नेपल्स येथील राष्ट्रीय संग्रहालयातील एक प्राचीन शिल्प.

ॲफ्रोडाइटी : प्रेम आणि सौंदर्य यांची ही ग्रीक देवता. या देवतेलाच रोमन लोक व्हीनस म्हणत. होमरच्या मताप्रमाणे झ्यूस व डिओने यांची ही मुलगी. डिओने ही हिफीस्टसची पत्‍नी व युद्धाचा देव आरेस याची प्रेयसी. पण हेसिऑडच्या मतानुसार झ्यूसचा आजा यूरॅनस याच्या विच्छिन्न शरीराभोवती जो समुद्राचा फेस जमला होता, त्यातूनच हिची निर्मिती झाली. वस्तुतः ग्रीकांनी ॲफ्रोडाइटी ही देवता आशियातील देवतेवरून घेतली. ही आशियातील देवता म्हणजे ॲसिरियनांची  इश्तार किंवा फिनिशिनय लोकांची आष्टोरेथ (आस्टर्टी) ही देवता होय. सायप्रस बेटावरील या देवतेच्या सुप्रसिद्ध पूजास्थानावरून हिला ‘किप्रिस’ हे नाव प्राप्त झाले असावे. पेलोपनीससच्या दक्षिणेस असलेल्या सिथीरा नावाच्या बेटावरील तिच्या देवालयावरून तिला ‘सिथीरियन’, त्याचप्रमाणे सिसिलीतील तिच्या देवालयामुळे तिला ‘एरिसिना’ असेही म्हटले जाते. या देवतेची ‘उरानिया’ म्हणजे आकाशाची देवता आणि ‘पांडेमोस’ म्हणजे लोकांच्या जीवनाचे संरक्षण करणारी देवता, अशा दोन नावांनी ग्रीक लोक पूजा करीत. नंतरच्या काळात ते ‘उरानिया’ हिला उच्च व सात्त्विक प्रेमाची देवता व ‘पांडेमोस’ हिला इंद्रियविषयक लालसेची देवता म्हणू लागले.

या देवतेचे अनेक पुतळे आढळतात. पूर्वीच्या काळात ते वस्त्रविभूषित होते. नंतरच्या कालखंडात ती नग्न व समुद्रातून वर येताना दाखविलेली आहे. शेवटी कलावंतांनी तिला केवळ एका सुंदर स्त्रीचे रूप दिले.

हंबर्ट, जॉ. (इं.) पेठे, मो. व्यं. (म.)