ग्रंथसाहिब : शिखांचा पवित्र धर्मग्रंथ. यात शिखांचे पहिले पाच गुरू व नववे गुरू यांची रचना संगृहीत आहे. शिखांचे सहावे, सातवे व आठवे गुरू यांनी लेखन न केल्याने त्यांच्या रचना ग्रंथसाहिबात आलेल्या नाहीत. दहावे गुरू ⇨ गोविंदसिंग  यांनी विपुल लेखन केले असून त्यांचे सर्व लेखन दसमग्रंथ  या स्वतंत्र ग्रंथात संगृहीत आहे. दसमग्रंथाला दहाव्या गुरूंचा पवित्र ग्रंथ मानतात तथापि ग्रंथसाहिबाचे स्वरूप यापेक्षा वेगळे आहे. ग्रंथसाहिबा आदिग्रंथ  असेही संबोधले जाते. शीख गुरूंची ‘बानी’ (रचना) यात असल्याने त्यास गुरूबानी  असेही म्हणतात. गुरू गोविंदसिंगांनी आपल्यानंतर आपल्या अनुयायांनी ग्रंथसाहिबासच गुरुस्थानी मानावे, असा आदेश दिल्याने ग्रंथसाहिबास श्रीगुरूग्रंथसाहिब  असे आदराने संबोधले जाते.

शिखांचे पाचवे गुरू ⇨ अर्जुनदेव (१५६३–१६०६) यांनी संकलित व संपादित केलेली प्रत ही ग्रंथसाहिबाची पहिली व अधिकृत प्रत मानली जाते. त्यांच्या आधीच्या चार गुरूंची म्हणजे गुरू ⇨ नानक (१४६९–१५३९), गुरू अंगद (१५०४–५२), गुरू अमरदास (१४७९–१५७४) व गुरू रामदास (१५३५–८१) यांची रचना ही काही हस्तलिखित स्वरूपात, तर काही कंठगत स्वरूपात उपलब्ध होती. त्या सर्वांच्या आधारे अर्जुनदेवांनी ग्रंथसाहिबाची अंतिम हस्तलिखित प्रत तयार केली (१६०४). ही प्रत भाई गुरुदास यांनी लिहून घेतली. ती गुरुमुखी लिपीत आहे. अर्जुनदेवांनी ही प्रत अमृतसर येथील ⇨ सुवर्णमंदिरात ठेवली व भाई बूढा (१५१८–१६३१) यास तेथे ‘ग्रंथी’ (पुरोहित) म्हणून नेमले. पुढे ही प्रत कर्तारपूर (पंजाब) येथे नेण्यात आली आणि अजूनही ती तेथेच आहे. ही प्रत कर्तारपूर वाली ‘बीर’ या नावाने प्रसिद्ध आहे. या प्रतीतील सुरुवातीच्या काही ओळी अर्जुनदेवांच्या हस्ताक्षरात असून, शेवटी सहावे गुरू हरगोविंद यांची सही आहे. या प्रतीवरूनच पुढे अर्जुनदेवांचा शिष्य भाई बन्नो याने स्वतःसाठी एक प्रत तयार केली. स्वतःच्या प्रतीत त्याने काही नवीन सूक्तेही अंतर्भूत केली. ही प्रत ‘भाई बन्नो वाली बीर’ म्हणून प्रसिद्ध आहे तथापि आज ती संपूर्णपणे उपलब्ध नाही. अर्जुनदेवांच्या प्रतीत पुढे शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग (१६६६–१७०८) यांनी आपले पिता नववे गुरू  ⇨ तेगबहादुर (१६२१–७५) यांची रचना (५९ सूक्ते व ५६ श्लोक) अंतर्भूत करून ग्रंथसाहिबाची तिसरी प्रत तयार केली (१७०४). ती त्यांचा शिष्य मणिसिंग याने लिहून घेतली. ही प्रत दमदमासाहेब (पंजाब) येथील गुरुद्वारात असून ती ‘दमदमा वाली बीर’ म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या प्रचारात असलेल्या ग्रंथसाहिबाच्या प्रती सर्वसाधारणपणे याच प्रतीवर आधारित आहेत.

