मूर्तिपूजा : मूर्तिपूजा ही धार्मिक संस्था जगातील प्राचीन संस्कृतींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. ग्रीक, रोमन व क्रीटमधील लोक हे मूर्तिपूजकच होते. ग्रीकांच्या आणि रोमनांच्या सुंदर मूर्ती आदर्श मूर्तिकलेमध्ये गणल्या जातात. ग्रीक, रोमन व क्रीट येथील लोकांचे धर्म हे हिंदू धर्मासारखे बहुदेवतावादी [→अनेकदेवतावाद] धर्म होते व त्यामुळे त्यांच्या देवतांच्या विविध ⇨ पुराणकथाही प्रचलित होत्या. मध्य पूर्वेतील असिरिया, बॅबिलोनिया त्याचप्रमाणे ईजिप्त येथेही मूर्तिपूजेला फार बहर आला होता. प्रेषित मुहंमदांच्या पूर्वी अरबी जमातीत शेकडो मूर्तिपूजेचे प्रकार होते. ते सगळे मुहंमदांनी बुडविले, मूर्तिपूजेचा निषेध केला आणि मक्केत ⇨  काबाचा तेवढा एक पवित्र दगड ठेवला. भारतात वेदपूर्वकाळी मोहें-जो-दडो व हडप्पा येथे सिंधू संस्कृतीचे राष्ट्र भरभराटीस आले होते. त्यात शिवासारखा देव व दुर्गादेवीसारखी देवी वा मातृदेवता यांची मूर्तिपूजा प्रचलित होती [→आदिमाता]. लिंगपूजाही होती, असे आज सापडणाऱ्या अवशेषांवरून निश्चित करता येते. आज हिंदू धर्मात जी मूर्तिपूजा सार्वत्रिक महतीस प्राप्त झाली वैदिक यज्ञसंस्था मागे पडली याचे कारण सामान्य जनांना समाविष्ट करणारी व कलेला प्रोत्साहन देणारी सिंधू संस्कृतीपासून वारसाक्रमाने चालत आलेली मूर्तिपूजाच होय.

हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील देवपूजेची एक विशिष्ट पद्धती मूर्तिपूजा होय. नैसर्गिक वस्तूंची पूजा ही देवपूजेचाच एक प्रकारहोय [→निसर्गपूजा]. नैसर्गिक मूर्त वस्तू सूर्य, अग्नी, नदी, पर्वत, वृक्ष, पशू इ. होत. नवग्रहांपैकी चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी आणि सूर्य या मूर्त वस्तूच होत. राहू आणि केतू या छाया होत. यांची ही पूजा त्यांच्या ठिकाणी देवता कल्पून हिंदू धर्मीय करीत आले आहेत. सूर्याची साक्षात् पूजा किंवा सूर्याची मूर्ती करून पूजा करण्याची पद्धती फार प्राचीन काळापासून रूढ आहे [→सूर्यदूवता]. पिंपळ, वढ, तुळस इ. वनस्पतीवर्गातील पदार्थांची पूजा ही मूर्तीपूजाच होय [→वृक्षपूजा]. गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, कृष्णा, गोदावरी, कावेरी इ. नद्यांची पूजा ही हिंदू धर्मामध्ये फार प्राचीन काळापासून रूढ आहे. या नदीदेवतांच्या मूर्तीही निर्माण करून पूजा करण्याची प्रथा आहे. सूर्याची मूर्ती कल्पून ज्याप्रमाणे पूजा करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे इतर ग्रहांच्याही मूर्ती वा प्रतीके घेऊन त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. मूर्तपूजा व मूर्तिपूजा यांची एक प्रकारे सांगड आहे. 

