शकुनविचार : ‘शकुन’ शब्दाचा मूळ अर्थ पक्षी असा आहे. ऋग्वेदात शकुन, शकुनी, शकुन्ती हे शब्द ‘पक्षी’ ह्या अर्थाने आले आहेत. त्यावरून मूलत: पक्षांच्या हालचाली, त्यांचे स्थान, ओरडणे, आगमन इत्यादींवरून काही भविष्य सूचित होते, असे मानले जात असावे उदा., ऋग्वेदात कपोत (कबूतर) हा पक्षी अशुभसूचक मानला आहे. पुढे मात्र शकुन हा शब्द व्यापक अर्थाचा झाला आणि पक्ष्यांशी संबंधित नसलेलेही जे जे भविष्यसूचक वाटेल, ते ते सर्व ‘शकुन’ शब्दाने बोधीत होऊ लागले. संस्कृत भाषेत शकुन ह्या विषयावर बरेच साहित्य उपलब्ध असेल, तरी वसंतराजशाकुन हा शकुन ह्या विषयावरचा बराच व्यापक स्वरूपाचा व महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यात १,५२५ श्लोक आहेत. त्यामध्ये शकुनाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे- शुभाशुभविनिर्णयाय हेतुर्नृणां य: शकुन: स उक्त:! (१·७) म्हणजे ज्यायोगे शुभ वा अशुभ असे भविष्य निश्चित केले जाते, तो शकुन. ह्या ग्रंथात शकुनाबद्दलचा विचार करताना असे सांगितले आहे, की पूर्वजन्मातील कर्माचे फल हे परिपक्व झाले, की दैवाने प्रेरित झालेला शकुन ते फल सांगावयास येतो. जो शकुनशास्त्रज्ञ असतो, तो एखाद्या कार्यात यश येईल का नाही, हे शकुनांच्या साहाय्याने पाहून मग त्यानुसार निर्णय घेतो व कार्यास प्रारंभ करतो अगर करत नाही (१·८). आता जर कोणी असा आक्षेप घेईल, की सर्व घटना जर नियतीनुसारच घडणार असतील, तर शकुन पाहण्याचा फायदा काय? – तर त्याला उत्तर असे देण्यात येते, की दैवानुसार घडणाऱ्याघटनासुद्धा विशिष्ट स्थलकाल परिस्थितीतच होतात व हा काल आणि परिस्थिती ह्यांचे ज्ञान शकुनांनी होते, म्हणून शकुनशास्त्र हे महत्त्वाचे आहे. ह्या ग्रंथातील बराचसा भाग श्यामा, कावळा आणि पिंगळा पक्ष्यांच्या ओरडण्याबाबतच्या विवेचनाला देण्यात आला आहे. ज्याप्रमाणे वेद, स्मृती, पुराणे ही प्रमाण आहेत, त्याचप्रमाणे शकुनागम (शकुनशास्त्र) हेही प्रमाण आहे, असाही दावा वसन्तराजशाकुनात केलेला आहे. तसेच जगात जी जी गोष्ट स्मरली जाते, ऐकली जाते, पाहिली जाते किंवा स्वप्नांनी जाणली जाते ती ती शकुन ह्या सदरात येते व ती फलप्रद असते, असे सांगून शकुनांचे क्षेत्र किती विस्तृत असते, ते सांगितले आहे. पुढे वेगवेगळ्या प्राण्यांचे ओरडण्याचे प्रकार, गमन इत्यादींवरून शकुनांची फलेही ह्या ग्रंथात सांगितली आहेत. अशुभ शकुनांची शांती करण्याचे विधीही सांगितले आहेत. मत्स्यपुराण (अध्याय २३७), अग्निपुराण ह्यांसारख्या पुराणांतही शकुनांचे विवरण आढळते. संस्कृतमधील चरकसंहितेसारख्या वैद्यकशास्त्रावरील ग्रंथातही शकुनांचे विवेचन केलेले आढळते.

निरनिराळ्या मानवी अवयवांचे – मुख्यत: हात आणि डोळे ह्यांचे –स्पंदन कसे होत आहे, ह्यावरून शुभाशुभ घटना सूचित होतात, असा भारतात फार जुना समज आहे. उदा., पुरूषाच्या शरीराच्या डाव्या बाजूला जे स्पंदन होते, ते अशुभसूचक मानतात. तेच जर उजव्या बाजूस झाले, तर शुभसूचक असते. योगायोगाने कानांवर पडलेले काही शब्द वा वाक्यांश शुभाशुभसूचक असतात, असा समज काही देशांतील लोकांमध्ये आहे.

प्राचीन काळापासून काव्य, नाटक, कथा इ. साहित्यप्रकारांतून शुभाशुभशकुनांचा विविध प्रकारे कल्पकतेने उपयोग केल्याचे दिसून येते. प्राचीन ग्रीक नाटककार अँरिस्टोफेनीस ह्याच्या “द बर्डर्स् (इं. शी.) ह्या नाटकातील पक्षी स्वत:कडे मानवतेचे मार्गदर्शक अशी भूमिका घेतात. रामायण – महाभारतातही शकुनाची वर्णने आलेली आहेत. वेदीवर देवांना बळी दिला जाणारा प्राणी हा लौकिक जगातून देवांच्या जगात जात असतो त्या बळीच्या माध्यमातून देव त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतात, असे मानले जाई. त्यामुळे बळी जाणाऱ्याप्राण्याच्या वर्तनावरून शुभाशुभाचा विचार करण्यात येई.

जगावर राज्य करणारे देव आकाशात राहतात, अशी प्राचीन काळी समजूत होती. त्यामुळे उल्कापात, चमकत्या विजा, वादळे ह्यांना शुभाशुभसूचनाच्या दृष्टीने महत्त्व आले असावे.

थिटे, ग.उ. कुलकर्णी, अ.र.