पू. ५ वे शतक

अशा प्रकारे, पुराणकथांच्या विविध विषयांचा अभ्यास केल्यानंतर सहजच ध्यानात येते, की जगातील वेगवेगळ्या लोकांनी निर्माण केलेल्या पुराणकथांमध्ये विलक्षण समानता आढळते. व्यापार, आक्रमण, दुष्काळ इ. उद्देशांनी वा कारणांनी लोक सदैव देशांतर करीत असतात. अशा प्रसंगी दोन भिन्न संस्कृतींतील लोक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे एका समाजाच्या कथा दुसरा समाज उचलतो किंवा निदान एका समाजाच्या कथांचा दुसऱ्याच्या कथांवर परिणाम होतो, हे या समानतेचे एक कारण होय. ग्रीस व रोम, ग्रीस व ईजिप्त, यूरोपातील विविध राष्ट्रे इ. देशांत असा परस्परसंबंध आला होता. रोमन लोकांनी ग्रीक पुराणकथा मोठ्या प्रमाणात उचलल्या, हे या प्रकारचे विख्यात उदाहरण होय. याउलट, एकाच समाजाची विभागणी होऊन त्याचे  वेगवेगळे समूह वेगवेगळ्या देशांत जाऊन स्थिरावले, तरी त्यांच्या मूळ पुराणकथा एकच असल्यामुळे त्यांच्या उत्तर-कालीन पुराणकथांतही समानतेचा दुवा राहतोच. उदा., इंडो-यूरोपियन लोकांच्या काही टोळ्या यूरोपमध्ये व काही इराणमार्गे भारतात आल्या असल्यामुळे यूरोपियन व भारतीय वैदिक पुराणकथांमध्ये साम्य आढळते. म्हणूनच, माक्स म्यूलरने तुलनात्मक भाषाशास्त्राच्या आधारे ‘तुलनात्मक पुराणकथाविद्या’ या विषयाचा पाया घातला. त्याच्या मते, वैदिक पुराणकथांचे अध्ययन अलगपणे न करता, जर इंडो-यूरोपियन पुराणकथांचे एक अविभाज्य अंग म्हणून केले, तर त्या अधिक चांगल्या रीतीने आकलन करता येतात. आडाल्‌बेर्ट कून, टेओडोर बेन्फाय, आल्ब्रेख्त वेबर, आंजेलो दे गूबेरनातीस इत्यादींचाही तुलनात्मक पुराणकथाविद्येवर विशेष भर होता. द्यौस् म्हणजे झ्यूस, वरुण म्हणजे यूरानस, उषस् म्हणजे ईऑस इ. अक्षरशः असंख्य समीकरणे मांडण्यात आली आहेत. काही अभ्यासक शब्दांच्या समान व्युत्पत्तीवरून समानता दाखवतात, तर झॉर्झ द्युमेझिलसारखे काहीजण देवतांच्या समान स्वरूपावरून त्यांच्यातील मूळचे ऐक्य शोधण्याचा प्रयत्न करतात. उदा., त्याने रोमन मातर मातुताचे उषेबरोबर आणि फॉर्च्यूना प्रायमिजेनिआचे अदितीबरोबर साम्य दाखवले आहे परंतु माक्य म्यूलर, कून इत्यादींनी या बाबतीत अतिरेक केल्यामुळे अनेकांनी अशा तुलनेला विरोधही केला. उदा.,आल्फ्रेट हिलेब्रान्टचा तुलनात्मक पुराणकथाविद्येवर विश्वास नव्हता. जॉन मुरनेही ती दुय्यम मानली होती. इंडो-यूरोपियन पुराणकथांप्रमाणेच इंडो-इराणियन कथांचीही स्थिती आहे. उदा., वैदिक पुराणकथांतील असुर, मित्र, सोम इत्यादींचे अवेस्तात अनुक्रमे अहुर, मिथ्र, हओम इ. प्रकारे रूपांतर आढळते. इंद्र हा वैदिक देव मात्र अवेस्तात दैत्य मानलेला आहे. अवेस्तानुसार देव हा शब्द दैत्य या अर्थाचाच आहे. इतर देशांतील पुराणकथांमध्येही अशा तुलना झाल्याचे आढळते.

परंतु काही वेळा ज्या दोन समाजांत समान पुराणकथा आढळतात त्यांच्यातील भौगोलिक अंतर इतके प्रचंड असते, की त्या दोन समाजांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने वर  सांगितलेल्या पद्धतीचा संबंध आला असण्याची शक्यता नसते. उदा., ईजिप्त आणि पॉलिनीशियामधील लोकांचा परस्परसंबंध आला असण्याची शक्यता दिसत नसूनही त्यांच्या काही पुराणकथा समान आहेत. या समानतेचे कारण मात्र मानसशास्त्र व समाजशास्त्र यांच्या आधारे शोधावे लागते. दूरदूर  राहणाऱ्या व परस्परांशी मुळीच संबंध नसलेल्या लोकांचीही एखाद्या विशिष्ट परिस्थितीविषयीची प्रतिक्रिया  समान असू शकते. उदा., ज्या लाकडांच्या घर्षणामुळे अग्नी निर्माण होतो, ती लाकडेच प्रथम त्याच्या भक्ष्यस्थानी पडत असल्यामुळे भारतीयांनी त्याला मातृभक्षक मानले आणि त्याने जन्मल्याबरोबर आईला जाळले. असे जपानी लोकांनी मानले. सूर्य-चंद्र, त्यांचे उदयास्त, ग्रहणे, भूकंप इत्यादींविषयीच्या समान पुराणकथा या दूरदूरच्या लोकांची मने एकाच पद्धतीने कार्य करीत असल्याच्या द्योतक ठरतात.

विद्यादेवता सरस्वतीची हस्तिदंती मूर्ती

भारतीय पुराणकथा : यूरोपमध्ये ख्रिस्ती धर्माच्या आगमनामुळे ग्रीक कथांचा प्रवाह जसा खंडित झाला, तसा भारतीय पुराणकथांचा प्रवाह मात्र कधीही खंडित झालेला नाही वैदिक काळापासून ते थेट आधुनिक काळापर्यंत तो सलगपणे विकसित होत आला आहे. वैदिक पुराणकथांपेक्षा पुराणे व महाकाव्ये यांतील पुराणकथा बदललेल्या स्वरूपात आढळत असल्या, तरी मूळ प्रवाह पूर्णपणे अवरुद्ध झाल्याचे आढळत नाही. बौद्ध व जैन यांनी मूळ प्रवाहातील काही पुराणकथा उचलल्या आणि काही नवीन निर्माण केल्या परंतु या कथांबरोबरच हिंदू कथांचा मूळ प्रवाहही स्वतंत्रपणे वाहत होताच. तसे पाहिले, तर कोणत्याच समाजाच्या पुराणकथा या एकजिनसी नसतात आणि भारतीय कथाही या  नियमाला अपवाद नाहीत. परंतु असे असूनही भारतासारख्या विशालकाय व विविधतेने भरलेल्या देशात राष्ट्रीय व सांस्कृतिक एकात्मता निर्माण करण्याचे महान कार्य भारतीय पुराण कथांनी प्राचीन काळापासूनच केले आहे. ईश्वराचे सान्निध्य वा ईश्वराशी ऐक्य साधणे, हा अनेक भारतीय पुराणकथांचा मुख्य उद्देश असल्याचे दिसून येते. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, वैष्णव, शैव, पाशुपत, तंत्रमार्ग इत्यादिकांनी आपापल्या पुराणकथा निर्माण केल्याचे दिसते. मूळच्या  एका कथेची या विविध मार्गांतून रूपांतरे झाल्याचेही आढळते. काळाच्या ओघात या पुराणकथांतून अनेक बदल झाल्याचेही आढळते. उदा., वैदिक काळातील दुय्यम प्रजापतीला  ब्राह्मणकाळात आणि विष्णूला पुराणकाळात प्राधान्य आले, तर वैदिक काळातील प्रधान अशा इंद्राला पुराणकाळात तुलनेने गौणत्व आले. अशा रीतीने काळाच्या ओघात बदलत व वळणे घेत घेत विकसित झालेला पुराणकथा हा भारतीय संस्कृतीचा विभाग अत्यंत समृद्ध आहे.

वैदिक पुराणकथा : वैदिक पुराणकथांना इंडो-यूरोपियन व इंडो-इराणी पुराणकथांची परंपरा होती, असे आधुनिक अभ्यासक मानतात; अर्थातच पुढे भारतात या परंपरेचा स्वतंत्रपणे विकास झाला. या कथा प्रमुख्याने ऋग्वेदात आढळतात. यजुर्वेद व ब्राह्यणग्रंथांतून यज्ञाला महत्त्व आल्यामुळे देवताविषयक पुराणकथांना प्राधान्य उरले नाही. निसर्गातील सर्व वस्तू सजीव आहेत, या भावनेपोटी निसर्गघटनांचे दैवतीकरण करून या पुराणकथा बनल्या आहेत. ज्या देवतेचे वर्णन चालू असेल त्या देवतेकडे विश्वनिर्मिती वगैरेंचे कर्तृत्व देणे, ही प्रवृत्ती आढळत असल्यामुळे विविध देवतांमध्ये स्पष्टपणे जाणवेल इतका वेगळेपणा आढळत नाही.

जुन्या संस्कृत पोथीतील अग्निदेवतेचे चित्र

पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग या तीन  भागांत विश्वाची विभागणी करण्यात आली होती. अंतरिक्षाला समुद्र म्हटले जाई आणि त्यात स्वर्गीय जल राहते, अशी समजूत होती. पृथ्वी ही आद्य माता व स्वर्ग (द्यौः) हा आद्य पिता मानला जाई. देवांचीही निर्मिती त्यांच्यापासूनच झाली. इंद्र, विष्णू इ. देवांनी त्यांना निर्माण केले वा विस्तृत केले, असेही म्हटले जाई.⇨ इंद्र ही आर्यांची प्रमुख देवता होती. सूक्तसंख्येच्या दृष्टीने इंद्राखालोखाल महत्त्वाची  देवता म्हणजे अग्निदेवता होय. त्याला सर्वसाक्षी, सर्वज्ञ, रोगनिवारक, गृहपती इ. विशेषणे लावली जात. दोन अरणींपासून त्याचा जन्म होतो, म्हणून अरणींना त्याच्या माता म्हटले जाई [→ अग्नि अग्निपूजा]. ⇨ वरुण हा विश्वव्यवस्थापक, धर्मसंरक्षक व ऋताचे पालन करणारा देव होता. ऋग्वेदात विष्णू हे सूर्यदेवाचेच एक रूप मानले जाई. त्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची तीन पावले. सूर्याचा उदय ,मध्यान्ह व अस्त ही ती पावले होत. विवस्वान व सरण्यू यांचे जुळे पुत्र म्हणजे ⇨ अश्विनीकुमार होत. त्यांनी परोपकाराची अनेक कृत्ये केली होती. त्यांनी वृद्ध च्यवनाला पुन्हा तारुण्य दिले. विश्पला नावाच्या राणीचा पाय तुटला असता तिला लोखंडी पाय बसवून दिला. शंयूची वंध्या गाय दुभती केली. सूर्य हा ‘द्यौः’ व ‘अदिति’ यांचा पुत्र असून ⇨ उषा ही त्याची पत्नी होय. ⇨ सूर्यदेवतेच्या रथाला सात घोडे असतात. विष्णू, सविता, मित्र आणि पूषन् ही सूर्याचीच रूपे होत. सोमवल्लीचे दैवतीकरण करून सोम ही देवता मानण्यात आली होती. ऋग्वेदाच्या नवव्या मंडलातील सर्व सूक्ते ही सोमसूक्ते आहेत, यावरून ⇨ सोमाचे महत्त्व स्पष्ट होते. गरुडाने स्वर्गातील सोम पृथ्वीवर आणला, अशी कथा आहे ⇨ आदित्यांची संख्या सहा, सात वा आठ मानली जाई. ते ⇨ अदितीचे पुत्र मानले जात. उत्तरकालात त्यांची संख्या बारा मानली गेली. आदित्यांपैकीच एक असलेला विवस्वत् हा अश्विनीकुमार, ⇨ यम व मनू यांचा पिता होता. त्वष्ट्याची मुलगी सरण्यू ही त्याची पत्नी होती. आदित्यांपैकी अर्यमन् याचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट नाही. भग हा धन देणारा होता. २१ अथवा १८० या संख्येने युक्त असा ⇨ मरुतांचा गण होता. ते ‘रुद्र’ व ‘पृश्नि’ यांचे पुत्र होते. ते इंद्राचे सहकारी असून पाऊस पाडणे, हे त्याचे कार्य होते. वायू ही स्वतंत्र देवताही होती. ⇨ ऋग्वेदात ⇨रुद्र या वादळांच्या देवाने स्थान दुय्यम होते. इंद्राचा सहकारी त्रित आप्त्य विहिरीत पडला असताना ⇨ बृहस्पतीने त्याला बाहेर काढले. पाऊस पाडण्याचे काम पर्जन्य हा देव करीत असे. ‘आपः’ या जलदेवता होत्या. सिंधू, सरस्वती इ. नद्यांचे दैवतीकरण केले होते. ⇨त्वष्टा हा देवांचा कारागीर, धाता हा विश्वनिर्माता आणि बृहस्पती हा देवांचा पुरोहित होता. तीन ऋभूही देवांचे कारागीर होते. श्रद्धा, मन्यू (क्रोध) , काम, श्री, प्राण इत्यादींचेही दैवतीकरण करण्यात आले होते. द्यावापृथिवी, मित्रावरुणौ, इंद्राग्नी इ. प्रकारे देवतांची द्वंद्वे आढळतात. मरुत्, रुद्र इत्यादींचे गण आढळतात. सर्व देवतांचा मिळून ‘विश्वे-देवाः’ असा गण कल्पिलेला होता. मनू, अंगिरस्, दंध्यच, भृगू, अथर्वन, सप्तर्षी इ. ऋषींविषयीच्या पुराणकथा आढळतात. गंधर्व, अप्सरा, असुर, पणी, दस्यू, दास, राक्षस, पिशाच, पितर इत्यादिकांविषयी पुराणकथा होत्या. यम हा मृतांचा राजा मानला जाई.

पुराणेतिहासातील कथा : पुराणादी वाङ्‌मयात अक्षरशः अपरिमित पुराणकथा आढळतात. ब्रह्मा [→ ब्रह्मदेव], विष्णू व महेश हे जन्म, स्थिती व नाश यांचे देव म्हणून विख्यात आहेत. त्यांपैकी ब्रह्मा हा विश्वाचा निर्माता मानलेला असून त्याला स्वयंभू, प्रजापती, विधाता, हिरण्यगर्भ इ. नावे आहेत. विष्णूच्या नाभीतून आलेल्या कमळातून ब्रह्मा जन्मला, असे मानले जाते. ⇨ सरस्वती हीच ब्रह्मदेवाची कन्या व पत्नी होय. वेदांत सरस्वती ही नदीदेवता होती, पुराणांत ती विद्येची देवता बनली.

जुन्या संस्कृत पोथीतील एक चित्रपृष्ठ

विष्णू : जगाचे पालन करणारा देव. क्वचित जगाची निर्मिती त्याच्यापासून झाली, असेही सांगितले जाते. त्याचा रंग सावळा असून त्याला चार हात असतात. गरुड हे त्याचे वाहन असून तो वैकुंठात राहतो. ⇨ लक्ष्मी ही विष्णूची पत्नी असून ⇨ समुद्रमंथनातून तिचा जन्म झाला आहे.⇨ विष्णू जेव्हा अवतार घेतो, तेव्हा लक्ष्मीही त्याच्याबरोबर अवतार घेते. विष्णू जगाच्या उद्धारासाठी  ⇨दशावतार घेतो. हे अवतार चोवीस आणि असंख्यही मानले जातात.

महेश : यालाच शिव, शंकर, महादेव इ. नावे असून वेदांतील रुद्राशी त्याचे तादाम्य मानलेले आहे. हा संहाराचा देव मानला जातो. त्याला तीन डोळे  असून क्रोध आल्यास तो तिसरा डोळा उघडून कोणालाही जाळू शकतो. त्याच्या गळ्यात नाग आणि जटेत गंगा ही पत्नी व चंद्रकोर असते. त्याचा निवास स्मशानात तसेच कैलासावरही असतो. नंदी हे त्याचे वाहन आहे. तो जसा रागीट आहे, तसाच भोळा सांब म्हणूनही प्रसिद्ध आहे. देशात सर्वत्र लिंगरूपाने त्याची पूजा चालते [→ शिवदेवता]. दक्षकन्या सती ही शंकराची पत्नी होती. दक्षाने केलेल्या अपमानामुळे तिने देहाचा त्याग केला, तेव्हा शंकराने तिचे शव खांद्यावर घेऊन तांडव नृत्य करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी विष्णूने आपल्या चक्राने तिच्या शवाचे तुकडे केले व ते जेथे पडले त्या ५१ ठिकाणी ⇨ शक्तिपीठे तयार झाली. ही सतीच पुढच्या जन्मात हिमालय व मेना यांची मुलगी बनली. तीच शंकराची पत्नी ⇨ पार्वती होय. शंकराने एकदा तिला काळी म्हणून हिणविले, तेव्हा ब्रह्मदेवाकडून वर मिळवून ती गौरी बनली. ⇨ दुर्गा, ⇨ काली, चंडी, कपाली, कराली, तारिणी, सिद्धसेनानी इ.तिचीच रूपे होत. शुंभ व निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिने दहा रूपे घेतली. दुर्गा, दशभुजा, सिंहवाहिनी, महिषासुरमर्दिनी, जगद्‌धात्री, काली, मुक्तकेशी, तारा, छिन्नमस्तका आणि जगद्‌गौरी ही ती रूपे होत. ⇨ कार्तिकेय हा शिव व पार्वती यांचा थोरला मुलगा मानला जातो. शंकर व पार्वती यांचा दुसरा पुत्र म्हणजे गणेश वा ⇨ गणपती होय. तो विद्येची देवता असून हिंदू लोक त्याच्या प्रार्थनेने सर्व कामांना प्रारंभ करतात. गणपतीला हत्तीचे तोंड कसे प्राप्त झाले, याविषयी विविध कथा आढळतात. शिवाने दग्ध केलेला मदन हा ⇨ कामदेव होय. त्यालाच मन्मथ, कुसुमबाण, पंचबाण, इ. नावे आहेत.

रवी, सोम, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू व केतू हे नऊ ग्रह असून त्यांना देवतांप्रमाणे पूज्य मानले जाते. रवी हा कश्यप आणि अदिती यांचा पुत्र होय. सोम हा अत्रिपुत्र, तो समुद्रमंथनातून वर आला इ. कल्पना आहेत. मंगळ हा भूमी व भरद्वाज यांचा आणि बुध हा सोम व तारा यांचा पुत्र आहे. गुरू हा अंगिरसाचा, शुक्र हा भृगूचा, शनी हा सूर्याचा आणि राहू हा सिंहिकेचा पुत्र आहे.

