काश्मीर शैव संप्रदाय : शैव संप्रदायाच्या द्वैतवादी, विशिष्टाद्वैतवादी व अद्वैतवादी अशा ज्या तत्त्वज्ञानदृष्टया तीन शाखा आहेत. त्यातील ही अद्वैत्ववादी शाखा होय. या संप्रदायात यास अद्वयवादही म्हणतात. पंचाक्षरी मंत्र (ओम नमः शिवाय), अकारादी सर्व वर्ण हे मंत्र, शिवपूजा, यंत्रपूजा, शक्तिपूजा, रुद्राक्षधारण, भस्मधारण इ. बाह्य कर्मकांड इतर शैव संप्रदायांसारखेच या संप्रदायाचेही आहे. हा संप्रदाय अष्टांगयोगमार्गी आहे. दार्शनिक उच्च पातळीवरून या संप्रदायाचे तत्त्वज्ञ अष्टांगयोगमार्गाची विशिष्ट उपपत्ती सांगतात. त्या उच्च पातळीवरून खाली उतरून पातंजल अष्टांगयोगमार्ग ते मान्य करतात. ते मंत्रोपासक आहेत. सर्व वर्ण म्हणजे नागरी लिपीतील वर्ण हे मंत्रच आहेत व त्यांचा अंतिम अर्थ महेश्वर हाच आहे. ‘अहं’ हा ‘अ’ कारापासून ह कारापर्यंत समाविष्ट करणारा निर्देश होय. सर्व वर्ण शिववाचक आहेत असे लक्षात घेतले म्हणजे ‘अहं’ हा मंत्रच ठरतो. क्ष हा ते अखेरचा मानतात त्यालाही त्यांनी गूढ आध्यात्मिक अर्थ दिला आहे. ही अक्षरमंत्रांची कल्पना तंत्रमार्गातीलच आहे. या तंत्रमार्गाला ‘क्रमपद्धती’ अशी संज्ञा आहे. शैव तंत्रागमांचे प्रामाण्य हा संप्रदाय मानतो. पशुपती, पशू आणि पाश या तिन्हीही कल्पना या संप्रदायाने स्वीकारल्या आहेत. पशुपती म्हणजे परमेश्वर, पशू म्हणजे जीव आणि मल, कर्म, माया, रोधशक्ती व बिंदू असा पंचविध पाश आहे. योगसाधना आवश्यक मानली आहे. परंतु परमेश्वराची भक्ती व ध्यान यांस प्राधान्य दिले आहे. भक्ती किंवा तत्त्वविचार नसेल, तर कर्मकांड व्यर्थ होय आणि भक्ती व तत्त्वचिंतन असेल, तर बाह्यकर्मकांड असले किंवा नसले तरी सारखेच, असे मानले आहे.

शैव तंत्रागमाचा अनुयायी वसुगुप्त (८२५) या सिद्धाने शैव मताला अद्वैतवादी रूप दिले. राजतरंगिणी (५⋅६६) या ग्रंथात याला एक सिद्ध म्हणून म्हटले आहे. याने शिवसूत्र  व स्पंदकारिका  हे ग्रंथ लिहिले. त्याचाच शिष्य कल्लट (नववे शतक) वसुगुप्ताच्या स्पंदकरिका  या ग्रंथावर त्याने टीका लिहिली आहे. याच शैवाद्वैताच्या विचारसरणीतील काही किरकोळ मुद्द्यांवर मतभेद होऊन प्रत्यभिज्ञा दर्शनाची दुसरी शाखा सोमानंदनाथ (८५०) याने प्रवृत्त केली. शिवदृष्टि हा त्याचा ग्रंथ, त्याचा पुत्र आणि शिष्य उत्पलदेव (नववे शतक) याने ईश्वरप्रत्यभिज्ञाकारिका आणि इतर अनेक ग्रंथ लिहिले. उत्पलाचा पुत्र लक्ष्मणगुप्त (नववे शतक) व त्याचा शिष्य अभिनवगुप्त (९५० – १०२०) हा झाला. अभिनवगुप्ताने ईश्वरप्रत्यभिज्ञाविमर्शिनी  ही विस्तृत टीका उत्पलदेवाच्या ग्रंथावर लिहिलेली प्रसिद्ध आहे. अभिनवगुप्त हा फार मोठा पंडित व तत्त्वज्ञ होता. त्याने प्रत्यभिज्ञा दर्शनावर परमार्थसार, मालिनीविजयवार्तिक, परमार्थद्वादशिका, अनुभवनिवेदन, परमार्थचर्चा, भेदवादविदारण, शिवदृष्ट्यालोचन, स्पंद  इ. अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याचा शिष्य क्षेमराज (९७५ – १०५०) याने या दर्शनावर प्रत्यभिज्ञाह्रदय, शिवसूत्रविमर्शिनी, स्पंदसंदोह, स्पंदनिर्णय  इ. ग्रंथ लिहिले आहेत. सोळाव्या शतकातील वरदराज याने लिहिलेले शिवसूत्रवार्तिक  प्रसिद्ध आहे. हा प्रत्यभिज्ञा संप्रदाय काश्मीरमध्ये एकोणिसाव्या शतकांपर्यंत प्रभावी होता. अलीकडे त्याला उतरती कळा लागली आहे.

