विश्वोत्पत्तिशास्त्र : आपल्या भोवती पसरलेले विश्व कसे अस्तित्वात आले असावे, ह्याबद्दलचे कुतूहल माणसाला अतिप्राचीन काळापासून आहे परंतु शुद्ध वैज्ञानिक दृष्टीने विश्वाच्या उत्पत्तीचा विचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तार्किक बुद्धीचा विकास संस्कृतिविकासाच्या आरंभीच्या अवस्थेतील माणसाच्या ठायी झालेला नसल्यामुळे, मिथ्यकथा, रूपके, प्रतीके अशांसारख्या माध्यमांतून विश्वोत्पत्तिसंबंधीच्या आपल्या कल्पनांचा आविष्कार त्याने केलेला आढळतो. प्राचीन भारतात आणि प्राचीन ग्रीसमध्ये तत्वज्ञानाचा विकास झाला परंतु ह्या दोन ठिकाणीही विश्वोत्पत्तीचा विचार मिथ्यकथा, रूपके ह्यांच्या अंगाने काही काळ झालाच. उदा., ऋग्वेदात आढळणाऱ्या काही कल्पना अशा : (१) विश्वाच्या उत्पत्तीसाठी प्रजापतीने तप केले. तपाच्या श्रमामुळे त्याच्या शरीतातून निथळलेला घाम म्हणजेच विश्वाच्या आरंभी निर्माण झालेले जळ होय. (२) प्रजापती जागा झाला म्हणजे जग अस्तित्वात येते, तो निजला म्हणजे प्रलय होतो. (३) जगाच्या मूळारंभी हिरण्यगर्भ होता त्यानेच ह्या पृथ्वीला आणि द्यूलोकाला आधार दिला तो पृथ्वीचा व द्यूलोकाचा जनक होय त्यानेच पाण्याचे चमकणारे विस्तीर्ण साठे निर्माण केले (ऋग्वेद १०.१२१). वैदिकांच्या समाजव्यवस्थेत सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सूत्रे ‘प्रजापती’ नावाच्या लोकपालकाकडे असल्यामुळे विश्वनिर्मितीची घडामोड ज्या शक्तीच्या हाती, तिलाही ‘प्रजापती’ म्हटले पाहिजे, असा विचार वैदिकांच्या मनात स्वाभाविकपणे आला असणार आणि म्हणून त्यांनी विश्वकर्त्याला अनेकदा ‘प्रजापती’ म्हटले असावे. विश्वोत्पत्तिसंबंधीच्या ग्रीक मिथ्यकथांपैकी एक अशी : सर्व वस्तूंची देवता यूरिनोमी ही निर्व्यवस्थेतून (केऑस) बाहेर आली. पाय ठेवण्यास अवकाश मिळावा, म्हणून तिने आकाशापासून समुद्र वेगळा केला आणि सागरलाटांवर नृत्य करीत ती दक्षिण दिशेला निघाली. तिच्या पाठीशी वाहत असलेल्या उत्तरेकडील वाऱ्याला तिने पकडले आणि दोन्ही हातांनी चोळले. तसे करताच ऑफिऑन नावाचा एक महासर्प निर्माण झाला. बेभानपणे नाचणाऱ्या यूरिनोमीबद्दल ऑफिऑनच्या मनात अभिलाषा निर्माण होऊन त्याने तिचा देह वेटोळला. यूरिनोमीला गर्भधारणा होण्यासाठी उत्तर वाऱ्याने साहाय्य केले. पुढे यूरिनोमीने कबुतराचे रूप घेऊन एक वैश्विक अंडे घातले. ऑफिऑनने त्या अंड्याला सात वेळा वेटोळल्यानंतर ते अंडे फुटून त्यातून यूरिनोमीची संतती बाहेर पडली. ती म्हणजे सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, पृथ्वी तिच्यावरचे पर्वत, नद्या, वृक्ष आणि प्राणी हे होत. यूरिनोमी आणि ऑफिऑन हे ऑलिंपस पर्वतावर राहू लागले. तिथे ऑफिऑन हा विश्वनिर्मिती स्वतःच केल्याची बढाई मारू लागल्यामुळे यूरिनोमीने त्याला चोप देऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील अंधाऱ्या गुहेत घालवून दिले. ह्या मिथ्यकथेतून स्त्रीप्रधान समाजव्यवस्था सूचित होते. गर्भधारणा वाऱ्याच्या साहाय्याने होताना दाखवलेली असल्यामुळे पिता व पितृत्व ह्यांना सन्मान नव्हता, असेही दिसते. ⇨ मार्डुक नावाच्या देवाने तेमात ही राक्षसीण व तिचा पती किंगू ह्यांना ठार मारले तेमातच्या देहाचे दोन तुकडे करून त्यांतील एका तुकड्यापासून आकाश व दुसऱ्या तुकड्यापासून पृथ्वी निर्माण केली. त्याचप्रमाणे किंगूच्या रक्तापासून मनुष्यजातीची निर्मिती केली, अशी एक बॅबिलोनियन मिथ्यकथा आहे.

विविध संस्कृतींत आढळून येणाऱ्या विश्वोत्पत्तिविषयक मिथ्यकथांमध्ये विश्व अस्तित्वात येण्यापूर्वीचा एक काळ आणि अवकाश कल्पिलेला असतो. ह्या अवकाश-कालात देव किंवा तशा प्रकारच्या अतिमानुष, अलौकिक शक्ती वावरत असतात. प्रत्येक संस्कृतीतील विश्वोत्पत्तिविषयक कथा त्या विशिष्ट संस्कृतीशी निगडित असल्या, तरी वेगवेगळ्या संस्कृतींतील अशा कथांचे विविध प्रकारे वर्गीकरण करता येते. उदा., ज्या सांस्कृतिक-ऐतिहासिक स्तरात त्या निर्माण झालेल्या असतात, त्याच्या आधारे एक वर्गीकरण करता येईल. म्हणजे उदा., मृगया-संस्कृतीच्या कालखंडातील मिथ्यकथा, नवपाषाणयुगातील मिथ्यकथा तसेच भाषिक गटांच्या (उदा., इंडो-यूरोपीय) मिथ्यकथा. विश्वोत्पत्तिविषयक वेगवेगळ्या मिथ्यकथांतील आशय, त्याची प्रतीकात्मक संरचना हाही वर्गीकरणाचा एक आधार होऊ शकतो. अशा प्रकारच्या एका वर्गीकरणानुसार विश्वोत्पत्तिविषयक मिथ्यकथांचे सहा प्रकार करण्यात आलेले आहेत : (१) शून्यातून वा पोकळीतून झालेली विश्वोत्पत्ती, (२) निर्व्यवस्थेच्या वा गोंधळाच्या (केऑस) अवस्थेतून सुव्यवस्थित अशा विश्वाची निर्मिती, (३) वैश्विक अंड्यातून झालेली विश्वोत्पत्ती, (४) एखाद्या दांपत्यापासून प्रजोत्पत्ती व्हावी तशी होणारी विश्वोत्पत्ती, (५) नवोद्‌भवाच्या (इमर्जन्स) प्रक्रियेतून झालेली विश्वोत्पत्ती, (६) पाण्यात बुडी मारून त्यातून विश्वनिर्मितीस उपयुक्त असे द्रव्य बाहेर काढणाऱ्यावर आधारलेल्या मिथ्यकथा, मात्र हे वर्गीकरण बंदिस्त कप्प्यांसारखे नाही. मिथ्यकथांच्या उपर्युक्त प्रकारांपैकी काहींची वैशिष्ट्ये एकाच मिथ्यकथेतही एकत्र येऊ शकतात.

विश्वोत्पत्ती ही शून्यातून केली गेली, अशी मांडणी करणाऱ्या मिथ्यकथांचे अनेकदा प्रत्ययास येणारे एक लक्षणीय वैशिष्ट्य असे, की येथे शून्यातून प्रस्थापित झालेल्या विश्वरचनेचा पूर्वीच्या कोणत्याही रचनेशी संबंध नसतो अशा कोणत्याही रचनेपासून ती पूर्णतः विखंडित असते. अशा पूर्वरचनेचे काही अवशेष नव्या निर्मितीत असलेच, तर ते ह्या नवनिर्मितीच्या प्रक्रियेत नव्याने सामावून घेऊन एकात्म केलेले असतात.

एका पॉलिनीशियन कथेत विश्व निर्माण करणारी देवता स्वतः एकाच पोकळीत वा शून्यावस्थेत एकाकी राहणारी, अशी असून तिचे नावही ‘मातृपितृहीन’ अशा अर्थाचे आहे. ह्या देवतेचे स्वरूप पूर्णतः स्वायत्त व स्वयंनिर्मित असे असून ते शून्यातून प्रकट झालेले आहे. शून्यामध्येही एक सर्जनशील शक्ती आहे, असे ह्यातून सूचित होते. त्याचप्रमाणे विश्वनिर्मिती ही एका परिपूर्ण वस्तूची निर्मिती असून तिची प्रक्रिया हेतुतः संकल्पपूर्वक सुरू केली जाते, असेही ह्या प्रकारातल्या मिथ्यकथा प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे सांगत असतात. ह्या प्रकारातल्या मिथ्यकथांतून अनेकदा आकाश हे निर्माणकर्त्या देवाचे प्रतीक म्हणून येते.

निर्व्यवस्थेतून वा गोंधळाच्या अवस्थेतून सुसंघटित विश्वाची निर्मिती झाली, असा काही मिथ्यकथांचा आशय असतो. ही निर्व्यवस्था निरनिराळ्या स्वरूपांत व्यक्त केली जाते. कधी ती अस्ताव्यस्तपणे वाहणाऱ्या जळाच्या स्वरूपात, कधी एखाद्या सर्पराक्षसाच्या स्वरूपात, तर कधी अन्य कोणत्या तरी स्वरूपात ती अस्तित्वात असते. अशा मिथ्यकथांचे दोन प्रकार अभ्यासकांनी दाखवून दिले आहेत : एक अवकाशनिगडित दुसरा कालनिगडित. अवकाशनिगडित मिथ्यकथांमध्ये राक्षसाने पाणी, सूर्य आणि सुफलता ह्यांना जखडून ठेवलेले असते. प्रजेला तो छळत असतो. जीवनदायी शक्तींना व्यक्त होण्यास तो वावच देत नसतो. नव्या विश्वव्यवस्थेसाठी स्थळ वा अवकाश ह्या जुलुमी व्यवस्थेत उपलब्ध होऊ शकत नाही. एक प्रकारची जडता सर्वत्र पसरलेली असते. परंतु ह्या निर्व्यवस्थेतही अंतःशक्ती असते.

कालनिगडित मिथ्यकथांमध्ये निर्व्यवस्था निर्माण होण्याची दोन कारणे दाखविलेली असतात. ह्या निर्व्यवस्थेत कोणताही बदल होत नसतो गतिमानता नसते सारे निश्चल, निश्चेष्ट झालेले असते, हे एक कारण. ह्याच्या उलट अत्यंत वेगाने आणि सतत घडून येणारे बदलही निर्व्यवस्था आणू शकतात. परंतु निर्मितीच्या शक्तींना चालना मिळते आणि बदलाचा वेग नियंत्रित होतो, सर्व हालचाली नेमक्या प्रमाणात राखल्या जातात. सैरभैरपणा काबूत येऊन एक संमीलित, एकात्म व्यवस्था निर्माण होते. निर्व्यवस्थेच्या एका टोकाकडून व्यवस्थेच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याच्या प्रक्रियेला मध्यस्थानी मानवी अस्तित्व असते. तसेच निर्व्यवस्थेची मूळ अवस्था नियंत्रणाखाली आल्यानंतर मानवाची कालसंकल्पना अस्तित्वात येते.

ह्या प्रकारातल्या काही मिथ्यकथांत थोडी वेगळी मांडणी असते. तेथे असे दाखविलेले असते, की निर्व्यवस्था वा गोंधळ पूर्णतः कधीच नाहीसा होत नाही. त्याचे अवशेष विश्वव्यवस्थेत राहतात. त्यामुळे एकदा निर्माण झालेली व्यवस्था पुन्हा निर्व्यवस्थेच्या गर्तेत जाण्याची शक्यता असते. ह्या अवस्थेत काल आणि अवकाश ह्यांचा अर्थच नाहीसा होतो.

एका वैश्विक अंड्यातून विश्वनिर्मिती झाल्याच्या मिथ्यकथा पॉलिनीशिया, आफ्रिका, भारत, जपान, ग्रीस इ. ठिकाणी आढळतात. अंडे हे सुफलतेचे प्रतीक आहेच. महाभारतात असा निर्देश आला आहे, की सृष्टीच्या आरंभी सर्वत्र अंधार होता. तथापि एक विशाल अंडे प्रकट झाले. हे अंडे म्हणजे सर्व प्रजेचे अविनाशी बीज होय. ह्या अंड्यातूनच ब्रह्मा बाहेर आला. जगाच्या निर्मितीचा हा देव होय, असे हिंदू मानतात. पश्चिम आफ्रिकेतील एक मिथ्यकथा असे सांगते, की आम्मा ह्या देवाने विश्वनिर्मितीची पहिली अवस्था म्हणून एक अंडे निर्माण केले. ह्या अंड्यातून एक उभयलिंगी जुळे बाहेर येणार होते. त्यातून ह्या जुळ्यांमध्ये लैगिंकतेच्या पातळीवरील परिपूर्णता साधणार होती. पुढे होणाऱ्या विश्वनिर्मितीचे अन्य पैलूही ह्या परिपूर्णतेशी सुसंगत असेच असणार होते. उदा., दिवस-रात्रीच्या व्यवस्थेऐवजी जग हे कायम संध्याप्रकाशात राहणार होते. जगात काही ओले आणि काही कोरडे अशी स्थिती असण्याऐवजी सर्वत्र दमटपणा असणार होता. परंतु काही दुर्घटना होऊन ही संकल्पित व्यवस्था अस्तित्वात येण्याऐवजी आपण आज पाहतो ती व्यवस्था प्रस्थापित झाली.

