संस्कृत भाषेत तंत्र शब्दाचे अनेक अर्थ आहेत. येथे एका विशिष्ट अर्थानेच तंत्र हा शब्द वापरला आहे. तो अर्थ असा : विशिष्ट देवतेच्या उपासनेची विशिष्ट प्रकारची सविस्तर पद्धती म्हणजे तंत्र वा तंत्रमार्ग होय. तंत्रपदाचा धात्वर्थ ‘विस्तारणे’ असा आहे. ज्या ग्रंथामध्ये विशिष्ट इष्टदेवतेची पूजा किंवा साधना विस्ताराने सांगितलेली असते, त्यास तंत्रशास्त्र म्हणतात. मंत्रशास्त्र, आगम, यामल आणि क्वचित निगम हेही तंत्रशास्त्राचे पर्याय आहेत.

तंत्राचे विषय : तंत्रशास्त्र हे मुख्यत: मूर्तिपूजेचे शास्त्र होय. ‘उपासनाकांड’ असेही या शास्त्रास म्हणतात. त्या त्या इष्टदेवतेचे तत्त्वज्ञान, देवतेच्या साधनेचे किंवा आराधनेचे विविध बीजमंत्र व देवतेचा निर्देश करणारे मंत्र, अनेक यंत्रे, चक्रे वा मंडले (रेखाकृती), मुख्य देवतेच्या व त्या देवतेच्या परिवारदेवतांची सांगोपांग स्वरूपे व मूर्ती, मंदिररचनेचे प्रकार, मंदिर व मूर्ती यांच्या प्रतिष्ठेचे विधी, उत्सव, रथयात्रा इ. तंत्रशास्त्राचे विषय असतात; त्याचप्रमाणे शिष्य, गुरू अथवा आचार्य, दीक्षा, अभिषेक, पूजाप्रकार, होम, जपविधी, मंत्रयोग, पुरश्चरण, इष्ट कामप्राप्तीचे व सिद्धिप्राप्तीचे म्हणजे अलौकिक वा अद्भुत चमकार निर्माण करणारे शक्तिसाधनेचे विधी म्हणजे जादूचे विविध प्रकार वा ⇨जादूटोणा इ. तंत्रशास्त्राचे विषय होत. तंत्राचे व्यवस्थित, समग्र विषयावर ग्रंथ निर्माण झाले तेव्हा त्यांचे ज्ञान, योग, क्रिया आणि चर्याचार हे पाद म्हणजे विभाग ठरले. ज्ञानपादात तत्त्वज्ञान, योगपादात षडंगयोग, क्रियापादात मूर्ती व मंदिर यांची रचना आणि चर्यापादात पूजाविधी सांगितलेला असतो. अशी पादविभागणी विशेषत: ‘पांचरात्रागम’ व ‘शैवागम’ यांत केलेली आढळते; मात्र काही आगमग्रंथांत यांपैकी चर्या वा योग हेच विषय सांगितेलेले असतात. शिव, दैवी शक्ती, विष्णू आणि त्याची शक्ती लक्ष्मी, सूर्य, गणपती, दत्तात्रेय  अशा इ. हिंदू देवतांची त्याचप्रमाणे बुद्ध, महावीर अशा त्या त्या मुख्य देवतेच्या परिवारदेवतांसह उपासनापद्धती सांगणारी तंत्रे आहेत; परंतु पन्नास वा एकावन्न अक्षरमातृकांचा मंत्र म्हणून स्वीकार, हे सर्व तंत्राचे समानरूप आहे. या तंत्रांना शैव, शाक्त किंवा कौल, वैष्णव, सौर, गाणपत्य, वज्रयान, नवस्मरण इ. संज्ञा आहेत. जगातील सर्वच धर्मपंथांचे आगम प्रमाण असून श्रद्धेने तदनुसारी आचरण सफल होते, असे काश्मीरी तंत्रशास्त्र सांगते. म्हणून तंत्रग्रंथांत विविध अन्य देवतांची उपासना स्वत:च्या इष्टदेवतेच्या उपासनेबरोबर संगृहीत केलेली दिसते. तंत्रशास्त्रात मूर्तिशास्त्र व मंदिररचनाशास्त्रही अंतर्भूत होते. काही प्राचीन ग्रंथांत मूर्तिशास्त्र व मंदिरशास्त्र ही पृथक्पणे सांगितलेली असली, तरी ती तंत्रशास्त्राचीच अंगे होत. बौद्ध तंत्रास ‘वज्रयान’ आणि जैन तंत्रास ‘नवस्मरण’ म्हणतात. शैव, शाक्त व वैष्णव ही तंत्रे दीड ते दोन हजार वर्षांइतकी प्राचीन आहेत. बौद्ध तंत्रदेखील शैव-वैष्णवांइतके प्राचीन असावे. हिंदू तंत्रांमध्ये विश्वाच्या उत्पत्ति-स्थिति-लयाची उपपत्ती बहुतेक सांख्यशास्त्राच्या आधाराने केलेली असते. ध्यानयोग किंवा समाधियोग पातंजलयोगाच्या पद्धतीने कुंडलिनीयोगासह विवरिला असतो. नाथयोगी हे तंत्रमार्गी होते. त्यांनी पातंजलयोगामध्ये कुंडलिनीयोगाची भर घातली. त्यांनी कुंडलिनीचे तत्त्व शोधून काढले वा कल्पिले आणि देहातील मूलधारादी नवचक्रे सांगितली; काहींनी षड्चक्रे व सातवे मस्तकातील सहस्रार चक्र यांची विद्या सांगितली. कुंडलिनीजागृतीचा आणि षड्चक्रविभेदनाचा योगमार्ग नाथयोग्यांनी विशेषत: प्रतिपादिला. हा कुंडलिनी योगमार्ग पातंजलयोगशास्त्रात सांगितलेला नाही. शैव व शाक्त तंत्रालाच धरून नाथयोग्याचा योगमार्ग विकास पावला [→ नाथ संप्रदाय ].

शांकर मायावादी ⇨केवलाद्वैतवाद, काश्मीरी शैवांचे अद्वैत म्हणजे ⇨चिद्विलासवाद, वैष्णवांचा आणि शैवांचा ⇨द्वैतवाद व ⇨विशिष्टाद्वैतवाद, दाक्षिणात्य शैवांचा द्वैतवाद इ. आध्यात्मिक तत्त्वज्ञाने भिन्नभिन्न तंत्रांमध्ये आपापल्या मताप्रमाणे समाविष्ट केली आहेत. बौद्धांचे पारमिता तत्त्वज्ञानही बऱ्याच अंशांनी बौद्ध तंत्रांनी समाविष्ट करून घेतले आहे. शाक्त किंवा कौल तंत्रांमध्ये द्वैत वा अद्वैत ह्यांच्या पलीकडचा देवीचा तत्त्वविचार आहे, असे कुलार्णवतंत्रात म्हटले आहे. म्हणजे तात्पर्य असे दिसते, की देवतेची उपासना ही मुख्य होय; द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत इ. तत्त्वज्ञाने ही उपासनेची सहायक अंगे होत. उपासनेच्या द्वारे येणारा आध्यात्मिक अनुभव हा मुख्य होय. या अनुभवाने साक्षात मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करून घेणे, हे अंतिम साध्य होय.

सर्व तंत्रे ही पुरुषतत्त्व व स्त्रीतत्त्व यांचे नित्य संयुक्त स्वरूप हेच विश्वाचे मूळ अधिष्ठान आणि उपास्य मानतात. त्याप्रमाणे शक्ती व शिवाची संयुक्त उपासना शैव तंत्र सांगते. हे सर्वांत प्राचीन तंत्र मानले जाते. शिव आणि शक्ती ही अविभक्त व एकरूप म्हणून यात उपास्य होत. शाक्त तंत्रात शिवावाचून शक्ती आणि शैव तंत्रात शक्तीवाचून शिव उपास्य नव्हे; कारण तसे असूच शकत नाही. या विचारसरणीचा इतर सर्व तंत्रांवर परिणाम झालेला दिसतो. विष्णूची उपासना श्री किंवा लक्ष्मीसहितच वा कृष्णाची उपासना राधेसहच करावी, असे वैष्णव तंत्रांमध्ये सांगितले आहे. वैष्णव तंत्रासच ‘पांचरात्र’ वा ‘पंचरात्र’ व ‘सात्त्वत’ आगम असे म्हणतात. यामध्ये विष्णू वा नारायण यांची श्री वा लक्ष्मीसह आणि वासुदेव किंवा कृष्ण यांची रुक्मिणी अथवा राधा यांच्यासह उपासना करावी, असे प्रतिपादिले आहे. बौद्ध तंत्रातही बुद्धाच्या उपासनेबरोबरच तारा इ. देवींची उपासना सांगितली आहे. नाथयोग्यांनी शोधून काढलेली कुंडलिनी ही शिवाची शक्तीच असून ती देहात प्रविष्ट झालेली आहे; मस्तकातील सहस्रार चक्रात शक्तीसह शिवाचा किंवा शिवशक्तिसमावेशनाचा साक्षात्कार हे अंतिम साध्य आहे, असे स्पष्टीकरण केलेले आहे.