ग्रंथसाहिबात एकूण ६,००० सूक्ते वा श्लोक असून सर्वाधिक रचना अर्जुनदेवांची (२,२१८ सूक्ते) आहे.  तिच्याखालोखाल नानक (९४७ सूक्ते), अमरदास (९०७ श्लोक), रामदास (६७९ सूक्ते), तेगबहादुर (११५ सूक्ते व श्लोक) व अंगद (६२ श्लोक) यांची रचना आहे. सर्वच शीख गुरूंनी आपली रचना, पहिले गुरू नानक यांच्याच नावे केली आहे. याचे कारण ते स्वतःस गुरू नानक यांच्या आत्मतेजाचाच एक आविष्कार मानत व त्यांच्या कृपेनेच आपणास ही ‘बानी’ प्राप्त झाली आहे, अशी  त्यांची दृढ श्रद्धा होती. परंतु ग्रंथसाहिबात त्यांच्या रचनेमागे महला १ (म्हणजे पहिले गुरू), महला २ (म्हणजे दुसरे गुरू)……असे निर्देश आहेत त्यांवरून ती रचना कोणत्या गुरूंची आहे, हे कळण्यास मदत होते. ग्रंथसाहिबाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यात शीख गुरूंच्या रचनांशिवाय अनेक हिंदू व मुस्लिम संतकवींच्या रचनाही अंतर्भूत आहेत. हे संतकवी वेगवेगळ्या प्रांतांतील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे व भिन्न जातींचे आहेत. यांमध्ये जयदेव (बंगाल) धन्ना व मीराबाई (राजस्थान) रामानंद, कबीर व सूरदास (उत्तर प्रदेश) त्रिलोचन, परमानंद व नामदेव (महाराष्ट्र) फरीद (पंजाब) इ. प्रसिद्ध संतकवींच्या रचनांचा अंतर्भाव आहे. साधारणपणे जयदेव (बारावे शतक) आणि नववे गुरू तेगबहादुर (सतरावे शतक) अशा सु. पाच शतकांच्या कालखंडातील शीख गुरूंच्या व विविध संतकवींच्या रचना ग्रंथसाहिबात आलेल्या आहेत. या वेगवेगळ्या रचना अंतर्भूत करताना मूळ विषयाशी त्यांचा समतोल राखला जाईल, याची काळजीही घेतली गेली आहे.

विविध प्रांतांतील व वेगवेगळ्या भाषांतील रचना ग्रंथसाहिबात आल्याने भाषादृष्ट्या तो ग्रंथ संमिश्र स्वरूपाचा झाला आहे. शुद्ध पंजाबी आणि तिच्या बोलीभाषा त्याचप्रमाणे पूरबी व पश्चिमी हिंदी या भाषांतील रचनांबरोबरच फार्सी, संस्कृत, प्राकृत तसेच अपभ्रंश भाषांमधील कित्येक शब्द त्यात आलेले आहेत. तसेच एखाद्या संतकवीच्या रचनेत त्याच्या भाषेचा स्वभावतःच प्रभाव असल्याने–उदा., जयदेवाच्या रचनेत संस्कृतचा, नामदेवाच्या रचनेत मराठीचा इ. ग्रंथसाहिबाचा काही भाग आज दुर्बोध वाटतो तथापि सामान्यपणे ग्रंथसाहिबाची भाषा ही ‘संतांची भाषा’ आहे, असे म्हणता येईल. त्यातील काव्यरचना एखाद्या अशिक्षित शेतकऱ्यासही समजेल इतकी सुबोध असून शैली प्रासादिक, सरळ व साधी आहे. ती अधिक परिणामकारक व्हावी म्हणून संगीताचाही उपयोग केला गेला आहे. ग्रंथसाहिबातील रचना रागबद्ध असून रचनेच्या सुरुवातीसच ती कोणत्या रागात गावयाची, याचा स्पष्ट निर्देश आहे. तसेच गाताना रागाच्या मांडणीवर विशेष भर न देता, रचनेतील शब्दांचा अर्थ श्रोत्याला अधिक परिणामकारकतेने कळावा अशा रीतीने ती गावी, असा संकेत आहे. रागांची निवडही हेतुपूर्वक केलेली असून सौम्य व उदात्त रागांना प्राधान्य दिले आहे. ग्रंथसाहिबातील रचना अष्टपदी, श्लोक, दोहरा, त्रिपदा, पंचपदा, गाथा इ. विविध प्रकारच्या प्रचलित छंदांत आहेत.

ग्रंथसाहिबाची विभागणी पुढील प्रकारणांत केलेली आहे : (१) ‘जपुनीसाणु’ (जपुजी), (२) ‘सोदरु महला १’, (३) ‘सुणिबडा महला १’, (४) ‘सो पुरषु महला ४’ आणि (५) ‘सोहिला महला १’. यानंतर ‘सिरीराग’ नावाचा भाग असून त्यात शीख गुरूंच्या रागबद्ध रचना अनुक्रमे आलेल्या आहेत. हे राग सु. एकतीस आहेत. त्यानंतर इतर संतकवींच्या रचनांचा समावेश असून ‘बारहमासा’, ‘सिद्ध गोष्टी’, ‘बिरहडी’, ‘सुखमनी’ यांसारख्या लहानमोठ्या रचनाही त्यात आलेल्या आहेत. रागबद्ध रचनांनंतर ‘सलोक सहस कृती ’, ‘गाथा महला ५’, ‘फुनहे महला ५’, ‘चौबोले महला ५’, ‘सवैये सीमुख महला ५’ आणि ‘मुदावणीं  ५’ हे भाग आलेले आहेत.  यांच्याशेवटी गुरूंची एक रागमाला दिलेली आहे. यांमध्ये अधूनमधून शीख स्तुतिपर बरीच पदे आलेली आहेत. ग्रंथसाहिबातील काही विशिष्ट रचना विशिष्ट वेळी म्हणण्याचा प्रघात आहे उदा., ‘जपुजी’ प्रातःकाळी, तर ‘सोहिला महला १’ रात्री झोपण्यापूर्वी इत्यादी. तसेच शिखांच्या धार्मिक संस्कारांत ग्रंथसाहिबातील विशिष्ट भाग वा उतारे म्हटले जातात.