ह्या जगाला जन्म देणारे कोणी आद्य मातापिता होते, ही कल्पना काही मिथ्यकथांमधून आढळते. मात्र विश्वनिर्मितीसाठी येणारा ह्या मातापित्यांचा संबंध ही अत्यंत उदासीनतेने आणि अबोधपणे (अन्‌कॉन्शसली) घडून येणारी घटना असते. ह्या दांपत्याच्या आलिंगनातही कसला आवेग वा हेतू नसतो. वैश्विक अंड्यात बंदिस्त असलेल्या उभयलिंगी जुळ्याच्या अवस्थेसारखे हे आलिंगन असते. त्यातून विलग होण्याची ह्या दांपत्याची इच्छा नसते. हे आलिंगन चिरस्थायी स्वरूपाचे असते. त्यातून निर्माण होणाऱ्या प्रजोत्पत्तीची ह्या दांपत्याला जाणीव नसते वा ते ह्या प्रजोत्पत्तीबद्दल उदासीन असते. मात्र हे दांपत्य म्हणजे विश्वव्यवस्थेच्या प्रक्रियेचा एक भाग असते. हे दांपत्य येण्यापूर्वी निर्व्यवस्था असते, असेही ह्या प्रकारातल्या काही मिथ्यकथा सांगतात. हे दांपत्य घट्ट आलिंगनावस्थेत असल्यामुळे आपल्या अपत्यांसाठी त्याच्याकडे अवकाश वा जागाच शिल्लक नसते. आपल्या अपत्यांच्या इच्छा, गरजा ह्यांबाबत ते उदासीन असल्यामुळे त्याची अपत्ये त्या उभयतांना परस्परांपासून विलग करण्यासाठी प्रयत्‍न करतात. काही मिथ्यकथांमध्ये हे काम कोणी देवता करते, असे दाखविलेले असते. विश्वनिर्मितीसंबंधीच्या एका बॅबिलोनियन मिथ्यकथेनुसार जगाचे मातापिता आणि त्यांची अपत्ये ह्यांच्यात लढाईचा प्रसंग येतो आणि हे दांपत्य विलग होताच अपत्यांमध्ये संवाद होतो त्यांचे समूहजीवन सुरू होते. मानवी समूहजीवनाचा मूलाकार (आर्किटाइप) ह्यांतून प्रकट होतो.

काही मिथ्यकथांत गर्भावधी आणि जन्म ह्या कल्पनांची प्रतीकात्मक मांडणी असते. ह्यांत पृथ्वी ही आईचे प्रतीक म्हणून येते. पृथ्वीमध्ये सर्व अंतःशक्ती असतात. तिच्या गर्भाशयात सर्व प्रकारची बीजे गर्भावस्थेत असतात. ती पृथ्वीच्या पोटातच परिपक्व होतात. त्यानंतर बीजांचे हे परिपक्व आकार वा विविध प्रकारच्या वस्तू जगात अवतीर्ण होतात. ह्या प्रक्रियेत पृथ्वीच्या आतल्या भागातील विविध स्तरांत जे चलनवलन चालू असते ते क्रमाक्रमाने, संकलित परिणाम साधणारे असे असते. निर्माण होणाऱ्या वस्तूंमध्ये एकात्मता आणि सुसंवाद साधणे हाही या प्रक्रियेचा एक भाग असतोच आणि ही त्या प्रक्रियेची नैतिक बाजू असते. ह्या प्रकारच्या मिथ्यकथांमध्ये आईला – पृथ्वीला-महत्त्व आहे पित्याला वा पुरुषतत्त्वाला नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर ह्या प्रक्रियेतून जेव्हा माणसे येतात तेव्हा त्यांना पहिल्यांदाच प्रकाशाचा अनुभव येतो. प्रकाश हे सूर्याचे आणि पुरुषतत्त्वावर आधारलेल्या एकंदर व्यवस्थेचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.

सर्वंत्र पसरलेले पाणी ही काही मिथ्यकथांमध्ये आद्य वस्तू असते. ह्या पाण्यात बुडी मारून धुळीचा, चिखलाचा वा वाळूचा एखादा कण आणता आला, तर त्याच्यापासून स्थायी स्वरूपाची अशी एक विश्वव्यवस्था निर्माण होणार असते. हे काम कोणत्या तरी पशूकडून होते. त्याने आणलेली कणभर धूळ, चिखल वा वाळू प्रचंड प्रमाणावर विस्तारत जाते आणि पृथ्वीवरील भूमी तयार होते. तिच्यावर सर्व सजीव राहू लागतात.

ज्यू-ख्रिस्ती प्रभाव असलेल्या ह्या प्रकारातल्या काही मिथ्यकथांमध्ये देव आणि सैतान ह्यांच्यातील विऱोधही दाखविलेला दिसतो. देव सैतानाला पाण्यात बुडी मारून मातीचा एक कण आणायला सांगतो.

अनेक प्रयत्‍नांनंतर सैतान तो आणतो. त्याचा विस्तार होऊन जग निर्माण झाले तरी दिशा, डोंगरदऱ्यां इ. निर्माण करून एकंदर भूमीची कशी व्यवस्था लावायची ह्याचे ज्ञान देवाला नसते ते सैतानाला असते. देव युक्तीने ते मिळवतो आणि मग भूमीची योग्य ती व्यवस्था लावतो. आणखी एका प्रकारात देवाच्या सांगण्यावरून एक माणूसच पाण्यात बुडी मारून थोडी माती आणतो. पण ती सर्वच देवाला न देता थोडीशी माती तो माणूस स्वतःच्या तोंडात दडवून ठेवतो. त्या मातीच्या आधारे त्याला स्वतःचे जग निर्माण करायचे असते. देवाकडे असलेल्या मातीचा विस्तार होऊ लागताच ह्या माणसाच्या तोंडातील मातीही विस्तारू लागते आणि त्याचे गुपित उघडे पडते. देव त्याच्याकडून ती लपविलेली माती ताब्यात घेतो आणि तिच्या आधारे भूमीवरील दलदलीच्या जागा निर्माण करतो. अशा मिथ्यकथांमध्ये विश्वनिर्माता आणि स्वतःच्या कल्पनेप्रमाणे विश्व निर्माण करू पाहणारा मानव ह्यांच्यातील विरोध दिसून येतो. देव आणि त्याचे सामर्थ्य ह्यांच्यापासून आपले स्वतंत्र अस्तित्त्व राखू पाहणाऱ्या, ज्ञान संपादण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या मानवाचे प्रतीकात्मक रूप अशा कथांतून दिसते.

विश्वाचे समग्र, साकल्याने प्रतीत होणारे स्वरूप काय आहे, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे हे तत्त्वज्ञानाचे एक प्रमुख कार्य होय किंबहुना तत्त्वज्ञानाने अगदी आरंभालाच विचारलेला हा प्रश्न आहे. त्याचा विचार भारतीय आणि ग्रीक तत्त्वज्ञांनी आपापल्या परीने केलेला आढळतो. भारतीय तत्त्वज्ञानाचा उदय उपनिषदांपासून झाला. उपनिषदांच्या रूपाने भारतात मौलिक तत्त्वचिंतन सुरू झाले आणि विश्वोत्पत्तीचा विचार तत्त्वज्ञानाच्या अंगाने होऊ लागला. ग्रीक तत्त्वज्ञानाचा आरंभ थेलीझ (इ. स. पू. सहावे शतक) ह्या तत्त्वज्ञापासून झाला. ग्रीक तत्त्वज्ञानाच्या आरंभीच्या काळात (इ.स.पू. सहावे शतक ते इ. स. पू. पाचव्या शतकाचा मध्य) विश्वस्वरूपाचा विचारच ग्रीक तत्त्वज्ञानात प्रामुख्याने झाला. परंतु कोणतेही तत्त्वज्ञान उदयाला येण्यापूर्वी त्याची एक पार्श्वभूमी तयार होत असते आणि तिच्या निर्मितीच्या प्रक्रियेत वर दिलेल्या मिथ्यकथांसारख्या मिथ्यकथा हा एक महत्त्वपूर्ण घटक असतो. अशी पार्श्वभूमी ही तत्त्वज्ञानाची एक अपरिहार्य पूर्वावस्था असली, तरी तत्त्वज्ञानाची रीत ही बौद्धिक असते तर्क, युक्तिवाद ह्यांना तत्त्वज्ञानीय रीतीत महत्त्व असते. भारतीय आणि ग्रीक तत्त्वज्ञांनी ह्या दृष्टीने विश्वस्वरूपाचा विचार कसा केला, हे पाहता येईल. तथापि उपनिषदांतील विश्वस्वरूपविचारापूर्वीही ऋग्वेदातील एका सूक्तात (१०.१२९) आलेले विश्वस्वरूपविषयक विचार निर्देशनीय आहेत. ‘नासदासीन्नो सदासीत्’ असा आरंभ असलेल्या ह्या सूक्ताला ह्या आरंभावरूनच ‘नासदीय सूक्त’ असे संबोधिले जाते. परमेष्ठीनामक प्रजापती हा ह्या सूक्ताचा ऋषी असून सूक्तदेवता परमात्मा आहे. ह्या सूक्ताचा आशय थोडक्यात आणि सर्वसाधारणतः असा: मूळारंभी ‘असत्’ (अस्तित्वात नसणारे) नव्हते ‘सत्’ (अस्तित्वात असणारे) नव्हते अंतरिक्ष नव्हते त्यापलीकडील स्वर्लोक नव्हता. अगाध गहन असे पाणी तरी तेव्हा होते काय? अशा स्थितीत कोणी कोणाला आवरण घातले असे म्हणणार? तेव्हा मृत्यू नव्हता म्हणून ‘अमृत’ वा अविनाशी पदार्थही नव्हते. रात्र व दिवस ह्यांचा भेद करण्यासारखे काही साधन नव्हते. तेव्हा जे होते ते एकटे एकच होते आणि स्वशक्तीने वाऱ्यांशिवाय श्वासोच्छ्‌वास करीत होते (म्हणजे स्फुरत होते). ह्याच सूक्तात पुढे म्हटले आहे, की अंधाराने आच्छादिलेला अंधार होता आणि भेदाभेदरहित असे पाणी होते, की तपाच्या प्रभावामुळे जन्माला आलेले प्रभावशील तत्त्व पोकळीने वेष्टिलेले होते. (मुळात काहीच नसल्यामुळे व तसे स्पष्ट विधान ह्या सूक्तात आरंभीच असल्यामुळे पुढे निर्देशिलेल्या ‘अंधार’, ‘पाणी’ ह्या वस्तू मूळ नसून एका ब्रह्माचाच तो पुढील विस्तार आहे, असे सांगण्याचा सूक्तकर्त्या ऋषींचा हेतू असल्याचे मत लो. टिळकांनी व्यक्त केले आहे). प्रथम त्या एकाच्या ठिकाणी काम (सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा) निर्माण झाला. हे मनाचे पहिले रेत होते. अशा प्रकारे कवींनी हृदयात चिंतनाने शोध घेऊन ‘असत्’ च्या ठिकाणी ‘सत्’ चा संबंध शोधून काढला. ह्या ऋचेच्या अखेरीस म्हटले आहे, की ही सृष्टी कुणापासून उत्पन्न झाली? देव तर हिच्या उत्पत्तीनंतरचे आहेत. मग ही कुठून उद्‌भवली ? हे कोण जाणतो? ही सृष्टी जिथून निर्माण झाली, त्याने तरी ही घडवली, की न घडवली? ह्या घटनेचा जो अध्यक्ष अत्युच्च लोकात आहे, तो तरी हे जाणतो की जाणत नाही? हे सूक्त अज्ञेयवादी प्रवृत्तीचे द्योतक असल्याचे मत गुरूदेव रा. द. रानडे ह्यांनी व्यक्त केले आहे. हे सूक्त सर्व उपनिषदांचे उपनिषद होय, असे मत नासदीय सूक्तावर भाष्य लिहिणारे अहिताग्‍नी राजवाडे ह्यांनी मांडले आहे. राजवाडे ह्यांनी पुढे म्हटले आहे, की ईशावास्योपनिषदात ‘आरंभापासून जो ईश प्रतीयमान आहे त्याच्याच स्वरूपाचे आविष्करण…”नासदीय सूक्ता” त असल्यामुळे वास्तविक रीत्या हे सूक्त उपनिषदाच्या वर्गात दाखल होण्यास पाहिजे होते.’ ह्या सूक्तात अज्ञेयवाद वा संशयाची भाषा आहे, असे अहिताग्‍नींना वाटत नाही. परम वस्तूचे स्वरूप दर्शविण्यासाठी म्हणजे ज्ञानातीताला ज्ञानात आणण्यासाठी जी भाषा योजणे उचित आहे, तीच ह्या सूक्तांत योजिलेली आहे, असे अहिताग्‍नींचे म्हणणे आहे.