‘भुक्ती’ वा सिद्धी म्हणजे ऐहिक व पारलौकिक भोग उपासनेच्या द्वारे साध्य करून घ्यावी आणि ‘मुक्ती’ ध्यानयोगाने साक्षात्कारद्वारा साध्य करावी; अशी दोन उद्दिष्टे परस्परांशी अविरोधी आहेत; तात्पर्य, एकसमयावच्छेदे करून ‘भुक्तिमुक्तिप्रदायिनी’ अशी जी शक्ती, तिची साधना करावी हे तंत्रमार्गाचे प्रतिपाद्य आहे. सिद्धी व मुक्ती असे उभयविध अविरोधी इष्ट तंत्रांनी सांगितले आहे. रोगनिवारण, शत्रुनाश, स्त्रीवशीकरण, संपत्तीची प्राप्ती, गुप्त होणे, परकायाप्रवेश, पंचमहाभूतांवर सत्ता चालविणे इ. लहानमोठ्या सिद्धी तंत्रसाधनांनी प्राप्त होतात; तंत्रशास्त्राहून अन्य मोक्षशास्त्रे असे म्हणतात, की ज्यांना विषयभोग पाहिजे त्यांना मोक्ष मिळणार नाही; ज्यांना मोक्ष पाहिजे, त्यांनी विषयभोगाची अपेक्षा करू नये. परंतु भुक्ती व मुक्ती अथवा भोग व योग हे उद्देश अविरोधाने साध्य करण्याचा मार्ग म्हणजे तंत्रमार्ग होय. शैव, शाक्त, वैष्णव, सौर, गाणपत्य आणि बौद्ध यांच्यामध्ये एकेक तंत्रसंप्रदाय असा उत्पन्न झाला, की त्यात या भोगमार्गाचा अतिरेक झाला. शाक्त तंत्रातील कौलमार्गाच्या पूजापद्धतीत पंच‘म’कार म्हणजे मत्स्य, मांस, मद्य, मैथुन आणि मुद्रा (भाजलेले चणे, लाह्या किंवा हातांचा वा शरीराचा विशिष्ट अभिनय) ही पंचतत्त्वे म्हणून आवश्यक ठरली; ही पूजेची अंगे ठरली, हे पंच‘म’कार सौर, गाणपत्य, बौद्धांचा वज्रयान इ. तंत्रमार्गांतही पूजेची महत्त्वाची अंगे म्हणून शाक्त मार्गाप्रमाणे मान्य झाले. स्त्रीविषयक स्वैराचार त्यामुळे तंत्रमार्गात वाढला.

तंत्रांचा अधिकार : वैदिक व स्मार्त धर्माचा अधिकार मुख्यत: पुरुषांना आहे, स्त्री ही पुरुषाच्या धर्माचरणात दुय्यम सहकारी म्हणूनच त्यात प्रतिपादिली आहे; परंतु पुराणोक्त व तंत्रोक्त पूजा, ध्यानयोग इ. धार्मिक कर्मांचा अधिकार स्त्रिया व पुरुष यांना समान आहे. किंबहुना तंत्रोक्त धार्मिक कर्मांत स्त्रियांना प्राधान्य असल्यामुळे सहभागी होणे आवश्यक मानले आहे; तंत्रशास्त्राप्रमाणे स्त्रीमध्ये शक्तितत्त्व पुरुषापेक्षा अधिक प्रकट आहे, म्हणून तंत्रमार्गात स्त्रीतत्त्व असलेल्या शक्तिदेवीची साधना ही प्रधान मानली आहे. गुरूप्रमाणेच देवतेचे मूर्तिरूप म्हणून स्त्रीची पूजा करण्याचा विधीही तांत्रिक कर्मकांडात अंतर्भूत आहे; महार्णवतंत्रात स्त्रीने सती जाणे निषिद्ध होय; स्त्रियांचा मान विशेष राखावा, असे निक्षून सांगितले आहे. तंत्रमार्गाचे गुरुत्व किंवा आचार्यत्वही करण्याचा अधिकार स्त्रीला मान्य केला आहे.

हा स्त्रीप्राधान्य असलेला पूजाविधी भारतातील आणि जगातील स्त्रीप्रधान प्राथमिक ग्रामसंस्थेतील असावा. भिन्नभिन्न विरळ पसर-लेल्या मानवी गटांची सामाजिक एकता निर्माण करून प्राथमिक स्थितीतील भौतिक संस्कृतीची देवघेव वाढवावी व संस्कृतीचे संवर्धन करावे हा उद्देश तेथे होता. वंशभेदांना महत्त्व देणे परवडत नव्हते. प्रजावाढीची गरज होती. सुफलताविधीत सर्व जमाती जमत व प्रजोत्पादन चाले. याचाच अवशेष शैव, शाक्त व बौद्ध तंत्रमार्ग होय.

स्त्रीला ज्याप्रमाणे तांत्रिक पूजेचा स्वतंत्र अधिकार आहे, त्याचप्रमाणे शूद्रांसह सर्व वर्णांना अधिकार सांगितला आहे. चार वर्णांहून भिन्न मानलेल्या अनुलोम व प्रतिलोम संकर जाती, चंडालादी अंत्यज जाती, म्लेच्छ इ. सर्व मानव तंत्रमार्गाचे अधिकारी असून त्या सर्वांनी त्या मार्गाची दीक्षा घ्यावी, असे सांगितले आहे. शैव, शाक्त व बौद्ध यांच्या विधींत मांगीण व चांडाली महिलांची पूजा व भोग सांगितला आहे. काही पांचरात्र ग्रंथांमध्ये उदा., सनत्कुमारसंहितेत चारी वर्णांना अधिकार सांगितला असला, तरी त्यांतून चंडालादी अंत्यजांना वगळले आहे; परंतु वैष्णवांना अत्यंत प्रमाणभूत असलेल्या श्रीमद्भागवत  या ग्रंथात अंत्यज, म्लेच्छ इत्यादिकांसह सर्व मानवांना भागवत धर्माचा अधिकार सांगितला आहे. ⇨पांचरात्र संप्रदायातभागवत ग्रंथ प्रमाण मानला आहे. नाथयोग्यांच्या परंपरेत स्त्रिया तसेच अंत्यज जाती, म्लेच्छ इ. सर्व मानव योगमार्गाचे अधिकारी म्हणून मान्य झाले होते. शूद्र, अंत्यज व अन्य म्लेच्छ जाती यांना वैदिक मंत्रांचा अधिकार नाही, असे मात्र सर्व हिंदू तंत्रांचे मत आहे. म्हणून त्यांतील काही तंत्रांत ओंकार किंवा स्वाहा हे वैदिक मंत्र असल्यामुळे त्यांनी जप, पूजा, होम, इत्यादींमध्ये ॐ, स्वाहा इ. वैदिक मंत्र वापरू नयेत, असे सांगितले आहे; परंतु काही हिंदू तंत्रे ओंकार, स्वाहा इ. मंत्र शूद्रांनाही सांगतात. आणखी असे, की अवैदिक बौद्ध व जैन तंत्रांत वैदिक ओंकार, स्वाहा इ. मंत्रही घेतले आहेत.

तंत्रग्रंथांचे प्रामाण्य : तंत्रग्रंथ किंवा तंत्रागम हे वेदांच्या इतकेच तांत्रिकांना प्रमाण आहेत; किंबहुना महार्णवतंत्र, परशुरामकल्पसूत्र इ. काही हिंदूंचे तंत्रग्रंथ असे म्हणतात, की श्रुती वैदिकी व तांत्रिकी अशी दोन प्रकारची असून तांत्रिकी श्रुती म्हणजे मूळ तंत्रग्रंथ वेदांपेक्षाही अधिक प्रमाण होत. तंत्रग्रंथ हे साक्षात शिव, नारायण, शिवावतार भैरव, वासुदेव, दत्तात्रेय इ. देवांना उपदेशिले असल्यामुळे ते श्रेष्ठ वेदच होत. शैव तंत्राचे चार, पाच किंवा सहा आम्नाय म्हणजे वेद शिवाच्या मुखातून निघाले आहेत, असे म्हटले आहे. ते म्हणजे पूर्वाम्नाय, पश्चिमाम्नाय, दक्षिणाम्नाय, उत्तराम्नाय, ऊर्ध्वाम्नाय व अंतराम्नाय किंवा अनुत्तराम्नाय होय. पहिले पाच शिवाच्या पाच मुखांतून निघाले आहेत. अखेरचा शिवाच्या अंतर्मुखातून निघालेला आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. महार्णवतंत्र या शाक्त तंत्रात महादेवाने वैदिक आगमांचे ज्ञानदंडाने मंथन करून काढलेले सार म्हणजे तंत्र होय, असे म्हटले आहे. तंत्रशास्त्राच्या काही ग्रंथांमध्ये तंत्रागमाचे दोन भेद सांगितले आहेत : काही वेदानुसारी आगम व काही वेदविरुद्ध आगम होत; त्यांपैकी वेदानुसारी ‘पांचरात्रा’दी जे आगम ते प्रमाण आणि वेदविरुद्ध ‘पाशुपत’ इ. आगम हे अप्रमाण होत, असे काही पांचरात्र व शैव तंत्रांत म्हटले आहे. वेद व स्मृती यांच्यातील वर्णाश्रमधर्माचे उल्लंघन ज्या तंत्रोक्त आचारामध्ये होत नाही, त्यांना वेदानुसारी असे म्हटले आहे.

