सण व उत्सव : सण व उत्सव या संस्था अतिप्राचीन काळा- पासून ते अर्वाचीन काळापर्यंत आणि आदिम समाजांपासून ते आधुनिक सुधारलेल्या समाजांपर्यंत जगातील सर्व समाजांत व राष्ट्रांत सर्व काळी अस्तित्वात असलेल्या दिसून येतात. ‘ सण ’ हा शब्द ‘ क्षण ’ ह्या संस्कृत शब्दावरून आलेला आहे. क्षण-छण-सण अशी त्याची व्युत्पत्ती देतात. ⇨ हेमचंद्रा च्या प्राकृत व्याकरणात छण म्हणजे उत्सव असा अर्थ दिलेला असून मेघदूत, दशकुमारचरित, श्रीमद्‌भागवत इ. संस्कृत गंथांतही उत्सव ह्या अर्थाने क्षण ही संज्ञा आढळते. सर्वदर्शनसंगहा त क्षण हा अमावास्या व पौर्णिमा ह्या तिथींचा वाचक असल्याचे म्हटले आहे तथापि सर्व सण हे उत्सवच होत. काही उत्सवांना सण ही संज्ञा मात्र देत नाहीत. नासिक येथे गुरूगह सिंह राशीत गेल्यानंतर वर्षभर गोदावरीच्या तिरी गोदावरीचा उत्सव चालतो. त्यास सण म्हणत नाहीत. प्रयाग येथे मकर मेळा व कुंभमेळा एक महिनाभर भरत असतो. तो गंगा-यमुनांच्या संगमांचा उत्सव असतो. तोही सण नव्हे. उत्सव म्हणजे सामुदायिक पूजा. ज्या पूजेत सामुदायिक रीतीने उपवास, पूजेनंतर सामुदायिक भोजन, नृत्य, गायन, भजन, कीर्तन, मैदानी खेळ व इतर क्रिडा ह्या गोष्टी किंवा यांपैकी काही गोष्टी चालतात व लोक त्यात उत्साहाने भाग घेतात, ती सामुदायिक पूजा होय. बरेचसे सण व उत्सव वर्षातून एकदा येतात. काही वर्षांपेक्षा अधिक अवधीने येतात. काही सण वा उत्सव कौटुंबिक, काही विशिष्ट कुल, विशिष्ट जात, विशिष्ट जमात, विशिष्ट धर्म व विशिष्ट राष्ट्र यांच्यापुरते मर्यादित असतात काही आंतरराष्ट्रीय असतात, परंतु सण व उत्सव यांचा विशिष्ट दिवस किंवा विशिष्ट कालखंड हे ठरलेले असतात. ⇨ दिवाळी पाच दिवसांची, ⇨ नवरात्र व ⇨ दसरा मिळून दहा दिवसांचा सण,नाताळ सात दिवसांचा सण [⟶ नाताळ -२], ⇨गणेशोत्सव दहा दिवसांपर्यंतचा उत्सव असतो. ही गोष्ट जगामधील सर्व धर्मांतील आणि राष्ट्रांतील सण व उत्सव यांना लागू आहे. जगातील बहुतेक सर्व राष्ट्रांत वर्षारंभ हा सणाचा दिवस असतो. उत्सव व सण यांना धार्मिक व लौकिक अशा दोनही बाजू असतात. ते पुराणकथांशी वा मिथ्यकथांशी निगडित असतात. विश्वात दिव्य, अद्भुत अशा काही शक्ती असून त्या जशी संकटे आणतात, तसेच त्यांचे निवारण करतात. ह्या समजुतीने देव, असुर, पितर आदींच्या प्रीत्यर्थ सण व उत्सव साजरे केले जातात. अशा काही सणांमध्ये धार्मिक उपासनेला व पूजेला खूप प्राधान्य दिलेले असते. काहींमध्ये धार्मिकतेचा लहानसा भाग असतो किंवा ते उत्सव पूर्णत: धर्मनिरपेक्ष असतात त्यांत धार्मिकतेपेक्षा सामुदायिक किंवा सामाजिक सुखात्मक भावनांना उत्तेजित करणाऱ्या, कीडात्मक प्रवृत्तींना स्फूर्ती देणाऱ्या, सुखलालसेला स्वैरपणे संचार करू देणाऱ्या गोष्टींनाच मुख्यत्वे प्राधान्य दिलेले असते. मुळात धार्मिक म्हणजे देवता प्रीत्यर्थ म्हणून अस्तित्वात आलेल्या धार्मिक उत्सवांचे धार्मिक स्वरूप पूर्णत: नाहीसे होऊन त्यांना केवळ लौकिक समारंभांचे रूप प्राप्त होते. उदा., ऑलिंपिक कीडा सामने, स्वातंत्र्य दिन, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वगैरे. तमाशा, नाटके, मैदानी खेळ, बहुरूपींचे नाच, वादयवृंदांचे वृंदवादन, कुस्त्यांच्या स्पर्धा, मुष्टियुद्ध, रथांच्या व जनावरांच्या शर्यती, बैठे खेळ, मदयपानोत्सव, घटकंचुकी, कलावंतीणींचे नृत्य इ. कार्यकम कमीअधिक प्रमाणात यात अंतर्भूत होतात. मात्र सर्व सणांना उत्सवी अंग असतेच असे नाही. जैन धर्मीयांच्या ⇨ पर्युषण पर्वा तपूजाअर्चा, तत्त्वार्थाधिगमसूत्रा सारख्या गंथांचे वाचन तसेच क्षमा, मार्दव, सत्य, अहिंसा, संयम इ. धर्मतत्त्वांचे मनन-चिंतन करून आत्मशुद्धी करण्यावर भर दिला जातो. लोकपरंपरा आणि स्थानिक लोकाचार यांनुसारही काही सण-उत्सव संपन्न होतात. उदा., अशोकाचा मुलगा महेंद्र बौद्घ धर्म प्रसारार्थ ज्या दिवशी श्रीलंकेत पोहोचला, तो दिवस तिथे सण म्हणून साजरा करतात तर म्यानमारमध्ये बौद्ध धर्मीय मेष-संक्रांती (१२-१३ एप्रिल) हा राष्ट्रीय सण मानतात. थायलंडमध्ये बौद्ध धर्मीय माघ पौर्णिमा हा दिवस सण म्हणून साजरा करतात. त्या दिवशी स्तूपाभोवती हजारो मेणबत्त्या लावतात. ग्रामीण भागांत गावोगावी होणारे गामदैवतांचे उत्सव किंवा स्थानिक यात्रा, हा लोकाचाराचाच भाग होय. तसेच काही सण-उत्सवांतून एखादया धर्माच्या इतिहासातील काही विस्मृत बाबींचे पुन:स्मरण करण्यात येते.उदा., क्रिस्ती धर्मीयांचा ऑल सेंट्स डे (सर्व ज्ञात-अज्ञात संतांचे स्मरण) किंवा ⇨ऑल सोल्स डे(सर्व मृतात्म्यांसाठीची सामूहिक प्रार्थना).