विश्व कसे उत्पन्न झाले? ह्या प्रश्नांपासूनच उपनिषदांच्या काळी तात्त्विक विचाराचा आरंभ झाला. ज्यापासून सर्व वस्तू निर्माण होतात, ज्यात त्या लीन पावतात व ज्यामुळे त्या स्थिर व जिवंत राहतात ते तत्त्व कोणते? असा प्रश्न छांदोग्यात उपस्थित करण्यात आला आहे (३.१४.१). ‘ब्रह्म’ हेच ते तत्त्व होय, असे तैत्तिरीयोपनिषदात सांगितले आहे (३.१). आप (पाणी), वायू, अग्‍नी अशा एखाद्या जडभूतापासून विश्व निर्माण झाले असावे, असे विचार उपनिषदांत प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे आलेले आहेत. विश्व निर्माण होण्यापूर्वी सर्वत्र जळ होते, ह्या जळापासून सत्य, सत्यापासून ब्रह्म, ब्रह्मापासून प्रजापती व प्रजापतीपासून सर्व देव उत्पन्न झाले, असे बृहदारण्यकोपनिषदात म्हटले आहे (५.५.१). छांदोग्यारैक्‌व ऋषींचे दृश्य विश्वाच्या विलयनाचे तत्त्वज्ञान आले आहे. विश्वाची उत्पत्ती कशी होते, हे ह्या ऋषींनी स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु सर्व भूते वायूत लीन होतात व वायू हेच सर्वांचे अधिदैवत आहे, असा त्यांचा विचार तेथे नमूद आहे. रैक्‌वांच्या म्हणण्याप्रमाणे अग्‍नी विझवल्यास तो वायूत लीन होतो सूर्य अस्तास जातो तेव्हा तो वायूत अंतर्भूत होतो आणि चंद्र मावळतो तेव्हाही तो वायूतच अंतर्धान पावतो. पाणी आटले म्हणजे ते वायूतच मिसळून जाते (४.३. १-२). हे सर्व वायूत कसे लीन होते, ह्याचे स्पष्ट विवेचनं रैक्‌वांनी केलेले नाही. हे विश्व अग्‍नीपासून निर्माण झाले, असे उपनिषदांत स्पष्टपणे म्हटलेले नसले, तरी ‘अग्‍नीने ह्या विश्वात शिरून अनेक रूपे धारण केली’ असे कठोपनिषदात म्हटले आहे (२.५). मूळ ‘सत्’ पासून अग्‍नी हा प्रथम उत्पन्न झाला, अग्‍नीपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली, असे छांदोग्यात म्हटले आहे (६·८·४). संहाराच्या वेळी पृथ्वी पाण्यात व पाणी अग्‍नीत विलय पावते नंतर अग्‍नी मूळ स्वरूपात मिसळतो, असेही येथे म्हटले आहे. पांचाल देशाचा राजा प्रवाहण जैवली ह्याने आकाश हे सर्व विश्वाचे उत्पत्तिकारण आहे, असे सांगितले. सर्व भूते आकाशापासून उत्पन्न होतात आणि आकाशातच लीन होतात आकाश हे सर्वांहून श्रेष्ठ असून तेच शेवटचे परायण होय अशा आशयाचे त्याचे विचार छांदोग्यात आले आहेत (१·९·१).

अगदी सुर वातीला ‘असत्’ होते, असे विचार उपनिषदांत काही ठिकाणी आलेले आहेत. नंतर त्यापासून (असत्‌पासून) सत् निर्माण झाले सत्‌ने आपल्या आवडीचे रूप धारण केल्यामुळे त्यास ‘सुकृत’ वा ‘स्वकृत’ असे म्हणतात, असे तैत्तिरीयोपनिषदात नमूद आहे (२·७). परंतु ‘असत्’ ही अभावात्मक कल्पना आहे. त्यामुळे काही अभ्यासक ‘असत्’ चा अर्थ ‘एक अभावसदृश अमूर्त वस्तू’ असा लावतात. बृहदारण्यकोपनिषदात म्हटले आहे, की आरंभी काही नव्हते, मृत्यूने या अशनेने सर्व व्याप्त होते. मृत्यूने आत्मवान होण्यासाठी उपासना केली, त्या उपासनेपासून जळ निर्माण झाले आणि त्या जळावरचा फेस घट्ट होऊन त्यातून पृथ्वी निर्माण झाली. मृत्यूने ह्या पृथ्वीपासून अग्‍नी उत्पन्न केला (१·२·१-२). असत्‌पासून सत् आणि अभावापासून भाव निर्माण होणार नाही, त्यामुळे आरंभी सर्वत्र एकमेव व अद्वितीय असे ‘सत्’ होते आपण ‘अनेक’ होऊन प्रजोत्पत्ती करावी, असे ‘सत्’ च्या मनात आले त्याने अग्‍नी उत्पन्न केला अग्‍नीलाही ‘अनेक’ होण्याची इच्छा झाली आणि त्याने पाणी निर्माण केले पाण्याच्याही मनात तीच इच्छा निर्माण होऊन त्याने अन्न निर्माण केले, असे विचार छांदोग्यात आलेले आहेत (६·२·१-४). ह्याच उपनिषदात उषस्ती चाक्रायण ह्या ऋषींनी प्राण हा सर्व जगताचा मूलाधार होय असे सांगितले आहे कारण सर्व वस्तू मुळात प्राणापासूनच निर्माण होऊन प्राणातच विलीन होतात (१·११·५).

वर दिलेल्या विश्वोत्पत्तिविषयक विचारांत विश्वनिर्मितीसाठी एखाद्या मनुष्यरूपधारी ईश्वराची जरूर आहे, असे कोठेच सांगितलेले नाही. मात्र अशा कल्पना काही ठिकाणी आलेल्या आहेत. विश्वाच्या आरंभी विश्वाचा कोणी कर्ता होता, असा विचार प्रश्नोपनिषदात पिप्पलाद ऋषींनी मांडला आहे : ह्या विश्वकर्त्याच्या मनात विश्वनिर्मितीची इच्छा उत्पन्न होऊन त्याने तप केले. ह्या तपातून प्राण व ‘रयि’ (अनुक्रमे चैतन्य व जड) हे दांपत्य उत्पन्न झाले. त्या दांपत्यापासून विश्व निर्माण झाले. आदित्य हा प्राण, चंद्र हा रयी शुक्लपक्ष प्राण, कृष्णपक्ष रयी दिवस हा प्राण, रात्र रयी अशी प्राण व रयी ह्यांची काही द्वंद्वात्मक उदाहरणेही त्यांनी दिली आहेत (१·३-१३). तैत्तिरीयोपनिषदात म्हटले आहे, की विश्वकर्त्याने तपाने सर्व वस्तू निर्माण केल्या आणि त्या सर्व वस्तूंत स्वतः शिरून तो स्वतःच व्यक्त, अव्यक्त निरुक्त, अनिरुक्त आलंब व निरालंब, विज्ञान व अविज्ञान, सत्य आणि अनृत झाला (११·६). ह्या दोन निर्देशांत विश्वकर्त्याला तप करावे लागले. असे म्हटले आहे, ते लक्षणीय आहे. निरनिराळ्या उपनिषदांत विश्वोत्पत्तिविषयी निरनिराळे विचार आले असून एकाच उपनिषदात भिन्न भिन्न स्वरूपाचे विचारही येतात.

वैशेषिक दर्शनाचा आद्यप्रवर्तक ⇨ कणाद (इ. स. पू. सु. सहावे शतक) ह्याने पृथ्वी, जल, तेज व वायू ह्यांच्या अणूंपासून विश्व बनले असून त्यांतील प्रत्येक अणू दुसऱ्या अणूहून वेगळा असतो व हे वेगळेपण दाखविणारा ‘विशेष’ प्रत्येक अणूत असतो, असे मत मांडले आहे.

ग्रीक तत्त्वज्ञानाच्या आरंभी-म्हणजे इ. स. पू. सहावे शतक ते इ. स. पू. पाचव्या शतकाच्या मध्यापर्यंत-विश्वोत्पत्ती आणि विश्वस्वरूप ह्या विषयांचा विचार ग्रीक तत्त्वज्ञांनी प्रामुख्याने केला, हे वर म्हटलेच आहे. आयोनियन वा मायलीशियन हा ग्रीक तत्त्वज्ञानाच्या इतिहासातला अगदी आरंभीचा विचारपंथ होय. थेलीझ, ⇨ ॲनॅक्सिमँडर आणि ॲनॅक्सिमीनीझ (सर्व इ. स. पू. सहावे शतक) हे तीन तत्त्वज्ञ ह्या विचारपंथाशी निगडित आहेत. त्यांतही ग्रीक तत्त्वज्ञानाचा आरंभ थेलीझपासून झाला, असे मानले जाते. संपूर्ण विश्व हे एकाच शाश्वत, एकजिनसी मूलद्रव्यापासून घडले असून विश्वातील भिन्न भिन्न प्रकारच्या सर्व वस्तू हा त्या एकाच मूलद्रव्याचा आविष्कार आहे, ह्या कल्पनेच्या दिशेने थेलीझने विचार केला आणि हे मूलद्रव्य म्हणजे ‘पाणी’ होय, असे सांगितले. आपली पृथ्वी ही एखाद्या लाकडाच्या तुकड्याप्रमाणे पाण्यावर तरंगत आहे, असेही थेलीझचे प्रतिपादन होते. विश्व घडविणारे मूलद्रव्य पाणीच का असले पाहिजे, ह्याबद्दल थेलीझने काही तपशीलवार स्पष्टीकरण दिल्याचे दिसत नाही, परंतु त्याबाबत काही तर्क केले गेले आहेत. ते असे : पाणी हे स्वयंचलित, प्रवाही, गतिमान असते. त्यामुळे विश्वातील विविध प्रकारच्या वस्तू निर्माण करणारे मूलद्रव्य हे अशाच प्रकारचे असणार. शिवाय पाणी हे अनेक रूपे धारण करते. ते कधी बाष्परूपात असते, तर कधी बर्फासारखे घनरूप धारण करते, सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि हेच पाणी पुन्हा पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पडते. ह्या पाण्याने सृष्टी फळते, फुलते आणि अन्ननिर्मिती होते. वनस्पती आणि प्राणी ह्यांच्या पोषणासाठी पाणी अत्यावश्यक आहे. जीवनिर्मिती करणारी बीजे-उदा., शुक्रद्रव्य-द्रवरूप असतात, इत्यादी.

थेलीझच्या विचाराचा ॲनॅक्सिमँडरने विकास केला. मूलभूत द्रव्याची कल्पना ॲनॅक्सिमँडरच्या मनात होती परंतु पाणी वा जगातील अन्य कोणते तरी द्रव्य हे ते मूलद्रव्य असावे, असे त्याला वाटत नव्हते कारण जगातील विविध द्रव्ये ही परस्परविरोधी धर्मांची असल्यांचे दिसून येते. उदा., अग्‍नी किंवा उष्णता आणि आर्द्रता. आता जी द्रव्ये अशी परस्परविरोधी धर्मांची आहेत, त्यांच्यापैकी एखादे द्रव्य-उदा., अग्‍नी व पाणी ह्या जोडींपैकी पाणी- हे मूलभूत द्रव्य असू शकणार नाही कारण पाणी हे अग्‍नी विझवणारे आहे. मूलभूत द्रव्य असे असले पाहिजे, की ज्यात भिन्न भिन्न वस्तूंचे परस्परविरोधी धर्म विलय पावलेले असतील आणि त्यामुळे ते पूर्णतः एकजीव, एकजिनसी झालेले असेल. हे मूलद्रव्य असे एकजीव, एकजिनसी असल्यामुळे त्यात विलय पावलेल्या परस्परविरोधी द्रव्यांमधील विभेद दर्शविणाऱ्या सीमा असणार नाहीत आणि ह्या अर्थाने ते ‘असीम’ आहे. परंतु ते अत्यंत गतिमान असल्यामुळे त्याच्या मंथनातून एकजीव आणि एकजिनसी अशा ह्या मूलद्रव्यात विलीन झालेली परस्परविऱोधी द्रव्ये परस्परांपासून विलग होतात आणि त्यांचे एक जग अस्तित्वात येते. जोपर्यंत ही परस्परविऱोधी द्रव्ये आपापल्या मर्यादा सांभाळून राहतात, एकमेकांवर आक्रमण करीत नाहीत, तोवर हे जग टिकते परंतु त्या परस्परविरोधी द्रव्यांपैकी कुणीही एकाने दुसऱ्यावर आक्रमण केले, तर त्या अन्यायाचा परिणाम म्हणून ते जग नष्ट होते. अशा प्रकारे ह्या विश्वात अनेक जगे निर्माण होतात आणि काही काळ टिकून नष्टही होतात. एका विश्वांतर्गत अनेक जगांच्या उत्पत्ती-स्थिती-लयाची ही कल्पना ॲनॅक्सिमँडरच्या विश्वोत्पत्तिविषयक. विचाराचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होय. मात्र ॲनॅक्सिमँडरने ज्याची कल्पना मांडली, ते मूलद्रव्य‘ अनिर्धार्य, संदिग्ध असे काहीतरी ’होते.