तंत्रागमांमध्ये दक्षिणाचार व वामाचार असे दोन मुख्य आचारभेद आहेत. शैव, शाक्त, गाणपत्य, सौर, दत्तात्रेय, बौद्ध इ. आगमांमध्ये वामाचारही सांगितला आहे. देवाच्या किंवा देवतेच्या पूजेच्या प्रसंगी वर्णभेद व जातिभेद न पाळता स्त्रीपुरुषांनी एकत्र जमून पूजेत सहभागी व्हावयाचे, सहभोजन करावयाचे, मद्यमांसादिकांचे देवतेचा प्रसाद म्हणून सेवन करावयाचे, योनिपूजन व कोणत्याही वर्णाच्या स्वकीय वा परकीय स्त्रीशी संभोग करावयाचा, असा वामाचारी पूजेचा प्रकार त्यांत सांगितला आहे. ⇨शाक्त पंथा मध्ये याला ‘भैरवी चक्र’ म्हणतात. या भैरवी चक्रात जे सामील होतात ते सर्व वर्ण अंत्यज, म्लेच्छ इ. मानव हे द्विजच बनतात, असे म्हटले आहे. यासंबंधी काही शाक्त पंडितांचे मत असे आहे, की सामान्य नियमांना अपवाद असतात, म्हणून वेदोक्त सामान्य नियमांना वेदांतही अपवाद सांगितलेले असतात; उदा., हिंसा करावयाची नाही, परंतु यज्ञीय हिंसा इष्ट आहे; तसाच भैरवी चक्रातील आचार अपवाद होय. त्यामुळे भैरवी चक्रातील पूजाविधी हा वेदविरुद्ध आहे, असे मानण्याचे कारण नाही. भैरवी चक्रात तंत्रमार्गाची दीक्षा घेतलेले सर्व समाविष्ट होतात; म्हणून हा सर्वसामान्य धर्म म्हणता येत नाही, अशी धारणा परंपरागत हिंदू धर्माच्या अनुयायांमध्ये हजारो वर्षे स्थिरावल्यामुळे मांगीण व महारीण यांची पूजा करणाऱ्या वाममार्गी हिंदूंना कधीही बहिष्कार पडला नाही. ते सर्वसामान्य हिंदू म्हणून कधीही वेगळे मानले गेले नाहीत. त्या मार्गाची निंदा काही स्मृतींमध्ये व पुराणांमध्ये आलेली असली, तरी गेली हजार वर्षे ब्राह्मणादी उच्च वर्णीयांमध्येसुद्धा वाममार्गी लोक प्रतिष्ठित म्हणून मानले गेलेले आहेत.

तंत्रांचा  इतिहास : तंत्रमार्गाचा उगम वेदपूर्व काली झालेला दिसतो. मूर्तिपूजा व मंदिरसंस्था किंवा देवालयसंस्था साक्षात वेदांमध्ये कोठेही सांगितलेली नाही. ऋग्वेदात व यजुर्वेदात तंत्रमार्गीयांचे रुद्रशिव व विष्णू हे देव वर्णिले आहेत; परंतु हे देव मूळचे अवैदिक आहेत. वेदपूर्व सिंधुसंस्कृतीत पशुपती शिवाची मूर्ती आणि भूदेवी किंवा मातृदेवतेची मूर्ती, योनिपूजा आणि लिंगपूजा आढळतात. लिंगपूजा, योनिपूजा आणि मातृदेवता यांचा प्राथमिक मानवी समाजातील पूजा सुफलताविधीशी संबंध दिसतो. मातृदेवता किंवा भूदेवी यांची पूजा प्राचीन संस्कृतींमध्ये यूरोप, आशिया इ. खंडांत चालू होती, असे सांस्कृतिक मानवशास्त्र सांगते. वैदिक आर्यांच्या पूर्वीच्या भारतातील मानवसमाजांमध्ये प्रचलित असलेली मातृदेवतेची पूजा, लिंगपूजा, योनिपूजा आणि अन्य मूर्तींची पूजा ही वेदकाळी व वेदोत्तर काळीही अनिर्बंध चालू राहिली. वैदिक धर्माने व संस्कृतीने या पूजा आत्मसात केल्या. वस्तुत: वेदांतील यज्ञसंस्था ही सामान्यजनांची धर्मसंस्था कधीच बनली नाही. वैदिक आर्यांनीही अवैदिक भारतीय धर्माची परंपरा स्वीकारली. उदा., पशूंचे बलिदान, प्रसाद म्हणून मद्यमांसाचे सेवन, जादूटोणा, योगविद्या इ. अनेक गोष्टी वैदिक आर्यांनी मान्य केल्या; कारण त्यांच्या परंपरागत वैदिक धर्मामध्येसुद्धा यज्ञात पशूंचे हवन करीत, प्रसाद वा हवि:शेष म्हणून मांस भक्षण करीत; श्राद्धात आणि अतिथिसत्कारात मांसभोजन पवित्र मानीत. क्वचित यज्ञात मद्याचाही उपयोग करीत. ब्राह्मण सोडून वैदिक क्षत्रिय व वैश्य यांना मद्यपानाचा निषेध वैदिक धर्मशास्त्रांनी केला नाही; मद्यपाननिवृत्ती मात्र अधिक चांगली, असे म्हटले. छांदोग्य उपनिषदात वामदेव्य व्रत सांगितले आहे; ते व्रत आचरत असता व्रती व्यक्तीने जी कोणी स्त्री संभोगाची इच्छा व्यक्त करील तिला नाकारू नये, असे तेथे म्हटले आहे. वैदिक परंपरेत जादूटोणाही मोठ्या प्रमाणात होता. तो अथर्ववेदात सविस्तर प्रतिपादिला आहे.

वेदोत्तर काली म्हणजे सूत्रकाली अनेक वैदिक आर्यांनी अवैदिकांचे शैव व शाक्त संप्रदाय स्वीकारले आणि त्यांच्यात कपिल, आसुरी, पंचशिख इ. ⇨सांख्यदर्शनाचे व  ⇨योगदर्शनाचे द्रष्टे निपजले. ⇨वैशेषिक दर्शनाचा सूत्रकार कणादमुनी, व्याकरणसूत्रकर्ता पाणिनी, न्यायसूत्रांचा वार्तिककार उद्योतकर इ. मोठमोठे तत्त्ववेत्ते हे त्यांच्यात निपजले. कणाद व पाणिनी हे माहेश्वर संप्रदायी होते आणि उद्योतकर हे पाशुपताचार्य होते.

शैव, वैष्णव, शक्त इ. उपासनामार्ग मूळचे अवैदिक होते. यांच्या सूचक कथा अनेक पुराणांमध्ये वर्णिलेल्या आढळतात. शिवाची, दक्षयज्ञविध्वंसाची कथा महाभारत, ब्रह्मांडपुराण, मत्स्यपुराण, लिंगपुराण, वायुपुराण  इ. ग्रंथांमध्ये आलेली आहे. दक्षप्रजापतीने सुरू केलेल्या यज्ञात शिवाला वा गौरीला निमंत्रित केले नाही आणि म्हणून शिवाने तो यज्ञ उद्ध्वस्त केला, या गोष्टीवरून मुळामध्ये शिव हा वैदिक नव्हता असे सूचित होते. यज्ञसंस्थेतील सर्वश्रेष्ठ देव इंद्र याला डावलून कृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा कली, ही भागवतातील कथा वासुदेव कृष्ण किंवा गोपाळकृष्ण हा अवैदिक होता, हे सूचित करते. वैष्णवांचा पांचरात्र आगम हा एकायन नावाच्या वेदशाखेतून निघाला, असे श्रीप्रश्नसंहिता, ईश्वरसंहिता इ. पांचरात्र तंत्रग्रंथांत म्हटले आहे. म्हणजे आज प्रसिद्ध असलेल्या चार वेदांपेक्षा निराळ्या असलेल्या वेदांतून वैष्णव तंत्र निघाले. ही वेदशाखा आद्य शंकराचार्यांना माहित नव्हती. पांचरात्र आगमाला वेदमूलकत्व आहे, हे सिद्ध करण्याकरिता एकायन वेदशाखेची कल्पना निघाली असावी. आणखी असे, की वेदमूलकत्व तंत्रमार्गास आहे, हे सिद्ध करण्याकरिता प्रत्येक तंत्रमार्गाची अनेक उपनिषदे निर्माण झाली. उदा., शैवोपनिषदे, शाक्तोपनिषदे, वैष्णवोपनिषदे इत्यादी. आज जे तंत्रमार्गीय पूजाप्रकल्प उपलब्ध आहेत, त्यांच्यात वैदिक मंत्रांचाही समावेश या वैदिक ब्राह्मणांनीच करून वैदिक मार्ग व तंत्रमार्ग यांचा समन्वय साधला आहे. वैदिक आचार्य तंत्रमार्गात शिरल्यामुळे वसिष्ठ, विश्वामित्र, च्यवन, हारीत, नारद इ. ऋषी तंत्रमार्गाचे द्रष्टे म्हणून तंत्रागमांमध्ये निर्दिष्ट केले आहेत. अनेक पुराणांमध्ये आणि महाभारतातही शिव हा किरातरूपधारी सांगितला आहे. किरात ही एक आर्येतर अवैदिक प्राचीन जमात होय. देवीची काली, मातंगी, चर्मकारिणी, धीवरी, अस्थिविदारणी, स्मशान कालिका, चंडिका, चंडाली, चंडभैरवी, कुक्कुटी इ. जी विविध उपास्य रूपे आहेत, त्यावरूनही ती आर्येतरांचीही मुळातली देवता आहे, असे सूचित होते. भारतातील अंत्यज आणि आदिवासी जंगली जमातींमध्ये विविध रूपांच्या देवींची उपासना आजही आढळते. मुळात मांगांची मातंगी, चांभारांची चर्मकारिणी, कोळ्यांची धीवरी व अस्थिविदारणी, चंडाली आणि चंडिका ह्या चंडालांच्या देवता होत, असे सूचित होते. तंत्रागमांमुळे सर्व हिंदूंच्या ह्या देवता बनल्या; त्यांची ⇨ शक्तिपीठे  बनली. प्रेतांची मुंडके धारण करणारा स्मशानवासी शिव आणि मुंडमाला धारण करणारी रक्ताने माखलेली ⇨ दुर्गा  यांची स्मशानात नग्न स्वरूपात उपासना तंत्रग्रंथांत सांगितली आहे. शिव, विष्णू, काली, गणपती, सूर्य इ. तंत्रोक्त देवतांचा नागाशी किंवा सर्पाशी संबंध दाखविला आहे. विष्णू हा शेषशाई आणि शिव, काली, गणपती, बुद्ध, तीर्थंकर यांचे भूषण नाग आहे; आर्येतर प्राचीन नाग जमातीचे हे देव होत, हे यावरून अनुमानित होते.

