गुणस्थान : जैन धर्मातील एक संकल्पना. जीवाला सिद्धावस्था प्राप्त करून घेण्यासाठी ज्या चौदा अवस्थांचा सोपान चढून जावे लागते, त्या अवस्थांना ‘गुणस्थान’ म्हणतात. या विश्वातील सर्वच जीव कर्ममलाने युक्त असल्याने अशुद्ध आहेत. फक्त मनुष्यजन्मामध्येच जीव कर्मांचा नाश करून आत्म्याची पूर्ण शुद्धी प्राप्त करू शकतो. मोहात सर्वस्वी बुडून गेलेला जीव एका हीनतम अशा टोकाला, तर सर्व कर्माचा नाश करून निर्मल, निरंजन असा सिद्ध जीव उच्चतम अशा दुसऱ्या टोकाला असतो. ह्या दोन आत्यंतिक टोकांच्या मधे कमीअधिक आत्मिक शुद्धी प्राप्त झालेल्या जीवांच्या अवस्था असतात. ह्या सर्व अवस्था अथवा गुणस्थाने एकूण चौदा असून ती पुढीलप्रमाणे आहेत :

(१) मिथ्यात्व : आत्मिक शुद्धीचा विचारही उत्पन्न न झालेली मूळ अवस्था. (२) सासादन : चौथ्या गुणस्थानातून भ्रष्ट झालेल्या जीवाची अवस्था. सासादन म्हणजे पतन. (३) सम्यग्‌मिथ्यात्व : श्रद्धा व विपरीत श्रद्धा यांचे मिश्रण असलेली अवस्था. (४) अविरत सम्यक्‌त्व : धर्मतत्त्वांवर श्रद्धा असते परंतु व्रताचरण नसते. कधीकधी जीव श्रद्धेपासून च्युत होऊन खालच्या गुणस्थान जातो. (५) देशविरत : जीव गृहस्थाची व्रते अथवा अंशतः संयम पाळतो, (६) प्रमत्त–विरत : जीव साधूची व्रते किंवा संयम पाळतो पण प्रमादशील असतो. (७) अप्रमत्त : जीव प्रमादरहित होऊन संयम पाळतो. (८) अपूर्वकरण : जीवाला प्राप्त झालेली विशुद्धी अपूर्व अशी असते. (९) अनिवृत्तीकरण : जीवाच्या अधिक निर्मल ध्यानामुळे अधिक कर्मनाश होतो. (१०) सूक्ष्म–सांपराय : जीवाच्या ठिकाणी सूक्ष्मरूपाने लोभरूप कषाय (विकार) डोकावत असतो. (११) उपशांत मोह : मोहनीय कर्माचा उपशम होतो. (१२) क्षीण मोह : मोहनीय कर्माचा नाश होतो. (१३) सयोग केवली : जीवास केवलज्ञानप्राप्ती होऊन, तो ‘जिन’ पदास पोहोचतो. ही सदेह मुक्तीची अवस्था होय. (१४) अयोग केवली : जीवाचा काययोग संपून, तो ‘सिद्ध’ पदी पोहोचतो. हीच विदेह मुक्तीची अवस्था होय.

संदर्भ : मेहता, मोहनलाल, जैन आचार, वाराणसी, १९६६.

पाटील, भ. दे.