मायलीशियन विचारपंथातील तिसरा तत्त्वज्ञ ॲनॅक्सिमीनीझ ह्याने ॲनॅक्सिमँडरची ही ‘अनिर्धार्य, संदिग्ध’ अशा ‘असीम’ मूलद्रव्याची कल्पना न स्वीकारता विशिष्ट आणि एकजिनसी अशा मूलद्रव्यापासून सर्व द्रव्ये निर्माण होतात आणि ते मूलद्रव्य म्हणजे वायू होय, असा विचार मांडला. मात्र ‘वायू’ मध्ये त्याला हवा आणि बाष्प अभिप्रेत असावे, असे दिसते. वायू हा द्रवरूप आणि घनरूप अशा दोन्ही रूपांत दिसतो. उदा., बाष्प हे जलाच्या रूपाने द्रवावस्था धारण करते आणि जलाचे बर्फ तयार होते. वायूच्या घनीभवनाच्या प्रक्रियेतून हे घडते. वायूचे विरलीभवन झाले, की अग्‍नी निर्माण होतो. सर्व सचेतन वस्तूंचे जीवन वायूवर अवलंबून असते. आपला आत्मा म्हणजे वायूच होय. वायूने सारे जग वेढलेले आहे. आकाशात चमकणारी वीज, इंद्रधनुष्य, भुकंप अशा घटनांचा अर्थही ॲनॅक्सिमँडरने वायूच्या आधाराने लावण्याचा प्रयत्‍न केलेला दिसतो.

विश्वात विविधता असली, अनेक प्रकारच्या वस्तू असल्या, तरी त्या घडविणारे मूलद्रव्य एक आहे, विश्वातील अनेकता म्हणजे त्या मूलद्रव्याचा आविष्कार आहे, असा मायलीशियन विचारपंथाच्या ह्या तत्त्वज्ञांचा दृष्टिकोण होता.

कॉलोफॉनचा झीनॉफानीझ (इ. स. पू. सु. ५७०-सु ४८०) ह्या आयोनियन तत्त्ववेत्त्याचे मत पृथ्वी आणि पाणी (आप) ह्यांच्यापासून सर्व काही उत्पन्न झाले असे दिसते, तर पायथॅगोरसने (इ. स. पू. सु. ५७५-सु. ४९५) आकारवादी दृष्टिकोणातून विश्वाचा विचार केला. कुठल्याही वस्तूला विशिष्ट आकार असेल, तर ती सुव्यवस्थित असू शकते आणि कुठल्याही वस्तूला विशिष्ट आकार द्यायचा असेल, तर त्या आकाराच्या अपेक्षेनुसार त्या वस्तूच्या बाह्यरेषा वा सीमा निश्चित केल्या पाहिजेत. सीमा निश्चित करावयाच्या तर ती वस्तू ज्या द्रव्याची बनणार असेल त्याला योग्य त्या मर्यादा घातल्या पाहिजेत. ह्या विश्वाला विशिष्ट आकार आहे, ते अमर्याद नाही म्हणून ते सुव्यवस्थित आहे. अशी पायथॅगोरसची धारणा होती. पायथॅगोरसची अशीही भूमिका होती, की विश्वात ज्या अनेक वस्तू दिसतात, त्या घडविणारे घटक सर्वत्र तेच असतात फक्त त्या घटकांचे प्रमाण वेगवेगळ्या वस्तूंत वेगवेगळे असते आणि त्यामुळे वस्तूंमधला वेगळेपणा निर्माण होतो. हे घटकांचे प्रमाण संख्येच्या रूपात व्यक्त करता येते. त्यामुळे ‘सर्व वस्तू म्हणजे संख्याच आहेत’ असा विचार पायथॅगोरसने केला.

पार्मेनिडीझ (इ. स. पू. ५१५-४४९) ह्या ग्रीक तत्त्वज्ञाच्या मते विश्व-म्हणजे ‘सत्’-हे अनादी, अनिर्मित, अपरिवर्तनीय, अचल, एकविध, सधन आणि अविचल असे आहे. विश्वात कधीही, कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही कारण बदल होणे म्हणजे होते ते नाहीसे होणे आणि नव्हते ते अस्तित्वात येणे. हे कधीच शक्य नसल्यामुळे बदलही अशक्य आहे. विश्वात आपल्याला ज्या अनेक प्रकारच्या वस्तू त्यांचे उत्पत्ति-स्थिती-लयासारखे बदल दिसतात, तो आपल्या ज्ञानेंद्रियांना होणारा केवळ आभास होय कारण ज्ञानेंद्रियांमुळे ‘सत्’ चे खरे स्वरूप आपणास कधीच कळत नाही ते बुद्धीमुळे समजते. विश्वात एकही पोकळी नाही कारण ‘पोकळी’ चा अर्थ ‘काहीही नसणे’ आणि ‘जे नाही’ ते ‘आहे’ असे म्हणता येणार नाही. विश्वात ‘स्थलांतर’, ‘गती’ असेही काही नाही कारण स्थलांतर होण्यासाठी, एक वस्तू एकीकडून दुसरीकडे जाण्यासाठी, एक रिक्त अवकाश गृहीत धरावा लागतो आणि तोच अस्तित्वात नाही आणि ‘स्थलांतर’ नाही म्हणून ‘स्थलांतर’ घडवून आणणारी ‘गती’ ही नाही.

पार्मेनिडीझच्या ह्या सिद्धांतातूनच ग्रीकांना परमाणुवाद विकसित झाला. ल्युसिपस (इ. स. पू. सु. ४५०) हा तत्त्ववेत्ता त्याचा प्रवर्तक होय. ह्या सिद्धांताचा विकास मात्र डीमॉक्रिटस (इ. स. पू. सु. ४६०-३६०) ह्याने केला. पोकळीला अस्तित्व नाही, हे पार्मेनिडीझचे मत परमाणुवाद्यांनी अमान्य केले. त्यांच्या मते ‘सत्’ आहे ते आहेच परंतु ‘असत्’ आहे तेही आहे असे म्हटले पाहिजे आणि हे स्वीकारल्यास पोकळी आहे, हेही मान्य करावयास हवे. पोकळीचे अस्तित्व स्वीकारल्यास पोकळी एक नसून अनेक पोकळ्या आहेत, असेही म्हणता येईल आणि पार्मेनिडीझने वर्णिलेल्या ‘सत्’ च्या स्वरूपाचे अनेक ‘सत्’ अशा पोकळ्यांच्या दरम्यान असू शकतील. ह्याप्रमाणे अनेक पोकळ्या आहेत, अनेक ‘सत्’ आहेत. पोकळ्या वा रिक्त अवकाश अस्तित्वात असल्यामुळे ‘स्थलांतर’ आहे आणि ‘स्थलांतरा’साठी आवश्यक असलेली ‘गती’ ही आहे.

अनेक पोकळ्यांच्या दरम्यान असलेले अनेक ‘सत्’ म्हणजेच परमाणू होत. विश्वात ज्या अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला दिसतात, त्या सर्व परमाणूंनीच घडलेल्या असतात. परंतु परमाणूंचे आकार, रचना आणि अवस्थिती ह्यांमुळे वस्तुवस्तूंमधील भिन्नत्त्व आपल्या प्रत्ययास येते. परमाणूंना गतीही असते गतिमान परमाणूंची एकमेकांशी टक्कर होऊ शकते. त्यांतून ते एकमेकांशी सांधले जाऊ शकतात वा एकमेकांपासून वेगळे होतात. विश्वाची उत्पत्ती आणि विश्वातील बदल ह्याच प्रक्रियेतून घडत असतात. [→परमाणुवाद, ग्रीक].

विश्वातील विविध वस्तू, त्यांत होताना दिसणारी परिवर्तने हा एक आभास आहे, असे पार्मेनिडीझचे म्हणणे असले, तरी ⇨ हेराक्‍लायटस (इ. स. पू. सु. ५३६-४७०) ह्या तत्त्वज्ञाच्या मते विश्वात स्थिर असे काहीही नाही. विश्वाच्या ठायी एकता आहे, परंतु ती सतत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. नदी एकच असली, तरी तिच्या गतिमान प्रवाहाचे पाणी मात्र सतत वेगळेच असते, तसेच हे आहे. हेराक्लायटसचे असेही म्हणणे होते, की अशा गतिमान विश्वाच्या ठायी जो सुसंवाद दिसतो, त्याचे कारण विश्वातील द्रव्यांच्या परस्परविरोधातून निर्माण होणारा ताण, हे आहे. विरोधातून निर्माण होणारा ताण संतुलन निर्माण करतो. ह्या संतुलनामुळे परस्परविरोधी गोष्टी वा द्रव्ये समरूपता पावतात, म्हणून युद्ध महत्त्वाचे ठरते विरोध, कलह महत्वाचा ठरतो. ह्याच कारणामुळे हेराक्लायटसला सर्व विश्व हे ‘अग्‍नी’ आहे असे वाटत होते. अग्‍नी योग्य प्रमाणात पेटवला जाणे आणि योग्य प्रमाणात तो विझणे ह्या परस्परविरोधी प्रक्रियांच्या ताणातून हे विश्व स्थिर आणि संतुलित राहते, अशी त्याची धारणा होती. त्याच्या मते अग्‍नी हा चिरंतन आहे तो ‘लॉगोस’ वा प्रज्ञा आहे तो स्वतःचे आणि स्वतःबरोबर अन्य वस्तूंचे नियमन करतो.

एम्पेडोक्लीझ (इ.स.पू.सु. ४९०-४३०) ह्या तत्त्वज्ञाच्या मते, विश्वातील प्रत्येक वस्तू पृथ्वी, आप, वायू आणि अग्‍नी ह्या चार मूलभूत द्रव्यांच्या , विशिष्ट प्रमाणात होणाऱ्या संयोगातून निर्माण झालेली असते. ह्या चार मूलभूत द्रव्यांचे प्रमाण वेगवेगळ्या वस्तूंत वेगवेगळे असल्यामुळे वस्तूंचे वेगळेपण निर्माण होते. विशिष्ट वस्तूमध्ये विशिष्ट प्रमाणात असलेली ही चार मूलद्रव्ये परस्परांपासून वेगळी झाली, की ती वस्तू नाहीशी होते. ह्या चार मूलद्रव्यांचे होणारे संयोग आणि वियोग हे अनुक्रमे प्रेमामुळे आणि कलहामुळे होतात, असेही एम्पेडोक्लीझचे म्हणणे आहे. ह्या संयोगा-वियोगांमुळे विश्व प्रेममय वा कलहमय होते.

क्लाझॉमेनीचा ॲनॅक्सॅगोरस (इ. स. पू. सु. ५००-४२८) ह्याने विश्वातील विविधता आणि परिवर्तने ह्यांचे स्पष्टीकरण परस्परांहून भिन्न अशा अनेक ‘बीजां’ च्या आधारे देण्याचा प्रयत्‍न केला आहे. आरंभी एकमेकांत मिसळून गेलेल्या आणि त्यामुळे विश्वाला साम्यावस्था प्राप्त करून देणाऱ्या ह्या बीजांना मन हे एखाद्या चक्री वादळाप्रमाणे विलक्षण गती देते. त्यामुळे आधी एकमेकांत मिसळून गेलेली ही बीजे एकमेकांपासून विलग होतात आणि ह्याचा परिणाम म्हणून विविध प्रकारच्या वस्तू निर्माण होतात. प्रत्येक वस्तूत सर्व प्रकारची बीजे अंशरूपांनी असतात, मात्र हे अंश प्रत्येक वस्तूत सारख्याच प्रमाणात असतील, असे नव्हे. एखाद्या वस्तूत काही बीजांश प्राधान्याने वा विशेष प्रभावी स्वरूपात असतात व त्यामुळे त्या वस्तूचे स्वरूप ठरते.

ॲनॅक्सॅगोरसच्या मते ‘मन’ हेही बीजांचेच बनलेले असते. ते अमर्याद स्वयंनियंत्रक व शुद्ध असे आहे. मन कशातही मिसळलेले नसते आणि मनातही काही मिसळलेले नसते. ग्रीक तत्त्वज्ञानात ‘मना’ ला स्वतंत्र पदार्थाचे स्थान देणारा हा पहिला तत्त्वज्ञ होय. [⟶ ग्रीक तत्त्वज्ञान].

कुलकर्णी, अ. र.

ज्योतिषशास्त्र

विश्वोत्पत्तीसंबंधीचे कुतूहल व विचार मानवाच्या आदिकालापासून चालू आहेत, हे वरील माहितीवरून लक्षात येते, तसेच विश्वाच्या कल्पनेबरोबरच विश्वोत्पत्तिशास्त्राची क्षितिजेही कशी वाढत गेली हेही त्यावरून दिसून येते. पुराणकाली पृथ्वी व आकाश हेच विश्वाचे दोन मुख्य भाग मानीत आणि ते व त्यांतील इतर घटक कसे उत्पन्न झाले याचाच विचार होत असे. अठराव्या शतकात प्रथम वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा विषय हाताळला जाऊ लागला, तेव्हा शास्त्रज्ञाचा भर सूर्यकुलाची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण मिळविण्यावर काय तो होता पण खगोलीय ज्ञानाची वाढ होऊन तारे, ⇨ आकाशगंगा व ⇨ दीर्घिका (तारामंडळे) यांचे खरे स्वरूप समजत गेले, तसे त्यांच्या उत्पत्तीचा विचारही विश्वोत्पत्तिशास्त्रात होऊ लागला. विश्व, दीर्घिका, तारकागुच्छ, सुटे तारे व तारकायुग्म आणि ग्रहमाला या क्रमाने संपूर्ण विश्व व त्यातील घटकांच्या उत्पत्तीचे आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने केलेले समीक्षण येथे दिले आहे. मूलद्रव्यांची व जीवांची उत्पत्ती या मुद्यांचाही या लेखात समावेश केला आहे.

