बोधिधर्म : (इ. स. सहावे शतक). एक भारतीय बौद्ध भिक्षू. इ. स. ५२६ ह्या साली तो चीन देशाला जाण्याकरिता निघाला. त्याच्या जीवनाबाबत अनेक आख्यायिका रुढ आहेत. एका आख्यायिकेनुसार तो इराणी होता, असे मानले जाते. दुसरीनुसार तो दक्षिण भारतातील एका राजाचा पुत्र होता व गुरु प्रज्ञारत्नाच्या सांगण्यावरुन समुद्रमार्गे चीनला गेला. चीनमध्ये आल्यावर नानकिंग येथे लयांग वंशाचा राजा वू-ती याच्याशी त्याची भेट झाली. नंतर तो उत्तरेकडील वे राज्यातील लोयांगला गेला. लोयांगजवळील सूंग पर्वतावरील प्रख्यात शाओ-लीन ह्या बौद्ध मठात त्याने भिंतीकडे तोंड करून नऊ वर्षे खडतर तपाचरण केले. मृत्यूसमयी त्याचे वय ६१, १०० किंवा १५० वर्षांचे असावे इ. मते प्रतिपादिली जातात. बोधिधर्म हा महायान पंथी असून शून्यतेचा पुरस्कर्ता होता. शुन्यतेबद्दल अस्तिपक्षी काही बोलता येण्याजोगे नाही म्हणून त्याची उत्तरे नास्तिपक्षीच असत. लेखन-वाचन, पांडित्य ह्यांबद्दल विशेष पर्वा न करता ध्यान-धर्माची त्याला गोडी होती. म्हणून त्याने महापरिनिर्वाणसूत्रांखेरीज इतर कोणत्याही ग्रंथाचे चिनी भाषेत भाषांतर केले नाही अथवा काहीही ग्रंथरचना केली नाही. पण चीन देशात त्याच्या गूढात्मक ध्यान-धर्माचा बराच परिणाम झाला व त्याला मान्यताही मिळाली. त्याने आपल्या शिष्यांना फक्त लंकावतारसूत्राचे अध्ययन करण्याचा उपदेश केला. त्याच्या ह्या ध्यान-धर्मातूनच जपानमध्ये लोकप्रिय झालेल्या झेन (चिनी-छान = ध्यान) धर्माचा उगम झाला. [⟶ झेन पंथ]. बोधिधर्माच्या पश्चात् त्याच्या अनुयायांनी त्याचा संप्रदाय चालू ठेवला. हूई-के हा त्याच्या शिष्यांतील एक प्रमुख शिष्य होता व त्यानेच छान अथवा झेन पंथाचे चीनमध्ये मूळ प्रवर्तन केले, असे मानले जाते. चीन व जपानमध्ये बोधिधर्मास आदराचे स्थान असून त्याच्या मूर्तीची पूजाही केली जाते. शाओ-लीन मठात समाधी घेऊन तो निर्वाण पावला.

संदर्भ : Dutt, Sukumar, Buddhist Monks and Monasteries of India, London, 1962.

बापट, पु. वि.