शिंतो धर्म : जपानमधील एक प्राचीन धर्म. ‘शिंतो’ म्हणजे देवांचा मार्ग. जपानमध्ये रूढ झालेल्या बौद्ध धर्माहून ह्या धर्माचे किंवा देवमार्गाचे वेगळेपण दाखविण्यासाठी इ. स. सहाव्या शतकात हा शब्द वापरात आला. शिंतो हा जपानी जनतेत पूर्वापार प्रचलित असलेला आचार धर्म आहे. जपानी लोकांची मूल्यव्यवस्था, विचार आणि आचरण ह्यांच्याशी शिंतोचा घनिष्ठ संबंध आहे. ⇨ कोजीकी (७१२, इं. शी. रेकॉर्ड्स ऑफ एन्शंट मॅटर) आणि निहोनशोकी (७२०, इं. शी. क्रॉनिकल्स ऑफ जपान) ह्यांना काहीजण शिंतो धर्माचे पवित्र ग्रंथ मानतात. त्यांत थेट नैतिक उपदेश आढळणे कठीण असले, तरी शिंतो धर्माचे सिद्धांत काय असावेत, ह्याचे अनुमान त्यांतील पौराणिक व धार्मिक चालीरीतींच्या वर्णनांतून काढता येते. सर्वसामान्यत्वाच्या कक्षेबाहेरचे जे काही महान असेल, त्याला प्राचीन जपानी लोक देवत्व बहाल करीत. उदा., निसर्गदेव. पृथ्वी, समुद्र, पर्वत, प्राणी, वनस्पती ही ह्या निसर्गदेवांची प्रतीके. मानव-देव म्हणजे मरण पावलेल्या थोर वीरांच्या वा पराक्रमी पुरुषांच्या महत्कृत्यांचे ईश्वरी स्वरूप. निर्मिती, पुनर्निर्मिती, विचार, सद्भाग्य, दुर्भाग्य तसेच जीवनाच्या अन्य पैलूंवर प्रभाव टाकणाऱ्या शक्तीही देवच होत्या. ह्यांपैकी काही रक्षकदेवता जपानी कुटुंबांतून पूजिल्या जात. महत्त्वाचे धार्मिक विधी शेतीशी निगडित होते. त्यांतही, पीक उत्तम यावे, म्हणून वसंत ऋतूत केली जाणारी प्रार्थना आणि शरतकाली देवाचे आभार मानण्याचा विधी हे विशेष महत्त्वाचे.

प्राचीन शिंतो धर्मात जगासंबधीच्या दोन वेगवेगळ्या संकल्पना अस्तित्वात होत्या. एक, ऊर्ध्व वा उभ्या रेषेत असणाऱ्या जगाची. या जगात अगदी वरच्या टोकाला स्वर्गलोक (ताका-मागा-हारा), मध्यभागी मनुष्यलोक (नाकात्सु-कुनी) आणि अगदी तळाला तमोभूमी (योमी-नो-कुनी) होत. जपानी पुराणकथांमध्येही हीच कल्पना प्रामुख्याने आहे. जगाची दुसरी संकल्पना समस्तर जगाची. त्यात एक वर्तमान जग आणि दुसरे शाश्वत जग. शाश्वत जग अतिदूर, समुद्रावर असलेले तथापि आपण ज्या जगात राहतो, ते वर्तमान जग शिंतो धर्माच्या दृष्टीने सर्वांत आदर्श होते. शिंतो धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या अठराव्या शतकातील काळातही आपण राहतो त्या जगाच्या स्वीकारावर भर देण्यात आला.

सहाव्या-सातव्या शतकांत शिंतोवर कन्फ्यूशस पंथाचा प्रभाव पडून शिंतो हा नैतिक मार्गदर्शनही करू लागला. एक राष्ट्र म्हणून जपानची जडणघडण होत असताना एकत्रीकरणाची जी प्रक्रिया सुरू झाली, तीत जपानमधील विविध कुलांच्या पुराणकथा एकत्र करण्यात आल्या आणि सूर्यदेवतेला (अमतेरसू ओहमी-कामी) सर्वश्रेष्ठत्व लाभले. जपानच्या राजघराण्याची पूर्वज म्हणूनच नव्हे, तर जपानी जनतेची सर्वश्रेष्ट संरक्षक देवता हे स्थान तिला प्राप्त झाले परंतु त्याचवेळी जपानमधील कुलांच्या विशिष्ट देवतांच्या उत्सवप्रसंगी जपानच्या राजघराण्याकडून त्या देवतांना नैवेद्य अर्पण केला जात असे. ही पद्धत ६४५ पर्यंत चालू होती असे दिसते.