अतिमानवी सामर्थ्य असलेल्या ⇨ ऋषींच्या विविध कथा आहेत. त्यांचे देवर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी इ. प्रकार होते. नारद, वसिष्ट, विश्वामित्र, दक्ष, भृगू, मनू, कश्यप, गौतम इ. अनेक ऋषींविषयी पुराणकथा आहेत. सप्तर्षी हा ऋषिसमुदाय प्रसिद्ध आहे. यांखेरीज, अतिमानवी शक्तीने युक्त असलेले ⇨ गंधर्व,  ⇨ यक्ष, ⇨ किन्नर, ⇨ सिद्ध, विद्याधर, योगी, ⇨ राक्षस, पिशाच, पितर इत्यादींविषयी असंख्य कथा आहेत. नल, कौरव-पांडव, सोम व सूर्य या वंशांतील अनेक राजे इ. वीरपुरुषांविषयीच्या कथाही प्रचंड प्रमाणात आढळतात. देवतांची वाहने असलेल्या ⇨ गरुड, ⇨ नंदी, उंदीर इ. पशुपक्ष्यांच्याही कथा आहेत.

महावीर वर्धमानमाता त्रिशला हिला महावीरजन्माआधी पडलेले दिव्य स्वप्नबौद्ध पुराणकथा: प्रारंभीच्या काळात बौद्ध धर्मात पुराणकथांना फारसे स्थान नव्हते परंतु लवकरच विविध पुराणकथा निर्माण झाल्या.हिंदूनी बुद्धाला विष्णूचा अवतार मानून त्याच्याभोवती पुराणकथेचे वलय तयार केले. बौद्धांनीही ⇨ बुद्ध व ⇨ बोधिसत्त्व यांच्याविषयी अनेक पुराणकथा तयार केल्या. शुद्धोदनाची पत्नी माया हिला शुभ्र हत्तीच्या रूपाने बोधिसत्त्व आपल्या गर्भात प्रवेश करीत असल्याचे स्वप्न पडले. जन्माच्या वेळी ब्रह्मदेवादींनी त्याचा स्वीकार केला. तो ज्या दिवशी जन्मला त्याच दिवशी त्याची भावी पत्नी यशोधरा, बोधिवृक्ष, त्याचा शिष्य व मित्र आनंद आणि तो ज्या घोड्यावरून संन्यासासाठी गेला तो कंटक घोडा या सर्वांचा जन्म झाला. जन्मल्याबरोबर त्याने सात दिशांनी सात पावले टाकून जग जिंकले. जेथे त्याचे पाऊल लागले, तेथे कमळ प्रकट झाले. तो जन्मताच वृक्षवेली फुलल्या , वाद्ये आपोआप वाजू लागली आणि नद्या थांबल्या. तो मंदिरात जाताच देवमूर्तींनी त्या प्रणाम केला. तो संन्यासासाठी गेला, तेव्हा देवांनी पहारेकऱ्यांना झोपवले आणि आवाज होऊ नये म्हणून घोड्यांचे खूर कापून टाकले. नंतर नागराज व त्याची पत्नी यांनी पाताळातून येऊन त्याची पूजा केली . माराने अप्सरा पाठवून त्याला भुरळ पाडण्याचा व हल्ला करून भिवविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला . ज्ञानप्राप्तीनंतर निर्वाणात प्रवेश न करता देवांच्या विनंतीवरून लोकांना उपदेश देण्यासाठी तो पृथ्वीवरच राहिला. शरीराच्या खालच्या भागापासून अग्नी आणि वरच्या भागापासून पाऊस पाडणे इ. चमत्कार त्याने केले. स्वर्गात जाऊन, आईला उपदेश देऊन सोन्यारुप्याच्या शिडीवरून तो परत आला. मृत्यूनंतर त्याची चिता आपोआप पेटली योग्य वेळी पावसाने विझली. बौद्ध धर्मात वैरोचन, रत्नसंभव, अमोघसिद्धी, अमिताभ आणि अक्षोभ्य असे पाच ध्यानिबुद्ध मानलेले आहेत. ज्ञानप्राप्तीसाठी बुद्धाला बोधिसत्त्व म्हटले जाते. ⇨ जातके किंवा जातककथा म्हणजे बोधिसत्त्वांच्या जन्मकथाच आहेत. बोधिसत्त्वांना गर्भातील सर्व अवस्था भोगाव्या लागत नाहीत. ते शुभ्र हत्तीच्या रूपाने मातेच्या गर्भात प्रवेश करताच आणि उजव्या कुशीतून बाहेर पडतात. समंतभद्र, रत्नपाणी, विश्वपाणी, वज्रपाणी, अवलोकितेश्वर असे ध्यानिबोधिसत्त्व मानलेले असून ⇨ अवलोकितेश्वराच्या डोळ्यांपासून चंद्रसूर्य इ. प्रकारे देवांची निर्मिती झाली. तारा ही अवलोकितेश्वराच्या अश्रूंपासून जन्मलेली देवता होती. प्रज्ञा, करुणा इ. शक्तीही होत्या. ⇨ मैत्रेय बुद्ध हा भावी बुद्ध असून तो अजून तुषित स्वर्गात राहतो. ⇨ मंजूश्री, क्षितीगर्भ इ. बोधिसत्त्वही होते.

जैन पुराणकथा : जैन पुराणकथांवर हिंदू कथांचा प्रभाव असून त्यांनी सरस्वती, कुबेर, इंद्र, शंकर, विष्णू, लक्ष्मी, गणपती, यक्ष, यक्षिणी इ. देवता व अतिमानवी शक्तींचा स्वीकार केलेला आहे. एवढेच, की त्यांनी या देवादेवतांना  तीर्थंकरांचे सेवक मानले आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य यांतील प्रत्येक काळात चोवीस तीर्थंकर होतात, असे त्यांनी मानले आहे. त्यांपैकी ऋषभदेव वा ⇨आदिनाथ हा पहिला तीर्थंकर असून ⇨ महावीर वर्धमान हा चोविसावा तीर्थंकर होय. त्यांच्याविषयी अनेक पुराणकथा आहेत. त्यांना तीन प्रकारची ज्ञाने उपजतच प्राप्त असतात, ते मातेच्या गर्भात असताना तिला १६ प्रकारची स्वप्ने पडतात, त्यांच्या पायाखाली सोन्याची कमळे उमलतात इ. कल्पना करण्यात आल्या आहेत.

तंत्रमार्गातील पुराणकथा : वैष्णव तंत्रात विष्णूचे अवतार, शाक्त तंत्रात कालीची अनेक रूपे, गाणपत्य तंत्रात महागणपती व गणपतीची अनेक रूपे आणि शैव तंत्रात महाकालाची भैरवादी रूपे पूज्य मानण्यात आली आहेत [→ तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म ].

भारताबाहेरील पुराणकथा : भारतीय पुराणकथांचा आढावा घेतल्यानंतर भारताबाहेरील विविध संस्कृतींतील तसेच आदिम समाजांतील पुराणकथांचा आढावा घेणे उचित ठरेल.

वाग्देवीची जैन मूर्ती, बिकानेर संग्रहालय.

चिनी पुराणकथा : चीनमध्ये असलेल्या ता ओ, कन्फ्युशस आणि बौद्ध या तीन धर्मांतील कल्पनांच्या मिश्रणातून चिनी पुराणकथा तयार झाल्या आहेत [→ कन्फ्युशस ताओ मत ]. पृथ्वीवर जशी राजा, मंत्री व इतर अधिकारी यांची एक राज्यव्यवस्था असते, तशीच स्वर्गात देवतांचीही प्रमुख देव आणि वेगवेगळी खाती सांभाळणारे इतर देव, अशी एक राज्यव्यवस्था असते. स्वर्गात प्रत्येक देवाचा वेगळा महाल असतो. स्वर्गाच्या नऊ वा तेहतीस पातळ्या मानलेल्या असून सर्वोच्च पातळीवर जेड (यू-ती) म्हणजेच लाव-तियन-येह हा सर्वश्रेष्ठ देव राहतो. सम्राज्ञी वँग ही त्याची पत्नी असून ती देवांना अमरत्वाची सप्ताळू (पीच) फळे देते.

लुंग-वँग हे ड्रॅगन असलेले चौघे भाऊ जेडच्या आज्ञेवरून पाऊस पाडतात. समुद्रदेवतांपैकी तियन-हो, ही देवी सर्वांत महत्त्वाची होय. देवी बनण्यापूर्वी ती एक सामान्य मुलगी होती. तिला चार खलाशी भाऊ होते. एकदा ते आले नाहीत, तेव्हा ती बेशुद्ध झाली आणि तिने आपले शरीर तेथेच ठेवून आपल्या प्राणशक्तीच्या योगे समुद्रात जाऊन तीन भावांना वाचवले. परंतु तिला लवकर शुद्धीवर आणल्यामुळे ती चौथ्या भावाला मदत करू शकली नाही. तीच पुढे खलाशांची देवता बनली. सूर्य हा देव प्रारंभी कोंबड्यांच्या रूपाने राहत होता परंतु नंतर त्याने मानवी चेहरा प्राप्त केला. चंद्राचा उत्सव हा चीनच्या तीन प्रमुख उत्सवांपैकी एक होय. जेडने नेमलेला तुंग-युता-ती हा पूर्व शिखराचा महान सम्राट मानला जाई. प्राण्यांचे नशीब त्याच्या हाती असे. त्साव-वँग हा चूल व घर यांचा देव घरातील सर्वांच्या कृत्यांचा अहवाल वर्षांतून एकदा जेडला देते. त्याची बायको स्त्रियांच्या कृत्यांचा अहवाल देते. सुतार, खाटीक, चर्मकार, दरोडेखोर, वेश्या इत्यादींचे देव असत. पा-शियन हे आठ पुरुष ताओ तत्त्वांच्या पालनाने अमर बनले होते. त्यांपैकी चँग-कुओ-लाओ याचे गाढव दिवसभरात हजारो मैल प्रवास करून जाई आणि विश्रांतीच्या वेळी त्याची कागदाप्रमाणे घडी करून ठेवता येई. क्वेइ-शिंग हा परीक्षांचा देव होता.

कन्फ्यूशसच्या धर्मविधीनुसार ग्रामीण चिनी लोक नांगरणी, सुगी आणि जमीन यांचा प्रत्येकी एक देव मानतात. नांगरणीच्या देवाचा उत्सव असताना राजा स्वतः नांगर धरून पहिले तास घालत असे. अश्वमुखी  देवी  रेशमी किड्यांचे रक्षण करीत असे. तिच्या वडिलांना लुटारूंनी पळवून नेले, तेव्हा जो त्यांना परत आणेल, त्याच्याशी तिचे लग्न लावून देईन, असे तिची आई म्हणाली. परंतु तिच्यावर प्रेम करणाऱ्या एका घोड्याने त्यांना परत आणल्यावर त्यांनी त्याला ठार मारून त्याचे कातडे उन्हात वाळत घातले. ती त्या कातड्याजवळून जात असताना कातड्याने उडी मारून पकडले आणि पळवून नेले परंतु जेडने तिचे रेशमी किड्यात रूपांतर करून तिला स्वर्गात नेले.

ताओ व बौद्ध तत्त्वांच्या मिश्रणातून नरककल्पना निर्माण झाली आणि १० न्यायालयांशी निगडित असे १८ नरक मानले गेले. या न्यायालयांत शि-तियनयन-वँग (यन=यम) या नावाचे, भिन्नभिन्न कामे करणारे १० यमराज असतात. नावाचा वगैरे घोटाळा होऊन चुकीच्या व्यक्तीला यमाकडे आणले गेले, तर तिला परत जायला परवानगी दिली जाई. म्हणूनच, चिनी लोकांत मृताचे शरीर सात दिवस तसेच ठेवण्याची  पद्धत होती. नरकात एक शिक्षा भोगल्यावर दुसरी शिक्षा भोगण्यापूर्वी शरीराची पूर्वावस्था प्राप्त होते. पुनर्जन्मासाठी नरकातून बाहेर पडताना प्रत्येकाला मेंग देवीने तयार केलेले विस्मृतीचे पेय घ्यावे लागते, व्यक्तीला ज्या प्राण्याचा जन्म द्यावयाचा असेल, त्या प्राण्याची त्वचा तिच्या अंगावर फेकली जाते इ. समजुती होत्या. बुद्ध, बोधिसत्त्व इत्यादींविषयीच्या कथाही होत्या.

जपानी पुराणकथा : जपानमध्ये धर्मकृत्यांच्या वेळी देव, जमात इत्यादींविषयीच्या पुराणकथा पुरोहित लोक सांगत असत. त्यामुळे पुरोहितांच्या जीवनपद्धतीचा वा विचारसरणीचा तेथील पुराणकथांच्या स्वरूपावर खूपच प्रभाव पडलेला आहे. उदा., प्रमुख अशा सूर्यदेवीच्या ठिकाणी त्यांनी पुरोहिताचे गुणधर्म कल्पिलेले होते. या कथा ⇨ शिंतो  धर्माच्या उत्सवात कोटारी-बेब या नावाच्या भाटांकडूनही म्हटल्या जात. कोजिकी या ग्रंथात अनेक पुराणकथा असून मन्योशी, जिंडाइकी, फुडोकी इ. ग्रंथही त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या पुराणकथा प्रामुख्याने तेथील राजघराण्यांशी निगडित होत्या. या कथांतून विदेशी प्रभावही आढळतो.

ग्वान-यिन ह्या चिनी संतानदेवतेचे एक शिल्प

या कथांतून झाडे, नद्या, पृथ्वी, पर्वत, विहिरी इ. निसर्गशक्तींचे दैवतीकरण केलेले असून त्या देवतांना ‘कामी’ असे नाव दिलेले होते. उदा.,नदीदेवतांना का वा-नो-कामी म्हटले जाई. कामींना सर्वज्ञ मानलेले नव्हते. देवांप्रमाणेच प्रसिद्ध अशा ऐतिहासिक व्यक्तींना कामी म्हटले जाई आणि त्यांची देवळेही बांधली जात.

निर्मितिविषयक कथेनुसार स्वर्गात प्रथम स्वयंभू अशा तीन देवता निर्माण झाल्या व अंतर्धान पावल्या. नंतर पृथ्वी तरंगत असताना एका अंकुरापासून दोन देवता जन्मल्या व अंतर्धान पावल्या. नंतर पृथ्वी तरंगत असताना एका अंकुरापासून दोन देवता जन्मल्या व अंतर्धान पावल्या. त्यानंतर देवांच्या सात पिढ्या जन्मल्या. त्यांपैकी शेवटचे जोडपे म्हणजे ईझॅनगी आणि ईझॅनमी हे होय. त्या दोघांपासून जपानसह अनेक बेटे, अनेक देव इत्यादींची निर्मिती झाली. ईझॅनमीला अग्नी हा पुत्र झाला, त्याने तिला जाळल्यामुळे ती मरण पावली. तेव्हा ईझॅनगीच्या शोकाश्रूंपासून शोकनदी ही देवी जन्मली. नंतर तो पत्नीला शोधण्यासाठी अधोलोकात गेला परंतु तिने तेथील अन्नाची चव चाखली असल्यामुळे ती परत आली नाही. त्याने परत आल्यावर पवित्र होण्यासाठी स्नान करताना फेकलेल्या वस्त्रांपासून अनेक देव झाले. त्याने समुद्रात बुडी मारली, तेव्हा समुद्रातील देव निर्माण झाले. त्याने डावा डोळा धुतल्यावर अमतेरसू ही सूर्यदेवी, उजवा डोळा धुतल्यावर त्सुकियोमी हा चंद्रदेव आणि नाकापासून सुसनॉ हा देव जन्मला.

आसन्स्थ ओसायरिस व मगे नेफ्थिस, इसिस व अमेंट ह्या देवता तसेच श्वानमुखी अनुबिस : उत्थित शिल्प, 19 वा राजवंश (इ.स.पू. १३५॰-१२॰५), ईजिप्त.

अग्निदेव ईझॅनमीच्या मृत्यूला कारणीभूत झाला, म्हणून ईझॅनगीने त्याचा वध केला. लोक त्याला भीत असत. राजवाड्यात दरवर्षी दोनदा त्याला शांत करण्यासाठी धर्मकृत्ये केली जात. अमतेरसू ही एक प्रमुख देवता होती. शिंतो धर्मात प्रारंभी ताऱ्यांना महत्त्व नव्हते परंतु बौद्ध व चिनी लोकांच्या प्रभावाने  ताऱ्यांच्या कथा आल्या व तानाबाटा हा ताऱ्यांचा उत्सवही साजरा केला जाऊ लागला. अमतेरसूने पृथ्वीवर राज्य करण्यासाठी आणि तेथील बातमी आणण्यासाठी अनेकांना पाठवले, त्यांपैकी तिचा नातू निनिगी हा एक होय. निनिगीचा पुत्र हिकोहोहोडेमी आणि एक समुद्रकन्या यांच्या वंशजांपासून जपानचा राजवंश सुरू झाला, असे म्हणतात. अमतेरसूचा धाकटा भाऊ सुसनॉ हा मेघनाद, पाऊस, वादळ व सुफलता यांचा देव होता. अमतेरसूच्या तीन कन्या आणि सुसनॉचे पाच पुत्र हे मानवांचे पूर्वज मानले जात. अनेक समुद्रदेवतांपैकी ओ-वता-त्सु-मी हा सर्वश्रेष्ठ देव होता. जपानी समुद्रदेव आणि हिंदूंचा वरुण यांचे तादात्म्य होऊन बनलेल्या सुइतेंगू हा देव प्रसिद्ध होता. फूजियामा हा ज्वालामुखी पर्वत अत्यंत पवित्र मानला जाई.लपलेल्या सूर्यदेवीला बाहेर आणण्यासाठी देवांनी साकाकी या वृक्षाला आरसा बांधला होता, म्हणून तो वृक्ष पवित्र मानला जाई. शिंतोकाळात संरक्षक म्हणून लिंगदेव प्रसिद्ध होते पण बौद्ध धर्मामुळे ते निष्प्रभ बनले. इ.स. चौथ्या शतकात कोरियाबरोबर लढलेली सम्राज्ञी जिंगो, सम्राट जिम्मू, सम्राट कम्मू, जिंगोचा मुलगा ओजिन, इ.स. १९१२ साली वारलेला सम्राट मेइजी इत्यादींचेही दैवतीकरण करण्यात आले होते. काहीजणांना जिवंतपणीच कामी मानून त्यांची मंदिरे बांधण्यात आली. पृथ्वीखाली नरकात मृतांचे राज्य असून त्याला ‘यमि-त्सु-कुनी’ म्हणजे अंधकारभूमी म्हटले जाई. तेथे जाण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरून एक आणि इझिमो प्रांतातून एक असे दोन मार्ग आहेत, असे मानले जाई.

जपानमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार सुरू झाल्यानंतर बौध्द पुराणकथा व देवतांचाही प्रभाव वाढला. मैत्रेय हा भविष्यकालीन बुद्ध आहे, असे मानले जाई. महावैरोचन, अक्षोभ्य, अमोघवज्र (अमोघसिद्धी), अमिताभ व रत्नसंभव ही बुद्धाची पाच भीषण रूपे मानलेली होती. या पाच बुद्धांपैकी प्रत्येकाशी समान असा एक-एक म्यू मानलेला होता. तीन वा चार मस्तके, तीन वा पाच डोळे, ज्वालांचा वेढा इ. प्रकारे त्यांची भीषण रूपे कल्पिलेली होती. किशिमोजिन म्हणजेच हरिती या देवीचे बुद्धाने धर्मांतर केल्यावर ती मुलांची संरक्षिका झाली. नक्षत्रसमुदायाचे प्रतीक असलेल्या २८ देवतांना  ‘निजुहाची बुशू’ म्हटले जाई. खलाशांच्या देवाला कुबेर वा कॉम्पिरा म्हटले जाई. देवळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना नीओ-फुकाओत्सू आणि सोको हो देव असत. शिच-फुकुजिन हे सुखाचे सात देव होते. भैषज्यगुरू म्हणजेच याकुशी न्योराई हा देव सर्व रोग बरे करीत असे. जिगोकू म्हणजे नरक हा पृथ्वीखाली असून एम्मा-हू म्हणजे यमराज हा तेथील राजा व न्यायाधीश होता. प्राण्यांना यमाकडे नेण्याचे काम ओनी नावाचे असुर करीत असत. यम पुरुषांचा न्याय करतो आणि त्याची बहीण स्त्रियांचा न्याय करते, पाप्याला त्याची सर्व पापे आरशाच्या मदतीने दाखवली जातात आणि त्या पापांचे वजन करून न्याय दिला जातो इ. कल्पना होत्या.

ईजिप्ती पुराणकथा : ईजिप्ती देवतांच्या अनेक मूर्ती व चित्रे आढळतात परंतु त्यांच्याविषयीच्या कथा मात्र विस्तृत स्वरूपात फारशा आढळत नाहीत. त्या कथा सर्वपरिचित असल्यामुळे आणि मौखिक परंपरेनेच सांगितल्या जात असल्यामुळे त्या लेखनबद्ध झाल्या नसाव्यात, असे दिसते. प्रारंभीच्या काळात पशू, पक्षी इत्यादींच्या स्वरूपात देवतांचे अस्तित्व मानले जाई. पुढे फक्त मस्तक पशूचे व आकार मानवाचा अशी स्थिती आली. काही वेळा मानवी मस्तकावर शिंगे दाखवली जात. लोक जसजसे एका जागी स्थिरावले, तसतशी प्रत्येक गावाची स्वतंत्र नगरदेवता मानली जाऊ लागली. काही देवतांचे संप्रदाय मात्र व्यापक प्रदेशात चालत असत.

मूळ ‘नन’ नावाचा एक समुद्र होता. त्यात सर्व पदार्थांची बीजे होती. त्याला देवांचा पिता म्हटले जाई. ह्याशिवाय  ⇨ ओसायरिस, ⇨ रा, थॉथ, प्ताह, इ. देवानी निर्मिती केल्याचे त्यांच्या त्यांच्या मंदिरांतून मानले जाई. सर्वव्यापी नीइथ ही सर्व देवांची माता मानली जाई. रा किंवा रे हा सूर्यदेव होय. तो जेथे पहिल्यांदा प्रकट झाला, त्या हीलिऑपोलिसमध्ये त्याचे मुख्य मंदिर आहे. कमळावर अधिष्ठित अशा मुलाच्या अथवा मेंढ्यांचे डोके असलेल्या मानवाच्या रूपात त्याचे चित्रण केले जाते. ॲपेप हा नाईलमध्ये राहणारा सर्प त्याचा शत्रू असून त्याने गिळल्यामुळे सूर्याला ग्रहणे लागतात, असे मानले जाई. थॉथ हा चंद्रदेव विज्ञान, कला, इतिहास इत्यादींची नोंद ठेवणारा देवांचा लेखनिक होता. त्याला इबिस या पक्ष्याचे डोके असते आणि त्यावर अर्धचंद्र असतो. त्याच्या पहिल्या शब्दातून आद्य देवता व विश्व निर्माण झाले. रानंतर त्याचा पुत्र शू हा जगाचा राजा झाला. तो वायुदेव असून आकाशालाही आधार देतो, असे मानले जाई. तेफ्नूट ही दव व पाऊस यांची देवी. ती शू ची बहीण व पत्नी होय. सिंहिणीच्या रूपात तिची पूजा होत असे. शू व तेफ्नूट यांना गेब (पृथ्वी) हा मुलगा व नट  (आकाश) ही मुलगी झाली. शूनंतर त्याची सत्ता गेबकडे गेली. रा नटवर रागावलेला असल्यामुळे तिला वर्षातील कोणत्याही दिवशी अपत्य होणार नाही, असा शाप त्याने तिला दिला होता परंतु थॉथने वर्षात नवे पाच दिवस निर्माण केल्यामुळे तिला ओसायरिस, इसिस, सेत, नेफ्थिस आणि होरस अशी पाच अपत्ये झाली. हाथर हीदेखील आकाशदेवी होती. ती राची मुलगी व होरसची पत्नी वा आई म्हटली जाई. लोकांनी जेव्हा राविरुद्ध बंड केले, तेव्हा तिने सिंहिणीच्या रूपात त्यांची भीषण हत्या केली. ती काहीशी हिंदूंच्या महिषासुरमर्दिनीसारखी वाटते.

बैल, मेंढा, पक्षी इ. रूपांत चित्रित केलेला आणि जवळजवळ १०० नावे असलेला ओसायरिस हा मूळचा वनस्पतींचा देव होता नंतर तो मृतांचा देव बनला. तो गेब आणि नट यांचा ज्येष्ठ पुत्र होता. ईजिप्तमध्ये त्याने व त्याची पत्नी इसिस हिने संस्कृती आणली. सेतने ओसायरिसला मारले होते परंतु इसिसने त्याला पुन्हा जिवंत केले. मृत्यूनंतर पुनर्जन्म होणे म्हणजे मावळल्यानंतर पुन्हा उगवणाऱ्या सूर्याचे प्रतीक असण्याची शक्यता आहे किंवा जिचे पाणी उतरते आणि पुन्हा महापुराच्या वेळी चढते, अशा नाईलचे तो प्रतीक असावा किंवा सुकून  गेल्यावर पुन्हा अंकुरणाऱ्या वनस्पतींचेही तो प्रतीक असण्याची शक्यता आहे. इसिस ही ओसायरिसची बहीण व पत्नी होय. तिने विवाहसंस्था निर्माण केली. ओसायरीसचा भाऊ सेत हा अत्यंत दुष्ट होता. ओसायरिस हा नाईलचे, इसिस ही समृद्ध मैदानाचे आणि सेत हा त्या दोघांना अलग करणाऱ्या नापीक वाळवंटाचे प्रतीक असावा, असे म्हणतात. ओसायरिस हा प्रकाशाचे आणि सेत हा अंधाराचे प्रतिनिधित्व करतो. ओसायरिस, इसिस आणि होरस या त्रिमूर्तीची संपूर्ण ईजिप्तमध्ये पूजा चाले, त्यांचे उत्सव साजरे होत, मिरवणुका निघत आणि तीर्थयात्रा केल्या जात. पंखयुक्त सूर्यमंडळ, उगवता सूर्य, दोन क्षितिजांमध्ये प्रवास करणारा सूर्य इ. रूपांत वेगवेगळे वीस होरस मानलेले होते.

मेंढ्याचे मस्तक असलेला ॲमन हा देवांचा राजा मानला जाई. तो सुफलतेचा देव होता. तो लोकांना आपले पुत्र मानून विजयी करीत असे. मट ही गायीच्या रूपातील आकाशदेवी त्याची पत्नी होती. हे दांपत्य अपत्यहीन असल्यामुळे त्याने ख्नूस या चंद्रदेवाला दत्तक घेतले होते. ख्नूस रूग्णांना बरे करीत असे. रा आणि ॲमन यांच्या खालोखाल महत्त्वाचा असलेला प्ताह हा  देव ‘ममी’च्या रूपात असे पिलूशीअमचे रक्षण करण्यासाठी त्याने शत्रुसैन्यावर उंदरांची सेना पाठवली होती. या उंदरांनी भाते, धनुष्याच्या दोऱ्या इ. कुरतडून त्या सैन्याला पळवून लावले. मातृत्वाचे प्रतीक असलेली तौरेत ही देवी पाणघोडीच्या रूपात कल्पिलेली होती. मानवजन्माच्या वेळी उपस्थित राहून भविष्य सांगणाऱ्या सात अथवा नऊ हाथर होत्या. रेनपीट ही तारुण्याची, तर सेल्केत ही मीलनाची देवी होती. व्यक्तीच्या जन्मापासून तो मृत्यूनंतर ओसायरिसपुढे न्याय होईपर्यंत तिच्या बरोबर राहणारा शाई हा नियतीचा देव आणि नेहेब हा शाश्वत काळाचा देव होता.

कुत्र्याचे वा कोल्ह्याचे डोके असलेला नेफ्थिसचा पुत्र अनुबिस हा मृतांसाठी परलोकाचे दरवाजे उघडत असे. ओसायरिसच्या मृत्यूच्या वेळी त्याने अंत्यसंस्कार करण्याची व ममी तयार करण्याची पद्धत शोधून काढली. अंत्यक्रियेतील प्रार्थना त्याला उद्देशून असत. मृतात्म्याला ओसायरिसकडे घेऊन जाण्याचे काम अनुबिस अथवा होरस करीत असे. तेथे महालाच्या मध्यभागी एक तराजू असे. ओसायरिसच्या शेजारी मानवाची व प्राण्यांची मस्तके असलेली ४२ न्यायाधीश असत. मृताने त्यांच्यापुढे आपली बाजू मांडली, की त्याचे हृदय तराजूच्या एका पारड्यात ठेवले जाई. दुसऱ्या पारड्यात न्यायाची देवी मात अथवा तिचे चिन्ह म्हणून एक पीस ठेवले जाई. वजन सांगण्याचे काम थॉथ करी. वजन समान असल्यास मृताला ओसायरिसच्या राज्यात कोठेही सुखाने संचार करण्याची परवानगी दिली जाई, नाहीतर सिंह, पाणघोडा व मगर यांचे रूप असलेला ॲमेमाइट हा राक्षस पापी व्यक्तीचे हृदय खाण्यास सज्ज असे.

पारशी पुराणकथा : पारशी लोकांच्या झेंदअवेस्ता वा ⇨अवेस्ता या धर्मग्रंथातून त्यांच्या पुराणकथा आढळतात. ⇨अहुर मज्द हा त्यांचा सर्वश्रेष्ठ ईश्वर होय. पारशी लोकांनी या जगाचे अस्तित्व १२ हजार वर्षांचे मानून त्या कालखडांचे चार समान भाग केलेले आहेत. प्रारंभी फक्त अहुर मज्द अस्तित्वात होता. नंतर दुष्टत्वाचे प्रतीक असलेला ⇨अंग्रोमइन्यू म्हणजेच अहरिमन निर्माण झाला. त्या दोघांचे सदैव युद्ध होते. आळीपाळीने दोघांचाही विजय होतो परंतु शेवटी जरथुश्त्राचा म्हणजेच पर्यायाने अहुर मज्दाचा विजय होतो. या विश्वातील सर्व सद्‌वस्तूंची निर्मिती अहुर मज्दाने, तर सर्व असद्‌वस्तूंची निर्मिती अहरिमनने केली. सद्‌गुणांचे प्रतीक असलेले सहा मंत्री अहुर मज्दाच्या हाताखाली असतात. त्यांना ⇨अमेशस्पँत म्हटले जाते. ‘यजत’ नावाच्या हजारो रक्षक देवता असून त्या सत्य, विजय, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, अग्नी इत्यादींच्या देवता होत. स्वर्गातील पहिला यजत म्हणजे अहुर मज्द, तर पृथ्वीवरील पहिला यजत म्हणजे ⇨ जरथुश्त्र होय. आतर् म्हणजे अग्नी हा अहुर मज्दाचा पुत्र मानला जातो, परंतु प्रत्यक्षात त्याची पूजा अहुर मज्दाच्या आधीपासूनच चालू होती असे दिसते. वेरेथ्रघ्न हा विजयाचा देव आहे. आपो हा जलदेव आहे. फ्रवशी संरक्षक देवदूत आहेत. ह्‌वरे म्हणजे सूर्य हा अहुर मज्दाचा नेत्र मानला होता. प्रारंभी करारांचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला मिथ्र नंतर सत्य व प्रकाश यांचा देव बनला [→मिथ्र धर्म]. विवनवात् या मानवाने पहिल्यांदा हओम तयार केला म्हणून त्याला यिम हा पुत्र लाभला. हओम हा वैदिक सोमाशी निगडित आहे. इ. स. पू. ६६०-५८३ या काळात होऊन गेलेल्या जरथुश्त्राला वोहु मनह्‌कडून ज्ञान प्राप्त झाले.

पारशांचा सर्वश्रेष्ठ देव अहुर मज्द : एक अपोत्थित शिल्प.

गायोमार्ट ही आद्य व्यक्ती उभयलिंगी होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या शरीरातून एक झाड उगवले व त्याच्यापासून दहा स्त्रीपुरुषदांपत्ये निर्माण झाली तीच मानवांची पूर्वज होत.दुसऱ्या एका कल्पनेनुसार अहुर मज्दाने गॉश नावाचा एक बैल निर्माण करून त्याच्यामध्ये सर्व प्राणिमात्रांची बीजे ठेवली होती. त्या बैलाच्या मृत्यूनंतर त्याच्या उजव्या खांद्यातून कैनार्ट्‌स हा आद्य पुरुष आणि डाव्या खांद्यातून गॉशुरुना हा त्या बैलाचा आत्मा व प्राण्यांचा रक्षक निर्माण झाला. कैनार्ट्‌सचे बीज ४० वर्षे पृथ्वीत राहिल्यानंतर त्याच्यापासून माश्या आणि माश्योई हे मानवी दांपत्य निर्माण झाले. प्रारंभी त्यांनी अहुर मज्दाची पूजा केली परंतु नंतर अहरिमनने विश्वनिर्मिती केली असे मानल्यामुळे ते अधःपतित झाले, तरीही ईश्वराने क्षमाशील अंतःकरणाने त्यांचे रक्षण केले.

‘देव’ या दुष्ट शक्ती असून अहरिमन हा त्यांचा प्रमुख आहे. अहुर मज्दाचे ज्याप्रमाणे सहा मंत्री आहेत, तसेच अहरिमनचे सहा सहकारी देव असून ते अहुर मज्दाच्या सहा मंत्र्यांचे प्रतियोगी होत. द्रुज याही दुष्ट शक्ती आहेत. नासू ही द्रुज माशी बनून प्रेत पटकन कुजायला लावते. जाही या द्रुजामुळे स्त्रियांतील दुर्गुण निर्माण होतात. अहरिमनने तिला दिलेल्या एका चुंबनामुळे स्त्रियांमध्ये अपवित्र ऋतुस्राव सुरू झाला. जादूगार (‘यातु’) तसेच पाऊस पडू नये म्हणून ताऱ्यावर जादूटोणा करणाऱ्या परी या दुष्ट शक्ती होत्या. मृत्यूनंतर न्यायाधीशांपुढे मृतात्म्यांच्या पापपुण्यांचे वजन केले जाते, अशी समजूत होती. जगात जरी सध्या दुष्टता वाढत असली, तरी या युगाच्या शेवटी साओशिअँट हे भावी रक्षक ही दुष्टता संपवतील. व्हिसपातुरी या कुमारीच्या उदरी जन्माला येणारा आस्तव्हतेरेता हा रक्षक जगाचे कल्याण करील व जगात अहरिमनचे नावही उरणार नाही. शाहनामा या फिर्दौसी (सु.९३२-सु.१०२०) याच्या महाकाव्यातही वैशिष्ट्यपूर्ण पुराणकथा आलेल्या आहेत.

अनुयायांना पाणी देणारा मोझेस : एक प्राचीन चित्र.

इस्लामी पुराणकथाइस्लाममध्ये प्रतिमा, ईश्वराचे मानवी रूप, मूर्तिपूजा इ. गोष्टी निषिद्ध असल्यामुळे पुराणकथांना मुळीच वाव नाही. इस्लामपूर्व अरबांना देवदैत्यांच्या कल्पना होत्या आणि त्यांच्या समाजात दगडांची व वृक्षांचीही पूजा चालत होती. ⇨ मक्केतील ⇨ काबा पवित्र मानला जात असे. ॲबिसिनियाचा सेनापती अब्राहा याने एकदा काबा नष्ट करण्यासाठी मक्केवर हल्ला केला परंतु त्याच्या हत्तीने मक्केत शिरावयाचे नाकारले आणि पक्ष्यांनी दगडांचा वर्षाव करून त्याला माघार घ्यावयास लावली. अत्तहर (सूर्य), सिन (चंद्र) इ. देवही मानले जात होते. कुराणानेही काही प्राचीन देवतांचा निर्देश केला आहे. इस्लामने पुराणकथा नाकारलेल्या असूनही  ⇨ शिया पंथी मुसलमानांनी मात्र पुराणकथा निर्माण केल्या आहेत. त्यांनी बारा ⇨ इमाम मानले असून त्यांच्याभावती पुराणकथा गुंफल्या आहेत. काहींनी तर त्यांना ईश्वरी अवतारही मानले आहे. आठवड्यातील वार व दिवसाचे वेगवेगळे भाग हे विशिष्ट इमामांचे मानून त्यांची विभागणी करण्यात आली आहे. ⇨अली हा पहिला इमाम असून त्याने अनेक चमत्कार केले होते. त्याची पत्नी फातिमा ही आईच्या गर्भात असतानाच बोलत असे. अकरावा इमाम अब्द-अल्ला हसन याने आपल्या दोन बोटांमध्ये प्रचंड सैन्य उभे केले होते. शुक्रवार हा बाराव्या इमामाचा वार असून तो इमाम एका शुक्रवारी येऊन अंतिम निवाड्याची घोषणा करणार आहे, असे मानले जाते. ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो. गुरू व शुक्र हे शुभ, तर शनी व मंगळ हे अशुभ आहेत इ. कल्पना होत्या. कुराणात जन्न आणि त्याची अपत्ये जिन्न यांचा निर्देश आहे.जन्न हा आदमच्याही आधी जन्मला होता. आधी ईश्वरमुक्त असलेले त्याचे वंशज अहंकारामुळे पुनःपुन्हा अधःपतित झाले. ð इब्लिस हा त्यांच्यापैकीच एक होता. अहंकारामुळे अधःपतित होऊन तो सैतान बनला. गोफणीतून दगड मारताना देवाचे नाव घेतले नाही, तर अदृश्य असलेल्या जिन्नांना दगड लागून त्यांच्या क्रोधाला बळी पडण्याचा धोका असतो. पर्शियन मुसलमानांनी नर हे भीषण दैत्य, स्त्रियांवर हल्ला करणारा  अल् हा दैत्य, लोकांना पाण्यात बुडवणारा नॅसनस हा दैत्य इ.दुष्ट शक्ती मानलेल्या होत्या. धूल आणि इफ्रित हे दुष्ट राक्षस मित्रादींचे रूप घेऊन प्रवाशांना फसवतात व त्यांना फाडून खातात, अशी समजूत होती. पा लीस हा अरण्यात झोपलेल्या लोकांचे पाच चाटून त्यांचे सर्व रक्त शोषतो  व त्यांना मारतो, अशी समजूत होती. पारशी व इस्लाम या धर्मांतील कल्पनांच्या मिश्रणातून काही पुराणकथा निर्माण झाल्या आहेत. अहुर मज्दअल्ला हा ईश्वर, अहरिमनसैतान हा दैत्य, कैनार्ट्‌सआदाम हा आद्य मानव आणि जरथुश्त्र-इब्राहिम हा देवसखा इ. कल्पना निर्माण केल्या होत्या. सूफी लोकांनी आपल्या गूढवादाविषयी काही कथा निर्माण केल्या होत्या [→ रहस्यवाद सुफी पंथ]. काही योग्यांजवळ शरीर लहान वा मोठे करणे , दूरचा संवाद ऐकणे इ. गोष्टींसाठी आवश्यक ते सामर्थ्य असते, अशी समजूत होती. बायबलमध्ये आढळणारी व मानवाचा अधःपात दर्शविणारी ðआदम व ईव्ह यांची कथा किंचित बदल करून इस्लाम धर्मानेही स्वीकारली आहे.

