महालक्ष्मीमूर्ती, मुंबई.महालक्ष्मी : आदिशक्तीचे एक रुप. दुर्गासप्तशती (देवीमाहात्म्य) या ग्रंथानुसार त्रिगुणात्मक, सर्वश्रेष्ठ व सर्वव्यापक अशी महालक्ष्मी ही जगाचे आदिकारण आहे. तिची सगुण व निर्गुण अशी दोन रूपे आहेत. सगुण रूपातील तिच्या हातात महाळुंगाचे फळ, गदा, चर्म व पानपात्र असते, तर मस्तकावर नाग, लिंग व योनी यांची प्रतीके असतात. चतुर्भुज आणि अष्टादशभुज (१८ हातांची) अशी तिची दोन रूपे आढळतात. महालक्ष्मी तमोगुणयुक्त रूप धारण करून महाकाली बनली आणि सत्त्वगुणयुक्त रूप धारण करून महासरस्वती बनली, अशी कथा आहे. पुढे तिने स्वतः ⇨ ब्रह्मदेव व लक्ष्मी यांना जन्म दिला तसेच तिच्या सांगण्यावरून महाकालीने शंकर [⟶ शिवदेवता] व त्रयी विद्या यांना आणि महासरस्वतीने ⇨ विष्णू व ⇨ गौरी यांना जन्म दिला. अशा प्रकारे विश्वनिर्मितीला प्रारंभ झाला आणि महालक्ष्मी ही विश्वाचे आदिकारण ठरली.

भारतीय परंपरेत ⇨ लक्ष्मी हे विष्णुपत्नीचे नाव आहे परंतु ‘महा’ हे विशेषण लावून बनलेला ‘महालक्ष्मी’ हा शब्द मात्र कधी विष्णुपत्नी या अर्थाने, तर कधी शिवपत्नी या अर्थाने वापरला असल्याचे आढळते. हे दोन अर्थ वर उल्लेखिलेल्या अर्थापेक्षा काहीसे वेगळे आहेत. वाचस्पत्य या संस्कृत शब्दकोशात हे दोन्ही अर्थ दिले आहेत. ‘लक्ष्म’ या शब्दाचा ‘चिन्ह’ असा अर्थ असल्यामुळे ‘लक्ष्मी’ या शब्दाचा ‘शुभ चिन्हे असलेली’ म्हणजे पर्यायाने ‘कल्याणकारक’ असा अर्थ होतो. या दृष्टीने पाहता महालक्ष्मी हे विशेषण विष्णुपत्नी व शिवपत्नी या दोघींच्याही बाबतीत अन्वर्थक ठरते. कारण, त्या दोघीही कल्याणकारक देवता असल्याची त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे.

ऋग्वेदातील ‘ खिलसूक्तां ’पैकी श्रीसूक्तात महालक्ष्मी ही विष्णुपत्नी मानल्याचे आढळते. पुराणांतूनही विष्णुपत्नीचा महालक्ष्मी म्हणून निर्देश येतो. कोल्हापूरखेरीज अन्य ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती बनवायची असेल तर ती विष्णुपत्नी आहे, असे मानून त्यानुसार मूर्ती बनवली जाते, असे देवीकोशात म्हटले आहे.

याउलट, महालक्ष्मी म्हणजे ⇨ दुर्गा असल्याचे निर्देशही आढळतात. उदा., महिषासुरमर्दिनी चंडीलाच महालक्ष्मी मानण्यात आले आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे स्थान हे एक ⇨ शक्तिपीठ असल्यामुळे स्वाभाविकच तेथील देवी ही दुर्गा ठरते. [⟶ कोल्हापूर शहर].

स्त्रियांना छळणाऱ्या कोलासुर नावाच्या दैत्याचा महालक्ष्मीने नाश केला या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी महालक्ष्मीचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीचे आगमन होते, ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा होते व मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन होते. आश्विन शुद्ध अष्टमीला महालक्ष्मीव्रत नावाचे एक काम्यव्रतही केले जाते. कोल्हापूर, मुंबई, झांशी, गोव्यातील बांदिवडे इ. ठिकाणी महालक्ष्मीची मंदिरे आहेत.

संदर्भ : 1. Agrawala, Vasudeva Sharan, Ed. Devl-Mahatmyam, Varanasi, 1968.            २. प्रभुदेसाई, प्र. कृ. आदिशक्तीचे विश्वस्वरूप (देवीकोश), ३ खंड, पुणे, १९६७–६८.

साळुंखे, आ. ह.