बृहस्पति :भारतीय संस्कृतीच्या इतिहासात वैदिक देवता, सूक्तद्रष्टा वैदिक ऋषी, देवांचा गुरु व पुरोहित, अर्थशास्त्रकार, वास्तुशास्त्रज्ञ, स्मृतिकार, लोकायत दर्शनाचा प्रवर्तक इ. नात्यांनी बृहस्पतीचा निर्देश येतो. वैदिक देवता, देवांचा गुरु व पुरोहित हा एकच बृहस्पती परंतु सूक्तकार, अर्थशास्त्रकार, वास्तुशास्त्रकार, स्मृतिकार आणि लोकायत दर्शनकार हे सर्व बृहस्पतिगोत्रातील निरनिराळे पुरुष होत, असे काही विद्वान मानतात. म्हणून हे सर्व बृहस्पती एकच म्हणणे अनैतिहासिक होय, असा त्यांचा अभिप्राय आहे.

‘बृहस्पति’ हा शब्द ‘बृहत्’ (वाणी) आणि ‘पति’ या शब्दांचा एक अनियमित समास आहे (पाणिनीची अष्टाध्यायी६.१.१५७). त्याला ब्रह्मणस्पती (मंत्राचा वा प्रार्थनेचा अधिपती), वाचस्पती, धिषण (बुद्धिमान), जीव, सदसस्पती (सभेचा वा यज्ञभूमीचा प्रमुख), ज्येष्ठराज (सम्राट), गणपती, वज्रिन्, अनिमिषाचार्य, चक्षस् (शिक्षक) इ. नावेही देण्यात आली आहेत.

प्राचीन वाङ्‌मयातील निर्देश आणि निबंधग्रंथांतील बृहस्पतिवचने ह्यांवरुन त्याचे धर्मशास्त्र होते असे दिसून येते. व्यवहार, संस्कार, आचार, श्राद्ध, आशौच, आपद्धर्म, प्रायश्चित ह्या विषयांच्या सु. २,४०० श्लोकांचे सु. १९० ग्रंथांतून संकलन करून ते बुहस्पतिस्मृति ह्या नावाने बडोद्याच्या ‘गायकवाड ओरिएंटल सीरिज’ ने प्रकाशित केले आहे.

राजनीतीविषयक सहा अध्याय व ४३० सूत्रे असलेले बाईस्पत्य अर्थशास्त्र लाहोरच्या ‘पंजाब संस्कृत बुक डेपो’ ने प्रकाशित केले आहे (१९२१). परंतु ते मूळ बृहस्पतीचे नसून इ. स. पाचव्या शतकातले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.

तो ‘अंगिरस्’ ऋषींचा पुत्र होता. अग्नीचा पुत्र, त्वष्ट्याचा पुत्र, उच्च आकाशातील प्रकाशाचा पुत्र असेही त्याचे निर्देश आढळतात. त्याच्या आईचे नाव सुरुपा, वसुदा वा श्रद्धा असे होते. त्याचा तारा व शुभा अशा दोन भार्या असून जुहू, वाच्, धेना (वाणी), चंद्रमसी अशीही नावे त्याच्या भार्येची नावे म्हणून निर्दिष्ट आहेत. रोमशा, सुलेखा इ. नावे त्याच्या मुलींची म्हणून, तर कुशध्वज, कच, भरद्वाज, तार अशी नावे त्याच्या मुलांची म्हणून आढळतात. देवांचा पिता म्हणूनही त्याचा निर्देश आढळतो. आंगिरसी हे त्याच्या बहिणीचे, तर उच (त) थ्य, संवर्त इ. त्याच्या बंधूंची नावे आहेत.

देवता या नात्याने ऋग्वेदात संपूर्ण अकरा सूक्ते त्याला वाहिलेली आहेत. दोन सूक्तांत इंद्राबरोबर त्याचीही स्तुती आहे. बृहस्पती म्हणजे अग्नीचे एक स्वरुप, पुरोहितांच्या कृत्यांचे मूर्त स्वरूप, वनस्पतीची देवता, चंद्राचे मनुष्यस्वरूप इ. मते आढळतात. एका मतानुसार बृहस्पती ही शुद्ध भारतीय देवता आहे, तर दुसऱ्या एका मतानुसार तो हिटाइट संस्कृतीमधील मेघनाद-देवाशी समान असल्यामुळे मूळचा त्या संस्कृतीमधील असण्याची शक्यता आहे. उत्तरकालामध्ये तो विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा देव तसेच आदर्शही मानला गेला. गुरु या ग्रहाला त्याचे नाव देण्यात आले, ६० संवत्सरांच्या चक्राला ‘बृहस्पतिचक्र’ असे नाव देण्यात आले. पुरोहित होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती त्याच्या नावाने ‘बृहस्पतिसव’ नावाचे कर्मकांड करु लागल्या.

ऋग्वेदातील काही सूक्तांचा ऋषी म्हणून ‘आंगिरस बृहस्पति’ व ‘लौक्य बृहस्पति’ असे निर्देश येतात. त्याच्याविषयी बऱ्याच कथा सांगितल्या जातात. त्यांपैकी काही महत्त्वाच्या पुढीलप्रमाणे : इंद्र रागावल्यामुळे तो एकदा देवांचा त्याग करुन गेला. त्याने भरद्वाजाला आग्नेयास्त्र व उपरिचर वसूला चित्रशिखंडिशास्त्र दिले. देवांनी पृथ्वीचे दोहन केले, तेव्हा तो वत्स वा दोग्धा बनला होता. त्याने रावणाला शाप दिला. त्याने आपल्या भावजयीशी समागम केला. त्याने शुक्राचार्याचे रुप घेतले व असुरांना नास्तिक मताचा उपदेश करुन फसविले. सोमाने त्याच्या पत्नीचे हरण केल्यावर त्याने सोमाशी युद्ध केले. हनुमंताची आई अंजना ही पूर्वजन्मात त्याची दासी होती.

साळुंखे, आ. ह.