हिब्रू पुराणकथा : हिब्रूंच्या पुराणकथा प्रामुख्याने बायबलच्या ‘जुन्या करारा’त आढळतात. विश्वाची निर्मिती आणि हिब्रू लोकांच्या  पूर्वजांची वंशावळ हे त्यांच्या पुराणकथांचे दोन मुख्य  विषय आहेत.

प्रारंभीच्या काळात हिब्रू लोक अश्तार्ती, अशेराह इ. देवतांची पूजा करीत होते परंतु नंतर मात्र त्यांनी विश्वनिर्माता ð येहोवा हा सर्वश्रेष्ठ व एकमेव ईश्वर मानला. एका कथेनुसार ईश्वराने स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मितीनंतर निर्मिलेल्या धुक्यामुळे जमीन ओली होऊन गवत व रोपे तयार झाली. त्यानंतर क्रमाने ईडनमधील बाग, आदम हा मानव, वृक्ष, पशू, स्त्री इत्यादींची निर्मिती करण्यात आली. ‘जुन्या करारा’ तील निर्मितिकथेनुसार प्रारंभी ईश्वराच्या भोवती तोहू (केऑस) आणि बोहू (रिक्तता) होती. मग ईश्वराने सहा दिवसांत प्रकाश, स्वर्ग, पृथ्वी व समुद्र, चंद्रसूर्य व तारे इत्यादींच्या निर्मितीनंतर सहाव्या दिवशी मानवाची निर्मिती करून सातव्या दिवशी विश्रांती घेतली. ईनॉच, आयझॅक, याकोब, मोझेस इ. लोक जिवंतपणीच ईडन बागेत गेले होते. ईडनच्या उत्तरेला जेहेन्ना हा नरक असून दुष्ट तेथे जातात. झेभुल नावाच्या स्वर्गात स्वर्गीय जेरूसलेम व मंदिर आहे. विश्वाच्या निर्मितीनंतर तिसऱ्या दिवशी देवाचा मुख्य दूत लूसिफर याला आपण देवाच्या बरोबरीचे व्हावे असा अहंकार झाल्यामुळे त्याला ईडनमधून हाकलण्यात आले.

पुत्रबलिदानास सिद्ध झालेला प्रेषित अब्राहम : हस्तिदंती शिल्पन.

ईश्वराने सहाव्या दिवशी उत्कृष्ट मातीपासून आदम या मानवाची निर्मिती केली. नंतर देवाने लिलिथ नावाची स्त्री निर्माण केली. दोघांचाही जन्म मातीपासूनच झालेला असल्यामुळे दोघे समान आहोत आणि त्यामुळे समागमप्रसंगी मी तुझ्या खाली झोपणार नाही, असे म्हणून ती रूसून गेली. नंतर देवाने पहिली ईव्ह निर्माण केली परंतु आदमने तिला स्वीकारले नाही. मग ईश्वराने त्याच्या बरगडीपासून (वा शेपटीपासून) दुसरी ईव्ह निर्माण केली. ईश्वराने आदम आणि ईव्ह यांना ईडनच्या बागेतील ज्ञानवृक्षाचे फळ खाऊ नका, असे सांगितले होते. ईश्वराने तुम्हाला फसवले आहे, असे सांगून सॅमेलने म्हणजेच सापाच्या रूपात असलेल्या सैतानाने ईव्हला फळ खावयास लावले. त्यानंतर मृत्यू दिसू लागताच आपल्या मृत्यूनंतर आदम दुसरे लग्न करील या भावनेने तिने त्यालाही फळ खायला लावले. त्यांना लगेच नग्नतेची जाणीव झाली आणि ईश्वराने त्यांना मर्त्यतेचा शाप देऊन बागेतून बाहेर घालवून दिले. फीनिक्स पक्ष्याने  फळ खाल्ले नसल्यामुळे तो अमर झाला. सॅमेलने ईव्हशी समागम करून तिला भ्रष्ट केले आणि तिला केन हा मुलगा झाला. आदमपासून तिला एबेल हा मुलगा झाला. त्याला केनने ठार केले. आदम एकूण ९३० वर्षे जगला व त्याच्या वंशजांचे आयुष्य क्रमाक्रमाने कमी होत गेले. आपल्या दुसऱ्या मुलालाही केन मारेल, असे वाटल्यामुळे आदमने १३० वर्षे ईव्हशी संबंध ठेवला नाही त्यानंतर त्याना सेत हा पुत्र झाला. केनचा मुलगा ईनॉच हा स्वर्गात जाऊन ईश्वराचा मुख्य सल्लागार बनला. केनची इतर मुले मात्र अत्यंत अधःपतित झाली. एकदा केनच्या वंशातील आंधळा लामेख आपल्या तुबल केन या मुलाबरोबर शिकारीला गेला होता. मुलाने शिकार समजून केनचाच निर्देश केल्यामुळे केन मारला गेला. मग लामेखने मुलालाही मारले. त्यामुळे लामेखाच्या बायका रागावल्या आणि त्या त्याच्याबरोबर झोपेनात. परंतु आदमने दिलेला आदेश मानल्यामुळे झिल्लहला लामेखपासून सुंता झालेल्या अवस्थेतच नोआ नावाचा मुलगा झाला. त्याचवेळी आदमचा मृत्यू झाला. ईनॉचची मुलगी नेमा हिच्याबरोबर नोआचा विवाह झाला. त्यांना शेम, हॅम आणि जापेत हे तीन मुलगे झाले. प्रलयाच्या वेळी नोआने नाव बांधून प्रत्येक प्राण्याचे एक जोडपे वाचवले. पुढे नोआने दिलेल्या गुलाम व कुरूप बनण्याच्या शापामुळे कनानची मुले निग्रो बनली. नोआच्या वंशात जन्माला आलेल्या अब्राहमने देवांच्या लाकडी मूर्ती कुऱ्हाडीने फोडून टाकल्या. म्हणूनच त्याला एकेश्वरवादी ज्यू धर्माचा प्रवर्तक मानले जाते. राजाने त्याला पेटलेल्या भट्टीत टाकून जाळण्याचा प्रयत्न केला परंतु भट्टीची बाग झाल्यामुळे तो वाचला. सावत्र बहीण साराय ही त्याची पत्नी होती. अब्राहम १०० वर्षांचा आणि साराय ९० वर्षांची असताना आणि तिची ऋतुनिवृत्ती झाली असतानाही ईश्वरी कृपेने त्यांना आयझॅक हा मुलगा झाला.पुढे ईश्वराच्या आदेशावरून अब्राहम आयझॅकचा बळी देण्यासाठी मोराइया पर्वतावर गेला असताना, त्याची तयारी पाहून ईश्वराने तेथे मेंढा निर्माण केला आणि त्याचा बळी घेतला. अब्राहम १३७ वर्षांचा झाला, तरी तो आयझॅकसारखाच दिसत असल्यामुळे अब्राहमच्याच प्रार्थनेवरून ईश्वराने त्याचे केस पांढरे केले. पुढे अब्राहमचा पुतण्या बीथूएल याला लेबन हा मुलगा आणि रीबेख ही मुलगी झाली. आयझॅकचे तिच्याबरोबर लग्न झाले. त्यांना याकोब व ईआसू हे मुलगे झाले. याकोब हा सुंता केलेल्या अवस्थेत जन्मला होता. एकदा प्रवासात याकोब झोपलेला असताना त्याला देवदूत शिडीवरून स्वर्गात जात असलेले दिसले. ते स्थान म्हणजेच बेथल हे देवाचे घर होय. आदम, नोआ इत्यादींमध्ये काहीतरी उणीव होती परंतु योकोब निर्दोष असल्यामुळे ईश्वराने देवदूतांना त्याची स्तुती करावयास सांगून त्याचे नाव इझ्राएल ठेवले. पुढे त्याने आपला मामा लेबन याच्याकडे सेवा करून त्याच्या लीह आणि रेचेल या मुलींशी विवाह केला. त्या दोघींच्या दोन दासीही त्याच्या स्त्रिया बनल्या. ज्यांना इझ्राएलचे पितृत्व दिले जाते ते बाराजण म्हणजे याकोबपासून या चौघींना झालेले पुत्र होत. रेचेल ही याकोबची लाडकी पत्नी होती. दीर्घकालीन वंध्यत्वानंतर एका वनस्पतीच्या भक्षणामुळे तिला जोसेफ आणि बेंजामिन हे दोन पुत्र झाले. जोसेफ सोडून इतर सर्वांना जुळ्या बहिणी होत्या व त्याच त्यांच्या पत्नी झाल्या. लीहचा मुलगा जुडा याला तीन मुलगे होते. एर या थोरल्या मुलाची बायको तामार ही पुढे इझ्राएलची वीरमाता मानली गेली. तिला सासऱ्यापासून पेरेझ आणि झरोह असे दोन पुत्र प्राप्त झाले. जोसेफला त्याच्या भावांनी खड्ड्यात टाकल्यावर तो दैवयोगाने ईजिप्तमध्ये पोचून तेथील राजाचा मुख्य मंत्री बनला. त्याने दूरदृष्टीमुळे सात वर्षांच्या दुष्काळात अनेक लोकांचे व आपल्या भावंडांचेही प्राण वाचवले. मोझेस, सॉलोमन इत्यादींविषयीच्या पुराणकथाही आढळतात.

ख्रिस्ती पुराणकथा : आपला धर्म पुराणकथाविरोधी आहे, असे जरी ख्रिस्ती लोक मानत असले, तरी बायबलमध्ये अनेक पुराणकथा आढळतात. गाब्रिएल या देवदूताने जॉन द बॅप्टिस्ट याचा जन्म होणार असल्याची घोषणा त्याच्या जन्माआधीच केली होती. त्यानंतर त्याने येशू ख्रिस्ताची माता मेरी आणि काही मेंढपाळ यांना येशूच्या जन्माची पूर्वकल्पना दिली होती. मेरी ही विवाहापूर्वीच गर्भवती होती, हे ध्यानात आल्यावर तिचा पती जोसेफ हा तिचा त्याग करण्याच्या बेतात होता परंतु तिच्या उदरात पवित्र आत्म्याचा गर्भ असल्याचे देवदूताने सांगितले. त्यामुळे येशूला मानवी पिता नव्हता, तो ईश्वराचा पुत्र होता, असे मानले गेले. त्यामुळेच आदमचे पाप येशूमध्ये प्रविष्ट झाले नाही. येशूमुळे आपल्या राज्याला धोका आहे, हे पाहून राजाने त्या काळात जन्मलेली सर्व मुले मारावयाची आज्ञा दिली. तेव्हा जोसेफला पळून जाण्याचा, कालांतराने परतण्याचा इ. दृष्टांत झाले. येशूच्या जन्माप्रमाणेच मृत्यूविषयीही पुराणकथा तयार झाल्या आहेत. त्याच्या मृत्यूच्या वेळी मंदिरावरचे आवरण दैवी शक्तीने फाडून टाकले, संपूर्ण पृथ्वीवर तीन तास अंधार पसरला, भूकंप झाला, थडग्यांतून अनेक साधू उठले व जेरूसलेममध्ये आले इ. गोष्टी सांगितल्या जातात. मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तो कबरीतून उठला व शिष्यांना भेटला. हेच ⇨पुनरुत्थान होय. त्यानंतर ४० व्या दिवशी त्याने स्वर्गारोहण केले. येशूने अनेक चमत्कार केल्याच्याही कथा आहेत. अशा रीतीने ख्रिस्ती धर्मातही पुराणकथांचे अस्तित्व असल्याचे स्पष्टपणे  जाणवते.

येशुचे स्वर्गारोहण : एक हस्तिदंती चित्रचौकट.

ग्रीक पुराणकथा : ग्रीक लोक रानटी अवस्थेतून बाहेर पडण्यापूर्वी मिनास नावाच्या राजाने क्रीट येथे स्थापन केलेली एक संस्कृती होती. इ.स.पू. १४०० सुमारास ही संस्कृती संपुष्टात आली परंतु नंतरच्या ग्रीक पुराणकथांवर तिचा प्रभाव टिकून राहिला. या ग्रीक कथांतील व्यक्तींचे तीन प्रमुख वर्ग पडतात : पहिला ऑलिंपस पर्वतावर राहणाऱ्या देवांचा, दुसरा सूर्य, चंद्र, समुद्र इत्यादींचा आणि तिसरा वीरपुरुषांचा होय. होमरच्या इलिअड आणि ओडिसी या महाकाव्यांत ग्रीक देवतांची बरीच माहिती आहे. इ.स.पू. आठव्या शतकातील हीसिअडच्या थिऑगनी (देवोत्पत्तिशास्त्र) या काव्यामध्ये मात्र ग्रीकांच्या सविस्तर पुराणकथा आढळतात. या काव्यात विश्वनिर्मिती, देवांचे जन्म इ. विषयांची चर्चा असून या काव्याला ग्रीसमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली होती. इ.स.पू. सहाव्या शतकापासून इसवी सनाच्या प्रारंभापर्यंतच्या काळात ऑर्फियस या तत्त्ववेत्त्याच्या प्रभावाने अनेक नवीन देवोत्पत्तिशाश्त्रे व पुराणकथा निर्माण झाल्या परंतु त्यांना विशेष मान्यता मिळाली नाही. प्राचीन काळापासून ते आजतागायत ग्रीक पुराणकथांमधून अनेक साहित्यिक व इतर कलावंत यांना प्रेरणा मिळालेली आहे.

हीसिअडने मांडलेल्या विश्वनिर्मितीच्या कल्पनेनुसार प्रारंभी ‘केऑस’ची अवस्था होती. त्यानंतर जीआ (पृथ्वी) निर्माण झाली. तिच्यापासूनच विश्वदेवता व मानव निर्माण झाले असल्यामुळे ती ग्रीसमधील महत्त्वाची देवता होती. जीआ व तिचा पुत्र यूरानस (आकाश) यांच्या संयोगातून सहा पुरुष व सहा स्त्रिया असे १२ टायटन्स निर्माण झाले. हाच विश्वातील पहिला वंश असून टायटन्स हे मानवांचे पूर्वज मानले गेले आहेत. त्यानंतर पृथ्वी व आकाश यांच्यापासून कपाळावर फक्त एकच डोळा असलेले सायक्लोप्स नावाचे वादळाचे तीन देव निर्माण झाले. त्यानंतर त्या दोघांपासून प्रत्येकी १०० बाहू आणि ५० मस्तके असलेली सेंटिमेन नावाचे तीन राक्षस जन्मले. टायटन्सपैकी क्रोनसने आपली बहीण रीया हिच्याशी विवाह केला. त्यांना हेस्टिआ, डीमीटर आणि हेरा या तीन मुली आणि हेडीझ, पोसायडन आणि ⇨झ्यूस हे तीन मुलगे झाले. पुढे झ्यूसने क्रोनसचा पराभव केल्यानंतर टायटन्स व झ्यूस वगैर देवांमध्ये युद्ध झाले. देवांनी सेंटिमेन व सायक्लोप्स यांची मदत घेऊन टायटन्सना पराभूत केले. हे युद्ध संपल्यानंतर झ्यूस आणि यूरानसच्या रक्तापासून बनलेले जायंट्‌स यांच्यात युद्ध झाले. जायंट्‌स हे फक्त मर्त्य व्यक्तीकडूनच मारले जातील, अशी भविष्यवाणी असल्यामुळे देवांनी हर्क्यूलीझ या मर्त्य वीराची मदत घेऊन त्यांचा नाश केला. पृथ्वीने शेवटी टायफोअस याला झ्यूसवर पाठविले. त्याने झ्यूसला कैदेत टाकले परंतु हर्मीझने झ्यूसची सुटका केल्यावर त्याने वज्रप्रहार करून टायफोअसला पराभूत केले. अशा रीतीने झ्यूस हा सर्वश्रेष्ठ देव बनला. झ्यूस या शब्दाच्या मुळाशी ‘द्यौस्’ हा संस्कृत शब्द असून ‘प्रकाशमान आकाश’ हे त्याचे मूळचे स्वरूप होते. मीटिस (विद्वत्ता) ही त्याची प्रथम पत्नी होती. तिची मुले तुला पदच्युत करतील असे पृथ्वी आणि यूरानस यांनी सांगितल्यामुळे अथीनाच्या जन्माच्या वेळी त्याने गर्भवती पत्नीला गिळले. झ्यूसपासून नीमॉसिनीला म्यूझेस, डीमीटरला पर्सेफोनी आणि ओसिॲनिड यूरीनोमीला चॅरिटी या कन्या झाल्या. तुझ्यापासून थेटीसला होणारे मूल तुला पदच्युत करील, असे प्रॉमीथिअसने सांगितल्यामुळे त्याने तिचा मोह सोडला. त्याने आपली बहीण हेरा हिला फसवून तिच्याशी विवाह केला. हेरा हे नाव ‘स्वर्’ (स्वर्ग) या संस्कृत शब्दाशी संबद्ध असून हेरा ही मूळची आकाशाची राणी, पुढे विवाह व मातृत्व यांची देवी बनली. झ्यूसने मीटिसला गिळले तेव्हा अथीना तिच्या गर्भात होती. नंतर झ्यूसचे डोके दुखू लागले म्हणून त्याची कवटी उघडली, तेव्हा ती बाहेर आली. ती बुद्धिमत्ता, कला, युद्ध, शांती इत्यादींची देवता होती. तिने आपले कौमार्य कटाक्षाने जपले होते. टैरेसिआसने तिला स्नान करताना पाहिले म्हणून तिने त्याला अंध केले परंतु नंतर त्याला भविष्यकथनाची कला दिली. अथीनाप्रमाणेच आर्टेमिस ही कृषिदेवताही कुमारी होती आणि तिने आपल्या मैत्रिणींनाही कुमारी राहायला लावले होते.