विश्वाची उत्पत्ती व वयोमान : विसाव्या शतकाच्या प्रथम चरणात दीर्घिका हे विश्वाचे सर्वांत मोठे घटक होते, हे समजून आले आणि सर्व दीर्घिका एकमेकींपासून दूर जात असून त्यांचा एकमेकींपासून दूर जाण्याचा वेग त्यांच्या परस्पर अंतराच्या समप्रमाणात वाढत जातो, हा शोध ⇨एडविन पॉवेल हबल यांनी १९२६ मध्ये लावला. त्याचा अर्थ संपूर्ण विश्व प्रसरण पावत आहे असा होतो. प्रसरणाचा वेग दर दशलक्ष पार्सेकास (१ पार्सेक = ३·२५८ प्रकाशवर्षे = सु. ३·०८६ X १०१८सेंमी.) ६० ते १०० किमी./से. एवढा आढळतो. या संख्येस हबल स्थिरांक (H) म्हणतात. विश्वप्रसरणाचा वेग उलटविल्यास सर्व दीर्घिका साधारण २० अब्ज वर्षांपूर्वी एकाच बिंदूत केंद्रित झाल्या होत्या, असा निष्कर्ष निघतो. त्या वेळी ‘यीलम’ नावाचे विश्वद्रव्य अतिघन अवस्थेत असल्याने त्याचा स्फोट होऊन विश्वप्रसरणास सुरूवात झाली, असा एक सिद्धांत आहे. त्यास ‘महास्फोट सिद्धांत’(बिग बँग) म्हणतात. हा सिद्धांत प्रथम जी. लमेअत्र यांनी मांडला. पुढे ⇨जॉर्ज गॅमो यांनी त्याचा विस्तार केला. त्याप्रमाणे २० अब्ज वर्षे हे विश्वाचे वयोमान निघते. विश्वातील सर्व घटकांची वयोमाने यापेक्षा कमीच आढळतात उदा, तारे व तारकागुच्छ यांची वयोमाने ६० लाख ते ६ अब्ज वर्षे असून सूर्याच्या ग्रहमालेतील पृथ्वी, चंद्र व अशनी (उल्काखंड) यांचे वयोमान ४·५ अब्ज वर्षे आहे.

महास्फोट सिद्धांतात विश्वाची सतत उत्क्रांती होत जाऊन प्रसरणामुळे विश्व शेवटी रिकामे होईल असा अंदाज करता येतो. १९४८ च्या सुमारास ह्या सिद्धांतात दोन अडचणी येत. विश्वाची प्रारंभिक एकमेवाद्वितीय स्थिती ही एक आणि दुसरी म्हणजे कमी वयोमान ही होय. ह्या अडचणी टाळण्यासाठी ‘निरंतर स्थितीचा सिद्धांत’ एच्. बाँडी, टी. गोल्ड व ⇨ फ्रेड हॉईल यांनी मांडला. त्यात विश्वाची घनता नेहमी सारखीच ठेवण्यासाठी प्रसरणाने उत्पन्न झालेल्या पोकळीत हायड्रोजन अणू एकसारखे उत्पन्न होतात, असे मानावे लागते. विश्वाच्या ह्या प्रतिकृतीत (नमुन्यात) विश्वाचे सर्व गुण सरासरी मानाने सर्वस्थानी व सर्वकाळी सारखेच राहतात, हे तत्व आधारभूत मानतात. त्याला ‘परिपूर्ण वैश्विक तत्त्व’ असे नाव आहे. अर्थात विश्वाचे काही घटक पुरातन व काही नव्याने उत्पन्न झाले असतील पण त्यांचे सरासरी वय नेहमी तेच राहील. अलीकडे शोध लागलेल्या ⇨कासार व इतर रेडिओ उद्‌गमांच्या (ज्योतींच्या) अवलोकनावरून ही अनुमाने चूक आहेत, असे दिसते. लांबचे (म्हणून जुने) रेडिओ उद्‌गम (रेडिओ तरंग उत्सर्जित करणाऱ्या खस्थ ज्योती) जवळच्या (म्हणजे नव्या) उद्‌गमांपेक्षा भिन्न असल्याचा पुरावा मिळतो. त्यामुळे निरंतर स्थितीच्या सिद्धांतास पुष्टी मिळत नाही परंतु आता सर्वच कासार ज्योती अतिदूर अंतरावर आहेत का, याबद्दल शंका उत्पन्न झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

उत्क्रांत होणारे विश्व प्रसरण पावून रिकामेच झाले पाहिजे असे नाही. विश्वातील द्रव्याची घनता ठराविक प्रमाणांपेक्षा जास्त असल्यास द्रव्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे विश्वाचे प्रसरण कमी होऊन थांबू शकते एवढेच नव्हे तर त्यापुढे जाऊन ते आकुंचन पावू शकते. आकुंचनाने सबंध विश्वद्रव्य एका बिंदूत केंद्रित झाल्यावर त्याचा स्फोट होऊन पुन्हा विश्व प्रसरण पावेल. अशा रीतीने पुनःपुन्हा आकुंचन व प्रसरण पावणारे विश्व मानणारा ‘स्पंदमान विश्वा’चा तिसरा सिद्धांत आहे. दूरस्थित उद्‌गमांच्या अधिकाधिक प्रसरण वेगावरून हे चित्र सत्यस्थितीशी जुळणारे वाटते. विश्वाचा स्पंदनकाल ७०-८० अब्ज वर्षे असावा, असा ⇨ॲलन रेक्स सँडेज या ज्योतिर्विदांचा अंदाज आहे.

या तिन्ही विश्वसिद्धांतांचा विचार ‘विश्वस्थितिशास्त्र’ या नोंदीत विस्ताराने आलेला आहे. तेथेच आल्फव्हेनप्रणीत द्रव्य व प्रतिद्रव्य यांच्या मिश्रणाने बनलेल्या विश्वाचाही विचार आला आहे.

दीर्घिकांची उत्पत्ती : व्यापक सापेक्षता सिद्धांताचा [⟶ सापेक्षता सिद्धांत] उपयोग करून महास्फोटाच्या सुरुवातीस असलेल्या विश्वपरिस्थितीचे अनुमान करता येते. त्यावेळी द्रव्याच्या घनतेपेक्षा प्रारणाची (तरंगरूपी ऊर्जेची) घनता १० कोटी पटींनी अधिक होती. म्हणजेच विश्व आरंभकाली तेजोमय होते, असे म्हणता येईल. विश्वोत्पत्तीपासून एक सेकंदानंतर त्याचे तापमान १·५ X १०१० केल्व्हिन व द्रव्यघनता १०-३ ग्रॅ./घ.सेंमी. एवढी असावी. प्रसरणामुळे तापमान व त्याबरोबरच प्रारणघनता कमी होत जाऊन अंदाजे ५ X १० वर्षानंतर प्रारणाच्या मानाने द्रव्याचे महत्व अधिक होईल. पुढे विश्वतापमान १०० के. व द्रव्यघनता दर दहा लाख लिटरमध्ये एक हायड्रोजन अणू एवढी झाल्यावर त्यात गुरुत्वाकर्षणामुळे द्रव्य एकत्र जमून दीर्घिका तयार झाल्या असे दिसते. स्वगुरुत्वाकर्षणामुळे संगठन होण्यासाठी आकुंचन पावणाऱ्या भागाचे द्रव्यमान एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असले पाहिजे, असे ⇨ जेम्स हॉपवुड जीन्स यांनी सिद्ध केले. त्याला ‘जीन्स निकष’ (मानदंड) म्हणतात. वर निर्देशिलेल्या परिस्थितीत हे द्रव्यमान एक कोटी सूर्यद्रव्यमानाएवढे येते व त्या वेळी त्याचा व्यास १० ते २० हजार प्रकाशवर्षे (१ प्रकाशवर्षे = ९·४६ X १०१७ सेंमी.) येतो. हे आकडे लघू दीर्घिकांच्या आकारमानाशी चांगले जुळतात. तेव्हा या व याहून मोठ्या दीर्घिकांची उत्पत्ती होण्यास परिस्थिती अनुकूल होती.

तथापि यात एक अडचण आहे. जीन्स निकष स्थिर द्रव्यास लागू होतो. प्रसरण पावणाऱ्या विश्वात तो दीर्घिका उत्पन्न करण्यास अपुरा पडतो. यावर एक उपाय आहे. प्रसरण पावणाऱ्या विश्वाच्या ⇨ विश्वस्थितिशास्त्रात निरनिराळ्या प्रतिकृती सापडतात. त्यांतील एका प्रतिकृतीत (हिला लमेअत्र प्रतिकृती म्हणतात) विश्व सुरुवातीच्या प्रसरणानंतर अनिश्चित कालापर्यंत स्थिर राहते व नंतर पुन्हा प्रथम हळू व पुढे जोरात प्रसरण पावते. या मध्यंतराच्या स्थिर कालात दीर्घिका उत्पन्न होऊ शकतात. ⇨ सर आर्थर स्टॅन्ली एडिंग्टन यांनी तर असे सुचविले आहे की, दीर्घिका उत्पन्न झाल्यामुळे जी ऊर्जा मुक्त झाली तीमुळेच विश्व पुन्हा प्रसरण पावू लागले.

एखाद्या स्थानी दीर्घिकेचे संगठन होण्यास प्रत्यक्ष कारण कोणते, या प्रश्नास दोन पर्यायी उत्तरे आहेत. हॉईल यांनी असे दाखविले आहे की, १०,००० के. तापमानाचा आयनीभूत (विद्युत् भारित अणूंचा बनलेला) हायड्रोजन वायू समतोलावस्थेत असतो, म्हणजे त्याचे आकुंचन किंवा प्रसरण होत नाही. तापमान कमी झाल्यास आकुंचन व वाढल्यास प्रसरण होते. तेव्हा प्रसरण पावणाऱ्या विश्वात ज्या ठिकाणी तापमान आसपासच्या मानाने कमी होईल,तेथे दीर्घिकेचे संगठन होऊ शकते. सी. फोन व्हिट्‌सझेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वात प्रक्षोभ (खळबळाट) असणार आणि प्रक्षोभाचे लहानमोठे आवर्तही (भोवरेही) असणार. त्यांपैकी काही आवर्त एक प्रकारे गोठून स्वगुर त्वाकर्षणाने त्यांच्या दीर्घिका बनू शकतात परंतु लहानमोठ्या प्रक्षोभ– आवर्तांच्या परस्पर संघर्षामुळे नियमित गतीचे अनियमित ऊष्मीय गतीत रूपांतर होते व मोठ्या आवर्तांचे लहान आवर्तांत रूपांतर होत राहते. यामुळे दीर्घिका उत्पन्‍न होण्यास बाधा येते. तरी पण प्रक्षोभामुळे कोनीय गती उत्पन्न होऊन दीर्घिकेचा आकार निश्चित होतो. विवृत्तीय (लंबवर्तुळाकार), चक्रभुजीय व रचनाविरहित (अनियमित) असे दीर्घिकांचे तीन प्रमुख प्रकार आढळतात. ही केवळ एकाच प्रकारच्या दीर्घिकांची उत्क्रांतीमुळे झालेली निरनिराळ्या वेळची रूपांतरे होत, असे पूर्वी मानीत असत पण सर्व प्रकारच्या दीर्घिकांत जुन्यात जुने तारे सापडतात, तेव्हा त्यांची वयोमाने सारखीच असली पाहिजेत. एकंदरीत रचनाप्रकार दीर्घिकेच्या वयोमानावर अवलंबून नाही. प्रारंभी मिळालेल्या कोनीय संवेगाप्रमाणे (वलन करणाऱ्या वस्तूचे निरूढी परिबल म्हणजे कोनीय वेगाला होणाऱ्या विरोधाचे माप – गुणिले तिचा कोनीय वेग या राशीप्रमाणे) दीर्घिकांची रचना ठरते, असे आता मानतात. कोनीय संवेग कमी असला म्हणजे दीर्घिका विवृत्तीय आकार घेतात आणि अधिक असेल, तर त्यांना चपटे चक्रभुजीय रूप प्राप्त होते, प्रक्षोभ फारच अधिक असल्यास नियमित कोनीय गती नसल्याने रचनाविरहीत दीर्घिका उत्पन्न होते.

शंभर ते हजार दीर्घिकांचे समूह पण विश्वात आढळतात. त्यांना विश्वाचे महत्तम घटक मानावे का, असा प्रश्न उत्पन्न होतो. कित्येक समूह पार्श्वभूमीतील सुट्या दीर्घिकांपासून नाममात्रपणे भिन्न दिसतात आणि इतर बरेच समूह विघटित होत असल्यासारखे वाटतात. यावरून दीर्घिकांचे समूह मूलगामी नसून आपाततः एकत्र होतात व कालांतराने मोडतात, असे अंवर्त्सुमियन यांचे मत आहे. याच्या उलट हे समूह समतोलावस्थेत असून बऱ्याच समूहांचे मिळून झालेले महासमूह पण विश्वात आहेत, असे जी. डि-व्होकोल्यूर इत्यादींचे मत आहे.

