वुड्रॉफ, सर जॉन : (१८६५-१९३६). तंत्रमार्गाचे व तांत्रिक दर्शनांचे व्यासंगी ब्रिटिश अभ्यासक. ‘आर्थर ॲव्हलॉन’ ह्या टोपणनावाने अनेक ग्रंथांचे लेखन-संपादन त्यांनी केले. कोलकाता (कलकत्ता) येथील उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले (१९०४-२२). भारतीय तत्त्वज्ञानात– विशेषतः तंत्रमार्गाच्या अभ्यासात–त्यांना मोठे स्वारस्य होते. संस्कृत भाषेचा त्यांचा चांगला अभ्यास होता.

तंत्रमार्ग आणि तांत्रिक दर्शन ह्यांचा परिचय पश्चिमी जगाला करून देण्यात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावणारे व्यासंगी पंडित म्हणून जॉन वुड्रॉफ हे ओळखले जातात. तंत्रमार्गाच्या संदर्भातील हे कार्य ते दोन वर्गांतील वाचक–श्रोत्यांसाठी करीत होते. पहिला वर्ग युरोपीयांचा–विशेषतः इंग्रजांचा. इंग्लंडच्या इतिहासातील व्हिक्टोरिअन कालखंडात लैंगिक विषयांबाबत लाजसंकोच बाळगण्याच्या प्रवृत्तीचा प्रभाव ह्या वर्गात होता. दुसरा वर्ग इंग्रजी विद्याविभूषित भारतीयांचा. त्यांपैकी काहींच्या मनात जातिव्यवेस्थेचे पूर्वग्रह असल्यामुळे तंत्रमार्गीयांची उपासनेबाबतची जातिनिरपेक्ष भूमिका त्यांना मान्य नव्हती. तंत्रोक्त पूजेचा व कर्मकांडाचा आधिकार सर्व जातिवर्णांच्या लोकांना असतो. ज्यांच्या मनात जातिवर्णांचे पूर्वग्रह नव्हते, त्यांना तंत्रमार्गातले स्वैराचार वाटण्यासारखे स्त्री–पुरूष संबंध घृणास्पद वाटत होते. आपल्या संस्कृतीत तंत्रमार्गासारख्या उपासनापध्दती आहेत, ह्याची लाज वाटत होती. त्यामुळे कळत-नकळत अधिक सोवळेपणा दाखवण्याची त्यांची वृत्ती होती. अशा परिस्थितीत तांत्रिक आचारांचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या कामोपभोगाचे स्वरूप वुड्रॉफ ह्यांनी स्पष्ट केले आणि त्याचे समर्थनही केले मात्र ह्या कामोपभोगाकडे केवळ पाशवी सुखोपभोग म्हणून पाहण्यातले गंभीर धोकेही त्यांनी दाखवून दिले. ज्याने वासनेवर पूर्णपणे विजय मिळवला आहे त्यालाच मद्य, मत्स्य, मैथुनादी तांत्रिक विधींमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी तंत्रविषयक ग्रंथांतील अनेक उद्‌धृते देऊन स्पष्ट केले. तंत्रमार्गाचा आणि तांत्रिक आचारांचा तिटकारा करणारे उच्चवर्णीय भारतीय अभिजन, तसेच पश्चिमी धर्मोपदेशक ह्यांना तंत्रमार्ग हा बहिष्कृत केला जावा, असे वाटत होते. वुड्रॉफ ह्यांना एक प्रकारे त्यांच्या विरूध्द भूमिका घ्यावी लागली. तंत्रविषयक ग्रंथांचे संपादन करणाऱ्या उच्चवर्णीय भारतीयांच्या संपादनावर त्यांच्या पूर्वग्रहांची छाप होती आणि ग्रंथांच्या संहितांमधून स्वतःची  भर घालून त्यांनी ती कित्येकदा व्यक्त केली होती. वुड्रॉफ ह्यांनी असे काहीही केले नाही. तंत्रमार्गाच्या अभ्यासाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

वुड्रॉफ ह्यांच्या ग्रंथांत (स्वतंत्र लेखन, अनुवाद, संपादन) खालील ग्रंथांचा समावेश होतो. तंत्र ऑफ द ग्रेट लिबरेशन–महानिर्वाणतंत्र (१९१३, ५ वी आवृ. १९५२, तांत्रिक साहित्यात मध्यवर्ती महत्त्वाच्या म्हणून मानल्या गेलेल्या महानिर्वाणतंत्र ह्या ग्रंथांची संपूर्ण संहिता, अनुवाद व त्यावरील भाष्य), प्रिन्सिपल्स ऑफ तंत्र (१९१४, २ री आवृ. १९५५, तंत्रतत्त्व ह्या एकोणिसाव्या शतकातील बंगाली ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद आणि विवेचन), दि सर्पंट पॉवर, बीइंग दि षट्चक्रनिरूपण अँड पादुकापंचकम्‌ (१९१८, ६ वी आवृ. १९५८), शक्ती अँड शाक्त, एसेज, ॲड्रेसेस ऑन दि शाक्त तंत्रशास्त्र (१९१८, ४ थी आवृ. १९५१), तंत्रराज-तंत्र (१९५२), हिम्‌स टू द गॉडेस (२ री आवृ. १९५३, आद्य शंकराचार्यांच्या नावावर मोडणारी स्तोत्रे), हिम्‌स टू काली (१९५३, कार्पूरादिस्तोत्राची मूळ संस्कृत संहिता, अनुवाद व संहितेवरील भाष्य), गार्‌लँड ऑफ लेटर्स (वर्णमाला) (३ री आवृ. १९५५, मंत्रशास्त्राचा अभ्यास) आणि इंट्रोडक्शन टू तंत्रशास्त्र–ए की टू तांत्रिक लिटरेचर (३ री आवृ. १९५६). पहा : तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म शाक्त पंथ.

कुलकर्णी, अ. र.