मीडूसाचा शिरच्छेद करणारा पर्सीअस व अथीना : एक कलशचित्र.

झ्यूसचा भाऊ पोसायडन हा नद्या, सरोवरे व समुद्र यांचा देव होता. झ्यूस व लीटो यांचा संगीतप्रिय मुलगा ⇨ अपोलो हा मूळचा सूर्यदेव होता आणि पुढे मेंढपाळांचा देव बनला. त्याच्या जन्माच्या वेळी मत्सरामुळे हेराने अनेक अडथळे उत्पन्न केले होते. म्यूझेस या त्याला संगीतात साथ देत असत. झ्यूस व हेरा यांचा लंगडा मुलगा हीफेस्टस हा अग्निदेव आणि देवांचा लोहार होता. त्याचे नाव संस्कृतमधील अग्नीच्या ‘यविष्ठ’(तरुणतम) या विशेषणाशी संबद्ध मानले जाते. मूळची जननक्षमतेची देवी ⇨ॲफ्रोडाइटी ही पुढे प्रणयदेवी बनली. एका सौंदर्यस्पर्धेत ट्रॉयच्या पॅरिसने हेरा आणि अथीना यांच्यापेक्षा तिला अधिक सुंदर ठरविले होते. व्यापार, लाभ, वक्तृत्व, वारा, संधिप्रकाश इत्यादींचा देव हर्मीझ हा झ्यूस व मेया यांचा मुलगा होता. झ्यूस व हेरा यांचा मुलगा एरीझ हा युद्धदेव ॲफ्रोडाइटीच्या प्रेमात पडला होता. क्रोनस आणि रीया यांचे पहिले अपत्य असलेली हेस्टिआ म्हणजे घरातील अग्नीची देवता होय. पोसायडन आणि अपोलो यांनी तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु तिने कुमारी राहणेच पसंत केले. यूरानस व जीआ यांची कन्या थीमिस ही न्यायाची व ज्ञानाची देवी होती. ग्रेसेस नावाच्या कृतज्ञतेच्या तीन देवी होत्या. ईरॉस हा ॲफ्रोडाइटीचा सहकारी सायकीच्या प्रेमात पडला होता. सेमली या राजकन्येला झ्यूसपासून झालेला ⇨डायोनायसस हा मद्यदेव म्हणजे वैदिक सोमाचे ग्रीक रूप असावे, असे मानले जाते. हेराच्या फसव्या सूचनेवरून सेमलीने झ्यूसला पूर्ण तेजात पाहण्याची इच्छा केली आणि ती जळून गेली. त्यानंतर झ्यूसने मुलाला आपल्या मांडीत वाढवले. क्रोनस व रीया यांची मुलगी डीमीटर हा धान्याची देवी होती. ð डीमीटर व झ्यूस यांची मुलगी पर्सेफोनी हिला हेडीझने पाताळात पळवून नेल्यावर डीमीटरने पृथ्वीवर पिके येऊ दिली नाहीत. हेराच्या मुली असलेल्या दोन इलिथिया मिळून प्रसूतीच्या वेळी उपस्थित राहणारी एक देवता मानलेली होती. लीटोने अपोलोला जन्म दिला, तेव्हा हेराने मत्सराने नऊ दिवसपर्यंत इलिथियाला अडवून ठेवले होते. ⇨हर्क्यूलीझच्या जन्माच्या वेळीही तिने तसेच केले होते. नशिबाच्या तीन देवता मोइरा या नावाने प्रसिद्ध होत्या. नेमेसिस ही नैतिक कल्पनेशी संबद्ध देवता होती. एटी ही देवता माणसांना चुका करायला लावी, तर लीएटी या तिच्या बहिणी त्या चुका दुरूस्त करीत. झ्यूस एखाद्या परीशी प्रणयक्रीडा करीत असला, तर हेराची दासी एको ही काही तरी वटवट करून व गाणे म्हणून हेराचे लक्ष दुसरीकडे गुंतवी. यामुळे हेराने तिला मुकी बनवून तुला दुसऱ्याच्या बोलण्यातील फक्त शेवटच्या वर्णाचा प्रतिध्वनी काढता येईल,असे सांगितले. तिला तरुण नार्सिससवरचे आपले प्रेम व्यक्त करता आले नाही व त्यामुळे त्याने तिला झिडकारले, शेवटी ती निराशेने मरण पावली. फक्त तिच्या आवाजाचा प्रतिध्वनी उरला. नार्सिससने एकोला झिडकारले, म्हणून देवांनी त्याला आत्मप्रतिमेच्या प्रेमात पडण्याची शिक्षा दिली. त्याने एकदा पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले आणि अखंडपणे तेथेच बसून तो ग्लानीने मरण पावला. त्याचे नार्सिसस या फुलात रूपांतर झाले.

झ्युसच्या मांडीतून जन्मणारा डायोनायसस : एक अभिजात ग्रीक अपोत्थित शिल्प.

क्रोनस व रीया यांचा मुलगा हेडीझ हा अधोलोकाचा प्रमुख देव होता. त्याच्या पत्नीचे नाव पर्सेफोनी हे होते. थॅनॅटॉस (मृत्यू) हा हेडीझला प्रजा मिळवून देतो, हिप्नॉस (निद्रा) हा त्याचा भाऊ होय, कीरीझ हे आयुष्य संपलेल्या व्यक्तीला ठार करून पाताळात नेतात इ. कल्पना होत्या.

हीपीरिऑन या टायटनपासून थीआ या त्याच्या बहिणीला हीलीऑस (सूर्य), सीलीनी(चंद्र) व ईऑस (उषा) ही तीन अपत्ये झाली. हीलीऑसच्या चुलत्यांनी त्याला समुद्रात बुडविले परंतु तेथून आकाशात जाऊन तो चमकू लागला, अशी कथा आहे. एन्डिमिऑन या सदैव झोपलेल्या आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी सीलीनी प्रत्येक रात्री येते, अशी एक कथा होती. चिरतरुण ईऑसने झ्यूसकडून टिथोनस या आपल्या प्रियकरासाठी अमरत्व मागितले परंतु चिरतारुण्य न मागितल्यामुळे तो कालांतराने वृद्ध झाला. तेव्हा तिने निराश होऊन त्याला कोंडून ठेवले. शेवटी देवांनी दयाबुद्धीने त्याचे सिसॅडा नावाच्या किड्यात रूपांतर केले. स्पर्श करशील ती वस्तू सोन्याची होईल, असा वर पृथ्वीदेवतेचा मुलगा मीडास याला डायोनायससकडून मिळाला होता.

वीरांना पूज्य मानून त्यांना आहुती दिली जात असे. ज्याच्यामध्ये शारीरिक सामर्थ्याचे मानवीकरण करण्यात आले होते, त्या हर्क्यूलीझने ऑलिंपिक क्रीडासामन्यांची स्थापना केली, असे मानले जाते. त्याने ९ फणा असलेला विषारी साप आणि लोखंडांचे अवयव असलेले नरमांसभक्षक पक्षी मारले. नेमिअन या सिंहाला मारून त्याच्या चर्माच्या वस्त्रामुळे तो अजिंक्य बनला. सोनेरी सफरचंदे गोळा करण्यासाठी ॲटलसने त्याला मदत केली, तेव्हा त्याने ॲटलसच्या खांद्यावरची पृथ्वी आपल्या खांद्यावर घेतली होती. पित्याचा वध व आईशी विवाह या गोष्टी ईडिपस या वीराकडून नकळत घडल्या. त्याच्यापासून त्याच्या आईला दोन मुले व दोन मुली झाल्या.

रोमन पुराणकथा : पूर्णपणे रोमन म्हणता येतील अशा पुराणकथा थोड्याच आहेत. रोमन लोकांनी इ.स.पू. तिसऱ्या आणि दुसऱ्या शतकांत मोठ्या प्रमाणात ग्रीक पुराणकथा उचलल्या. ग्रीक देवतांना रोमन नावे देण्यात आली. क्रोनसला सॅटर्न, झ्यूसला ⇨ज्यूपिटर, हेराला ⇨ज्यूनो, अथीनाला⇨मिनर्व्हा, आर्टेमिसला ⇨डायना, सीलीनीला ल्यूना, हर्मीझला मर्क्युरी, एरीझला मार्झ, ॲफ्रोडाइटीला ⇨ व्हीनस, ईरॉसला क्यूपिड, पोसायडनला नेपच्यून, हेस्टिआला व्हेस्टा, डीमीटरला सीरझ, डायोनायससला बॅकस, हेडीझला प्लूटो आणि पर्सेफोनीला प्रोझर्पिना म्हटले जाऊ लागले. यांखेरीज पर्शियन, सिरियन, ईजिप्ती, आल्बन, एट्रुस्कन, सॅबीन इ. अनेक कथांच्या प्रभावातून सध्या उपलब्ध असलेल्या रोमन पुराणकथा तयार झालेल्या आहेत. ईजिप्तची इसिस व सिरियाची अतारगॅटिस हि देवता रोमन लोकांनी स्वीकारली होती. आशिया मायनरमधून सिबिल आणि सुफलतेची देवी मा यांचा रोममध्ये प्रवेश झाला. सिरियातील सैनिकांनी रोमन सैन्यास भरती होताना आपले बेअल नावाचे देव सोबत आणले. पर्शियातून आलेल्या मिथ्रदेवांची रोमन सम्राटही पूजा करीत असत.

लांडगीचे दुग्धपान करताना रॉम्यूलस आणि रीमस : रोमन पुराणकथा, एक शिल्पांकन.

ज्यूपिटर हा रोमन लोकांना सर्वश्रेष्ठ देव होय. तो सूर्य, चंद्र, प्रकाश, वादळ, पाऊस इत्यादींचा देव होता. राज्याचा संरक्षक युद्धदेव व न्यायदेवता म्हणून त्याची संपूर्ण इटलीत पूजा चाले. त्याची बहीण व पत्नी असलेली ज्यूनो ही रोमन लोकांची संरक्षिका आणि चंद्रदेवी होती. रोमन मातृत्वाचे प्रतीक असलेली, प्रसूती आणि वंशवृद्धी यांचीही  ती देवता होती.सॅटर्न हा कृषिदेव होता. मूळचा कृषिदेव असून नंतर युद्धदेव बनलेला मार्झ हा अत्यंत महत्त्वाचा देव होता. हा मार्झ म्हणजे एका फुलाशी झालेल्या संबंधातून ज्यूनोला झालेला मुलगा होय. रीआ सिल्व्हिआ ही त्याची पत्नी आणि रॉम्यूलस व रीमस त्याचे पुत्र होत. त्याची कन्या, बहीण अथवा पत्नी असलेल्या बेलोनाचे रोममध्ये प्रसिद्ध मंदिर होते. जेनस हा द्वारांचा देव असल्यामुळे किल्ली हे त्याचे चिन्ह होते. तो मूळचा सूर्यदेव होता. वर्षाच्या पहिल्या महिन्याला जानेवारी हे त्याचेच नाव देण्यात आले आहे. हातोडा, ऐरण व चिमटा ही व्हल्कन या अग्निदेवाची चिन्हे होत. मर्क्युरी हा व्यापाऱ्यांचा देव होता. मूळची एट्रुस्कन पण नंतर ग्रीक अथीनाशी एकरूप मानलेली मिनर्व्हा ही कलावंत, उद्योगधंदे, शाळा, व्यापार इत्यादींची देवता पंखानी युक्त अशी मानलेली होती. संस्कृत ‘वस्’ धातूशी जिचे नाव निगडित आहे, ती व्हेस्टा सर्व रोमन देवतांपेक्षा अधिक सुंदर होती. मूळची पृथ्वीदेवता असूनही ती पुढे अग्निदेवता बनल्यामुळे ज्वाला हे तिचे प्रतीक बनले. प्रत्येक चुलीची स्वतंत्र व्हेस्टा असे आणि तिला पहिले अन्न व पेय दिले जाई. ज्यूपिटरची कन्या फॉर्च्युना ही नशिबाची देवी होती. बोनस इव्हेन्टस हा यश देणारा देव होता. मुलांच्या जीवनातील सर्व घटनांवर लक्ष ठेवणारी शक्ती म्हणजे जीनिअस व मुलींच्या बाबतीतील अशी शक्ती म्हणजे ज्यूनो होय. साहस, आशा, धार्मिकता इ. अनेक सद्‌गुणांनाही देवता मानले जाई. व्हिक्टोरिया ही यश देणारी देवी होती. घरातील महत्त्वाच्या प्रसंगी ल्हर या देवाला आवाहन केले जाई. कुऱ्हाड, उखळ, केरसुणी इ. वस्तूंच्याही देवता असत. अधोलोकात असलेल्या मेन्सची म्हणजे ⇨ पितरांची खाजगी व सार्वजनिक पूजा चाले. ऑर्कस हा मृत्युदेव लोकांना मृत्युलोकात नेई. लीबीटीन ही अंत्यसंस्काराची देवी होती. मृत्युलोकावर एइटा वा ॲडे आणि त्याची पत्नी पर्सीप्नी यांचे राज्य असे. पर्‍या (नींफ्‌स) या सामान्यतः जलदेवताच असत. कॅमेनी या नींफ्‌सपैकी एक भूतकाळ आणि दुसरी भविष्यकाळ जाणते. जटुर्ना या नींफला ज्यूपिटरने प्रेमाखातर नद्यांची सम्राज्ञी बनवले. सीरझ ही धान्याची, फ्लोरा ही फळाफुलांची आणि व्हीनस ही उद्यानांची देवता होती. व्हर्च्युम्नस हा फळाझाडांचा देव होता. कॉन्सस या पेरणीच्या देवाचा उत्सव साजरा होई, तेव्हा रथांच्या व घोड्यांच्या शर्यती होत. पीलीअस हा आधी देव होता परंतु नंतर त्याचे कळपांच्या संरक्षक देवीत रूपांतर झाले. टेलस मॅटर ही विवाह व अपत्यनिर्मिती यांची देवी, तर लीबरपॅटर हा कृषीच्या सुफलतेचा देव होता. रॉम्यूलस आणि रीमस हे दोन वीरपुरुष म्हणजे मार्झचे पुत्र होत. रीआ सिल्व्हिआ झोपलेली असताना मार्झने तिच्याशी समागम केला व तिला जुळे झाले. या जुळ्याला सुपात ठेवून नदीत सोडल्यावर एका लांडगीने दूध पाजले व मेंढपाळ दांपत्याने सांभाळले. पुढे रॉम्यूलसने रीमसला ठार मारले. समुद्रातील प्रवाशांचे रक्षण करणारे आणि युद्धमोहिमेत योद्ध्यांबरोबर जाणारे असे कॅस्टर आणि पॉलक्स हे दोन वीर होत. रोमचा राष्ट्रीय वीर असलेल्या ईनीअसपासून आपला वंश सुरू झाला, असे अनेक रोमन लोक मानत. क्लॉडिअस, ऑगस्टस इ. बादशहांचे दैवतीकरण करण्यात आले होते.

ट्यूटॉनिक पुराणकथा : ट्यूटॉन लोकांना इंडो-यूरोपियन पूर्वजांकडूनच पुराणकथांचा वारसा मिळाला होता. हे लोक जर्मनी, बाल्टिक समुद्रातील बेटे, तसेच आईसलँड, नॉर्वे, डेन्मार्क व स्वीडन या देशांनी बनलेल्या स्कँडिनेव्हियन प्रदेशातील होत. गॉथ, ट्यूटॉन, जर्मन व अँग्लो-सॅक्सन लोकांचे ते पूर्वज होते. या प्रदेशातील लोकांच्या पुराणकथांत खूपच विविधता असून कित्येकदा एका ठिकाणी अत्यंत प्रसिद्ध असलेली देवता दुसऱ्या ठिकाणी अज्ञातही असे. ज्यांच्याकडून या पुराणकथांची माहिती मिळाते ते लेखक स्वतः ख्रिस्ती असल्यामुळे या कथांवर ख्रिस्ती प्रभावही आढळतो. स्कँडिनेव्हियन लोकांनी मात्र ख्रिस्ती धर्म पतकरल्यानंतरही मूळच्या कथा जपण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला दिसतो. लॅटिन व ग्रीक ग्रंथांतूनही या पुराणकथाची माहिती मिळते. पश्चिम व उत्तर जर्मनीतील ग्रंथांतूनही बरीचशी माहिती मिळते. प्रारंभी पोकळीतून ढग, नद्या इत्यादींची निर्मिती झाल्यावर ईमीर हा मानवी रूपातील ‘जायंट’ निर्माण झाला. तो जायंटलोकांचा पूर्वज होता. जायंट हे देवांच्याही आधीचे होत. भूकंप, वादळे, ज्वालामुखी इत्यादींचे मानवीकरण करून जायंट ही कल्पना निर्माण केली होती, असे दिसते. ईमीरच्या डाव्या काखेतील घामापासून एक स्त्री निर्माण झाली. पुढे बरी नावाचा एक प्राणी प्रकट झाला. त्याचा मुलगा बॉर होय. त्याच्यापासून बास्टला नावाच्या जायंटकन्येला ओडिन, व्हीली आणि व्हे हे तीन देव झाले. नंतर देवांनी वृद्ध ईमीरला मारले. त्याच्या मृतदेहापासून विश्वनिर्मिती झाली. त्याच्या प्रेतातील किड्यांपासून ‘बुटके’ पुरुष निर्माण झाले. गुप्त खजिन्यांचे रक्षण करणारे कुरूप बुटके हे सोनार व लोहार होते. देवांची शस्त्रे व देवींचे दागिने त्यांनीच बनवले. नंतर ओडिन, होनीर आणि लोडूर हे देव एकदा फिरायला गेले असताना, त्यांनी वृक्षाचा निर्जीव बुंधा पाहून त्यात प्राण भरले आणि त्याला मानव बनवले. त्या मानवाला आश्क आणि त्याच्या पत्नीला एंबल म्हटले जाई. त्यांच्यापासून मानवी वंश सुरू झाला. विश्वनिर्मितीच्या इतरही परंपरा आढळतात. एसीर आणि व्हनीर असे दोन प्रकारचे देव होते.