तारकागुच्छांची उत्पत्ती : नुकत्याच उत्पन्न झालेल्या दीर्घिकेतील द्रव्य आकुंचन पावू लागल्यावर त्याची घनता वाढत जाते. ती दर घ.सेंमी. मध्ये एक दशांश ते एक हायड्रोजन अणू इतकी झाली म्हणजे जीन्स निकषाप्रमाणे एक लाख सूर्यद्रव्यमानाचे भाग स्वतंत्र होऊन त्यांचे स्वगुरुत्वाकर्षणाने आकुंचन होते. हे द्रव्यमान गोलाकार तारकागुच्छाइतके असल्याने या भागांची पुढे वर्णन केल्याप्रमाणे शकले होऊन त्यांचे लाखो तारे बनतात व अशा रीतीने गोलाकार तारकागुच्छांचा जन्म होतो. हे तारकागुच्छ दीर्घिकेतील सर्वांत जुने, म्हणजे ६ – ७ अब्ज वर्षे वयोमानाचे, घटक होत. गोलाकार तारकागुच्छात तारे अत्यंत दाटीने एकमेकांच्या आकर्षणात बद्ध असल्याने या तारकागुच्छांचे लवकर विघटन होत नाही. याशिवाय त्यांच्यात अति-उत्क्रांत अवस्थेतील लाल महातारे भरपूर सापडतात आणि त्यांतील ताऱ्यांच्या वर्णपटात धातूंच्या रेषा कमी तीव्र असतात, म्हणजे त्यांच्या द्रव्यात धातूंचे प्रमाण कमी असते [⟶ तारा]. यावरूनही गोलाकार तारकागुच्छांचे पुराणत्व सिद्ध होते, हे पुढे मूलद्रव्यांच्या उत्पत्तीचा विचार करताना लक्षात येईल. गोलाकार तारकागुच्छ उत्पन्न झाले त्या वेळी दीर्घिका भ्रमणाने चपटी झाली नसल्याने या तारकागुच्छाचा किरीटच दीर्घिकेभोवती तयार झाल्यासारखा दिसतो.

याशिवाय दीर्घिकेत शंभर ते हजार तारे सामावलेले विरल तारकागुच्छ पण सापडतात. यात उष्ण निळ्या भारी (जड) ताऱ्यांचा भरणा असल्याने त्यांचे वयोमान दहा लाख ते २०-३० कोटी वर्षे एवढे निघते. त्यांच्या विरलपणामुळे त्यांचा विघटनकालही कमी असतो. हे तारकागुच्छ दीर्घिकेच्या मध्यपातळीत दाट धुलिमेघात सापडतात. तेव्हा ते अलीकडेच या धूलीमेघात उत्पन्न झाले असले पाहिजेत. त्यांच्या वर्णपटात धातूंच्या रेषा तीव्र असल्याने त्यांत धातूंचे प्रमाण अधिक आहे. यावरूनही त्यांचे अल्प वय स्पष्ट दिसते. काही अगदी नवे तारकागुच्छ असे आढळतात की, त्यांतील तारे एकमेकांपासून अलग होत आलेले दिसतात. ही अंबर्त्सुमियनप्रणीत नामाभिधानाप्रमाणे ‘प्रसरण पावणारी तारकाकुले’ कशी उत्पन्न झाली यासंबंधी ⇨ यान हेंड्रिक ऊर्ट यांची एक कल्पना आहे. प्रथम मध्यभागी एक अतिउष्ण तारा उत्पन्न झाला. त्याच्या प्रारणाच्या दाबामुळे सभोवतालच्या आंतरतारकीय द्रव्यात वेगवेगळे गोल संगठित झाले व दूर फेकले गेले. हीच ती प्रसरण पावणारी तारकाकुले होत. त्यांच्या अस्तित्वावरून व सर्वच विरल तारकागुच्छांचे हळूहळू विघटन होत जाते त्यावरून दीर्घिकेतील सर्व तारे तारकागुच्छात निरनिराळ्या वेळी उत्पन्न झाले असावेत आणि कालांतराने दीर्घिकेत सर्वदूर पसरले असावेत, असे दिसते.

विरल तारकागुच्छात उत्पन्न झालेल्या नव्या ताऱ्यांना I सामूहिक तारे (तारकासमुदाय – १) व गोलाकार तारकागुच्छांबरोबर उत्पन्न झालेल्या जुन्या ताऱ्यांना II सामूहिक तारे (तारकासमुदाय – २) अशी नावे ⇨व्हाल्टर बाडे यांनी दिली आहेत. पहिल्या समुदायातील तारे दीर्घिकेच्या मध्यपातळीत आणि चक्रभुजांत सापडतात तर दुसऱ्या समुदायातील तारे दीर्घिकेच्या केंद्रभागी व किरीटात सापडतात. चक्रभुजांच्या बाहेर पण दीर्घिकेच्या मध्यपातळीत आढळणारे सूर्यासारखे सर्वसाधारण तारे २ ते ४·५ अब्ज वर्षे या मध्यम वयोमानाचे आहेत. [⟶ तारा दीर्घिका].

ताऱ्यांची उत्पत्ती : ताऱ्यांची द्रव्यमाने १०० सूर्यद्रव्यमानांपेक्षा कमी आढळतात. याहून मोठे तारे असू शकत नाही, असे सैद्धांतिक पद्धतीने सिद्ध करता येते. इतक्या कमी द्रव्यमानाचा द्रव्यमेघ स्वगुरुत्वाकर्षणाने ताऱ्याच्या रूपात संगठित होणे जीन्स निकषाप्रमाणे साधारण परिस्थितीत शक्य नाही. तेव्हा वर वर्णन केल्याप्रमाणे १,००० ते एक लाख सूर्यद्रव्यमानाच्या मेघांचे आकुंचन होत असता त्यांची शकले होऊन तारे उत्पन्न होतात असे दिसते. शकले कशी होतात याबद्दल मॅक्रे यांची एक कल्पना आहे. तारकागुच्छाचा मूलमेघ आकुंचन पावून एक प्रचंड तारा होण्याचा प्रयत्‍न करतो. त्याच्या केंद्रभागी अणुकेंद्रीय विक्रिया इतक्या वेगाने होतात की, संपूर्ण ताऱ्याचा एक प्रचंड स्फोट होतो. या स्फोटात उत्पन्न झालेल्या आघात तरंगांच्या दाबामुळे मेघात लहान लहान गोळे जमण्यास मदत होते. अशा रीतीने सुटे तारे उत्पन्न होतात.

आकुंचन पावणाऱ्या द्रव्यमेघाचे द्रव्यमान सूर्याच्या दहा कोटी पटींइतके मोठे असल्यास त्याच्या आकुंचनाला सीमा राहत नाही. म्हणून अंतःस्फोटाने (आकुंचन स्फोटाने) गुर त्वाकर्षणीय ऊर्जेचे प्रारणीय व इतर प्रकारच्या ऊर्जांमध्ये रूपांतर होते. अशा रीतीने १०६० अर्ग ऊर्जा बाहेर फेकणे शक्य होते. क्वासार ज्योतींची ऊर्जा इतकीच मोठी असल्याने त्या ज्योती म्हणजे दहा कोटी सूर्यद्रव्यमानांचे प्रचंड तारे असावेत, असा एक तर्क आहे.

तारा ज्या द्रव्यमेघात उत्पन्न होतो त्यातील कोनीय संवेग व चुंबकीय क्षेत्र ताऱ्यात टिकून राहते. म्हणून अक्षीय भ्रमण करणारे तसेच चुंबकीय तारे उत्पन्न होतात. कोनीय संवेग अत्यधिक असल्यास एकमेकांभोवती फिरणाऱ्या ताऱ्यांची युग्मे उत्पन्न होतात, दीर्घिकेतील अर्ध्याहून अधिक तारे तारकायुग्म प्रणालींचे घटक असल्याचे दिसून येते. आता दोन तारे आपापल्या मार्गाने आक्रमण करीत असता एकत्र येऊन तारकायुग्मे तयार होण्याची सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) संभाव्यता अत्यल्प आहे. तसेच एका मोठ्या ताऱ्याचे विभाजन होऊन तारकायुग्म बनणे सुद्धा अशक्य आहे. तेव्हा अधिक कोनीय संवेगामुळे मूलमेघातच दोन गुरूत्वाकर्षणीय केंद्रे उत्पन्न होऊन तारकायुग्म बनते, हा पर्याय अधिक सयुक्तिक वाटतो.

दीड-दोन सूर्यद्रव्यमानांपेक्षा भारी ताऱ्यात कोनीय संवेग द्रव्यमानाच्या ५/३ घाताबरोबर वाढत जातो पण त्याहून कमी द्रव्यमानाच्या ताऱ्यात त्याचे प्रमाण एकदम कमी होते. हा लुप्त झालेला कोनीय संवेग सूर्याच्या बाबतीत त्याच्या ग्रहांच्या गतीत आढळतो. तेव्हा या सर्व लहान ताऱ्यांभोवती ग्रहमाला असाव्यात, असे अनुमान करतात. एकंदरीत, जलद अक्षीय भ्रमण करणारे सुटे तारे, तारकायुग्मे व ग्रहमाला हे एकाच प्रक्रियेचे द्रव्यमान व कोनीय संवेग यांवर अवलंबून असलेले निरनिराळे परिणाम होत, हे स्पष्ट होते. [⟶ तारा].

सूर्यकुलाची उत्पत्ती : विश्वोत्पत्तिशास्त्राचा हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपली एकच ग्रहमाला माहीत असल्याने तिचे विवरण कठीण पण कुतूहलपूर्ण भासते. ग्रहमालेचे काही महत्वाचे गुण असे आहेत : (१) बहुतेक सर्व ग्रह व उपग्रह यांचे कक्षीय भ्रमण आणि त्यांचे व सूर्याचे अक्षीय भ्रमण पश्चिम-पूर्व या एकाच दिशेत होते. यावरून सर्वाना कोनीय संवेग मिळण्याच्या मूलस्त्रोत एकच असला पाहिजे. (२) सूर्याचे द्रव्यमान ग्रहांच्या ७५० पट असले, तरी त्याचा कोनीय संवेग ग्रहांच्या कोनीय संवोगाच्या १/२०० भागाएवढाच आहे. कोनीय संवेगाची ही असम विभागणी कशी झाली ते समजणे आवश्यक आहे. (३) ग्रहांची सूर्यापासूनची अंतरे बोडे नियमाला (योहान एलर्ट बोडे यांच्या नावावरून पडलेले नाव) धरून आहेत. र (न) हे न व्या ग्रहाचे अंतर मानल्यास र (न) = ०·४ + ०·३ X २ हा बोडे नियम होय. यात बुधास न = – ∞, शुक्रास न = ०, पृथ्वीस न = १ इ. धरावे. (४) उपग्रह प्रणालींचा आपापल्या ग्रहांशी असलेला संबंध जवळजवळ ग्रहांचा सूर्याशी आहे तसाच आहे पण उपग्रहांचा कोनीय संवेग त्यांच्या वस्तुमानाप्रमाणेच ग्रहापेक्षा पुष्कळ कमी आहे. (५) ग्रहांचे तीन गट पडतात : बुध ते मंगळ हे पृथ्वीसदृश ग्रह कमी द्रव्यमानाचे, छोटे व अधिक घनतेचे आहेत आणि त्यांत हायड्रोजन, हीलियम व ऑक्सिजन-निऑन इ. उडून जाऊ शकणारे वायू अत्यंत कमी प्रमाणात आहेत. गुरू व शनी या गुरूसदृश मोठ्या व भारी ग्रहांची १ ग्रॅ / घ.सेमी.च्या आसपास असून त्यांत हायड्रोजन-हीलियम सकट सर्व मूलद्रव्ये सौर प्रमाणात आहेत आणि प्रजापती व वरूण हे बाहेरचे ग्रह मध्यम वस्तुमानाचे व २ ग्रॅ. / घ.सेंमी. घनतेचे असून त्यांत हायड्रोजन व हीलियम सोडले तर इतर मूलद्रव्ये सौर प्रमाणात आहेत.

ग्रहमालेच्या उत्पत्तीसंबंधी मांडलेले विविध सिद्धांत असे आहेत : (अ) अठराव्या शतकात ⇨ इमॅन्युएल कांट व ⇨ प्येअर सीमॉ मार्की द लाप्‍लास यांनी त्यांचा ‘अभ्रिका सिद्धांत’ (किंवा परिकल्पना) मांडला. त्यात अक्षीय भ्रमण करणारी एक वायुमय अभ्रिका आकुंचन पावू लागते. आकुंचनात कोनीय संवेग कायम ठेवण्यासाठी तिची कोनीय गती वाढते व त्यामुळे ती चपटी होते. कोनीय गती फार वाढली म्हणजे विषुववृत्तीय पातळीत एक वलय बाहेर फेकले जाते व त्यात पुढे एक ग्रह संगठित होतो. आकुंचन क्रिया जसजशी पुढे सरकते, तसतशी आणखी वलये बाहेर फेकली जाऊन त्यांत इतर ग्रह उत्पन्न होतात. शेवटी मधल्या गोळ्याचा सूर्य बनतो. या सिद्धांताप्रमाणे सर्वांत मोठ्या सूर्याचा कोनीय संवेग त्याच्या द्रव्यमानाच्या प्रमाणात म्हणजे ९९·९% असला पाहिजे. प्रत्यक्ष ग्रहमालेत तो ०·५ % एवढाच असल्याने हा सिद्धांत अपुरा ठरतो.