परमात्म्याची शक्ती ही तंत्रमार्गात मुख्य उपास्य आहे. शक्तिदेवता हीच मूलभूत तत्त्व मानणारा शाक्त पंथ हा या सर्वांचा मूलस्रोत आहे. शिव, विष्णू इ. परमात्मस्वरूप किंवा निर्वाणतत्त्व मानणारे सर्व तंत्रमार्ग शक्तीच्या उपासनेच्या द्वारेच अंतिम तत्त्वाची वा मोक्षाची प्राप्ती करून घेतात. हा उपासनामार्ग योगमार्गच आहे. बौद्ध तंत्रमार्गाचे विनयतोष भट्टाचार्यांसारखे विद्वान हे काली इ. रूपाच्या शक्तीचा संप्रदाय व तंत्रमार्ग हिंदूंत बाहेरून आला असे मानतात. या बौद्ध तंत्रमार्गाला ‘चीनाचार’ अशी संज्ञा आहे; परंतु बौद्ध तंत्रातील बीजमंत्र आणि अक्षरमंत्र त्याचप्रमाणे ओं, नम:, श्री, स्वाहा, वषट्, फट् इ. मंत्र वा मंत्रांची अंगे ही वेदांची आरण्यके आणि प्राचीन उपनिषदे यांच्यातून घेतलेली दिसतात. अक्षरतत्त्व, वर्णतत्त्व व योनिसंकल्पना त्याचप्रमाणे शक्तितत्त्वही (श्वेताश्वेतरोपनिषद ४.१, ८, ११; ५.५) वैदिक आहे. बौद्ध आणि जैन तंत्रांतील वारंवार येणारी ब्रह्मोपासना ही वैदिकच आहे; कारण ‘ब्रह्म’ शब्दच वैदिक आहे. परमात्म्याची पराशक्ती ही विविध असून त्या शक्तीची ज्ञान, बल व क्रिया ही स्वरूपे श्वेताश्वेतरोपनिषदात (६.८) सांगितली आहेत. काली देवीचा उल्लेख मुंडकोपनिषदात (२.४) आला आहे. काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुल्लिंगिनी व विश्वरुची अशा सात देवींचा सात अग्निजिव्हा म्हणून तेथे उल्लेख आहे. दुर्गेचा उल्लेख नारायणोपनिषदात (२.७) केला आहे.

तंत्रमार्गातील अक्षरोपासना अक्षरांच्या तत्त्वज्ञानासह प्राचीन उपनिषदांमध्ये व आरण्यकांमध्ये विस्ताराने वर्णिली आहे. ओंकार अक्षर विश्वमूल व विश्वात्मक ब्रह्म आहे; प्राणरूप ब्रह्मतत्त्व हे वाक्तत्त्वच आहे; परब्रह्म हे त्याचे मूळ रूप आहे आणि त्याच्यातूनच समष्टी म्हण सर्व विश्व आणि व्यष्टी म्हणजे सर्व व्यक्ती व जिवात्मे निर्माण होऊन विलीन होतात, असा विचार त्यांच्यात सांगितला आहे (तैत्तिरीय उपनिषद १.८; छांदोग्य उपनिषद २.२३; प्रश्नोपनिषद  ५.२; कठोपनिषद १.२.१६). ओंकाराच्या अ, उ, म या ज्या तीन मात्रा आहेत, त्यांचे अनुक्रमे ईहलोक, अंतरीक्ष आणि स्वर्गलोक असे अर्थ केलेले आहेत (प्रश्नोपनिषद ५.७). वाचक शब्द व त्याचा वाच्यार्थ यांचा अभेद तंत्रमार्गात गृहीत धरला आहे. त्याप्रमाणे ओम् हे अक्षर आणि त्याचा वाच्यार्थ परमात्मा, ब्रह्म यांचे ऐक्य वरील उपनिषदांनी मानले आहे. वर्णमालेतील अकारापासून हकारापर्यंतची किंवा क्षकारापर्यंतची ५० अथवा ५१ अक्षरे यांतील प्रत्येक अक्षराचा देवता आणि विश्वातील एक-एक तत्त्व, असा अर्थ तंत्रमार्गाने सांगितला आहे; म्हणून एक-एक अक्षर म्हणजे मंत्र होय. शब्द व अर्थ यांच्यात अभेद मानला आहे. एक-एक अक्षराला देवतास्वरूप किंवा अर्थ देण्याची पद्धती प्राचीन उपनिषदांमध्ये सुरू झाली आहे. सत्यकाम जाबालाला गुरूने क ब्रह्म होय; ख ब्रह्म होय; असा उपदेश केला (छांदोग्य उपनिषद ४.१०). उपासनेची ही नवी सांकेतिक भाषा उपनिषदांमध्ये उत्पन्न झाली. तिचा विस्तार वैष्णव, शैव, शाक्त इ. तंत्रांत झाला. बौद्ध व जैन तंत्रांनी हा विस्तार स्वत:च्या धार्मिक तत्त्वज्ञानाचा संस्कार करून स्वीकारला.

रूढ शब्दाला नवीन सांकेतिक गूढ अर्थ देण्याची आणि त्या शब्दांच्या अक्षरात्मक अवयवांना नवीन अर्थ देण्याची पद्धती ऋग्वेदाच्या व सामवेदाच्या आरण्यकांत आणि उपनिषदांत सुरू झाली. ‘ओंकार’ हा ‘होय’, ‘ठीक’, ‘मान्य’ या अर्थी वैदिक भाषेत होता (तैत्तिरीय उपनिषद १.८). त्यालाच सर्वात्मक परब्रह्म हा अर्थ उपनिषदांच्या तत्त्वचिंतनामध्ये मिळाला. ‘अहं’ शब्दाला तंत्रांच्या तत्त्वज्ञानात (अ+ह) शिव-शक्ती किंवा विष्णू-लक्ष्मी यांच्या एकरूपतेचा निदर्शक मानला आहे. ऐतरेय आरण्यकात त्याची फोड करून अहंमधील अ म्हणजे ब्रह्म व त्यातून आलेला तो अहं होय, असे म्हटले आहे (२.३.८). तंत्रतत्त्वज्ञानाप्रमाणेच तेथे म्हटले आहे, की अकार हीच सर्व वाणी होय; व्यंजने ही तिचीच व्यक्त झालेली नाना रूपे होत; तिचे अव्यक्त रूप प्राण व्यक्त रूपात आला म्हणजे वाणीचे रूप घेतो. प्राण हेच सत्य होय. त्या प्राणरूप सत्यातूनच वाणिरूपी तंतू निघून त्या तंतूंचे नामे हे अनेक तंतू बनतात आणि त्यांनी सर्व विश्व बांधले जाते. घोष म्हणजे नाद हा प्राणाचा आत्मा आणि व्यंजने ही त्याचे शरीर होय (ऐतरेय आरण्यक २.१.२). तेथे वाणीचे रहस्य सांगत असताना क पासून म पर्यंतची व्यंजने पृथ्वीरूप होत; श, ष, स, ल व्यंजने अंतरीक्षरूप आणि सगळे स्वर द्यूलोक होत. त्याचप्रमाणे स्पर्शनामक व्यंजने अग्नीची रूपे, ऊष्मनामक व्यंजने वायूची रूपे आणि सर्व स्वर आदित्याची रूपे होत (ऐतरेय आरण्यक  ३.२.५).