थॉर अथवा डॉनर हा ट्यूटॉन लोकांचा एक प्रमुख देव होता. गुरुवार या अर्थाचा ‘थर्सडे’ हा शब्द त्याच्या नावावरूनच बनला आहे. यर्ट म्हणजे पृथ्वी ही त्याची आई आणि वैवाहिक निष्ठेचे प्रतीक असलेली सिफ ही त्याची पत्नी मानली जाई. माग्नी म्हणजे बल आणि मोडी म्हणजे क्रोध हे त्याचे वारस पुत्र होत. तो अनेक कथांचा नायक असून मेघनाद व युद्ध यांचा देव होता. एका बुटक्या पुरुषाने तयार केलेला हातोडा हे त्याचे प्रसिद्ध शस्त्र असून ते शत्रूवर प्रहार करून पुन्हा त्याच्या हातात येत असे. त्याच्या वाहनाला दोन बोकड  जुंपलेले असत. भूक लागली की तो त्यांना मारून खाई परंतु त्यांच्या कातड्याला हातोडा लागला, की ते पुन्हा जिवंत होऊन त्याचे वाहन ओढत असत. एकदा थ्रिम या जायंटने त्याचा हातोडा चोरला. लोकी हा देव जादूचे वस्त्र परिधान करून तो हातोडा आणण्यासाठी गेला असता जायंटने फ्रेया ही देवी मला दिली, तरच हातोडा परत देईन असे सांगितले. तेव्हा थॉरने फ्रेयाचे आणि लोकीने तिच्या दासीचे रूप घेतले आणि ते दोघे त्या जायंटकडे गेले. हातोडा हातात येताच थॉरने सर्वांचा धुव्वा उडवला. थॉरच्या अद्‍भुत पराक्रमाच्या अशा अनेक कथा आहेत.

बुधवार या अर्थाचा ‘वेन्स्डे’ हा शब्द ज्याच्या नावावरून बनला तो ओडिन हा एक प्रमुख देव होय. मानवी समाजाला त्याने नियमबद्ध केले. जायंट मीमीर हा त्याचा मामा त्याचा सल्लागार होता. एका डोळ्याच्या मोबदल्यात ओडिनने मामाकडून विद्येच्या झऱ्यातील पाणी घेतले होते. एसीर व व्हनीर यांच्या युद्धांत मीमीर मारला गेला परंतु ओडिनने त्याचे डोके मसाल्यात ठेवून मंत्र म्हटले व त्यामुळे ते डोके ओडिनला गूढ गोष्टींची उत्तरे देत राहिले. ओडिन हा फ्रिग म्हणजेच फ्रायजा या देवीचा पती होता. तो विद्वत्ता व काव्य यांचाही देव होता.

संस्कृत द्यौस् आणि ग्रीक झ्यूस या नावांशी संबंधित अशा टीयूझ या देवाला टिवू, टीर, ट्‌सीऊ इ. नावे होती. मंगळवार या अर्थाचा ‘टयूझडे’ हा शब्द त्याच्या नावापासून बनला आहे. द्वंद्वयुद्धांत ज्याच्यावर त्याची कृपा होई, तो विजयी होत असे. काही जण त्याला ओडिनचा, तर काही जण हीमीर या जायंटचा पुत्र मानतात. जायंट लांडगा फेन्‍रीर हा देवांचा शत्रू होता.

देवांचा लाडका असलेला प्रकाशदेव बाल्डर हा ओडिन आणि फ्रिग यांचा मुलगा होता. मूळचा अग्निदेव असलेला लोकी व ओडिन यांनी मैत्री व बंधुत्वाची शपथ घेतली होती. लोकीने काही वेळा देवांना सहाय्य केले असले, तरी त्याची बरीचशी कृत्ये आसुरी स्वरूपाचीच होती. एकदा त्याने थॉरची बायको सिफ हिचे सुंदर केस कापले. संतापलेल्या थॉरने त्याला मुठीत पकडून त्याच्या हाडांचा चुराडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा बुटक्याकडून तिच्यासाठी सोनेरी केस आणण्याचे वचन देऊन त्याने आपली सुटका करून घेतली.

स्कँडिनेव्हियामध्ये एसीर या देवाखेरीज शांत व उपकारक असे व्हनीर हे देवही मानले जात. एसीर आणि व्हनीर या देवांचे युद्ध आणि भारतातील अश्विनीकुमारांचा देवतासमूहात समाविष्ट होण्याचा प्रयत्न यांविषयीच्या कथांचे मूळ इंडो-यूरोपियन पुराणकथांत असल्याचे अभ्यासक मानतात. एकदा एसीर देवांनी सोने मिळविण्यासाठी गलवेइग या व्हनीर देवीला छळले. तेव्हा भक्तांनी दिलेल्या आहुती प्राप्त करण्याचा समान दर्जा व्हनीरांनी एसीरांकडे मागितला . युद्धानंतर त्यांना तो दर्जा मिळाला. ब्राघी या काव्यदेवाच्या जिभेवरच अक्षरे कोरली होती, असे म्हणतात. स्कँडिनेव्हियन लोकांत पुरुष असलेला न्यॉर्ड हा देव जर्मन लोकांत नेर्थिस नावाची देवी मानला जात होता. कदाचित ही मूळची उभयलिंगी देवता असावी. मृतांच्या अधोलोकातील देवीला हेल म्हटले जाई. जलदेवतांना मानवी रूप घेता येई. अत्यंत सुंदर असलेल्या निक्सी या त्यांपैकीच होत. युद्धात कोणाला यश द्यायचे हे ठरविणाऱ्या, हंसी बनणाऱ्या आणि पाहुण्यांचे आतिथ्य करणाऱ्या ओडिनच्या सहचरी स्त्रिया म्हणजे व्हल्कीरीझ या होत. यांखेरीज नवजातांचे भविष्य ठरविणार्‍या नॉर्न नावाच्या अतिमानवी स्त्रियाही होत्या. फ्रिग या देवीच्या नावावरूनच शुक्रवार या अर्थांचा ‘फ्रायडे’ हा शब्द तयार झाला. ती विवाहांचे रक्षण करीत असे पण स्वतः मात्र एकनिष्ठ नसे.

विकारवशतेमुळे देवांचा नाश झाला. त्यांनी त्यांच्यासाठी महाल बनविणार्‍या जायंटला फसवले, गलवेइगला छळले आणि तेव्हापासूनच सर्व उदात्त तत्त्वांचा नाश होऊन दुर्गुणांचे थैमान माजले. जे देव विकारवश झाले नव्हते ते वाचले.  थॉरचे माग्नी व मोडी हे पुत्र, ओडिनचे व्हीडार आणि वह्‌ली हे दोन पुत्र व दोन पुतणे आणि होनीर हे देव वाचले. परंतु बहुतेक देव नष्ट झाल्यामुळे मानव संकटात सापडले. सुर्टर ह्या जायंटने पृथ्वीला आग लावली. तारे पृथ्वीसह कोसळू लागले. सर्व काही जळून गेल्यावर सर्वत्र पाणी येऊन पुन्हा नव्या जगाची सुरुवात झाली. बाल्डरचा पुन्हा जन्म झाला. नवे देव आले. सूर्यपुत्र नवा सूर्य बनला. धान्य आले आणि पवित्र वृक्षाच्या लाकडात लपल्यामुळे वाचलेल्या मानवांपासून नवा मानववंश सुरू झाला.

स्लाव्होनिक पुराणकथा : स्लाव्होनिक पुराणकथा बऱ्याचशा अस्पष्ट असून त्यांच्याविषयी जी काही थोडीबहुत माहिती मिळते ती आख्यायिका, म्हणी, लोकगीत इत्यादींमधून मिळते. या कथांचा विकास होत असताना प्रारंभीच्या काळातच त्यांच्यावर ख्रिस्ती  धर्माचा प्रभाव पडल्यामुळे त्यांचे पूर्णपणे स्वतंत्र असे अस्तित्व राहिले नाही. अर्थात या प्रभावानंतरही त्या पूर्णपणे नष्ट मात्र झाल्या नाहीत. महापूर, वादळे, भूकंप इ. भीषण घटनांची भीती वाटल्यामुळे त्यांची स्पष्टीकरणे देण्याच्या प्रयत्नातून या पुराणकथा निर्माण झाल्या. प्राचीन स्लाव्होनिक लोक देवाला ‘बोग’ हा शब्द वापरत असत. परस्परविरुद्ध स्वभावाचे दोन बोग त्यांनी मानलेले होते. प्रकाशाचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाचा बायलोबोग आणि अंधाराचे प्रतीक असलेला काळ्या रंगाचा चर्नोबोग हे ते दोन देव होते. स्वारोग (संस्कृत-स्वर्ग) हा त्यांचा आकाशदेव होता. हा सर्व देवांचा पिता मानला जाई. स्वारोगनंतर त्याचा मुलगा डाझबोग म्हणजेच सूर्य याने राज्य केले. स्वारोगीच किंवा ओगून (संस्कृत-अग्नि) म्हणजे अग्नी हा  स्वारोगाचा दुसरा पुत्र होता.

रशियन लोकांनी ‘पृथ्वीमाता’ या अर्थाचे पृथ्वीला दिलेले नाव म्हणजे मेटी-सीराझीम्ल्या हे होय. पीक चांगले येईल की नाही, हे भविष्य जाणण्यासाठी जमीन उकरून तेथे कान लावून पृथ्वीचा संदेश ऐकण्याची प्रथा होती. प्लेगसारखे संकट दूर करण्यासाठी रात्रीच्या वेळी स्त्रियांनी नांगर ओढून पृथ्वीतील सत्-शक्तींना आवाहन केल्याचे उदाहरणही आढळते.

सोनेरी आयाळ असलेले बारा शुभ्र घोडे सूर्याचा रथ ओढतात, असे पोलिश पुराणकथेत मानले आहे. स्वर्ग विजेच्या रूपाने दिव्य अग्नी निर्माण करतो, असे रशियात मानले जाई. पृथ्वीवरचा अग्नी स्वर्गातून आणलेला असल्यामुळे त्याला स्वर्गपुत्र म्हटले जाई. सूर्याच्या पुनर्जन्माविषयीही कथा होत्या. राक्षसांनी विझवलेल्या सूर्याच्या प्रकाशझोताला स्वारोग पुन्हा प्रज्वलित करतो. मीस्याट्‌स म्हणजे चंद्र हा सूर्याचा टक्कल पडलेला वृद्ध चुलता अशी कल्पना काही ठिकाणी होती. सर्व लोकांत सूर्य हा तरुण व सुंदर राजा असे मानले जाई. उषेची आरोरा आणि संध्येची आरोरा अशा दोन सुंदर कन्या त्याच्या शेजारी उभ्या असत. सात ग्रह हे न्यायाधीश व धूमकेतू हे दूत, अशा अर्थाच्या कथाही होत्या. झोऱ्या ही उषादेवी होती. सायंकाळची, मध्यरात्रीची व सकाळची अशा तीन झोऱ्याही मानल्या जात. त्या जगाच्या रक्षिका म्हटल्या जात. कूपल या देवाचा उत्सव आनंदाने साजरा केला जाई. त्याच्या उत्सवासाठी रोपे व फुले जमवली जात. नेचाचे रोप सर्वांत पवित्र मानले जाई. उत्सवाच्या रात्री त्याला एकच फूल येई. या फुलात राक्षसांना नियंत्रित करण्याचे आणि स्त्रिया व संपत्ती मिळवून देण्याचे अलौकिक सामर्थ्य होते. परंतु हे फूल मिळविणे अवघड असे. त्या रात्री झाडे एकमेकांशी गूढ भाषेत बोलत, एवढेच नव्हे तर हिंडू फिरूही शकत. डोक्यावर फुलांचा मुकुट असलेल्या यारिलो या प्रणयदेवाचा पेरणीच्या वेळी एक उत्सव होई. उन्हाळ्यात त्याच्या अंत्यक्रियेचा उत्सव होई आणि त्याच्या मृत्यूबद्दल स्त्रीपुरुष शोक व्यक्त करीत. चार दिशांना चार मस्तके असलेला स्वान्टोव्हिट हा देव योद्ध्याच्या रूपात आढळतो. सूर्य व अग्नी यांचा पिता असा तो सर्वश्रेष्ठ देव होता. त्याच्या उजव्या हातातील बैलाच्या शिंगात मद्य असे. त्यात किती  मद्य आहे, हे दरवर्षी हे पुरोहित पहात असे. जास्त मद्य असणे हे शुभ, तर कमी मद्य असणे हे दुष्काळाचे लक्षण मानले जाई. पीरून (संस्कृत-पर्जन्य) हा हिंदूंच्या इंद्राप्रमाणे वज्र धारण करणारा युद्धाचा देव होता. मानवी निवासस्थानांशी संबंधित अशा बऱ्याच देवता मानल्या होत्या. यांखेरीज धान्यकोठारांचे, पाळीव  पशूंचे इ . देव असत.

ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर मूळच्या स्लाव्होनिक कथा आणि ख्रिस्ती विचार या दोहोंचे मिश्रण झालेले आढळते. विशेषतः रशियातील बायलिनी या काव्याच्या पहिल्या मंडलात अनेक पुराणकथा आढळतात. बोगाटूर नावाच्या वीरांविषयी अनेक कथा आढळतात.

केल्टिक पशुदेवता सेर्नुनॉस : चांदीच्या पात्रातील एक कोरीव चित्र.

केल्टिक पुराणकथा : प्राचीनतम यूरोपियन साहित्य म्हणून ग्रीक आणि लॅटीन साहित्याखालोखाल केल्टिक पुराणकथांचा क्रम लागतो. केल्टिक लोकांचे पुरोहित ड्रुइड यांच्या विद्याप्रेमामुळे या पुराणकथा सुरक्षित राहिल्या. इ. स. आठव्या शतकानंतर झालेल्या अनेक ग्रंथांतून या कथा आढळतात. फ्रान्स, दक्षिण ब्रिटन, स्पेन आणि इतर काही प्रदेशांतून केल्टिक देवतांविषयीचे शिलालेख आढळतात. त्यांच्या अभ्यासावरून असे दिसते, की केल्ट लोक स्थानिक देवदेवतांची पूजा करीत असत. एपोना या देवतेला फार महत्त्व होते. मात्रेस या सुफलतेच्या तीन देवींची गॉल व ब्रिटनमध्ये पूजा चालत असे. या कथांच्या अभ्यासाला उपयुक्त अशी बरीच माहिती पुरातत्त्वविद्येतूनही मिळते. अल्स्टरमध्ये नव्या राजाचे घोडीबरोबर प्रतीकात्मक मीलन दाखविले असून त्यातून पृथ्वीची सुफलता सूचित केली आहे. ख्रिस्ती विचारांचा प्रभाव पडल्यामुळे मूळच्या केल्टिक पुराणकथांत बरेचशे बदल झाले असले, तरी या कथांतून इ.स. पूर्वीच्या केल्ट लोकांची संस्कृती कळण्यास मदत होते. नव्या प्रभावाने जुनी संस्कृती पूर्णपणे लुप्त होत नाही. म्हणूनच, रोमन साम्राज्याबरोबर आलेल्या रोमन देवतांचा स्वीकार केल्यावरही केल्टिक लोक स्थानिक देवतांची पूजा करीतच होते. या पुराणकथांतील देवता प्रामुख्याने अमीर-उमरावांच्या  होत्या. सामान्य लोक या देवतांवर विश्वास ठेवत होते की नाही, हे सांगता येत नाही. हे सामान्य लोक जादूगारांची मात्र पूजा करीत असत.

देव हे अतिमानवी सामार्थ्याने व आपल्याजवळ असलेल्या चार अद्‌भूत गोष्टींच्या प्रभावाने लोकांचे कल्याण करीत असत. लूगचा भाला, डेअग्धाची कढई, न्वादाची तलवार आणि राजाने पाय दिला की ओरडणारा फालचा दगड या त्या चार गोष्टी होत.

मॅनॅनॅन हा आयर्लंडमधील त्वाथा लोकांचा समुद्रदेव होता. आज मारून खाल्ल्यानंतर उद्या लोकांच्या  भोजनासाठी पुन्हा जिवंत होणारी डुकरे, सूर्यासारखे तेजस्वी शिरस्त्राण आणि इच्छा येईल तिकडे घेऊन जाणारे जहाज या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी होत्या. तो बहुधा सुफलतेचा देव असावा, असे मानले जाते. लूग हा देव कुशल कारागीर म्हणून प्रसिद्ध होता. त्याचा संप्रदाय स्पेन, स्वित्झर्लंड, गॉल आणि आयर्लंडमध्ये होता. त्याच्याजवळ भाला आणि गोफण होती. त्याने गोफणीतून दगड मारला आणि फमोरियन लोकांचा नेता बाह्‌लॉर याचा एकमेव प्रचंड डोळा फोडून त्याला ठार मारले. नंतर तो त्वाथांचा नेता बनला. बाह्‌लॉरच्या एका डोळ्याने सूचित होणाऱ्या सूर्याची उपासना मागे पडून लूगची उपासना सुरू झाली असावी, असे म्हणतात. डेअग्धा हा देव सर्वांचा पिता, सर्वशक्तिमान व सर्वज्ञ मानला जाई. पोषणकर्ता असल्यामुळे तो सुफलतेचा देव असावा, असे म्हणतात. कधीही रिकामी न होणारी आणि कोणालाही अतृप्त न ठेवणारी एक कढई त्याच्याजवळ होती. सारंगी वाजवून तो ऋतूंना बोलावू शकत असे. माणसांना मारून पुन्हा जिवंत करू शकत असल्यामुळे त्याला जीवन व मृत्यू यांचा स्वामी म्हटले जाई. त्वाथांचा राजा न्यादा हा लूग व डेअग्धा या देवांच्या गुणधर्मांनीच युक्त होता. त्याच्याजवळ एक अत्यंत प्रभावी तलवार होती. युद्धात त्याचा मूळचा हात तुटल्यावर त्याच्या वैद्याने त्याला चांदीचा हात बसवला होता. या देवांशिवाय लोहार व मद्यकर्ता गॉब्निड, वैद्य डीआनकेख्ट आणि क्रीडापटू ऑग्मा हे इतर प्रमुख देव होते.

आयर्लंडमधील देव म्हणजे दानू देवीची प्रजा, असे अनेकदा म्हटले जाते. डेअग्धा  हा मात्र काही वेळा तिचा पिता म्हटला जातो. यूचार्बा, ब्रायन व यूचान या त्रिमूर्तीची दानू ही आई होय. विद्या, संस्कृती व कसब यांची देवता ब्रिगिट ही कधी कधी दानूशी एकरूप मानली जाते. तीच स्थिती अनू वा अन या देवीचीही आहे. इतर दोघींपेक्षा ब्रिगिटची पूजा अधिक प्रचलित होती. ती ख्रिस्ती धर्मातही सेंट ब्रिगिड (ब्राईड) म्हणून आढळते. एकाच मातृदेवीची ही तीन वेगवेगळी रूपे असावीत, असे म्हणतात. नेमीड या वीराची पत्नी माछा ही देवी मानली होती. केल्ट लोक आयर्लंडमध्ये येण्यापूर्वी तेथे ज्या मातृदेवीची पूजा चालत होती, तिचेच अवशिष्ट रूप म्हणजे ही देवी असावी.

ब्रिटिश पुराणकथांमध्ये ह्‌लीरचा मुलगा मॅनाविधन हा सुफलतेचा व कारागिरीचा देव होता. त्याचा भाऊ ब्रॅन हा अत्यंत सामर्थ्यशाली होता. शेवटच्या युद्धात त्याच्या पायाला विषारी बाण लागला, तेव्हा आपले मस्तक कापून ते लंडनमध्ये न्या आणि आक्रमकांपासून राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवा, असे सांगून त्याने आत्मसमर्पण केले. डनच्या मुलांपैकी ग्विडिऑन हा सर्वांत महान होता. तो युद्ध व शांती या दोहोंत कुशल होता. त्याची पूजा वायव्य वेल्सपुरती मर्यादित होती. आह्‌रिॲनरोड ही देवी डनची कन्या होय. ती ह्‌लियूची माता होती. आयरिश लूगप्रमाणेच त्याच्याजवळ भाला व गोफण असे. डनच्या मुलांपैकी अनेकांची नावे ताऱ्यांना दिली गेली. म्हणून डनची मुले म्हणजे आकाशदेवता, असे म्हटले जाते.