(आ) १९०० मध्ये ⇨ ओएन चेंबरलिंन व एफ्.आर्. मोल्टन यांनी त्यांची ‘आघात परिकल्पना’ किंवा ‘संयुती सिद्धांत’ मांडला. त्याप्रमाणे एक आगंतुक तारा सूर्याच्या अगदी जवळून गेल्यामुळे सूर्यावर एक प्रचंड लाट उठली व तो तारा दूर गेल्यावर लाटेतील द्रव्य थंड होऊन त्यात ग्रह उत्पन्न झाले परंतु यातही ग्रहांना फार थोडा कोनीय संवेग मिळतो. म्हणून लिटिलटन, हॉईल इत्यादींनी असा तर्क केला की, सूर्याच्या जोडीला पूर्वी आणखी एक तारा होता. एक तिसरा आगंतुक तारा येऊन त्याने सूर्याच्या जोडीदाराला टक्कर दिली व त्याचे तुकडे होऊन ते बाहेर फेकले गेले पण काही भाग मागे राहून त्यात ग्रह उत्पन्न झाले. अशा रीतीने कोनीय संवेगाचा प्रश्न सुटला, कारण सूर्याच्या जोडीदाराचा कोनीय संवेग ग्रहांना आपोआपच मिळाला परंतु नोल्के व स्पिट्‌झर यांनी दाखवून दिले की, ताऱ्याचा उर्वरित भाग इतका गरम असेल की, त्यात ग्रह संगठित होण्याऐवजी तो वायू प्रसरण पावून अवकाशात विलीन होईल. या सिद्धांताविरूद्ध आणखी दोन मुद्दे प्रस्तुत करता येतात. एक तर ताऱ्यांमध्ये टक्कर होण्याची शक्यता अत्यल्प आहे. दुसरा मुद्दा असा की, पृथ्वीची अंतर्रचना व तिच्या वातावरणाचे रासायनिक संगठन समजण्यासाठी पृथ्वी सुरुवातीस गरम नसून थंड होती व किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) द्रव्यांमुळे पुढे गरम झाली असे मानावे लागते, हे ⇨हॅरल्ड क्‍लेटन यूरी यांनी स्पष्ट केले आहे.

(इ) १९४० नंतर अभ्रिका सिद्धांत बदललेल्या स्वरूपात पुन्हा पुढे आला. त्यात सूर्य अगोदर तयार झाला व त्याच्याभोवती जमा झालेल्या अभ्रिकेत ग्रह मागून तयार झाले असे मानतात. ग्रहांचे संगठन करण्यासाठी व्हिट्‌सझेकर (१९४५) अभ्रिकेतील प्रक्षोभामुळे उत्पन्न झालेल्या आवर्ताचा उपयोग करतात, कुइपर (१९५०) अभ्रिकेच्या निरनिराळ्या भागांतील कमीजास्त द्रव्यधनतेचा आधार घेतात आणि ⇨ हान्नेस आल्फव्हेन (१९४२) विद्युत्‌ भाररहित व आयनीभूत (विद्युत्‌ भारित) अणूंवर होणारे वेगवेगळे विद्युत्‌ चुंबकीय परिणाम लक्षात घेतात, पण या सर्व विवेचनांत सूर्य व अभ्रिका वेगळे काढल्यामुळे कोनीय संवेगाचा प्रश्नच डावलण्यात आला आहे.

(ई) पृथ्वी, चंद्र, अशनी यांची वयोमाने सूर्याच्या वयोमानाशी जुळत असल्याने सूर्य व ग्रह जवळजवळ एकाच वेळी उत्पन्न झाले हे दिसून येते. ग्रहमाला, तारकायुग्मे, जलद अक्षीय भ्रमण करणारे तारे हे सर्व एकाच प्रक्रियेचे परिस्थितीनुसार झालेले निरनिराळे परिणाम होत, हे आपण वर पाहिलेच आहे. म्हणून सूर्यकुलाच्या उत्पत्तीत सूर्य व ग्रह यांची सहउत्पत्ती लक्षात घेणे जरूर आहे. अशा प्रकारचे पुढील दोन आधुनिक सिद्धांत सध्या प्रचलित आहेत.

(१) मॅक्रे सिद्धांत : येथे ज्या वायुधूलीमेघात सूर्य व ग्रह उत्पन्न झाले तो एकसंघ न मानता त्यात साधारणपणे ५,००० छोटे छोटे पुंजके होते व ते इतस्ततः निरनिराळ्या गतींनी विचरण (भ्रमण) करीत होत, असे मानतात. पुंजक्यांमध्ये आपसात टक्कर होऊन काही पुंजके मोडतील तर काही एकमेकांना चिकटून मोठे होतील. एखादा पुंजका इतरांपेक्षा विशेष मोठा झाला म्हणजे त्याकडे इतर लहान पुंजके आकर्षिले जातील. त्यात त्या मध्यपुंजक्याकडे सर्व बाजूंनी सरळ येणाऱ्या पुंजक्यांचा भरणा अधिक असल्याने त्याला कोनीय संवेग मिळणार नाही. उरलेले पुंजके त्या मध्यपिंडाभोवती केप्लरप्रणीत कक्षांत फिरत राहतील. त्यांपैकी विरूद्ध दिशांत फिरणारे पुंजके एकत्र आले म्हणजे त्यांचा कोनीय संवेग नष्ट होऊन ते मधल्या मोठ्या गोलास म्हणजे प्रसूर्यात (आद्य सूर्यात) पडतील. शेवटी साधारण २०० पुंजके त्या प्रसूर्याभोवती एकाच दिशेत फिरत राहतील. त्यातच पुढे ग्रह उत्पन्न होतील. अशा रीतीने सूर्यास कमी व ग्रहांना अधिक कोनीय संवेग प्राप्त होऊ शकतो. प्रसूर्य आकुंचन पावून सूर्य होतो, त्याच वेळी बाहेर ग्रह उत्पन्न होत असल्यामुळे त्यांचे वयोमानही एकसारखेच असते. ग्रह उत्पन्न होण्यासाठी प्रथम लोहकण एकत्र येऊन त्यांचा एक गाभा तयार होतो. त्यावर नंतर वालुकण व शेवटी हायड्रोजन, हीलियम इ. वायूंचे अणू जमा होतात. सूर्याजवळच्या भागात तापमान जास्त असल्याने हायड्रोजन, हीलियम व इतर उडून जाणारे वायू जमणे शक्य नसते. म्हणून आतल्या ग्रहात हे वायू सापडत नाहीत. ग्रहांभोवती उपग्रह असेच उत्पन्न होतात.

(२) हॉईल सिद्धात : यात कांट-लाप्लास कल्पनेप्रमाणे आकुंचन होणाऱ्या चपट्या गोलाच्या विषुववृत्तीय भागातून प्रथम एक वलय बाहेर पडते पण ते चुंबकीय क्षेत्ररेषांनी आतल्या प्रमुख गोलाशी जोडलेले राहते. मधला गोल अधिक आकुंचन पावून जोरात अक्षीय भ्रमण करू लागला म्हणजे चुंबकीय क्षेत्ररेषांच्या बंधनामुळे ही गती बाहेरच्या वलयाला दिली जाते. अशा रीतीने मधल्या प्रसूर्याचा कोनीय संवेग वलयास दिला जाऊन ते दूर सरकत जाते. म्हणूनच पुढे वलयात उत्पन्न होणाऱ्या ग्रहांना मूळ वायुगोलाचा जवळजवळ सर्व कोनीय संवेग प्राप्त होतो.

सुरुवातीस वलय १,००० के. इतक्या तापमानाचे असल्याने उडून न जाणाऱ्या द्रव्याचे घनीभवन होऊन त्याचे कण तयार होतात. सूर्याजवळच्या भागातील १०० सेंमी.पेक्षा लहान कण व वायू वलयाबरोबर सूर्यापासून दूर निघून जातात. उरलेल्या घन कणांचे मग अधिक घनतेचे अंतर्गह बनतात. ५ ज्योतिषशास्त्रीय एकक (पृथ्वी व सूर्य यांतील सरासरी अंतराला ज्योतिषशास्त्रीय एकक म्हणतात व १ ज्योतिषशास्त्रीय एकक = १४·९५९९ कोटी किमी.) अंतरावर मात्र १० मी. आकारमानाचे दगडही मागे राहतात व त्यांचेच बृहदग्रह बनून त्यांवर हायड्रोजन व हीलियमसकट सर्व वायू जमा होतात. अगदी बाहेरच्या भागात मात्र द्रव्याची सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाबाहेर पडण्याची गती कमी असल्याने हायड्रोजन व हीलियम हे सर्वांत हलके वायू ग्रह बनण्यापूर्वीच सूर्यकुलाच्या बाहेर निघून जातात.

अशा रीतीने आपल्या ग्रहमालेचे सर्व गुण या सिद्धांतात जमविता येतात. उपग्रहांची उत्पत्ती वरील पद्धतीनेच होते. चुंबकीय क्षेत्ररेषांचे बंधन परिणामकारक होण्यास मध्य ताऱ्याच्या बाह्य आवरणात प्रवहन (अभिसरण) चालू असावे लागेल. ताऱ्यांच्या वर्णपटीय F5 ते M वर्गात [⟶ तारा] हे शक्य असल्याने या ताऱ्यांभोवती ग्रहमाला असण्याची शक्यता आहे. नेमक्या याच ताऱ्यांचा अक्षीय भ्रमण वेग व कोनीय संवेग इतरांपेक्षा कमी आढळतो, हा त्यांच्याभोवती ग्रहमाला असल्याचा अप्रत्यक्ष पुरावा मानला पाहिजे. [⟶ सूर्यकुल].

मूलद्रव्यांची उत्पत्ती : विश्वात सर्वदूर म्हणजे आकाशगंगेतील बहुतेक ताऱ्यांत, आंतरतारकीय द्रव्यात, सूर्यकुलातील ग्रहांत व अशनींत, तसेच बाह्य दीर्घिकांत मूलद्रव्यांचे प्रमाण एकसारखेच आढळते. यावरून सर्व मूलद्रव्ये एकाच वेळी किंवा एकाच प्रकाराने सर्वदूर उत्पन्न झाली असावीत. मूलद्रव्यांची उत्पत्ती समजण्यासाठी त्यांच्या सापेक्ष प्रमाणासंबंधाचे पुढील महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत : (१) मूलद्रव्यांचे प्रमाण अणुभार (A) वाढतो, तसे exp (-KA) याप्रमाणे कमी होत जाते. हा नियम १०० अणुभारापर्यंत म्हणजे चांदीपर्यंत लागू होतो. यापुढे मात्र मूलद्रव्याचे प्रमाण बरेच हळू कमी होते व युरेनियम (२३८) येथे एकदम संपुष्टात येते. याशिवाय Fe56 जवळील मूलद्रव्यांचे प्रमाण आसपासच्या अणूंपेक्षा अधिक आढळते, यालाच लोह-शिखर म्हणतात. अशीच प्रमाणांची छोटी शिखरे Si88, Ba138, Pb206 या ५०, ८२ व १२६ न्यूट्रॉन असलेल्या अणूंजवळ आढळतात. (२) सर्वसाधारणपणे सम अणुभारांच्या अणूंचे प्रमाण विषम अणुभारांच्या अणूंपेक्षा जास्त आढळते. त्यातही ४ ने भाग जाणाऱ्या अणुभारांचे C, O, Ne इ. अणू अधिक प्रमाणात सापडतात. (३) D, Li, Be, B यांचे प्रमाण त्यांच्याजवळील H, He, C, N, O या अणूंच्या प्रमाणापेंक्षा पुष्कळच कमी आहे.

गॅमो यांच्या महास्फोट सिद्धांतातील ‘यीलम’ प्रसरण पावू लागल्यावर प्रथम त्याचे न्यूट्रॉन वायूत रूपांतर होते व काही न्यूट्रॉन फुटून त्यांचे प्रोटॉन व इलेक्ट्रॉन बनतात. यानंतर प्रोटॉन व न्यूट्रॉन ठराविक प्रमाणात एकत्र येऊन निरनिराळे अणू पहिल्या दोन तासांतच उत्पन्न होतात व अशा रीतीने त्यांचे प्रमाण नेहमीसाठी गोठून जाते. या क्रियेत विश्वस्थिती एकसारखी बदलत असल्याने त्याला अणूंच्या उत्पत्तीची ‘असमतोल प्रक्रिया’ म्हणतात. त्यात निरनिराळ्या अणूंचे प्रमाण त्यांच्या न्यूट्रॉन शोषणक्षमतेच्या व्यस्त प्रमाणात राहील. न्यूट्रॉन शोषणक्षमता A = १ ते १०० पर्यंत वाढत जाते आणि त्यामुळे ती जवळजवळ स्थिर राहते, यावरून विश्वातील अणूंचे प्रमाण स्पष्ट होते. ५०, ८२ व १२६ न्यूट्रॉन असलेल्या अणूंची न्यूट्रॉन शोषणक्षमता अत्यंत कमी असल्याने त्यांचे अधिक प्रमाणही समजू शकते परंतु हीच गोष्ट लोह-शिखरास लागू होत नाही, कारण त्यातील अणू न्यूट्रॉन शोषण करण्यास चांगलेच समर्थ असतात. शिवाय हीलियम अणू अत्यंत चिरस्थायी असल्याने त्यात न्यूट्रॉनांचे शोषण होऊन अधिक अणुभाराचे अणू तयार होणे अशक्यप्राय भासते. म्हणून हायड्रोजन आणि हीलियम यांव्यतिरिक्त इतर अणूंचे प्रमाण मिळविण्यास ही असमतोल प्रक्रिया असमर्थ ठरते.