सगळे स्वर इंद्राची शरीरे, सगळे ऊष्मवर्ण प्रजापतीची शरीरे आणि सगळे स्पर्शवर्ण मृत्युदेवाची शरीरे होत, असे छांदोग्य उपनिषदात (२.२२.३.४) म्हटले आहे. ‘सत्य’ शब्दातील ‘सत्’, ‘ति’ आणि ‘यम्’ या तीन अक्षरांना क्रमाने छांदोग्य उपनिषदात (८.३) अमृत, मर्त्य आणि दान असे अर्थ देऊन अमरत्व, मर्त्य हे दोन्ही देणारा शब्द, असा अर्थ केला आहे. ऐतरेय आरण्यका ‘सत्’, ‘त्’ आणि ‘य’ अशी तीन अक्षरे सांगून क्रमाने प्राण, अन्न आणि आदित्य या तिघांची एकरूपता असा अर्थ सांगितला आहे. बृहदारण्यक उपनिषदात (५.६) यांचाच क्रमाने सत्य, अनृत व सत्य असे अर्थ सांगून अनृत हे सत्याने दोन्ही बाजूने झाकलेले असले, तरच मारक ठरत नाही; उघडे असेल तर मारते असे म्हटले आहे. द, हृदय, अरण्यायन, वीर इ. शब्दांचीही अशीच फोड करून त्या उपनिषदात विविध अर्थ सांगितले आहेत. तात्पर्य असे, की तंत्रांच्या तत्त्वज्ञानातील शब्दब्रह्म आणि अक्षरमंत्र व बीजमंत्र यांचा उगम वैदिक साहित्यातच झाला आहे, हे अनेक अशा प्रमाणांनी निश्चित करता येते. मंत्रांच्या योगाने यज्ञामध्ये देवतांची उपस्थिती होते आणि त्या देवता ऐहिक व पारलौकिक इष्टकामनांची पूर्ती करतात हे मंत्रांचेच सामर्थ्य आहे आणि मंत्र म्हणजे वाग्देवतेचेच व्यक्त स्वरूप होय, ती वाग्देवता सर्व देवतांचे नियंत्रण करते, ती विश्वमूलभूत व विश्वनियंत्रक शक्ती आहे, असा विचार ऋग्वेदामध्येच व्यक्त झालेला आहे.

ऋग्वेदातील ऋचांचे पदपाठ तयार झाले तेव्हा अक्षरात्मक पृथक्करण करावे लागले. ऋग्वेदाच्या ऋचांवरच सामगायन म्हणजे सामवेद तयार झाला आहे. सामे वीणेवर गात असत; वेगळ्या केलेल्या अक्षरांच्या वर सामगायनाचे सूर गायिले जात. त्यातूनच अक्षरब्रह्म व नादब्रह्म हे ज्ञानात्मक आणि आनंदात्मक आहेत, हा अनुभव यज्ञातील उपासनेत आला. वैदिक संस्कृतीचे आर्य आणि अवैदिक संस्कृतीचे अन्य भारतीय यांचे सामाजिक एकीकरण होऊ लागल्यानंतर दोघांच्याही उपासना संप्रदायांची एकमेकांत देवघेव सुरू झाली. उपासनेच्या संप्रदायात कर्मकांडाबरोबर मंत्रांचीही एकमेकांत देवघेव झाली. त्यामुळे एकमेकांच्या भाषाही एकमेकांजवळ आल्या व मिसळू लागल्या. ‘पांचरात्रागमा’च्या लक्ष्मीतंत्रात वैदिक व अवैदिक आगम, विविध भाषा, व्यक्त व अव्यक्त वाणी शब्दब्रह्ममयच आहेत, असे सांगितले आहे. ही गोष्ट सर्वधर्मसमन्वयाची पद्धती सूचित करते. आदिम जातींपासून अत्यंत प्रगल्भ, सुसंस्कृत समाजांपर्यंतचे उपासनामार्ग समाविष्ट करण्याचे तत्त्व म्हणजे शब्दब्रह्मतत्त्व होय, हे सिद्ध झाले. त्यामुळे त्यात सर्व प्रकारची यातुविद्या किंवा जादूटोणाही समाविष्ट झाला.

तंत्रतत्त्वज्ञान : निष्कल व निर्गुण प्रकाशरूप परब्रह्म होय. स्वत:चा स्पष्ट निर्देश करणारा त्याचा अनुभव म्हणजे विमर्श होय; ही त्याची विमर्शशक्ती होय; ही त्याच्याहून वेगळी नाही. ‘मी’ म्हणजे अहं असा अनुभव म्हणजे अहंता विमर्श होय. सर्वात्मक परमात्म्याची ही शक्ती आहे. तिचे पहिले रूप नाद हे आहे. नाद म्हणजेच शब्द होय. शब्दातील अक्षर बिंदू होय. अ पासून ह पर्यंतची अक्षरे अहं या पदाने समाहार करून दर्शविली आहेत. शिव हा शुक्लबिंदू, शक्ती हा रक्तबिंदू व त्या दोन्ही बिंदूंचा मिश्रबिंदू होतो. हा मिश्रबिंदू म्हणजेच शब्दब्रह्म होय. यात वर्ण, वाचक शब्द व वाच्य अर्थ अव्यक्त रूपाने आहेत. त्यात स्फुरता म्हणजे स्फूर्ती हा धर्म, इच्छा, ज्ञान व क्रिया या तीन शक्ती आहेत; याच बिंदूच्या कला म्हणजे विभाग होत. शक्तीच्या अकारापासून अं यातील बिंदूपर्यंत १५ अवस्था आहेत. शाक्त व शैव तंत्रांप्रमाणे श, ष, स आणि ह ही अक्षरे म्हणजे क्रमाने महामाया, शुद्धविद्या, ईश्वर आणि सदाशिव हे होत; तर पांचरात्र सिद्धांताप्रमाणे क्रमाने अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण आणि वासुदेव हे होत. क्ष ही महाशक्ती होय. शैव व शाक्तांप्रमाणे य, र, ल आणि व यांची राग, विद्या, कला व माया (नियती) ही रूपे होत म्हणजे हे वाच्य अर्थ होत; लक्ष्मीतंत्राप्रमाणे क्रमाने वायू, अग्नी, माया किंवा पृथ्वी किंवा वरुण हे वाच्यार्थ होत. वैष्णव, शैव व शाक्त तंत्र यांच्या मताप्रमाणे मकारापासून ककारापर्यंतच्या वर्णांपासून उलट्या क्रमाने सांख्यांची २५ तत्त्वे व्यक्त होतात व त्यांचे वाच्य होतात. ती तत्त्वे पुढीलप्रमाणे होत : पुरुष, प्रकृती, बुद्धी, अहंकार, मन, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, तन्मात्र पंचक आणि पंचमहाभूते.

शिवात्मक किंवा वासुदेवात्मक असलेल्या बोध, इच्छा आणि क्रिया शक्तींचे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे उन्मेष होत. समष्टी विश्व व व्यष्टी किंवा व्यक्तिविश्व या दोन्ही रूपांनी शक्तिदेवी नांदते. अव्यक्त, सूक्ष्म व शांत नाद हे परावाणीचे स्वरूप होय, झांज, पैंजण, शंख, वेणू, तंतुवाद्य, घंटा, वाद्यांचा ताल, मृदंग, मेघ, दुंदुभी यांतून जो नाद निघतो ते परावाणीचे व्यक्त रूप होय. ती शांत परावाणी इच्छारूपात वा विचार किंवा बोधरूपात आली म्हणजे तिला पश्यंती म्हणतात. बोधाची वाक्यरूप अवस्था येण्याच्या अगोदरचे हे स्वरूप आहे. शब्द आणि अर्थ, वाच्य आणि वाचक या रूपांत बोध बनतो, त्याला मध्यमा म्हणतात. कंठापासून ओठापर्यंत वर्ण आणि वाक्यरूपाने वाणी प्रकट होते, तिला वैखरी म्हणतात. चार वाणींचे वर्णन सर्व तंत्रग्रंथांत सारखे नाही; त्यात फरकही सापडतो. ऋग्वेदामध्ये वाणीची चार पावले सांगून माणसे बोलतात ती तुरिया अथवा चौथी वाणी होय, असे सांगितले आहे. नाद, बिंदू व कला या तंत्रतत्त्वज्ञानातील संज्ञांप्रमाणे मूळ तत्त्वातून शांत नाद म्हणजे शांत ध्वनी उत्पन्न होतो. त्याच्या घनीभावास बिंदू ही संज्ञा येते. बिंदूचे विभाग म्हणजे कला.

अक्षर, पद व सबंध मंत्र हे तीन अध्वा (मार्ग) होत आणि कला, तत्त्वे व भुवने (तत्त्वांनी बनलेले विश्वाचे भाग) हे तीन अध्वा मिळून  उपासनेचे सहा अध्वा अनुलोम व प्रतिलोम पद्धतींनी उपासनेत ध्यानात घ्यावयाचे असतात. तत्त्वे म्हणजे ५० अक्षरांचे तात्त्विक अर्थ होत.

अकारादी हकारान्त किंवा क्षकारान्त ५० अथवा ५१ वर्णांना ‘मातृका’ ही संज्ञा आहे, प्रपंचसारतंत्रात शंकराचार्यांनी ही वर्णमाला म्हणजेच शारदादेवी म्हणून प्रारंभी स्तविली आहे. शक्तिदेवीची अवर्ग महालक्ष्मी, कवर्ग ब्राह्मी, चवर्ग माहेश्वरी, टवर्ग कौमारी, तवर्ग वैष्णवी, पवर्ग वाराही, यवर्ग ऐंद्री व शवर्ग चामुंडा अशी आठ रूपे आहेत. पहिली महालक्ष्मी वगळून बाकीच्या सप्तमाता होत. इतरत्र या आठ वर्गांच्या आणखी निराळ्या मातृदेवता सांगितल्या आहेत. निरनिराळ्या तंत्रग्रंथांत या ५० किंवा ५१ वर्णांच्या मातृदेवता आणि देव सांगितले असून त्यांच्यातील काही सर्वांच्या समान आहेत, काही भिन्न आहेत. शैव व शाक्त तंत्रांमध्ये बरेच साम्य आहे. वैष्णवादी तंत्रांमध्ये बराचसा फरक आहे. त्यामुळे हा वर्णदेवतांचा सु. सहा हजार शब्दांचा सांकेतिक कोश बनू शकतो. काही तंत्रांनी आपले स्वत:चे तंत्राभिधानासारखे कोश तयार केले आहेत.