कोरियन द्वीपकल्पातून बौद्ध धर्म जपानमध्ये प्रविष्ट झाला. शिंतो धर्म आणि बौद्ध धर्म ह्यांच्या परस्परसंपर्काकडे अनेक प्रकारे पाहता येईल. एक कल्पना अशी, की शिंतो देवता ह्या बौद्ध धर्माचे रक्षण करतात. आठव्या शतकाच्या मध्याला नारा यथेल तोडाइजी मंदिरात शिंतो देवतांची पूजास्थाने बांधण्यात आली. तसेच प्रसिद्ध शिंतो देवस्थानांच्या परिसरात बौद्ध मंदिरे उभी राहिली. शिंतो देवस्थानांसमोर बौद्ध प्रार्थना म्हटल्या जात. आठव्या शतकाच्या अखेरीस बौद्ध-शिंतोंचा एक पंथ शिंतो देवतांना बोधिसत्त्व मानू लागला. तेंडाई संप्रदाय ह्या नावाने ओळखला जाणारा प्रातिनिधिक बौद्ध-शिंतो पंथ शिंतो देवता म्हणजेच आद्य बुद्ध प्रकृती होय, असे मानू लागला. शिंगॉन संप्रदायाने शिंतो देवता म्हणजे प्रतीकरूपाने सूर्य असलेला महाविरोचन होय असे मानले. अशा प्रकारचा बौद्ध-शिंतो धर्म १८६८ सालापर्यंत सम्राट मेजीची कारकिर्द सुरू झाल्यानंतर काही देवस्थानांमधून अस्तित्वात असल्याचे दिसते.

बौद्ध-शिंतो धर्माची दार्शनिक बैठक तेराव्या शतकात पूर्णत्वास गेली पण त्यास विरोध करणारे शिंतो पंथही जवळपास त्यास सुमारास उदयास आले. वाताराई शिंतो हा अशा प्रकारचा पहिला पंथ होय. शिंतोमध्ये आलेले बौद्ध घटक वगळून त्याला शुद्ध जपानी रूप देण्याचा प्रयत्न ह्या पंथाने केला. कोंतोन (केऑस क़िंवा गोंधळाची स्थिती) किंवा असत् (अभाव) (नॉन-बीइंग) ही विश्वाची मूलभूत अवस्था ह्या पंथाने मानली. ह्या अवस्थेतून सर्व जीव निर्माण झाले. प्राचीन शिंतोमध्ये महत्व देण्यात आलेल्या शुद्धतेला, शुद्धाचरणाला ह्या पंथाने अधिक खोल असा आध्यात्मिक अर्थ दिला. ‘शोजिकी’ म्हणजे नेकी आणि साधुता ह्यांच्या बळावर आपण देवांशी (कामी) एकरूपता साधू शकतो, अशी ह्या पंथाची शिकवण होती.

योशिदा शिंतो हा संप्रदाय पंधराव्या शतकाच्या अखेरीस उदयाला आला. योशिदा कानेतोमो (१४३५–१५११) ह्याने ह्या पंथाची सैद्धांतिक बैठक घडवली. वाताराई शिंतोबरोबरच ताओवादाचा काही प्रभाव त्याच्यावर होता. एखादी व्यक्ती जर खरोखर विशुद्ध झालेली असेल, तर तिचे ह्रदय हे कामींचे–म्हणजे देवांचे–निवासस्थान होऊ शकते, अशी ह्या पंथाची शिकवण होती.

सतराव्या शतकात प्राचीन चिनी तत्त्वज्ञ ⇨ कन्फ्यूशस ह्याच्या विचारांनी प्रभावित झालेले काही शिंतो पंथ निर्माण झाले. नव-कन्फ्यूशस मताच्या दृष्टिकोणातून शिंतोचा अन्वयार्थ अभ्यासक लावू लागले. अठराव्या शतकात शिंतोचे पुनरुज्जीवन करण्याची चळवळ सुरू झाली (फुक्को शिंतो). मोतुरी नोरीनागा (१७३०– १८०१) हा ह्या पुरुज्जीवनवादी चळवळीचा प्रमुख प्रतिनिधी. पुनरुजज्जीवनवाद्यांनी बौद्ध धर्म आणि कन्फ्यूशस ह्यांच्या विचारांचा शिंतोवरील प्रभाव नाकारला. अभिजात जपानी साहित्यातून प्रत्ययास येणाऱ्या आपल्या प्राचीन पूर्वजांच्या श्रद्धा आणि त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ह्यांतून शिंतोचे प्राचीन रूप शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जपानमधील विद्यमान शिंतो धर्म ह्या पुनरुज्जीवनावर आधारलेला आहे. अन्य शिंतो संप्रदाय मात्र लुप्त झाले.