प्रजाहितदक्ष असे केल्टिक वीरपुरुष हे मूळचे मानव असूनही अतिमानवी शक्तीने युक्त होते. कूकुलिन हा वीर सर्वांत जास्त प्रसिद्ध होता. एका कथेनुसार तो लूग या देवाचा पुत्र होता. तो केल्टिक लोकांच्या पराक्रमाचा आदर्श होता. त्याच्या कपाळावर चंद्र होता. त्याने अनेक उग्र कृत्ये केली. फिन हा अतिमानवी शक्तीने युक्त असलेला आणखी एक वीर होता. आर्थर नावाचा एक ऐतिहासिक राजा होऊन गेला. त्याच्या संबंधातही पुराणकथा तयार झाल्या आहेत.

आयर्लंडमध्ये आलेल्या टोळ्यांविषयी पुराणकथांच्या स्वरूपाचे विपुल साहित्य आढळते. केल्ट लोकांचा परलोक हा अत्यंत सुखयुक्त होता. तेथील युद्धात कोणाला जखम झालीच तर ती दुसऱ्या दिवशी बरी होई आणि कोणाचा मृत्यू झालाच तर तो दुसऱ्या दिवशी जिवंत होई. सिद या स्वर्गाच्या राज्यकर्त्यांना युद्धात मदत करण्यासाठी केल्टिक वीरपुरुषांना बोलावले जाई आणि त्याबद्दल त्यांना देवांगनांचे प्रेम मिळे. केल्टिक लोकांनी दुःख व भय यांनी युक्त असा एक परलोकही मानला होता. ब्रिटिश कथांत ह्‌लीरची मुले म्हणजे अधोलोकातील देवता असे मानले होते. प्विल या अधोलोकाच्या स्वामीने रीॲननशी विवाह केला. त्यांचा पुत्र प्रिडेरी हा नंतर अधोलोकाचा स्वामी बनला.

फिनिशियन पुराणकथा : बिब्लॉस आणि रास शॅम्रॅ येथील उत्खननांमुळे या कथांची माहिती मिळाली आहे. ईजिप्तचे लोक व्यापारानिमित्त बिब्लॉसला येत व त्यामुळे पुराणकथांचीही देवघेव होत असे. इ.स. च्या पहिल्या शतकात फिलोने ग्रीक पुराणकथा या फिनिशियन पुराणकथांवर आधारलेल्या आहेत, असे दर्शविण्याचा प्रयत्न केला होता.

विश्वाच्या उत्पत्तीचे वर्णन करणार्‍या अनेक फिनिशियन कथा असून त्यांतून कधी काळ, तर कधी ईथर व वायू ही आद्य तत्त्वे मानलेली आहेत. आफ्रिकेच्या किनाऱ्यावर आणि इतर काही ठिकाणी फिनिशियन लोकांनी जेथे वसाहती केल्या तेथे त्यांचे देवही जाऊन पोहोचले. कार्थेज येथे मुख्य वसाहत होती आणि तेथे बाल-हम्मान हा आकाशाचा व सुफलतेचा देव होता. एश्मुन, आडोनिस, बीस इ. देव तसेच टॅनिट ही एक श्रेष्ठ देवी होती. इ.स.पूर्वीच्या फिनिशियात प्रत्येक गावात बाल या देवाची पूजा होई. त्या देवाचे खरे नाव शत्रूला माहीत होऊ नये म्हणून गुप्त ठेवलेले होते. एका स्त्रीचे वृक्षात रूपांतर झाल्यावर त्या वृक्षापासून जन्मलेल्या आडोनिस या कृषिदेवाची सर्व फिनिशियामध्ये पूजा चालत असे. त्याच्या स्मरणार्थ मोठा उत्सवही होत असे.

नाईल नदीच्या काठावरील हाथर या देवीशी समान असलेली एक देवी ही बिब्लॉसची प्रमुख देवता होती. ईजिप्तच्या रा या सूर्यदेवाशी एकरूप बनलेला त्यांचा एक महान देवही होता. त्याचा मुलगाही बिब्लॉसचा देव मानला जाई. फिनिशियन लोकांचा हाय-टाऊ हा अरण्यातील वनस्पतींचा देव होता. ईजिप्ती लोकांनी त्याचे आपल्या ओसायरिसबरोबर ऐक्य मानले.

वृषभ एल हा नद्यांना प्रवाहित करून जमीन सुपीक करणारा असा देव होता. त्याच्या खालोखाल महत्त्वाचा देव म्हणजे पाल होय. तो एलचा शत्रू होता. उत्तरेचा स्वामी, लेबाननचा स्वामी इ. प्रकारे त्याची फक्त विशेषणेच वापरली जात. त्याचे खरे नाव फक्त दीक्षित लोकांनाच माहीत असे. तो वादळ, वातावरण व ढग यांचा देव होता. एलचा मुलगा मॉट आणि बालचा मुलगा अलेयिन हे दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. बालची आई ही देवांची माता मानली जाई. वालची मुलगी अनट ही दवबिंदूंचा बर्षाव करून वनस्पती वाढवी. तिने मॉटला बळी दिले. मॉट आणि अलेयिन यांचे दरवर्षी युद्ध होते, असे मानले जाई. एलने निर्माण केलेल्या प्राण्यांकडून बाल मारला गेला. नंतर अलेयिनही मरण पावला. उषा (सहर) आणि संध्या (सालेम) या देवतांच्या कथाही आढळतात.

फिन्नो-उग्रिक पुराणकथा : फिनलंडमधील परंपरागत गीते एकत्र करून ⇨कालेवाला नावाचे एक महाकाव्य तयार करण्यात आले आहे. यातील गीते प्राचीन असली, तरी संकलन बऱ्याच उशिरा करण्यात आले असल्यामुळे त्यावर उत्तरकाळातील गोष्टींचा प्रभाव पडलेला आहेत. शिवाय त्यातील बऱ्याचशा कथा लोककथांच्या सदरात मोडणाऱ्या आहेत. खऱ्या अर्थाने पुराणकथा कमीच आहेत

या लोकांच्या जीवनात ⇨ शामानला व ⇨ जादूटोण्याला अत्यंत महत्त्व होते. धान्य, शेत, वृक्ष इ. सर्व वस्तूंना शरीरापासून अविभाज्य असा आत्मा असतो,  असे हे लोक मानतात. व्होगल लोकांच्या मते आत्मा हा हृदय व फुप्फुसे यांत राहतो. म्हणून ते शत्रूंची हृदये व फुप्फुसे खात असत. या लोकांच्या विविध देवतांना स्वतंत्र व स्पष्ट अशी व्यक्तिमत्वे क्वचितच आढळतात. व्होत्याक लोक देवांच्या नावापुढे ‘मर्त’ (मानव) आणि देवींच्या नावापुढे ‘ममी’ (माता) हे शब्द लावतात.

मृत लेम्मिनकॅईननला मंत्रसामर्थ्याने जिवंत करणारी त्याची आई : फिनिश लोकमहाकाव्य कालेवाला मधील एक चित्रांकित प्रसंग.

साप, अग्नी आणि लोखंड यांच्या उत्पत्तिकथा कालेवालामध्ये आढळतात. उक्को याने आपली तलवार नखावर घासल्यावर जी ठिणगी पडली, तिच्यापासून अग्नी झाला. यूमह्‌लाह हा निर्माता व सर्वश्रेष्ठ देव होता. नंतरच्या काळात उक्कोने त्याची जागा घेतली. जगाचा आधार असलेला उक्को हा देव आकाश, हवा व पर्जन्य यांचा देव होता. अक्क ही त्याची पत्नी होती. पैव व कू हे अनुक्रमे सूर्य व चंद्र यांचे देव होते. वातावरणाच्या कुमारिकेचा मुलगा म्हणजे वैनामोइनेन हा कालेवालाचा मुख्य नायक होता. तो तीस उन्हाळे व तीस हिवाळे आईच्या गर्भात राहिला होता. त्याच्या पराक्रमाची वर्णने या काव्यात आली आहेत. लेम्मिनकॅईनन हा वीर जेव्हा मारला गेला, तेव्हा त्याच्या आईने त्याला जादूने जिवंत केले.

पृथ्वी व अरण्यदेवी या मातृस्वरूपात मानलेल्या होत्या. वृक्षदेवही मानलेले होते. लेम्पो, पह आणि हिसी वा दुष्टशक्ती मानल्या होत्या. अहतो हा मुख्य जलदेव होता. नरकाची कल्पना नव्हती परंतु मृत लोक अधोलोकात जातात असे मानले जाई. त्या लोकाला तुओनेला असे म्हटले जाई. तुओनी आणि त्याची बायको तुओनितर यांचे राज्य तेथे चालते, त्यांची अपत्ये रोग वगैरे निर्माण करतात, असे मानले जाई.

बॅबिलोनियन पुराणकथा : विश्वनिर्मिती, देवदैत्यांचे युद्ध, प्रलय, वीरपुरुष व सम्राट यांची जीवने इ. विषयांवरील कथा बॅबिलोनियन परंपरेत महत्त्वाच्या आहेत. तैमात व तिचे वंशज असलेले देव यांमध्ये झालेले युद्ध प्रसिद्ध आहे. तैमातच्या हत्येनंतर स्वर्ग, पृथ्वी, नक्षत्रे, मानव इत्यादींची निर्मिती झाली. ⇨ मार्डुक, एन्लिल, अन्, ईआ, समुद्र इत्यादींपैकी कोणाला तरी विश्वनिर्माता मानणाऱ्या भिन्नभिन्न कथा आढळतात. मानवांची मर्त्यता व देवांचे अमरत्व दर्शविणारी ईआचा पुत्र ॲडापा याची कथा प्रसिद्ध आहे. झू या देवतेने सर्वसत्ताधीश बनविणाऱ्या दैवाच्या गोळ्या एकदा एन्लिलपासून चोरल्याची व त्या एन्लिलने परत आणल्याची कथा प्रसिद्ध आहे. नर्गल या देवाने पाताळात प्रवेश करून तेथील एरिश-कगह्‌ल या देवीला धमकावले परंतु नंतर तो तिचा पती व तेथील राज्याचा स्वामी बनला, अशी एक कथा आहे. गिलगामेश हे महाकाव्य अत्यंत विस्तृत आणि पुराणकथांनी समृद्ध आहे. ऊरूक शहराचा राजा गिलागामेश आणि त्याचा साथीदार ईआबनी यांचा ðइश्तारबरोबर संघर्ष झाल्याची कथा प्रसिद्ध आहे. गिलगामेश अनेक अडथळे ओलांडत आपल्या देव बनलेल्या  पूर्वजांकडे जाऊन आल्याची कथाही प्रसिद्ध आहे. दहा प्राचीन राजांच्या इतर कथाही महत्त्वाच्या आहेत. माणसांच्या पापांमुळे एन्लिल या देवाने मानवांवर साथीचे रोग, दुष्काळ इत्यादींसारखी संकटे पाठवली परंतु प्रत्येक वेळी ॲट्राखसिस या राजाने संकटाची आज्ञा स्थगित करण्यात यश मिळविले. शेवटी एन्लिल व इतर देवांनी जलप्रलय घडविण्याचे ठरविले. तेव्हा ईआ या देवाने त्या राजाला, नाव बनवून तिच्यात सर्व प्राण्यांचे प्रतिनिधी घ्यावयास सांगितले. त्यामुळे तो राजा प्रलयातून वाचला. प्रलयानंतर यज्ञ करून त्याने देवांना संतुष्ट केले आणि देवत्व प्राप्त करून घेतले.

इश्तार देवतेचे सुमेरकालीन एक पक्कमृदाशिल्प

हिटाइट पुराणकथा : विसाव्या शतकाच्या प्रारंभी उत्खननांतून आशिया मायनरमध्ये इ.स.पू.सु. ३००० वर्षांपासून राहत असलेल्या हिटाइट लोकांच्या पुराणकथांची माहिती मिळाली आहे. या कथांवर एकीकडून बॅबिलोनियन कथांचा प्रभाव दिसतो, तर दुसरीकडून या कथांचा ग्रीक व पाश्चात्त्य कथांवर प्रभाव दिसतो. पुरोहित लोक या कथांचा कर्मकांडात उपयोग करीत असत. या कथांमध्ये तेलिपिनू नावाचा देव रागावून लपल्याची कथा प्रसिद्ध आहे. ‘पुरुल्ली’ नावाच्या वार्षिक उत्सवात म्हटली जाणारी ड्रॅगनच्या हत्येची एक कथा आहे. हवामानाचा देव हा या कथेचा नायक आहे. इल्यूयांकस या ड्रॅगनने प्रथम त्याचा पराभव केला होता. मग एका देवीने ड्रॅगनला मेजवानीला बोलावले. त्यावेळी तिने हुपासियास या मानवाची मदत मागितली व त्या मोबदल्यात तिच्याबरोबर समागमाची त्याची मागणी तिने मान्य केली. ड्रॅगन मुलांसह तेथे येऊन खूप प्याल्यावर हुपासियासने त्याला बांधले व नायकाने त्याला मारले. हुरियन परंपरेतून आलेली कुमार्बी याची कथाही महत्त्वाची आहे. कुमार्बीने वडिलांचे (अनू) जननेंद्रिय तोडले, तेव्हा मी याआधीच वेदरगॉड, आरांझाक (टाइग्रिस) ही नदी आणि टॅस्मिसू असे तीन देव जन्मण्याची व्यवस्था केली आहे, असे अनू कुमार्बीस म्हणाला. कुमार्बी थुंकला आणि त्याच्या थुंकीपासून पृथ्वीने तीन देवांना जन्म दिला. पुढे कुमार्बीने तेशुबचा पराभव करण्यासाठी समुद्रकन्या वा पर्वताचे शिखर याच्याशी संबंध करून जो पुत्र मिळवला तो उल्लीकुम्मी होय. ज्या उबेल्यूरिसच्या खांद्यावर जग आहे, त्याच्याच उजव्या खांद्यावर तो समुद्रात वाढला व स्वर्गाला टेकण्याइतका प्रचंड झाला. सूर्याने हे तेशुबला सांगितले. शेवटी, ज्या हत्याराने (करवत वा सुरी) स्वर्ग व पृथ्वी यांना अलग करण्यात आले होते, त्या हत्याराने उल्लीकुम्मीचे पाय कापून त्याला ठार करण्यात आले.

अनाहिता देवतेचे चांदीच्या बशीवरील एक सपरिवार कोरीव चित्र, ससानियन कालखंड.

आफ्रिकन पुराणकथा : आफ्रिकन लोक निसर्ग व क्षुद्र वस्तू यांना देवता मानून त्यांची पूजा करतात. प्रत्येक चराचर वस्तूत एक चित्-शक्ती असते, मृत्यूनंतर आत्मा वनस्पतीत वा प्राण्यात जातो, सगळे जग जादूगारांच्या आशेत असते इ. प्रकारच्या त्यांच्या श्रद्धा असून त्यांतूनच त्यांच्या पुराणकथा निर्माण झाल्या आहेत. सृष्टिनिर्माता असा एक सर्वोच्च देव बहुतेक सर्व पुराणकथांतून आढळतो. आफ्रिकेत भिन्नभिन्न अशा असंख्य जमाती असून त्याच्या पुराणकथांतून विविधता आढळते.

आग्नेय आफ्रिकेच्या उत्तर भागात मसाई लोक राहतात. त्यांच्या मते नॅजी हा विश्वनिर्माता सर्वश्रेष्ठ देव होय. त्यांच्या कथेनुसार प्रारंभी पृथ्वीवर किंटू नावाचा एकच पुरुष होता. स्वर्गाची कन्या त्याच्या प्रेमात पडली. मग त्याला बोलावून घेण्यात आले आणि त्यांचा विवाह झाला. तो परत निघाला, तेव्हा त्याला परत येऊ नकोस, म्हणून सांगितले होते परंतु धान्य विसरले म्हणून तो परत आला. त्यामुळे त्याची सर्व मुले मारली गेली व मृत्यूस प्रारंभ झाला. काँगोतील उटोपोस हे लोक म्हणतात, की लिबांझाने म्हणजेच देवाने चंद्राला व पृथ्वीवरील लोकांना बोलावले असताना चंद्र वेळेवर गेला म्हणून अमर झाला आणि मानव उशिरा गेले म्हणून मर्त्य बनले. गॅल्लास लोकांच्या मते देवाने एका पक्ष्याजवळ मानवांना अमरत्वाचा संदेश दिला होता. स्वतःची त्वचा काढली, की तुम्ही तरुण व्हाल असे त्यांना सांगितले होते. वाटेत एक साप मांस खात होता. पक्ष्याने त्याच्याकडून मांस घेतले आणि सापाला अमरत्वाचा संदेश दिला. देवाने पक्ष्याला शिक्षा दिली म्हणून तो अजूनही झाडावर बसून शोक करीत असतो. इतर जमातींतही अमरत्वाबाबत व मर्त्यत्वाबाबत विविध कथा आहेत.

माकोउआस आणि बानाइस हे लोक मुलुकू या देवाला सर्वश्रेष्ठ स्थान देतात. एका मुलुकूने जमिनीत दोन छिद्रे पाडली. एकातून पुरुष व दुसऱ्यातून स्त्री आली परंतु त्या दोघांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. माकडाच्या एका जोडप्याने मात्र देवाच्या आज्ञा पाळल्या. म्हणून देवाने माकडाच्या शेपट्या तोडून त्या माणसांना लावल्या व तेव्हापासून माकडांचे मानव आणि मानवांची माकडे बनली. मोझांबिकमधील निग्रो लोक टिलो हा आकाशदेव मानतात. पाऊस व मेघनाद यांच्याही देवता त्यांनी मानल्या आहेत. ते सूर्य व चंद्र यांचीही पूजा करतात. त्यांच्या एका कथेनुसार प्रारंभी निस्तेज चंद्र या महिलेने सूर्याचे लक्ष नाही हे पाहून त्याचे तेजःस्वरूप असे काही पंख चोरले. सूर्याच्या हे ध्यानात येताच त्याने तिच्या अंगावर चिखल उडवला. तेच तिच्या अंगावरचे डाग होत. तीही संधी साधून चिखल उडवते, तेव्हा सूर्यग्रहण होते.

बोमीताबा या लोकांच्या कथेनुसार प्रारंभी जगात दोन सूर्य असल्यामुळे लोकांना खूप त्रास होत असे. एका सूर्याने आपण स्नान करू या, असे दुसऱ्या सूर्याला म्हटले. त्याने स्वतः नदीत उडी मारण्याचे नुसते नाटक केले परंतु प्रत्यक्षात मात्र उडी मारली नाही. दुसऱ्या सूर्याने मात्र खरोखरच उडी मारली म्हणून त्याचे तेज कमी होऊन तो चंद्र बनला.