प्रत्येक वर्णमंत्रावर अर्धचंद्र आणि त्याच्यावर बिंदू देऊन यँ, वँ, रँ, शँ अशा तऱ्हेने सर्व वर्ण लिहावयाचे आणि उच्चारावयाचे असतात. नुसती व्यंजनेसुद्धा मंत्र आहेत; परंतु त्यांच्यामध्ये स्वर मिसळून अर्धचंद्र व बिंदू यांसह त्यांचा उच्चार करावयाचा असतो. या सगळ्या वर्णमंत्रांना बीजमंत्र म्हणतात. ह्या बीजमंत्रांना प्रारंभी ओंकार हा मूलमंत्र लावून शेवटी नम:, स्वाहा, वषट्, फट् इ. शब्दांपैकी एक वा अनेक शब्द शास्त्रोक्त रीतीने लावले म्हणजे मंत्र पूर्ण होतो. हे शब्द कशा प्रकारची सिद्धी पाहिजे, हे ठरवून मंत्राच्या शेवटी लावायचे असतात. बीजमंत्रांच्या बरोबर आपल्या शिव, काली, लक्ष्मी, विष्णू इ. आत आराध्यदेवतेची प्रसिद्ध नामे म्हणजे पदे घेऊन चतुर्थी विभक्ती लावून किंवा संबोधन करून मंत्रात घालावयाची असतात. उदा., ‘गँ गणपतये नम:’ इ. काही मंत्रांमध्ये इष्टदेवतेचे नावही नसते, ते केवळ बीजमंत्र असतात. इष्टदेवतांच्या नावातील आद्याक्षर हासुद्धा बीजमंत्रच मानलेला असतो. उदा., गणपती याचा ‘गँ’, दुर्गेचा ‘दुँ’ इत्यादी. काही विशेष बीजमंत्र आहेत. हे सगळ्या तंत्रांमध्ये असतात. उदा., ऐँ, ऱ्हीँ, क्लीँ इ. ऐ हा वर्ण सरस्वतीचा वाचक आहे. बिंदू हा परमात्मा व शक्तिदेवी यांचे एकरूप, अर्धचंद्र शब्दब्रह्माचा वाचक आहे. ऱ्हीँ याला महामाया बीज म्हणतात. याच्यातील ह व्यंजन म्हणजे शिव, र् व्यंजन म्हणजे प्रकृती आणि ई म्हणजे चिन्मयी माया; श्रीँ मधील श लक्ष्मी, र्  संपत्ती व ई विष्णू हे लक्ष्मीबीज आहे. अशा प्रकारे व्यंजने व स्वर यांचे त्या त्या तंत्रमार्गातील कोशाप्रमाणे अर्थ लक्षात घेऊन उपासकाने पूजा व ध्यान करावयाचे असते.

यंत्र : बिंदू, त्रिकोण, अर्धचंद्र, वर्तुळ, चतुष्कोण, षट्कोण, स्वस्तिक, कमळ इ. विविध प्रकारची रेखाचित्रे किंवा मंडले काढून ती एकमेकांत शास्त्रोक्त पद्धतीने रेखाटून व रंग भरून भूर्जपत्रावर काढायची किंवा धातूच्या पत्र्यावर तयार करावयाची; भिंती, पाषाण, भूमी यांवरही रंग भरून काढावयाची. त्यांच्यामध्ये वर्णमालेतील बीजमंत्र व देवतावाचक मंत्र लिहावयाचे आणि त्यांची पूजा व ध्यान करावयाचे. यांना यंत्रे म्हणतात. ही देवतांची शरीरे होत, असेही म्हणतात. काही यंत्रे किंवा मंडले आखून त्यांवर त्याप्रमाणे देवालयेसुद्धा बांधावयाची असतात. श्रीयंत्र हे सर्व तंत्रमार्गांमध्ये सर्वकामप्रद, सिद्धिप्रद आणि मोक्षप्रदही मानले आहे. ते विश्वात्मक शक्तिदेवतेचे रूप आहे. यंत्रराज, सर्वतोभद्र, वारुणमंडल, ग्रहमंडल, स्मरहर, मुक्तियंत्र, गणपतियंत्र, विष्णुयंत्र इ. शेकडो प्रकारची यंत्रे उपासनेची व पूजेची साधने म्हणून वर्णिलेली आहेत.

मूर्ती : मूर्तिपूजा भारतात वेदपूर्वकाली चालू होती, असे सिंधुसंस्कृतीत सापडलेल्या मातृदेवतेच्या आणि लिंगांच्या कृतीवरून लक्षात येते. नारायणोपनिषदात गणपती, दुर्गा, स्कंद इ. देवतांच्या मूर्तीची वर्णने आहेत. उत्खननात मिळालेल्या व भारतातील संग्रहालयांमध्ये संगृहीत केलेल्या मूर्तीवरून गेली दोन अडीच हजार वर्षे तरी भारतात मूर्तिपूजा प्रचलित होती, हे लक्षात येते. तंत्रागमात दगड, धातू, लाकूड, रत्ने इत्यादिकांच्या तयार करावयाच्या मूर्ती, त्यांचे आकार, अवयव, आयुधे, सिंहासन इत्यादिकांचे वर्णन केलेले आहे. मूर्तीमध्ये मंत्रांच्या योगाने प्राण येतो, असे मानतात. मूर्ती आणि मंदिर सूक्ष्म अदृश्य देवतांची प्रतीके होत. मूर्ती आणि मंदिर यांचा संबंध नृत्य, वाद्य व गायन यांच्याशी असतो. त्यांची रचना व व्यवस्था त्याप्रमाणे करावयाची असते. मूर्ती ही देवतेचा अर्चावतार होय, असे ‘पांचरात्रागमा’त म्हटले आहे.

ब्रह्मा, विष्णू व त्याची विविध स्वरूपे, विष्णूचे विविध अवतार, शिवाची विविध स्वरूपे, त्रिमूर्ती, सूर्य, स्कंद, गणपती, देवी व त्यांची विविध रूपे व अवतार, बुद्ध, अनेक बुद्ध, जैनांचे महावीर, पार्श्वनाथ व ऋषभदेव, नवग्रह इ. यांची निर्मिती कशी करावी यासंबंधी आगमग्रंथांत तपशीलवार वर्णन दिलेले आहे. मुख्य देवाचे वाहन आणि परिवारदेवता असतात. ब्रह्मदेवाच्या मूर्तीची चार तोंडे, चार हात, वरदमुद्रा, स्रुवा, कमंडलू, अक्षमाला, डावीकडे सावित्री, उजव्या बाजूला सरस्वती, भोवती ऋषी, हंसवाहन, कमलासन व त्यावर दर्भासन, योगमुद्रा इ. गोष्टी दिसतात. विष्णूची मूर्ती असेल तर सावळा रंग, चार हात, पिवळी वस्त्रे, शेजारी लक्ष्मी, पुढे गरुड, चार हातांत शंख, सुदर्शन, गदा आणि कमळ असे स्वरूप दिसते. विष्णुपंचायतन असले, तर मधे विष्णुमूर्ती आणि चार कोणांमध्ये शंकर, गणेश, देवी व सूर्य या चार परिवारदेवता असतात. शिवाची बहुतेक लिंगेच असतात. काही लिंगांच्या मध्ये चतुर्मुख व पंचमुख शिवमूर्ती घडविलेली असते. कित्येक ठिकाणी एकमुख लिंगही असते. शिवपार्वतीची मिथुनमूर्ती वा तांडवनृत्य करणाऱ्या शिवाचीही मूर्ती प्रसिद्ध आहे. महिषासुरमर्दिनी देवीची आणि सप्तमातांच्या मूर्तीही काही देवालयांत दिसतात.

तंत्रांच्या वास्तुशास्त्रात ग्रामनिवेश व नगरनिवेश सांगून प्रासाद म्हणजे देवालये कुठे बांधावी व कशी बांधावी, यासंबंधी सविस्तर विधान केलेले असते. प्रासादाच्या नागर, द्राविड आणि वेसर अशा तीन शैली सांगितल्या आहेत. त्यांची विविध परिमाणे आणि चतुष्कोण, दीर्घवर्तुळ इ. रचनाप्रकार, अधिष्ठान, मंडप व मंडपातील स्तंभ त्याचप्रमाणे प्राकार, मर्यादा, मध्यहार, अंतर्हार, अंतर्मंडप, गर्भगृह, गोपुर व शिखर यांचे स्पष्टीकरण असते. वेदातील इंद्र, वरुणादी देवांच्या मूर्तीसह इतर शेकडो देवदेवींच्या मूर्तीची विधाने आगमांत सांगितली आहेत. दक्षिणेतील विशाल मंदिरांत व मंदिरांवर शेकडो देवदेवींच्या मूर्ती निर्माण करून बसविलेल्या दिसतात. त्या देवतांचे पारमेश्वरसंहिता या पांचरात्रागमाच्या ग्रंथात वर्णन आलेले आहे.