मूर्तिकला फार प्राचीन कालापासून भारतात प्रशस्त मानलेली आहे. माती, काष्ठ, विविध प्रकारचे पाषाण किंवा संगमरवरी दगड किंवा काच, विविध प्रकारचे धातू, रत्ने यांच्या इष्टदेवतेच्या मूर्ती करुन शास्त्रोक्त पद्धतीने त्या मूर्तीचे वर्णन लक्षात घेवून कारागीर मूर्ती तयार करतात आणि पूजक यजमानाच्या आधीन करतात. उदा., गणेश, हनुमान, देवी, लक्ष्मी-नारायण, विठ्ठल-रुक्मिणी, शिव-पार्वती, दत्तात्रेय इत्यादिकांच्या मूर्ती तयार करण्याचे कारखानेच भारतात आहेत. मंदिरे आणि मंदिरातील मूर्ती याला कलात्मक स्वरूप देण्याची हजारो वर्षाची प्रथा आहे. मूर्तिपूजक याच्या धार्मिक तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष मूर्ती ही देवता नसून किंवा हा देव नसून मंत्राच्या योगाने त्या मूर्तीमध्ये त्या देवतेची शक्ती प्रकट होत असते. म्हणून ही मूर्ती प्रत्यक्ष देव किंवा देवी नसून, त्या त्या अमूर्त देवाचे किंवा देवीचे प्रतीक आहे म्हणजे बोधक चिन्ह आहे. प्रत्यक्ष पूजाविधीमध्ये मूर्ती ही देव किंवा देवीच आहे अशा धारणेने पूजक पूजा करत असतो परंतु तत्त्वतः ती पूजा देवतातत्त्वाची पूजा असते, ही गोष्ट मूर्तिपूजकाच्या धर्मशास्त्रात सांगितलेली असते म्हणून मूर्तिपूजाविरोधी असलेले जे धर्म त्यांचा मूर्तिपूजानिषेध प्रतीकवादी मूर्तिपूजेला लागू नाही. 

वेदकाली वैदिक लोक हे मूर्तिपूजक नव्हते, असे अनेक आधुनिक विद्वानांचे बहुमत आहे. ऋग्वेदामध्ये अल्पस्वल्प संबंध सूचित करणाऱ्या काही ऋचा आहेत. एक ऋषी म्हणतो की, दहा धेनू देऊन माझ्या इंद्राला कोण बरे विकत घेईल? (क्र. ४. २४. १०). अशा तऱ्हेच्या विधानांवरून वेदकाली मूर्तिपूजा होती, असे अनुमान करणे फारसे समर्थनीय ठरत नाही. यज्ञा आणि  पूजा या दोन भिन्नभिन्न परंपरा हिंदू धर्मात रूढ आहेत. वैदिक समाज हा यज्ञ संप्रदायाचा होता. अग्नीमध्ये आहुती देऊन देवाला वा देवतेला प्रसन्न करून घेणे, संतुष्ट करणे यास यज्ञ असे म्हणतात. येथे मूर्तीचा काही संबंध नाही. ऋग्वेदात अग्नी, इंद्र, वरुण, मित्र, सविता, अर्यमा, अश्विदेव, वायू, विश्वदेव इत्यादिकांची स्तवने विपुल प्रमाणात उपलब्ध होतात. त्यांच्या देहाची किंवा स्वरूपाची वर्णनेही मोठ्या काव्यमय भाषेत केलेली आढाळतात परंतु त्यावरून मूर्तिपूजेचे अनुमान होऊ शकत नाही. कारण ऋग्वेदातील या ऋचा किंवा पद्यमंत्र हे त्या देवतांची यज्ञाप्रसंगी वर्णने करण्याकरता व वर्णन करून स्तवने करण्याकरिता वापरण्याची पद्धती आहे.


ऋग्वेद, यजुर्वेदसामवेद या तीन वेदांचा यज्ञप्रकरणी संबंध येतो. मंत्र आणि ब्राह्मण म्हणजे वेद होय. त्यात सांगितलेले अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, सोमयाग, अश्वमेध इ. यज्ञांचे सांगोपांग सविस्तर स्वरूप सांगणारी श्रौतसूत्रे आहेत. त्यावरून हे निश्चितपणे म्हणता येते की, यज्ञ म्हणजे मूर्तिपूजा नव्हे. वैदिक आर्यांनी मूर्तिपूजा ही वैदिक आर्येतर भारतीय जनतेपासून प्राप्त करून घेतलेली धर्मसंस्था आहे. या धर्मसंस्थेमध्ये चारी वर्णाचे लोक प्रामुख्याने भाग घेऊ शकतात. म्हणून असे म्हणता येत, की ⇨ यज्ञसंस्था ही केवळ द्विजांची म्हणजे त्रैवर्णिक आर्यांची धर्मसंस्था आहे व मूर्तिपूजा ही आर्य व आर्येतर अशा चारी वर्णांची धर्मसंस्था आहे. म्हणून मूर्तिपूजकामध्ये व मूर्तपूजकामध्ये चारी वर्ण सारख्याच उत्साहाने भाग घेतात. मोठमोठ्या तीर्थस्थानी म्हणजे वाराणसी, प्रयाग, गया, कांची, नाशिक, उज्‍जैन, हरद्वार इ. ठिकाणी प्रचंड यात्रा भरतात. त्यात मूर्तिपूजेचे सोहळे मोठ्या उत्साहाने साजरे होतात आणि जातपात न मानता सर्वसामान्य जन त्यात भागीदार होतात.