शिल्लुक लोकांच्या मते जुओक या देवाने काळ्या मातीतून निग्रो, पांढऱ्या मातीतून गोरे लोक आणि नाईलच्या मातीतून तांबडे लोक तयार केले. काँगोतील एका कथेनुसार गोरे व काळे लोक आणि गोरिला ही परमेश्वराचीच अपत्ये होत. परंतु गोरिला आणि निग्रो यांनी देवाची आज्ञा मोडल्यामुळे देवाने त्यांना सोडून दिले आणि तो आपली गोरी मुले व संपत्ती घेऊन मध्य आफ्रिकेतून निघून गेला.

हॉटेंटॉट लोकांमध्ये हेईत्सी-एईबीब हा अतिमानवी पुरुष असून त्याचा जन्म गायीपासून वा विशिष्ट वनस्पती खाल्लेल्या कुमारिकेपासून झाला, असे मानले जाते. त्याच्या शापामुळे वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळे गुणधर्म प्राप्त झाले. बुशमन लोक कॅन या देवाला विश्वनिर्माता मानतात. त्याची शक्ती त्याच्या एका दातात असते आणि तो आपल्या पादत्राणांना कुत्रे बनवून त्यांना शत्रूवर पाठवतो, असे मानले जाई. कोटी ही त्याची पत्नी होती. निर्मितीविषयीच्या काही पुराणकथा सर्वाना ठाऊक नसत, त्या फक्त दीक्षा घेतलेल्या लोकानांच ठाऊक असत. या लोकांच्या कथा त्यांच्या नृत्यांशी निगडित आहेत. कित्येकदा पिशाचांना दूर पळविण्यासाठी नृत्ये केली जात. नद्या, पर्वत, गुहा, पशू, वृक्ष, मृतात्मे इत्यादींचीही पूजा आफ्रिकेत चाले. सर्व आफ्रिकेत मृतात्म्यांविषयी विविध कल्पना होत्या. मादागास्करमध्ये मृतांचे आत्मे हे देवता व मानव यांतील मध्यस्थ मानले जात.

अमेरिकन इंडियन जमातींच्या पुराणकथा : भिन्नभिन्न जमातींच्या पुराणकथा भिन्नभिन्न असल्या, तरी प्रलय, अग्नीची चोरी इ. कथांच्या बाबतीत त्यांत साम्य आढळते. हे लोक देव मानण्याच्याही आधीपासून देवक मानत आले आहेत. स्वर्गात देवता, पृथ्वीवर मानव व अधोलोकात पितर राहतात, अशी त्यांची समजूत आहे. मेक्सिकन लोक चार सूर्यांच्या आधिपत्याखालील एक एक सृष्टी ही प्रलय, अग्नी, भूकंप इत्यादींनी नष्ट झाली असून आता पाचवा सूर्य प्रकाशत आहे, असे मानतात. प्रलयाच्या वेळी कॉक्स्कोट्‌ली हा पुरुष आणि त्याची बायको नावेतून पर्वतावर गेल्यामुळे वाचले आणि त्यांच्यापासून पुन्हा सृष्टी निर्माण झाली. त्यांची सर्व मुले प्रारंभी मुकी होती. नंतर झाडावर बसलेल्या एका कबूतराने त्यांना भाषांची देणगी दिली, असे म्हटले जाते. एका कथेनुसार देवांना प्रसन्न करू इच्छिणाऱ्या एका माणसाने वैराग्य पतकरले होते. त्याची परीक्षा घेण्यासाठी देवांनी याओट्ल नावाच्या एका राक्षसाला त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पाठविले, राक्षसाने त्याच्याकडे सुंदरींना पाठविले. परंतु तो अधःपतित झाला नाही. त्याच्या सद्‌गुणांनी प्रसन्न झालेली त्लाझोल्तेओत्ल ही प्रणयदेवी त्याला भेटावयास आली, तेव्हा त्याने तिला खडकावर चढण्यास मदत केली. त्यामुळे राक्षसाने त्याचा व त्याच्या पत्नीचा शिरच्छेद केला. नंतर त्या दोघांचे विंचवात रूपांतर झाले. राक्षसाने मर्यादा उल्लघिंली म्हणून देवांनी त्यालाही टोळ बनविले.

युद्ध व वादळ यांचा देव असलेला वीत्झी-लॉपॉचत्‌ली हा को-अत्लीक या स्त्रीचा पुत्र होय. ती प्रार्थना करीत असताना तिच्या छातीवर स्वर्गातून पिसांचा मुकुट पडला आणि ती गरोदर झाली. तेव्हा तिच्या एका मुलीने तिला भ्रष्ट मानून आपल्या भावांना तिची हत्या करावयास सांगितले परंतु तिच्या उदरातील वीत्झी-लॉपॉचत्‌लीने त्या मुलीशी संभाषण करून तिला शांत केले.

तेझ्कत्लीपोका आणि काते-झाल-को-आत्ल या दोघांच्या वैराची पुराणकथा प्रसिद्ध असून तिच्यातून वांशिक संघर्ष सूचित होतो, असे मानले जाते. काते-झाल-को-अत्ल हा सर्पपक्षी असून तो विश्वनिर्माता, संस्कृतिकर्ता, वायुदेव, कलांचा आश्रयदाता इ. स्वरूपात मानला जातो. तेझ्कल्लीपोका या सूर्यदेवासाठी उत्सवपूर्वक नरमेध केले जात असत. पर्वत, पर्जन्य, जल, कृषी, अग्नी, व्यापार, नशीब, प्रसूती इत्यादींचेही देव असत. ॲझटेक लोकांनी ९ स्वर्ग मानले असून ते सूर्य, चंद्र इ. देवांनी व्यापलेले असतात. मृतात्मे व अधोलोकातील ९ नद्या यांचे नियंत्रण करणाऱ्या देवदांपत्याची कल्पना करण्यात आली होती. भविष्य सांगणारा माइरा-आता हा एक प्रसिद्ध वीर होता. त्याच्या पत्नीला इंडियन लोकांनी मारले म्हणून त्याच्या ॲरिकोंते आणि तामेंदोनारे या मुलांनी सूड घेण्यासाठी महापूर घडवनू आणला. महापुरातून दोन जुळे भाऊ व त्यांच्या बायका वाचल्या आणि त्यांच्यापासून दोन वंश निर्माण झाले. नन्देरेवुसू व त्याची बायको नंदेसी यांचा मुलगा तुपन निर्माण झाले. नन्देरेवुसू व त्याची बायको  नंदेसी यांचा मुलगा तुपन हा मेघनाद व वीज यांचा असुर होय.

यूकातानमधील माया लोकांच्या कथांमध्ये हुनाब कू हा सर्वश्रष्ठ देव मानला जातो. इक्साझालूओ (जल) ही त्याची पत्नी मानली जाते. सूर्यपूत्र इतझमन हा संस्कृतिनिर्माता वीर होता.

कॅलिफोर्नियातील पेरिकू इंडियन लोक निपरप हा स्वर्गातील देव सर्वश्रेष्ठ होय, असे मानतात. तारे म्हणजे धातूचे जळते तुकडे, अशी त्यांची समजूत आहे. मैदानी प्रदेशातील इंडियन लोक आकाशपिता, जीवनस्वामी, महान गूढ इ. अर्थांच्या नावांनी प्रसिद्ध असलेला एकच सर्वश्रेष्ठ देव मानतात. स्वर्ग व पृथ्वी यांच्या विवाहाचे उत्सवही इतर जमातींत केले जातात. प्रभातकालीन तारा ही सूर्याखालोखाल महत्त्वाची देवता होय. दक्षिणेकडचा तारा हा मृत्यूचा निदर्शक मानला जातो.

एस्किमो लोकांच्या मते हवा, समुद्र, दगड, प्राणी इ. प्रत्येक निसर्गपदार्थाची एक इन्युआ असते. समुद्र व समुद्रातील प्राण्यांची देवता सेदना ही एक अत्यंत महत्त्वाची देवी होय. ती मानवांशी शत्रुत्व करीत असल्यामुळे लोकांना तिची भीती वाटत असे.ॲग्लुलिक हा शिकार्यांतना मदत करणारा, ऐपालुकव्हिक हा समुद्रात नावाड्यांना मारू पाहणारा आणि इतरही सरोवर, पृथ्वी इत्यादींचे अनेक देव एस्किमो लोकांनी मानलेले आहेत.

एक्कादोरमधील कॅरान्के हे लोक वाघ, सिंह, समुद्र, मासे, इत्यादींची पूजा करीत. एक सूर्यदेव आणि उमीन नावाचा एक औषधांचा देव यांची ते पूजा करीत. कॅनरियन जमातीत महापुराच्या वेळी पर्वतवर गेल्यामुळे वाचलेल्या दोन भावांची कथा आह. ते बाहेर गेले, की स्त्रियांचे चेहरे असलेले दोन पोपट घरी येऊन स्वयंपाक करीत असत. त्या भावांनी धाकट्या पोपटाला पकडून त्याच्याशी विवाह केला आणि त्यांना झालेल्या मुलांपासून कॅनरियन वंश सुरू झाला. मध्य कोलंबियातील लोक बोचिका या संस्कृतीनिर्मात्याला सूर्यदेव म्हणून मानतात. त्याने चब्चाकुम या राक्षसाला पराभूत करून त्याच्या खांद्यावर पृथ्वी ठेवली आणि तो जेव्हा खांदा बदलतो, तेव्हा भूकंप होतो, असे मानले जाते.

इरोक्काईस लोक निसर्गातील प्रत्येक वस्तूमध्ये ओरेंडा नावाची गूढ शक्ती असते, असे मानतात. मेघनाद, वायू व प्रतिध्वनी हे त्यांचे महत्त्वाचे देव होत. ते पूर्वजांनाही पूज्य मानत. अल्‌गाँक्कियन लोकांनी प्रत्येक पदार्थात मोनितोऊ नावाची गूढ शक्ती असते, असे मानलेले आहे. स्वतः जन्मरहित असून विश्वनिर्मिती करणारा कित्‌की हा सर्वात श्रेष्ठ मोनितोऊ होय. प्रलयानंतर मिकबोने पुन्हा सृष्टी निर्माण केली. एक मेघनादपक्षी असून त्याच्या डोळ्यांची चमक म्हणजे वीज आणी त्याच्या पंखाची फडफड म्हणजे मेघगर्जना होय. पक्षी हे मानव व देवता यांच्यातील दूत असून साप व जलचर हे अधोलोकातील शक्तींशी संबंध ठेवतात.

चिलीचे आराउकानियन लोक जी महापुराची कथा सांगतात, तीनुसार महापुराच्या वेळी पर्वतावर गेलेले लोक तेवढे वाचले. आउचीमाल्गेन म्हणजे चंद्र ही सूर्यपत्नी असून या लोकांची हीच एकमेव शुभ्रदेवता होय. या लोकांत सूर्यपूजा आढळत नाही. हे लोक देवक, पितर इत्यादींची पूजा करीत. त्यांचे बहुतेक मुख्य देव या दूष्ट शक्ती आहेत. त्यानी वायू, जलाशय इ. देव मानले होते परंतु नरक मात्र मानलेला नव्हता.

इंका हे लोक इंतीचे म्हणचे सूर्याचे पूजक होत. ममा क्किला म्हणजे चंद्र ही विवाहित स्त्रियांची देवता होती. पेरुमध्ये आधीपासून राहणार्या  लोकांचे देवही त्यानी स्वीकारले. पृथ्वीच्या वर ४ स्वर्ग असतात आणि सर्वश्रेष्ठ देव सर्वोच्च स्वर्गात राहतो इंतीने पश्चिमेच्या समुद्रात उडी घेतली आणि तो पृथ्वीखालून पोहत पूर्वेला आला तो रागावला की ग्रहणे होतात इ. समजुती आहेत.

ओशिॲनिक पुराणकथा  : या विभागात पॉलिनीशिया, मेलानीशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड, फिजी, न्यू गिनी, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांतील पुराणकथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. बहुतेक ठिकाणी सर्वव्यापक अशा भागाची नियंत्रक मानली जात असे. युध्द, विवाह, सुफलता, गुन्हेगारी इत्यादींचे स्वतंत्र देव मानून त्यांमध्ये श्रमविभागणी केली होती. मानव,पशू पक्षी, दगड, खडक, ठिणग्या धुमकेतू इ. विविध रुपांतून देवतांचे अस्तित्व मानले जाई. २४ पोटे, आठ डोळे, आठ हात इत्यादींनी युक्त असलेल्या विचित्र शरीरांचीही कल्पना केली जाई. काही देव अज व नित्य असे होते, तर काही कल्पना केली जाई. काही देव अज व नित्य असे होते. तर काही मृतात्म्यांचे दैवतीकरण करण्यात आले होत. विश्वनिर्मिती सूर्यचंद्र, परलोक इत्यादींविषयीच्या कथा अधिक प्रमाणात आढळतात.

पृथ्वी, आकाश, समुद्र इत्यादींचे अस्तित्व गृहीत धरून पुढची निर्मिती सांगणार्या  अनेक कथा आहेत. पृथ्वी वगैरेंची निर्मिती सांगणार्याव कथाही आहेतच, अंड्यातून निर्मिती झाल्याच्या कथा बोर्निओ, सोसायटी, इ. ठिकाणी आहेत. शून्यातून व धुक्यातून निर्मिती झाल्याच्या कथा अनुक्रमे पॉलिनीशिया व नीआस बेटात आहेत. आकाशातून फेकलेल्या वा समुद्रातून माशांप्रमाणे पकडून आणलेल्या पदार्थांपासून पृथ्वी व बेटे बनली असे अनेक कथांतून आढळते, पृथ्वीवरच्या वनस्पती म्हणजे आकाश या तिच्या नवर्यामने वा टाहूने या तिच्या पुत्राने तिच्या अंगावर घातलेले दागिने होत, असे न्यूझीलंडमध्ये मानतात. प्रारंभी स्वर्ग व पृथ्वी हे दांपत्य एकमेकांच्या जवळ होते, परंतु माउइ या वीराने वा अन्य कोणी तरी त्यांना एकमेकांपासून समुद्र बनल्याची कथा आहे. आतेआ या देवाची मुलगी आतानुआ हीच्या बनल्याची कथा आहे. आतेआ या देवाची मुलगी शाईपासून समुद्र बनल्याची कथा आहे. आतेआ या देवाची मुलगी आतानुआ हीच्या गर्भपाताच्या वेळी प्रवाहित झालेल्या द्रवापासून समुद्र बनला, अशी कथा मार्केझास बेटात आहे. स्वर्गीय देवीला नाकातून वा बाहूतून मूल झाले, इ. प्रकारच्या कथा आढळतात. महापुराच्या वळी पर्वताचा आश्रय घेतलेल्या मानवांच्या पायाला पाणी लागल्यावर त्याचे काळ्या हंसात रूपांतर झाले, अशी कथा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरीया प्रदेशात आढळते. स्वर्गातून पडलेल्या झाडाच्या पानांपासून प्राणी बनले, असे बोर्निओमध्ये मानले जाते. काळ्या व उजळ अशा दोन नारळांपासून एक काळी व एक गोरी स्त्री निर्माण झाली अशी एक कथा आढळते.अग्निप्राप्तीच्या विविध कथाही आहेत. स्वर्गाने पृथ्वीसाठी ढाळलेले अश्रू म्हणजे दवबिंदू व पृथ्वीने स्वर्गासाठी टाकलेले उसासे म्हणजे धुके, असे न्यूझीलंडमध्ये मानतात. ईम्यू पक्ष्याच्या आकाशात फेकलेल्या अंड्यापासून सूर्य बनला, असे ऑस्ट्रेलियात मानतात. आद्य प्राण्याच्या डोळ्यांपासून सूर्य-चंद्र बनले, अशा आशयाच्याही अनेक कथा आहेत.देवाने स्वर्ग व पृथ्वी यांना अलग केल्यावर स्वर्ग हा पिता नग्न असल्याचे पाहून त्याने ताऱ्याच्या रूपाने त्याला वस्त्र दिलेमृत व्यक्ती तारे बनतात इ. आशयाच्या कथा आढळतात.

मानव हा प्रारंभी मर्त्य नव्हता. कलांनी वाढणारा चंद्र, कात टाकणारा साप वा तोडल्यावरही फुटून येणारा वृक्ष यांच्याप्रमाणे तो होता,असे मानले होते. मानवाला सापाप्रमाणे त्वचा बदलता येई. विशिष्ट कारणाने तो मर्त्य झाला. मृत्यूनंतर अनेक अडचणींना तोंड देत आत्मा परलोकात जातो आणि त्याच्या शक्तिप्रमाणे वा ज्येष्ठतेप्रमाणे त्याला तेथे दर्जा मिळतो .पॉलिनीशियातील माउई या मृतवीराचे दैवतीकरण करण्यात आले होते. त्याने पृथ्वीवर अग्नी आणला, समुद्रातून बेटे वर काढली, सूर्याची गती कमी केली आणि मानवांना अमर बनविण्याच्या प्रयत्नात तो मरण पावला इ. कथाही आढळतात. (चित्रपत्रे २५,५१,५२).

संदर्भ  : 1. Aldington, Richard; Ames, Delano, Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, London, 1975.

2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth, Mashville, Tenn., London, 1968.

3. Campbell, Joseph, The Masks of God, 4 Vols.,  London, 1959–68.

4. Dandekar, R. N. Vedic Religion and Mythology, Poona, 1965.

5 Dent, J. M.; Dutton, E. P. Everyman’s Dictionary of Non– Classical Mythology, New York, 1952.

6. Eliade, Mircea, Trans. Myth and Reality, New York, 1963.

7. Frazer, J. G.The Golden Bough, New York, 1922.

8. Gray, L. H. Ed. The Mythology of All  Races, 13 Vols., Boston, 1925-36.

9. Hackin, J.; Huart Clement &amp others, Trans.; Atkinson, F. M. Asiatic mythology, London, 1963.

10. Hooke, S. H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.

11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.

12. James, E.O. Prehistoric, Religions London, 1957.

13. Jensen, A. E. Trans. Myth and Cult Among Primitive Peoples, New York, 1963.

14. Jung, C. G.; Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.

15. Kramer, S. H. Ed., Mythologies of the Ancient World , Chicago, 1961.

16. Long C. H. Alpha : The Myths of Creation, New York, 1963.

17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and Other Essays, Boston, 1948.

18. Malinowaski Bronislaw, Sex, Culture and Myth, London, 1963.

19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism, New York, 1967.

20. Picard, B. L. Ed. The Encyclopadia of Myths And Legends of All Nations, London, 1962.

21. Savill, Sheila Ed. Barker, Mary; Cook, Christopher, Pears Encyclopaedia of Myths and Lagends, 4. Vols., London, 1976-78.

साळुंखे, आ. ह.

पुराणकथा

पुराणकथा

पुराणकथा