वर्षारंभापासून ते वर्षाच्या अखेरपर्यंत चालणारे, प्रत्येक महिन्यात, प्रत्येक ऋतूत विशिष्ट तिथीस व वारास येणारे देवदेवता, संत, राजेमहाराजे, गोसावी, फकीर, धर्म संस्थापक, धर्माचार्य, वीरपुरूष, गामदेवता, नगर-देवता, राष्ट्रदेवता इत्यादिकांचे जन्मदिवस, स्थापना दिवस किंवा मृत्यूदिवस, युद्ध दिवस किंवा विजय दिवस, ठरलेले असतात. आदिम समाजात आणि कृषिप्रधान संस्कृतीत पेरणी व पीक कापणी यांच्या हंगामाचे आणि घेतलेल्या नव्या पिकाचे, ऋतुपालटाचे उत्सव साजरे होतात. ह्यांत पिकांच्या वृद्धीसाठी, पशूंच्या प्रजननासाठी आणि पर्जन्यासाठी काही सण-विधी करतात. पौर्णिमा, अमावास्या, पंचमी या तिथींचेही उत्सव प्रचलित आहेत. वर्षाचे कालचक व त्याचे चांद्रमान किंवा सूर्यमानाप्रमाणे बारा भाग तसेच वर्षाची सु. ३५४, ३६० किंवा ३६५ अशी जी दिवस-संख्या, तीनिश्र्चित करण्यास समर्थ झालेली ज्योतिषविदया,तिने सण व उत्सव या संस्थांच्या कार्यकमांचे योग्यवेळी पालन करण्याकरिता पंचांगनिर्मिती केली. त्याचे पालन ईजिप्त, ॲसिरिया, बॅबिलोनिया, ग्रीस, इटली (रोम), भारत, चीन इ. प्रदेशांतील कृषिप्रधान संस्कृतींत पूर्वापार चालत आलेले आढळते. त्यामुळे प्रत्येक समाजात कुटुंबांचे, कुलांचे, जमातींचे व सबंध समाजाचे जे सण आणि उत्सव विशिष्ट काली पार पाडावयाचे असतात, त्या कालाचे निश्चयक प्रमाण या कृषिप्रधान समाजांना उपलब्ध झाले. सूर्य व चंद्र यांच्या गतीच्या मापनावर तारीख, तिथी, वार, मास, ऋतू आणि वर्ष यांचा आरंभ व अंत निश्र्चित करता येऊ लागले. सण व उत्सव यांचा आधार मुख्यत: पंचांग होय. उदा., हिंदू-पंचांग उघडून पाहिले म्हणजे असे दिसून येते की, प्रत्येक महिन्यात हिंदूंचे स्थानिक, प्रदेशीय व देशव्यापी असे सण व उत्सव त्या त्या दिवशी निर्दिष्ट केलेले असतात.