मूर्तिपूजा किंवा देवपूजा हा उपचार समर्पणाचा विधी असतो. साधारपणे सुस्थितीतील हिंदू, बौद्ध किंवा जैन गृहस्थाच्या घरी देवपूजा होत असते. ज्यांना वेदाधिकार आहे ते ऋग्वेदातील पुरुषसूक्ताचा वापर करीत असतात व द्विजेतर पौराणिक मंत्रांचा वापर करतात. स्नान करून पूजक स्वच्छ धूतवस्त्र, रेशमी वस्त्र किंवा लोकरीचे वस्त्र धारण करून आसनावर बसतो. आपल्या देव्हाऱ्यातील देवावरचे निर्माल्य बाजूला काढतो. आचमन, प्राणायाम, इष्टदेवतास्मरण आणि देशकालांचा उच्चार करून पूजेचा संकल्प सोडतो. गणपतीचे स्मरण करतो. कलश, शंख, घंटा, दीप यांची गंधाक्षतपुष्पाने पूजा करतो. शंखात पाणी भरून पूजासाहित्य आणि स्वतःचे शरीर यांचे प्रोक्षण करतो व देवाच्या ध्यानाचा मंत्र म्हणतो आणि भक्तिपूर्वक १६ उपचार करतो. ते १६ उपचार म्हणजे देवतेचे आवाहन, देवतेला आसनप्रदान, देवतेची पाद्यपूजा, अर्ध्यप्रदान, आचमनीय प्रदान, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनूलेपन, पुष्प, धूप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प हे १६ उपचार समर्पित करतो. याला ‘षोडशोपचार पूजा’ म्हणतात. स्नानाच्या वेळी पंचामृताचे स्नान घालतो, नंतर गंधोदकाचे व शेवटी शुद्धोदकाचे. स्नान घालताना ⇨  अभिषेक करतो. अभिषेकासाठी तळाशी छिद्र असलेले पात्र पाण्याने भरतो, गीत, वाद्य, नृत्य, मंगलआरती व कर्पूरआरती अर्पण करतो. अशा वेळी आरत्या म्हणतो [→आरती]. मंत्रपुष्पसमर्पणानंतर आपले आवाहन, विसर्जन पूजा यासंबंधीचे अज्ञान प्रकट करून परमेश्वराची क्षमा मागतो. [→पूजा]. 

ही षोडशोपचार पूजा किंवा अधिक संपन्न पूजा न करता ज्यांची ध्यानशक्ती चांगली आहे, मनाची एकाग्रता ज्यांना चांगली साधते त्यांना हे सगळे उपचार मनाने कल्पून, मनामध्ये देवतेची मूर्ती आणून त्यांचे समर्पण करावयाचे असते. मानसपूजेला बाह्यपूजेइतकेच महत्त्व आहे किंवा अधिकही आहे. या देवपूजेमध्ये किंवा मूर्तिपूजेमध्येच देवालय ही संस्था भव्य बनली व ही भव्य देवालयसंस्था हिंदू धर्म, बौद्ध धर्म व जैन धर्म यांच्यामध्ये मोठ्या मान्यतेस प्राप्त झाली.

पहा : देवालय प्रतिमाविद्या मंदिर-वास्तुकला शिल्पकला. 

संदर्भ : 1. Durant, Will, The Story of Civilization: Part I (Our Oriental Heritage), Part II (The Life of  Greece), Part III (Caesar and Christ), Part IV (The Age of Faith), New York, 1935, 1939, 1944, 1950.

    2. Hastings, James, Ed. Encyclopedia of Religion and Ethics. Vol.VII (4th Impression), New York, 1959.

   3. Wheeler, Sir Mortimer, The Indus Civilization (3rd Ed.). Cambridge, 1968.

जोशी, लक्ष्मणशास्त्री