पूजा : म्हणजे उपासना. पूजेचा अधिकार तंत्रोक्त पद्धतीने गुरूपासून दीक्षा घेतलेल्या शिष्यासच असतो. दीक्षा न घेतलेल्या व्यक्तीस बद्ध किंवा शैवागमाप्रमाणे पशू म्हणतात. दीक्षा घेणारा शिष्य वीर होय. पूजेच्या योगाने सिद्धी प्राप्त झालेल्याला ‘दिव्य’ म्हणतात; कारण त्याच्यात देवतेची शक्ती प्रकट होते. गुरू हा दीक्षेमध्ये मंत्र देतो. पूजेचे बहिर्याग व अंतर्याग किंवा बाह्यपूजा व मानसपूजा, असे दोन भेद आहेत. यात इष्टदेवतेचे मंत्रांकित यंत्र व इष्टदेवतेची मूर्ती या दोन गोष्टींची आवश्यकता असते. बाह्यपूजेमध्ये मानसपूजासुद्धा करावी लागते; मंत्र व मंत्रार्थ मनात आणावाच लागतो. मूर्तीमध्ये देवतेची भावना करावी लागते. ही देवता स्थूलरूपाने, सूक्ष्मरूपाने ध्यानात आणावी. स्थूल, सूक्ष्म आणि पर (अरूप) असे तिचे स्वरूप असते. मानसपूजेसहित बाह्यपूजेने मुमुक्षूला सिद्धी व मोक्ष प्राप्त होतो. बाह्यपूजेने ऐहिक व पारलौकिक भोगांची प्राप्ती होते. बाह्यपूजेत साधे पत्र, पुष्प, फल किंवा जल ह्यांपैकी एखादाही उपचार चालतो. पूर्णपूजेत पंचोपचार, षोडशोपचार, चौसष्ट उपचार किंवा त्यापेक्षाही अधिक उपचार सांगितले आहेत.

पूजातंत्र : स्नानसंध्यादी नित्यकर्म झाल्यावर विध्युक्त पद्धतीच्या स्थानी जाऊन गुरू, इष्टदेवता, दिक्पाल यांना प्रणाम करावा; आचमन व पवित्र धारण करून, प्रार्थनामंत्र म्हणून देवघरात प्रवेश करावा. आचमन करून अनेक अवयवांना जलस्पर्श करून द्वारदेवतांची पूजा करावी. शिखाबंधन व आसनपरिग्रह करून दिशांची पूजा करावी. नंतर शरीरातील पंचमहाभूतांची शुद्धी करावी. या सर्व क्रिया मंत्रपूर्वक करावयाच्या असतात. त्यानंतर शरीराच्या सहा अंगांमध्ये म्हणजे हृदय, शिर, शिखा, इतर अंगे आणि दोन नेत्र यांच्यामध्ये मंत्रांनी देवतांचा न्यास करावा. नंतर ध्यानमंत्र म्हणून सुलटउलट कपाळापासून पायापर्यंत निरनिराळे बीजमंत्र म्हणून इष्टदेवतेला नमस्कार करावा. नंतर देवतेमध्ये आत्मतत्त्व, विद्यातत्त्व आणि शिवतत्व किंवा विष्णुतत्त्व यांचा न्यास करावा. त्याचप्रमाणे बीजमंत्रांचाही न्यास करावा. पूजेकरता लागणाऱ्या पाण्याच्या पात्राची स्थापना करून त्याची पूजा करावी. इतर पूजोपकरणांवर प्रोक्षण करावे. शंख व घंटा यांची पूजा करून इष्टदेवतेचा अभिषेक करावा. अभिषेकानंतर गंध, पुष्पे, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य इ. समर्पण करावेत. इष्टदेवतेच्या मुख्य मंत्राचा ध्यानमंत्रपूर्वक जप करावा. जपांती पुष्पांजली अर्पण करून व आचमन करून नैवेद्याचे स्वत: सेवन करावे. जपाच्या वेळी देवतेचे स्तोत्र आणि कवच, हृदय, शतनाम, सहस्रनाम यांपैकी एखादे म्हणावे. कवच व हृदय, शतनाम व सहस्रनाम हेही स्तोत्राचे विशेष प्रकार होत. त्या त्या देवतेचे उपनिषद असल्यास तेही म्हणावे.

देवालयांचे उत्सव असतात; त्याकरिता यात्रा जमते. त्यावेळच्या महापूजेचा यात्रा हाही भाग असतो. पालखी किंवा रथ यांमधून मूर्तीची मिरवणूक निघत असते. यांचेही विधान आगमग्रंथात सांगितलेले आहे.

योग : मानसिक पूजेचेच योगविधी हे स्वरूप आहे. पातंजलयोगसूत्रात ⇨ अष्टांगयोग  सांगितला आहे. तंत्रमार्गात प्राणायाम, ध्यान, प्रत्याहार, धारणा, तर्क ( सविकल्प समाधी) आणि समाधी, असा षडंगयोग सांगितला आहे.

तंत्रमार्गातील योगसाधना शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत करून साधावयाचा असतो. कुंडलिनीयोग पातंजलयोगामध्ये सांगितलेला नाही. कुंडलिनी ही विश्वशक्ती होय. तीच शरीरातही विद्युल्लतेसारखी सर्पिण बनून मूलाधारात वास करते. तिला जागृत करून पृष्ठवंशात असलेल्या सुषुम्ना नाडीतून नेऊन दोन भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्रातील शिवाची व तिची भेट करवावी. नंतर मस्तकातील सहस्रदल चक्रात कुंडलिनीरूप शक्ती आणि शिव यांचे सामरस्य होते, ते अनुभवणे म्हणजेच समाधी होय. मानवी शरीरात मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा अशी सहा चक्रे असून शिवाय लंबिका (पडजीभ), ललाट (कपाळ) आणि ब्रह्मरंध्र अशी तीन चक्रे मिळून नऊ चक्रे आहेत. षड्चक्रांचा भेद करून सहस्रारचक्रात ब्रह्मरंध्रापाशी कुंडलिनी शक्तीला योगसाधनेने नेऊन पोहोचवायचे असते. मूलाधारचक्र हे जननेंद्रिय आणि गुद यांच्या मधल्या भागात, स्वाधिष्ठान हे जननेंद्रियाच्यावर सहा अंगुले, मणिपूर नाभीजवळ, अनाहत हृदयात, विशुद्ध कंठात आणि नाकाच्या वर दोन भुवयांच्या निम्नभागात आज्ञा असते, असे म्हटले आहे. कुंडलिनी शक्तीची कल्पना मुळात आर्येतर नाग जमातींची असावी. ती तंत्रागमांनी स्वीकारली असावी. मस्तकातील व भृकुटिमध्यातील स्थान हे परमात्म्याचे स्थान असून ते स्वर्गाचे किंवा मोक्षाचे द्वार होय, अशी कल्पना आरण्यकांत आणि प्राचीन उपनिषदांत सांगितली आहे.

तंत्रागम साहित्य : शैव, शाक्त, वैष्णव व बौद्ध आगमांचे प्रत्येकी शेकडो ग्रंथ झालेले आहेत. शाक्त व शैव आगमांचे ग्रंथ काही समान आहेत, काही वेगळे आहेत. सर्व आगमांमिळून अनेक हजारांपेक्षा अधिक ग्रंथांचे निर्देश आढळतात. त्यांतील सु. पन्नास चांगल्या तऱ्हेने मुद्रित व प्रकाशित मिळतात.

सर्वसामान्य तंत्रग्रंथ : तंत्राभिधानम् (कलकत्ता, १९३७), प्रपंचसारतंत्रम् (शंकराचार्यविरचित, २ भाग, कलकत्ता, १९३५ ), मंत्रमहोदधि (महीधरविरचित, कलकत्ता, १८९२), यंत्रचिंतामणि (मुंबई, १९०२), शारदातिलकतंत्रम् (लक्ष्मणदेशिकेंद्रविरचित, २ भाग, कलकत्ता, १९३३).