आशयदृष्ट्या ग्रंथसहिब  हे ईश्वराची आराधना व त्याच्या नामाचे स्मरण (नामसिमरण) असलेले तसेच उत्कट भक्तिभावनेने ओतप्रोत असे एक स्तोत्र आहे. ज्ञानमार्ग वा कर्ममार्ग यांपेक्षा ईश्वराच्या नामस्मरणावरच त्यात अधिक भर दिलेला दिसतो. अहंभावनेचा पूर्णतः निरास करून तसेच दांभिक कर्मकांड अथवा रूढी यांसारख्या भक्तिच्या बाह्यावडंबराचा त्याग करून, शुद्ध व पवित्र अंतःकरणाने परमात्म्याशी एकरूपता साधणे व अंतिम मुक्ती म्हणजेच मोक्ष प्राप्त करून घेणे, हा त्यातील मुख्य आशय आहे. ऐहिक कर्माचा त्याग करून संपूर्णपणे संन्यस्त वृत्तीने जगण्याच्या बौद्ध व जैन धर्मातील शिकवणुकीसग्रंथसाहिबाचा विरोध आहे. त्यात इतरांची सेवा करत करत त्याद्वारे आपल्या व्यक्तिमत्त्वास पूर्णता आणणे व आत्मोन्नती  करून घेणे, यांवर भर दिलेला आहे. ग्रंथसाहिबात एकेश्वरमताचाच पुरस्कार केलेला आहे. विषयाच्या स्पष्टीकरणार्थ अथवा ओघात कुठेकुठे हिंदू पौराणिक देवतांचे उल्लेखही येतात परंतु ते हिंदूंच्या मूळ धार्मिक मताचे निदर्शक नाहीत. तत्कालीन राजे आणि समाज यांची नैतिक मूल्यांबाबतची उदासीनता इत्यादींसारखे तत्कालीन परिस्थितीचे उल्लेखही कुठे कुठे अप्रत्यक्षरीत्या डोकावतात.

ग्रंथसाहिब  हा शिखांचा अधिकृत व मूलभूत असा धर्मग्रंथ असून त्यांची आध्यात्मिक व नैतिक मूल्ये, तसेच त्यांचे आचारविषयक नीतिसिद्धांत इत्यादींचेही विवेचन त्यात आलेले आहे. शिखांच्या धर्मिक व सामाजिक जीवनात ग्रंथसाहिबाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ⇨ गुरुद्वारामध्ये (शिखांचे उपासनामंदिर) कोणत्याही देवमूर्तीची प्रतिष्ठापना न करता ग्रंथसाहिबाची स्थापना केलेली असते. शीख लोक ग्रंथसाहिबास गुरुस्वरूप मानतात त्यामुळे त्याची  दैनंदिन पूजाअर्चा, आरती  वगैरेही  केली जाते. शूचिर्भूत होऊनच त्याचे दर्शन घेतात. त्याचे अखंड किंवा साप्ताहिक पठण केले जाते व काही विशिष्ट धार्मिक प्रसंगी त्याची मिरवणूकही काढण्यात येते.

अनेक पंजाबी  कवींना ग्रंथसाहिबापासून स्फूर्ती मिळाली असून त्यांनी गुरू अर्जुनदेव किंवा नानकदेव यांच्या रचनांचे अनुकरणही केलेले दिसते. अशा कवींत ⇨ भाई वीरसिंग  हे उल्लेखनीय होत. ग्रंथसाहिबाची विविध भारतीय भाषांत तसेच इंग्रजीमध्येही भाषांतरे झाली असून त्याच्यावर विवरणात्मक लिखाणही झाले आहे. अशा ग्रंथांमध्ये डॉ. गोपाल सिंग यांनी  इंग्रजीत भाषांतरित केलेला व ‘युनेस्को’च्या सहकार्याने प्रसिद्ध झालेला (१९६०), चार खंडांतील श्रीगुरु ग्रंथसाहिब  हा ग्रंथ अधिक परिपूर्ण व अद्ययावत स्वरूपाचा आहे.

संदर्भ : 1. Greenless, Duncan,The Gospel of the Guru-Granth Sahib, Adyar, 1952. 

            2. Kohli , Surinder Singh,Critical Study of Adi Granth, Delhi, 1962 . 

            3. Macauliffe, M. A.Study of Adi Granth, Calcutta, 1958. 

            4. Singh, Sohan, The Seeker’s Path, Delhi, 1959. 

           5. Singh, Trilochan and Others,The Selections from the Sacred Writing of the Sikhs,                 London, 1960. 

          6. Trumpp, Ernest,The Adi Granth, London, 1877. 

          ७. मिश्र, जयराम, श्रीगुरू ग्रंथ दर्शनअलाहाबाद, १९६०. 

         ८. मियानी, धरमपाल, गुरु ग्रंथसाहिब—एक परिचयजलंदर,१९६२. 

आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) पोरे, प्रतिभा (म.)