विश्वारंभी काही अतिभव्य तारे निर्माण झाले व त्याच्या केंद्रभागी तापमान व द्रव्यघनता अत्याधिक होती, असे मानल्यास त्या ताऱ्यांच्या केंद्रभागी प्रोटॉन, न्यूट्रॉन, आल्फा कण व बीटा कण आणि प्रकाशकण यांत समतोल साधला जाईल. अशा रीतीने निरनिराळे अणू उत्पन्न झाल्यावर त्या ताऱ्यांचा स्फोट होऊन ते अणू सर्वदूर विखुरले जातील. अशा प्रकारे अणूंचे सापेक्ष प्रमाण एकदाच निश्चित होईल. ⇨सुब्रह्मण्यन् चंद्रशेखर इत्यादींनी वर्णिलेल्या या ‘समतोल प्रक्रियेत’ चिरस्थायी अणू अचिरस्थायी अणूंपेक्षा अधिक प्रमाणात उत्पन्न होतील. म्हणून अणुभार वाढतो, तसे अणूंचे प्रमाण कमी होणे स्वाभाविक आहे. तसेच लोह-शिखरातील अणू, सम अणुभारांचे अणू व चारने भाग जाणाऱ्या अणुभारांचे अणू अधिक प्रमाणात आढळतात, हेही त्यांच्या अधिक चिरस्थायित्वाला धरूनच आहे पण याच नियमाने चांदीपेक्षा अधिक अणुभाराच्या अणूंचे प्रमाण आहे त्यापेक्षा फारच कमी येईल. या बाबतीत ‘समतोल प्रक्रिया’ अपुरी पडते.

एकंदरीत सर्व अणूंचे सापेक्ष प्रमाण मिळविण्यासाठी समतोल व असमतोल या दोन्ही प्रकारच्या प्रक्रियांची आवश्यकता आहे. अशा प्रक्रिया सर्वच ताऱ्यांच्या केंद्रभागी त्यांच्या निरनिराळ्या उत्क्रांत अवस्थांत शक्य आहेत, असे आता हॉईल, बर्बिज, डब्ल्यू. ए. फाउलर, कॅमरन इत्यादींच्या संशोधनाने स्पष्ट झाले आहे. गॅमो सिद्धांताप्रमाणे हायड्रोजन, हीलियम विश्वारंभीच उत्पन्न होतात. नंतर त्यांचे तारे बनल्यावर त्यांच्या केंद्रभागी प्रोटॉनसाखळीच्या प्रक्रियेने आणखी हीलियम तयार होईल. केंद्रभागातील हायड्रोजन संपल्यावर ताऱ्याचे आकुंचन होऊन केंद्रतापमान १० कोटी केल्व्हिन झाल्यावर हीलियम अणू एकत्र येऊन त्यांचा कार्बन अणू तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. तापमान आणखी वाढल्यावर कार्बनामध्ये हीलियम मिळून ऑक्सिजन, त्यात आणखी हीलियम मिळून निऑन इ. चारने भाग जाणाऱ्या अणुभारांचे अणू बनतात. तापमान १ ते १·५ अब्ज केल्व्हिन झाले म्हणजे न्यूट्रॉन उत्पन्न होऊन गंधकापर्यंतचे (अणुभार ३२) सर्व अणू तयार होतात आणि तारा फुटला म्हणजे ते आंतरतारकीय अवकाशात फेकले जातात.

या नव्या द्रव्यापासून तयार झालेल्या दुसऱ्या पिढीतील ताऱ्यांत कार्बन असल्याने त्यांच्या केंद्रभागी कार्बन-नायट्रोजन चक्राची प्रक्रिया चालू शकते. पुन्हा हीलियम, कार्बन इ. उत्पन्न होत केंद्रीय तापमान ३-४ अब्ज केल्व्हिन झाले म्हणजे समतोल प्रक्रिया सुरू होऊन लोह-शिखरापर्यंतचे सर्व अणू तयार होतील. आता जर बाह्य भागात Ne21 व आल्फा कण यांच्या संयुतीचे (टकरीने) न्यूट्रॉन उत्पन्न झाले, तर गॅमो असमतोल प्रक्रियांना चालना मिळून अतिभारी अणू उत्पन्न होतील. न्यूट्रॉनाचा पुरवठा धीम्या गतीने होत असेल, तर Pb206 पर्यंतचे अणू उत्पन्न होऊ शकतात, परंतु लोह-शिखरातील अणू उत्पन्न झाल्यावर तारा जोरात आकुंचन पावू लागल्यास न्यूट्रॉनाचा प्रवाह तीव्र होऊन युरेनियम (U236 व U238) व कॅलिफोर्नियम (Cf256) पर्यंतचे अणूही उत्पन्न होतील. ताऱ्याचा स्फोट झाल्यावर हे सर्व अणू आंतरतारकीय अवकाशात विखुरले जाऊन नंतरच्या पिढीतील ताऱ्यांत ते सामावले जातील. अशा रीतीने भारी मूलद्रव्यांचे प्रमाण जुन्या ताऱ्यांत कमी व नव्या ताऱ्यांत जास्त का आढळते, हे स्पष्ट होते. या सिद्धांतानुसार सर्व अणू एकाच वेळी उत्पन्न होत नाहीत. पण विश्वात सर्वदूर ताऱ्यांची उत्क्रांती एकसारखीच होत असल्याने आपल्याला त्यांचे प्रमाण सगळीकडे एकसारखेच आढळते.

ड्यूटेरियम (D), लिथियन (Li) व बेरिलियम (Be) हे अणू ५०-६० लाख केल्व्हिनपेक्षा अधिक तापमानात नष्ट होत असल्याने त्यांचे प्रमाण कमी होते. विश्वात जे आढळते ते सुद्धा ताऱ्यांच्या पृष्ठभागात किंवा बिंबाभ्रिकेत चुंबकीय क्षेत्रामुळे अतिऊर्जित अवस्थेत पोहोचलेल्या प्रोटॉन आदि कणांच्या माऱ्यामुळे उत्पन्न होतात, असे मानावे लागते. [⟶ मूलद्रव्ये].

जीवोत्पत्ती : जीवाची उत्पत्ती ही एक वैश्विक घटना आहे, असे आता मानतात म्हणून या विषयाचा येथे अंतर्भाव केवा आहे. अमीबासारख्या एककोशिक (एकपेशीय) प्राण्यांपासून क्रमविकास (उत्क्रांती) होत होत उच्च श्रेणीचे प्राणी तयार झाले व पुढे त्यांपासून मानव उत्पन्न झाला, असे डार्विनप्रणीत ⇨क्रमविकासाच्या सिद्धांताने स्पष्ट झाले आहे आणि परिस्थिती अनुकूल असल्यास अकार्बनी द्रव्यांपासून सर्व जीवांत सापडणारी ॲमिनो अम्‍ले उत्पन्न होऊ शकतात, असे ए. आय्. ओपॅरिन आदि शास्त्रज्ञांच्या प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. ग्रहगोल उत्पन्न झाल्यावर केव्हा तरी अशी परिस्थिती पृथ्वीवर अस्तित्वात आली असे मानतात, पण त्यापूर्वीही आंतरतारकीय अवकाशात फॉर्माल्डिहाइडासारखे काही कार्बनी पदार्थ तयार झाले असले पाहिजेत, असे अगदी अलीकडच्या रेडिओ वेधांवरून दिसून आले आहे. यांपैकी कोणत्याही प्रकारे जीवोत्पत्तीच्या दृष्टीने पायाभूत कार्बनी पदार्थ तयार झाल्यावर त्यापासून जीव व जीवाचा क्रमविकास होण्यास काही गोष्टी जुळून आल्या पाहिजेत. एखाद्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर अशी परिस्थिती असू शकते, पण हा तारा युग्मरूप नसावा. नाही तर ग्रह कधी त्या ताऱ्यांच्या जवळील अतिउष्ण भागात तर कधी त्यांच्यापासून दूर असलेल्या अतिशीत भागात राहील. सुट्या ताऱ्यासभोवती सुद्धा ०° ते १००° से. तापमानाच्या प्रदेशातच जीवसृष्टी शक्य होईल. हा जीवानुकूल कटिबंध जितका मोठा तितकी जीवोत्पत्तीची व क्रमविकासाची शक्यता अधिक असते. त्यासाठी K वर्णपट विभागापेक्षा कमी पृष्ठतापमानाचे तारे [⟶ तारा] गाळले पाहिजेत. दुसरा मुद्दा असा की, जीवांच्या क्रमविकासाठी २-३ अब्ज वर्षाचा तरी काल लागतो, असे पृथ्वीवर अनुभवास आले आहे. तेव्हा मध्यताऱ्याचे वयोमान यापेक्षा जास्त असले पाहिजे. म्हणून F वर्णपट विभागाच्या अलीकडचे तारेही गाळावे लागतील. एकंदरीत F 5 ते K 5 या वर्णपट विभागातील सुट्या ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांवरच विकसित जीव आढळण्याची शक्यता आहे. याच ताऱ्यांभोवती ग्रहमाला उत्पन्न होण्याची शक्यता अधिक असते, हे हॉईल यांच्या ग्रहमाला-उत्पत्तीच्या सिद्धांतात आपण पाहिलेच आहे. असे सर्वगुणसंपन्न तारे आकाशगंगेत शेकडा एक निघतात. त्यांपैकी १/१०  ग्रहांवर जीव आहेत, जीव असलेल्या ग्रहांपैकी १/१० ग्रहांवर जीवाचा विकास मानवसदृश प्राण्यांपर्यंत झाला आहे आणि त्यांपैकी १/१० ग्रहांवरील मानवांची तांत्रिक प्रगती आपल्यासारखी झाली आहे, असे मानले तरी आकाशगंगेतील शंभर अब्ज ताऱ्यांपैकी दहा लाख ताऱ्यांच्या ग्रहांवर प्रगत मानवसदृश संस्कृती असावी, असा अंदाज करता येतो. हीच परिस्थिती इतर दीर्घिकांत सापडेल. तेव्हा जीवोत्पत्ती व तिचा विकास हा विश्वोत्क्रांतीचा एक स्वाभाविक भाग आहे, असे ठरते. [⟶ जीवोत्पत्ती विश्वातील जीवसृष्टी].

विश्वाची उत्क्रांती :  विश्व प्रसरण पावू लागल्यापासून  त्यात कसकसे बदल होत गेले त्याचा शेवटी थोडक्यात आढावा घेतला आहे. सर्वप्रथम ऊर्जेचे न्यूट्रॉन, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांमध्ये रूपांतर होऊन त्यांपासून हायड्रोजन व हीलियम वायू तयार झाले. गुरुत्वाकर्षणाने त्यात दीर्घिका संगठित झाल्या. त्या सुरूवातीस थंड होत्या. पुढे त्यांत तारे उत्पन्न होऊन त्या चमकू लागल्या. ताऱ्यांच्या केंद्रभागी भारी मूलद्रव्ये तयार होऊन ताऱ्यांचा स्फोट झाल्यावर ती आसमंतात फेकली गेली. त्यांपासून आणखी तारे उत्पन्न होऊन त्यांत आणखी भारी मूलद्रव्ये तयार झाली. अशा रीतीने भारी मूलद्रव्यांचे प्रमाण वाढत गेले. काही ताऱ्यांभोवती ग्रहमाला व काही ग्रहांवर जीव उत्पन्न झाले. काही थोडे तारे आपले सर्व अणुकेंद्रीय इंधन संपवून थंड होण्याच्या मार्गाला लागले आहेत. यात लघुतम तारे, न्यूट्रॉन व कृष्णविवरे यांचा समावेश होतो. इतर सर्व ताऱ्यांचीही पुढे ही अवस्था होऊन शेवटी विश्व काळोखमय होईल का? की त्यापूर्वी किंवा त्याच सुमारास गुरूत्वाकर्षण प्रबल ठरून विश्वाचे आकुंचन होईल व विश्व पुन्हा हिरण्यगर्भसमान तेजोमय अवस्थेत  येईल? नक्की काय होणार आहे ते क्वासारसारख्या दूरस्थित ज्योतींच्या अवलोकनाने जाणून घेणे हे विश्वोत्पत्तिशास्त्र व विश्वस्थितिशास्त्र यांचे पुढील उद्दिष्ट राहील.

पहा  : आकाशगंगा ग्रह तारा दीर्घिका विश्वस्थितिशास्त्र सूर्यकुल.

अभ्यंकर, कृ. दा.

संदर्भ : 1. Aller, L. H. Abundances of Elements, New York, 1961.

2. Burnet, John, Greek  Philosophy, London, 1962.

3. Fuller, B. A. G. A History of Ancient and Medieval Philosophy, New York, 1955.

4. Hoyle, F. Galaxies, Nuclei and Quasars, New York, 1965.

5. Shklovskii, T. S. Sagan, C. Intelligent Life in the Universe, 1960.

6. Tucker, W. H. Tucker, K. The Dark Matter: Contemporary Science’s Quest for the Mass Hidden in Our Universe, New York, 1988.

         7. Zeller, Eduard Trans Palmer, L. R.Outlines of the History of Greek  Philosophy, London, 1955.

         ८. मेहेंदळे, म. अ. ऋग्वेदसार, पुणे, १९८२.

९. रानडे, रा. द. अनु. गजेंद्रगडकर, कृ. वें. उपनिषद्रहस्य, पुणे, १९३८.