सण-उत्सव हे सर्वांना आवडतात, म्हणून ते सर्वगाह्य आहेत. त्यांच्या-मुळे दैनंदिन जीवनातून अल्पकाळ विरंगुळा मिळतो. सण-उत्सवांशी निगडित असलेल्या वस्तू-सेवांचा व्यापार वाढून आर्थिक उलाढाल होते. विविध कलावंतांना- क्रिडापटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी लाभते. लोकजागृतीसाठीही सण-उत्सवांचा प्रभावी वापर करून घेता येतो, हे लोकमान्य टिळकांसारख्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू करून दाखवून दिले आहे. एकूण सण-उत्सव हे ऐक्याचे साधक, प्रेमाचे पोषक, प्रसन्नतेचे प्रेरक, धर्माचे संरक्षक आणि भावनांचे संवर्धक आहेत.


महाराष्ट्रात विशेषत्वाने गणेशोत्सव, दसरा, बैलपोळा वा बेंदूर हे सण साजरे केले जातात. पोळा हा शेतकृयांच्या दृष्टीने महत्त्वाचा सण असून तो ग्रामीण भागात अधिक लोकप्रिय आहे. दसरा हा पूर्वापार चालत आलेल्या योद्धयांचा प्रसिद्ध सण होय. त्यादिवशी काही ठिकाणी रावण-दहनाचा उपकम राबविला जातो. याशिवाय मुसलमानांचा मोहरम किंवा पैगंबर जयंती यांसारखे सण प्रसिद्ध आहेत. रामनवमी, गोकुळाष्टमी, दत्तजयंती, दासनवमी हे उत्सवही समारंभपूर्वक साजरे केले जातात. भारतात प्रदेशपरत्वे सणांचे महत्त्व असून काही सण दक्षिणेत धुमधडाक्याने (ओणम्,नाडहब्ब), तर काही उत्तरेत (होळी, रंगपंचमी) साजरे केले जातात. बंगाल – ओरिसात दुर्गापूजा किंवा रथोत्सव यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, तर केरळमध्ये ‘ पूरम्’, ‘ ओणम’ सणाला आहे. मंगळागौर, हरतालिका, चंपाषष्ठी यांसारख्या स्त्रियांनी आचरावयाच्या वतांना महाराष्ट्रात महत्त्व आहे. [⟶ महाराष्ट्र राज्य (सण व उत्सव)].

संदर्भ : 1. Eliade Mircea, Ed. The Encyclopedia of Religion Cere- mony (Vol. 3) and Seasonal Ceremonies (Vol.13), New York, 1987.

            2. Gaster, Theodor H. Ed. New Golden Bough, New York, 1959.

            3. MacCormack, Sabine G. Art and Ceremony in Late Antiquity, Berkeley, 1981.

            4. Moore, Sally F. Barbara,G.Myerhoff Ed. SecularRitual:FormsandMeanings, Assen, 1977.

            ५. ऋग्वेदी, आर्याच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास, वाई, १९७९.

 

जोशी, लक्ष्मणशास्त्री.

 

'ओणम्‌'सण, केरळ : (अ) पूजाविधी 'ओणम्‌'सण, केरळ : कथकळी नर्तकाच्या मुखवट्याची पुष्पसजावट. 'लिकिर उत्सव' : नृत्य करणारे मुखवटाधारी भिक्षू, लडाख.
ख्रिस्ती धर्मातील 'लेट'सणाच्या आदल्या मंगळवारचा (श्रोव्ह ट्यूसडे) कार्निव्हल-उत्सव येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा नाटयरूपात सादर करणारे शालेय विदयार्थी. 'शिंतो उत्सव' : पारंपरिक वेशभूषेतील मिरवणूक, जपान.

'बैल पोळा' (बेंदूर) : शेतकऱ्यांचा आवडता हिंदू सण. 'मंगळागौर' : सामुदायिक पूजन. 'रथोत्सव' : जनन्नाथपुरी, ओरिसा.
'दसरा' : रावण-दहनाचे दृश्य, हृषिकेश. 'मोहरम' : ताबूत मिरवणूक. 'पूरम्‌'सण : श्रृंगारलेल्या हत्तींची मिरवणूक , केरळ.