जोशी, लक्ष्मणशास्त्री

तांत्रिक कला : तंत्रमार्गी साधनेमधील एक साधनभूत घटक तसेच तांत्रिक तत्त्वज्ञानाचे विशदीकरण, अशा दोन्ही अंगांनी दृश्य कलांचे कार्य या पंथामध्ये अजोड ठरले आहे. कलेमध्ये आज आपण ज्यांना माध्यमसाधने म्हणतो अशा रंग, धातू, दगड, लाकूड या जडद्रव्यांचा त्यांनी चैतन्यघन घटक म्हणून उत्कट वापर केला आणि मूळ तत्त्वज्ञानाइतकेच महत्त्व या साधनघटकांना प्राप्त झाले. अशा रीतीने कलाविष्कार हे तांत्रिक पंथाचे अविभाज्य अंग बनले. आदिमानवी कलेमध्ये जसे जीवनचैतन्य ओसंडून जाते, तसेच ते तांत्रिक कलेमधूनही रसिक मनाचा ठाव घेते. मानवी मनाप्रमाणेच मानवी शरीर हेही असीम विश्वचैतन्याचे एक अंगभूत आविष्करण आहे. म्हणून शरीरमनासह अंतर्बाह्य चैतन्याचा संवाद ‘याचि देहि’ साधणे हेच खरे अध्यात्म; अशी तांत्रिकांची ठाम भूमिका होती. अर्थातच, आध्यात्मिक विचारप्रणालींमध्ये वर्ज्य मानलेले स्त्री, मद्य, मांसादी पंच‘म’कारही त्यांनी तांत्रिक विधीमधील अंगभूत घटक मानले. स्त्री-पुरुष लैंगिक घटना ही आध्यात्मिक साक्षात्कारामधील महत्त्वाचा विधी म्हणून स्वीकार्य मानली. सांख्यांमधील प्रकृति-पुरुष हे प्रतिमाद्वंद्व तांत्रिकांमधील या लैंगिक द्वंद्वघटनेशी समांतर आहे. सांख्यांमधील प्रकृती किंवा आदिमाया ही महामाता, देवी तारा, कालिमाता, महाकाली, डाकिण इ. अनेक संस्करणांतून विविध रूपे घेत बौद्ध, हिंदू, जैन यांमधील तांत्रिक पंथांमध्ये अवतरते. आदिमायेच्या या कल्पनेचे मूळ यूरोप आणि आशियाभर आदिम काळापासून रूढ असलेल्या मातृदेवतेमध्ये सापडते. ‘जड-चैतन्या’च्या द्वंद्वविकासाची मुक्त क्रीडा किंवा लीला म्हणजेच अंतिम विश्वसत्य, अशी तांत्रिकांची भूमिका असल्यामुळे या क्रीडेमधील परमचैतन्याची भावोत्कट जाणीव त्यांच्या कलाविष्कारांमधून गोचर व्हावी, हे स्वाभाविक होते. कलाचैतन्यामध्ये अभिप्रेत असलेला संवाद-विरोधमय सौंदर्यभाव तांत्रिकांच्या अध्यात्मवृत्तीमध्ये अंगभूत होता. या पंथामध्येच ⇨अभिनवगुप्त  हा थोर प्रज्ञेचा सौंदर्यशास्त्रज्ञ होऊन गेला, हे विशेष.

तांत्रिकांमधील दृश्य कलाविष्कारांचे तीन प्रमुख गट करता येतील. योग्यांना ध्यानधारणा करण्यासाठी साधनभूत म्हणून वापरल्या गेलेल्या विविध प्रकारच्या अप्रतिरूपाकृती किंवा यंत्रे, विधीमध्ये आवश्यक असलेली इतर पूजासाधने अलंकृत केली जात; त्यातून अनेकविध कारागिरीच्या वस्तू निर्माण झाल्या; ही तांत्रिकांची कनिष्ठ कला होय. याशिवाय प्रकृति-पुरुष, विश्व-निर्मिति-विलय, आदि-अंत, अवकाशकाल, मानवी शरीरातील शक्तिकेंद्रे किंवा चक्रे इ. तांत्रिक कल्पनांचे विशदीकरण करण्याच्या प्रयत्नातून चित्रे आणि शिल्पाकृती निर्माण झाल्या.

यांतील पहिल्या प्रकारातील यंत्रे भौमितिक आकारांवर आधारलेली आहेत. क्वचित त्यांत अलंकरणही असते. मात्र त्यातील मूलभूत भौमितिक जडणघडण अलंकरणातूनही अबाधित राहते. परस्परविरोधी आकाररंगांची मांडणी त्यांत एका केंद्रानुवर्ती अवस्थेत केलेली असते. त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळे हे त्यातील मुख्य आकार असून अंतिमत: ती एक पूर्ण मंडलाकृती होते. या आकृतीचा केंद्रबिंदू म्हणजे विलयावस्था होय. ॐकारातील अनुनासिक नादबिंदूशी या केंद्रबिंदूची समरूपता असते. अशा आकृत्यांवर ध्यान करणाऱ्या साधकाच्या  मनावर त्याचा  व्यूहमानसशास्त्रीय परिणाम व्हावा, हे अगदी स्वाभाविक आहे. अशा केंद्रानुवर्ती मंडलाकृतीमध्ये मानवी मनाच्या द्वंद्वविकासी (डायलेक्टिकल), अति-आदिम (प्रीमॉर्डियल) प्रेरणांचे सार साठवलेले असते; मानवी मनोरचनेचा तो मूलबंध असतो; असे प्रतिपादन युंग या मानसशास्त्रज्ञाने केले असून आपल्या मानसशास्त्रीय सिद्धांताला त्याने ‘मंडलसिद्धांत’ असे नाव दिले आहे. ‘सुवर्ण पुष्प’ (गोल्डन फ्लॉवर) या कल्पनेवर आधारलेल्या तांत्रिक चित्रांवरून त्याच्या या सिद्धांताची त्याला स्फूर्ती मिळाली असल्याचे त्याने आपल्या कलांचे आत्मचरित्रात नमूद केले आहे. या मंडलाकृतीमुळे मानवी मनातील यांना द्वंद्वभावाचे केंद्रानुवर्ती संतुलन होते, तेव्हा द्वंद्वनिरास होऊन निर्द्वंद्व अवस्था प्राप्त होते, असे मानसशास्त्रीय आधारावर म्हणता येते. मंडलाकृती किंवा इतरही चित्र-शिल्पांमध्ये येणारे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, बिंदू या भौमितिक मूलभूत संकल्पना किंवा मूलबंध आहेत. भारतीय मंदिरे आणि स्तूप यांची रचनासुद्धा अशी मंडलाकृतीवर आधारलेली असते. भारतीय ज्योतीर्गणितभूमितिशास्त्रात संशोधनासाठी ज्या वेधशाळा उभारण्यात आल्या, त्यांची रचनासुद्धा बहुधा मंडलाकृतियुक्त किंवा मूलभूत भौमितिक आकारांची होती. येथेही आपणास तांत्रिक कलेचा प्रभाव जाणवतो. असे मंडलाकृतियुक्त सुंदर दगडगोटे मिळाल्यास ध्यानधारणेसाठी त्यांचाही उपयोग तांत्रिक व ताओ पंथातील योगी करीत असत.

तात्त्विक कल्पनांचे विशदीकरण करण्यासाठी निर्माण झालेले कलाविष्कार या सर्वांहून प्रभावी आहेत. जीवनातील जड-चेतन, मंगल-अमंगल, सात्त्विक-तामसी, सुकोमल-विक्राळ, सुंदर-विराट अशा द्वंद्वांचे संतुलन करण्यावर तांत्रिकांची श्रद्धा होती. आदिम निर्मितीचे लैंगिक प्रतीक असे शिवलिंग, स्त्रीयोनी, सर्प, अंडाकृती इ. आकारांचा भावघन प्रतिमा म्हणून त्यांनी उपयोग केला. आदिमायेचे विविध रूपांतील चित्रण करण्यासाठी स्त्रीप्रतिमेचा, तिच्या जननफलनासह, त्यांनी जो नि:संकोच वापर केला आहे, त्याला अभिव्यक्तीच्या दृष्टीने कलेच्या इतिहासात फार वरचे स्थान आहे. खजुराहो येथील मिथुनशिल्पे ही त्याची कलादृष्ट्या अजोड उदाहरणे आहेत. नेपाळ, तिबेट, चीन या देशांत प्रामुख्याने धातुशिल्पे आणि टंकचित्रे तांत्रिकांनी हाताळली. भारतामध्ये देवालयाच्या वास्तूमध्ये दगडातील मिथुनशिल्पे प्रामुख्याने आढळतात. शिवाय जननफलनाच्या अभिव्यक्तीसाठी स्त्रीआकृतीचा प्रतीकात्म उपयोग केलेली चित्रे आणि दगडातील व लाकडातील शिल्पे विपुल आहेत. तांत्रिकांची खास अशी चित्रशैली होती; पण त्याशिवाय कांग्रा, राजस्थानी, जैन इ. शैलींमध्ये तांत्रिक चित्रे निर्माण झाल्याचे आढळते. तांत्रिक पंथातील महत्त्वाचे आकारकल्प आणि ‘हीँ, क्लीँ, ॐ’ यांसारखी मंत्राक्षरे यांचा आधुनिक भारतीय चित्रकारांनी आपल्या परीने वापर सुरू केला असून १९६० नंतरच्या काळात तांत्रिक कलेची आधुनिक भारतीय शैली रूढ होत आहे. (चित्रपत्र ३७).

 

कदम, संभाजी

पहा : काश्मीर शैव संप्रदाय; वैष्णव संप्रदाय; शैव संप्रदाय; हठयोग.

संदर्भ : 1. Banerjea, J. M. Puranic and Tantric Religion, Calcutta, 1966.

2. Chakravarti, Chintaharan, Tantras, Calcutta, 1963.

3. Mookerjee, Ajit, Tantra Art : Its Philosophy and Physics, New Delhi, 1966.

4. Rawson, Philip, The Art of Tantra, Delhi, 1973.

5. Schrader, F. Otto, Introduction to the Panchratra and the Ahirbudhnya Samhita, Madras, 1973.

6. Woodroffe, John, Introduction to Tantra Sastra, Madras, 1963.

७. अवस्थी, शिवशंकर, मंत्र और मातृकाओं का रहस्य (तंत्रानुसार), वाराणसी, १९६६.

८. गोपीनाथ कविराज, तांत्रिक वाङ्मय में शाक्त दृष्टि, पाटणा, १९६३.