सत्यसाईबाबा : (२३ नोव्हेंबर १९२६ – ). दक्षिण भारतातील एक विख्यात सत्पुरूष. जन्म आंध्र सत्यसाईबाबाप्रदेशातील पुट्टपर्थी नावाच्या एका खेडयात. मूळ नाव सत्यनारायण राजू. त्यांचे वेगळेपण त्यांच्या बालवयापासूनच दिसून येत होते. आपल्या घरी भिकाऱ्यांना बोलावून ते त्यांना मदत करीत. २० ऑक्टोबर १९४० रोजी त्यांनी शाळेतून घरी येऊन हातातले दप्तर टाकले आणि घरच्यांना सांगितले की, आजपासून मी सत्यनारायण नसून सत्यसाईबाबा आहे. शिर्डीच्या साईबाबांचे आपण अवतार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी घर सोडले. त्यांना अनेक अनुयायी मिळाले. त्यांत सर्वसामान्य माणसांबरोबरच अनेक राजकीय नेते, सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश, तसेच प्रशासनादी अन्य अनेक क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. बंगलोरमधील व्हाइटफील्ड ह्या भागात सत्यसाईबाबांचा भव्य आश्रम आहे. वर्षातील काही महिने त्यांचे वास्तव्य तेथे असते. त्यांचे अनेक भक्त येथे राहतात. व्हाइटफील्डमध्ये सत्यसाईबाबांच्या भक्तांनी कोटयावधी रूपये खर्च करून एक भव्य रूग्णालय सु. २० हेक्टर भूमीवर बांधलेले आहे. त्यासाठी अनेक भक्तांनी आपली सेवा विनावेतन दिलेली आहे. येथे १२ शस्त्रक्रिया कक्ष (ऑपरेशन थिएटर्स) असून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. येथे उपचार घेणाऱ्यांची दररोजची संख्या सरासरी एक हजार इतकी आहे. जगभरातील अनेक निष्णात डॉक्टर ह्या रूग्णालयाला आपली सेवा कोणताही मोबदला न घेता देतात. रूग्णांना येथे विनामूल्य वैदयकीय सेवा मिळते.

सत्यसाई शिक्षणसंस्था ही एक मान्यवर शिक्षणसंस्था आहे. बालविकास वर्गापासून विदयापीठापर्यंत मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे काम या संस्थेने केले आहे.

२२ नोव्हेंबर १९८१ मध्ये पुट्टपर्थी ह्या सत्यसाईबाबांच्या जन्मगावी ‘ सत्यसाई विदयापीठा ’ ची स्थापना करण्यात आली. ह्या विदयापीठाच्या कक्षेत येणाऱ्या महाविदयालयांत दोन महिला महाविदयालये येतात. ह्या विदयापीठाच्या कक्षेतील महाविदयालयांत विनाशुल्क शिक्षण दिले जाते. सर्व महाविदयालये निवासी स्वरूपाची असून विदयार्थ्यांची शारीरिक, बौद्धीक, मानसिक वाढ घडवून आणण्यासाठी येथे शिस्तबद्ध प्रयत्न केले जातात. विज्ञान – तंत्रज्ञानाबरोबरच कला, क्रीडा ह्यांचेही शिक्षण दिले जाते. प्राचीन वेदवाङ्‌मयाच्या जपणुकीसाठी आणि शिक्षणासाठी ‘ सत्यसाई वेदपीठ ’ शाळेची स्थापना करण्यात आली आहे. आश्रम परिसरात एक संगीत महाविदयालय असून त्याच्या इमारतीचा आराखडा सत्यसाईबाबांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष निरीक्षणाखाली तयार करण्यात आला आहे.

सत्यसाईबाबांनी आपला मृत्यू आणि पुनर्जन्म यांविषयीही भाकीत केले आहे.

कुलकर्णी, अ. र.