रामलीला : उत्तर भारतातील एक पारंपरिक लोकनाट्योत्सव. दरवर्षी नवरात्रात (अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. दशमी) हा उत्सव साजरा केला जातो. गुजरात, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा, बंगाल, राजस्थान इ. राज्यांतही रामलीला साजरी होते. काही विद्वानांच्या मते दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाने लंकाधिपती रावणावर विजय मिळविला होता. त्या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करीत असावेत.

रामायणात रस्त्यावरून लव कुश रामायण गात चालल्याचा जो उल्लेख आहे, त्यामध्ये रामलीलेची मूळ प्रेरणा असावी. अनेक लहानमोठ्या शहरांतून रामलीला विविध ठिकाणी आणि प्रकारे सादर केली जाते. सीतास्वयंवर, रामाचे वनवास गमन, रावण जटायू युद्ध, लंकादहन इ. प्रसंग रामलीलेत प्रामुख्याने अंतर्भूत असतात. राम, लक्ष्मण, सीता यांच्या भूमिकांसाठी १४ वर्षांखालील मुलांची निवड करतात. रावण, कुंभकर्ण, विभीषण, हनुमान इत्यादींसाठी तांब्या-पितळेचे मुखवटे वापरतात. या भूमिका स्थानिक मंडळी वर्षानुवर्षे करताना दिसतात. हनुमानाच्या भूमिकेला विशेष महत्त्व असते. कधी कधी वानरसेनेच्या मुखातून रामायण गातानाही दाखविले जाते.

तुलसीदासाने रामलीलेच्या धार्मिक उत्सवाची सुरुवात केली, असे म्हणतात. यासाठी दिल्ली शहर फार प्रसिद्ध असून १९२० मध्ये मुद्दाम याच उत्सवासाठी तयार केलेल्या रामलीला मैदानावरच अजूनही हे कार्यक्रम होतात. महंत राधोदासाने बहादुरशाह जफरच्या कारकीर्दीत (१८३७ – ५७) दिल्लीतील रामलीला सुरू केली. १९३८ मध्ये या कार्यक्रमासाठी एक समिती स्थापण्यात आली. तेव्हापासून या समितीमार्फतच हा उत्सव साजरा होतो. दिल्लीत जवळजवळ ५० ठिकाणी रामलीला सादर केली जाते. अधिक उंच रावण तयार करण्याचीही अहमहमिका असते.

अयोध्येत आश्विन वद्य नवमीला रामलीला सुरू होऊन ती पुढे सतरा दिवस चालते. येथील लंकादहनाचा प्रसंग उल्लेखनीय असतो. त्यासाठी रावणाचा महाल सु. १८ ते २१ मी. उंच बनवितात. हनुमान दोरीच्या साहाय्याने त्या महालावर जाऊन आग लावतो. काही ठिकाणी रावणाच्या पुतळ्याला एका वर्तुळात दहा तोंडे आणि मध्यभागी गाढवाचे तोंड लावलेले असते.

काशीजवळील रामनगरची रामलीला सुप्रसिद्ध असून ती तीसचाळीस दिवस चालते. साधारणतः १२ किमी.च्या परिसरात ही सादर केली जाते. त्यासाठी रामायणातील अयोध्या, मिथिला, पंचवटी, लंका इ. स्थाने आधीच तयार करतात. असे खुले रंगमंच माळवा, बुंदेलखंड या भागांत आढळतात. रामायणातील प्रसंग सादर करताना दृश्यानुरूप रंगमंच बदलतात. तेव्हा प्रेक्षकही आपापल्या जागा बदलतात. रंगमंचावर तुलसीदासाच्या रामचरितमानसातील चौपाया गातात. त्यानंतर कलाकार स्थानिक बोलीत आपले संवाद बोलतात. लंकादहनाची आतषबाजी पहाण्यासाठी हजारो प्रेक्षक येतात.

लाहोरमध्ये ताडमाड उंच रावण आणि त्यापेक्षा कमी उंचीचे इतर राक्षस (मेघनाद, कुंभकर्ण) तयार करून मैदानावर उभे करतात. हे कागदाचे व पोकळ असून त्यांत बाण व इतर प्रकारचे दारूसामान भरून ठेवतात. उत्तम अभिनय करणाऱ्या मुलांना राम-लक्ष्मणादिकांची सोंगे देऊन मोठ्या थाटामाटाने आणतात. लंकानगरीची सजावटही प्रेक्षणीय असते. रात्र पडताच उभय पक्षांकडून बाण सुटतात व सु. एका तासातच सर्व लंकानगरीची आणि राक्षसांची राखरांगोळी होते. राक्षस जळू लागताच त्यांतून शेकडो तऱ्हेची शोभेच्या दारूची चक्रे, फुले वगैरेंची नयनरम्य आतषबाजी पहावयास सापडते. काही ठिकाणी दसऱ्यानंतर दोन दिवसांनी भरतभेटीचा सोहळाही समारंभपूर्वक पार पाडतात.

कापडी, सुलभा