आधुनिक शिंतो धर्मात देवतांचे अनेकत्व मानलेले आहे परंतु ‘माकोतो’ म्हणजे सत्यसंकल्प वा सत्याचा मार्ग हा देवत्वाचा गाभा होय, असही त्यात स्पष्ट केले आहे. मनुष्य, देव आणि ह्या विश्वातल्या कित्येक वस्तू ह्यांच्यातील कालातील नातेसंबंधांत माकोतो हा अंतर्भूत असतो. सत्य ही काही अमूर्त संकल्पना नाही वास्तवातून त्याची प्रचिती येत असते. तसेच अवकाश-कालाच्या चौकटीत त्याची अनंत आणि विविध परिवर्तने होत असतात. त्यामुळेच देव हे माकोतोशी अनुरूप असतात. माकोतो वा सत्य जेव्हा माणसात कार्यरत होते, तेव्हा देवांकडून अनुग्रह आणि सहकार्य मिळविण्याची ती एक शक्ती ठरते.


जपानी पुराणकथा, शिंतोची ऐतिहासिक परंपरा आणि शिंतो धर्मीय व्यक्तीला येणारे धार्मिक अनुभव ह्यांतून शिंतोची शिकवण प्रत्ययास येते. शिंतोची एक शिकवण अशी, की देवांनी माणसाला जीवन दिलेले आहे त्यामुळे सर्व माणसे पवित्र आहेत. अर्थातच, सर्वांनी एकमेकांचा आदर राखून परस्परांना सहकार्य केले पाहिजे. माणसाची जीवनाकडे पाहण्याची वृत्ती ही नम्रतेची आणि सत्यशीलतेची असली पाहिजे ही मूलभूत वृत्तीच माणसाकडून सर्व प्रकारची नैतिक कृत्ये घडवून आणते, असे हा धर्म मानतो. आपले काम आणि आपले मानवी संबंध ह्यांत आपला जीव ओतला पाहिजे. आपल्या मर्यादित आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण मनःपूर्वक कारणी लावला पाहिजे. त्या दृष्टीने प्रत्येक वर्तमान क्षण हा मौल्यवान होय. सतत पुढे जाणऱ्या, विकसित होणाऱ्या इतिहासात मिसळून जाण्याचा हाच खरा मार्ग होय.

शतकानुशतके जपानने अनेक प्रकारच्या संस्कृती आणि धर्म आत्मसात केले आणि त्या सर्वांचा सुसंवादी मेळ घालून एक अनन्यसाधारण अशी संस्कृती निर्माण केली. जपानी लोकांच्या मनावर असलेला शिंतोचा प्रभावच ह्या औदार्यातून स्पष्ट होतो.

शिंतोचे तीन प्रकार आहेत. एक प्रकार देवस्थानाला (श्राइन) विशेष महत्त्व देणारा. देवस्थान हे आध्यात्मिक एकतेचे केंद्र होय, असे तो मानतो (१९६४ साली देवस्थानकेंद्रित शिंतोची सु. ८०,००० देवस्थाने होती, १७,००० धर्मगुरू होते, आणि ह्या शिंतोला मानणारी कुटुंबे एक कोटी चाळीस लाख होती). दुसरा प्रकार लोकशिंतोचा. ह्या शिंतोच्या धार्मिक संघटना नाहीत त्याचप्रमाणे विचारव्यवस्था नाहीत. लोकश्रद्धांतून उभ्या राहिलेल्या ह्या शिंतोचे देवस्थानकेंद्रित शिंतोशी निकटचे नाते आहे. तिसरा प्रकार पंथीय शिंतोचा. पंथीय शिंतो म्हणजे एकोणिसाव्या शतकात उदयाला आलेली एक चळवळ आहे. तेरा पंथांच्या शिंतो संघटनांनी तिचा विस्तार घडवून आणला आहे. इझुमो ताइशा-कयो आणि तेन्री-कयो ह्या मोठया संघटनांचे सदस्य अधिक आहेत. वर दिलेले शिंतोचे तिन्ही प्रकार एखाद्या वस्त्राच्या धाग्यांसारखे एकमेकांत गुंतलेले आहेत.

पहा : कन्फ्यूशस झेन पंथ ताओ मत बौद्ध धर्म.

हिराई, नाओफुसा (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)