मेरु पर्वत : पुराणादी प्राचीन भारतीय ग्रंथांतून उल्लेखिलेला एक पर्वत. त्याला ‘सुमेरू’, ‘महामेरू’, हेमाद्री’ (सुवर्णपर्वत), ‘रत्नसानु’ (रत्नखचित शिखराचा) आणि ‘देवपर्वत’ असेही म्हणतात. त्याच्या शिखराचा व्यास पायथ्याच्या व्यासापेक्षा अधिक असल्यामुळे त्याला ‘कर्णिकाचल’ (कमलाकार पर्वत) असेही नाव आहे. भारताच्या वायव्येला नीस या ग्रीक राज्यातील मेरॉस पर्वताच्या किंवा मॉरू पर्वताच्या नावावरून मेरू हे नाव बनले असावे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. मेरू पर्वत म्हणजे पामीरचे पठार, पश्चिम सायबीरियातील अल्ताई पर्वत, हिमालयाच्या उत्तरेचा तार्तर प्रदेश, केदारनाथ, अलमोडा जिल्ह्याच्या उत्त रेचा पर्वत, हिमालयाचे एखादे शिखर, एक काल्पनिक व पुराणकथात्मक पर्वत इ. मते विद्वानांत आढळतात.

हिंदू, जैन व बौद्ध पुराणकथांनी मेरूला विश्वाच्या केंद्रस्थानी वा पृथ्वीच्या नाभिस्थानी मानले आहे. म्हणूनच माळेच्या मध्यमण्याला लक्षणेने ‘मेरूमणी’ म्हणतात. विविध पुराणकथांच्या मते जंबू वगैरे द्वीपेकमळाच्या पाकळ्यांप्रमाणे त्याच्या भोवती आहेत. [→ जंबूद्वीप]. सूर्य, चंद्र व इतर ग्रह त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. त्याची उंची ८५ हजार योजने आहे. त्याच्या शिखरावर स्वर्गीय गंगा उतरते. त्याच्या शिखरावर ब्रह्मदेवाची नगरी असून उतारावर इंद्रादी अष्ट दिक्‌पालांच्या नगरी आहेत. तेथे देव, गंधर्व, सप्तर्षी इत्यादींचे वास्तव्य असते. रावणाची लंका हे मूळचे मेरूचेच एक शिखर होय. तो स्वर्गाला आधार देतो. त्याच्या खाली सप्तपाताल लोक असून त्यांच्या खाली विश्वाचा आधार वासुकी आहे. पांडवांचा अखेरचा प्रवास मेरूच्या दिशेने झाला. ‘मेरूसावर्ण’ व ‘मेरूसावर्णि’ या नावाच्या विशिष्ट मनूंनी या पर्वतावर तप केले होते. मेरूच्या अकरा कन्यांपैकी मेरूदेवी ही नाभिराजाची पत्नी व जैनांचे आद्य तीर्थकार ऋषभनाथ किंवा आदिनाथ यांची माता होती. मेरूव्रत नावाचे जैनांचे एक व्रतही आहे. सोने, चांदी इत्यादींचा प्रतीकात्मक मेरू करून तो दान देण्याचे हिंदूंचेही एक व्रत आहे.

भारतामध्ये एक सांस्कृतिक प्रतीक म्हणून मेरूला महत्त्वाचे स्थान होते. मेरूप्रमाणे भव्य असलेल्या मंदिर, प्रासाद इत्यादींना लक्षणेने मेरू असे म्हटले जाई. उदा., सिद्धमेरू नावाचे शिवमंदिर गुजरातच्या कर्ण राजाने बांधलेला ‘कर्णमेरू प्रासाद’ इत्यादी. मंदिरे, राजवाडे वगैंरेनी युक्त अशा पर्वतांना वा गिरिदुर्गांनाही मेरू असे म्हटले जाई. उदा., अजयराजाचा अजयमेरू (अजमेर), जसलाचा जसलमेरू (जैसलमीर) इत्यादी. विश्व वगैरेंचे प्रतीक असलेल्या तांत्रिक आकृतींच्या केंद्रस्थानी मेरू पर्वत दर्शविलेला असतो. शरीर हे विश्वाचेच छोटे रूप आहे, या धारणेमुळे शरीराच्या केंद्रस्थानीही मेरू पर्वत असल्याचे मानले जाते. पृष्ठवंशातील मेरूदंड हे मेरूचे प्रतीक असून जागृत कुंडलिनी जिच्यामधून ब्रह्मरंध्राकडे जाते, ती सुषुम्ना नाही या मेरूदंडामध्ये असते. मंदिर हे विश्वाचे केंद्रस्थान मानले जात असल्यामुळे मूर्तीच्या बरोबर मस्तकावर येणारे मंदिराचे शिखर हे मेरूचे प्रतीक मानले जाते. 

साळुंखे, आ. ह.