वसुगुप्ताच्या शिवसूत्राचे  व स्पंदकारिकेचे  प्रामाण्य अभिनवगुप्ताचा संप्रदाय मानतो. प्रत्यभिज्ञादर्शन हे वसुगुप्ताच्या शिवसूत्र व स्पंदकारिका इ. ग्रंथांच्या आधारे विकसित झाले आहे. साक्षात ईश्वरानेच एका शिलाखंडावर लिहिलेली शिवसूत्रे होती तीच वसुगुप्ताने जगाला दिली, अशी एक कथा अभिनवगुप्ताचा शिष्य क्षेमराज याने सांगितली आहे. परंतु स्वतः अभिनवगुप्त असे म्हणतो, की शिवाने शैवागमरहस्य दुर्वासमुनीला सांगितले, दुर्वासाने त्र्यंबकादित्य नावाच्या मानसपुत्रास ते दिले. त्र्यंबकादित्याच्या वंशातील सोमानंदनाथाला तेच रहस्य प्राप्त झाले. सोमानंदनाथ, उत्पलदेवाचार्य, लक्ष्मणगुप्त व अभिनवगुप्त अशी ही गुरुशिष्यपरंपरा आहे. सोमानंदनाथाचा शिवदृष्टि  हा ग्रंथ आधाराला धरूनच ईश्वरप्रत्यभिज्ञा हा ग्रंथ उत्पलदेवाने लिहिला आहे. प्रत्यभिज्ञादर्शन हे वेदमूलक नाही, ते साक्षात ईश्वराने उपदिष्ट केले आहे.

या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानास ‘स्पंददर्शन’ किंवा ‘ईश्वरप्रत्यभिज्ञादर्शन’ अशी संज्ञा आहे. हे दर्शन अद्वैतवादी असले, तरी हा अद्वैतवाद शंकराचार्यांच्या ⇨केवलाद्वैतवादाहून भिन्न आहे. परमेश्वर किंवा महेश्वर हे एकच एक तत्त्व असून जीव व दृश्य जड विश्व, हे मायेने मूळ परमेश्वरावर म्हणजे चैतन्यशक्तीवर आवरण पडल्यामुळे उत्पन्न झाले आहे. व विश्वाने स्वतः चिद्रूप परमात्मा आवृत झाला आहे, असे शंकराचार्य मानतात तसे प्रत्यभिज्ञादर्शन मानत नाही. वस्तुतः विश्वाचा परमेश्वरच कर्ता व उपादान कारण होय म्हणून त्या चिन्मय परमेश्वराचीच जीव व जगत ही प्रकट रूपे आहेत, त्याचाच ती जीव व जगत रूपे आविष्कार आहे, असे हे दर्शन सांगते. जग दिसते ते ईश्वराचेच प्रकट रूप दिसते. ज्ञानदेवांचा चिद्विलासवादही असेच सांगतो. प्रत्येक जीवात्म्याला त्या परमेश्वर स्वरूपाचा साक्षात्कार होत असूनही, त्याला तसा साक्षात्कार होतो, असे वाटत नाही. ‘तो चिदात्मा मी आहे’ (‘सोSहम्’) असा अनुभव आला म्हणजे जीवात्मा मुक्त होतो. ह्या अनुभवालाच ‘प्रत्यभिज्ञा’ म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची पुन्हा ओळख असे म्हणतात. ही प्रत्यभिज्ञा किंवा साक्षात्कार परमेश्वराच्या अनुग्रहशक्तीने म्हणजे कृपेने प्राप्त होतो. ही कृपा शास्त्रतत्त्वाच्या चिंतनाने किंवा गुरुकृपेने प्राप्त होते, असा या दर्शनाचा सिद्धांत आहे.

तत्त्वचिंतकाचा स्वानुभव हा या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. ईश्वराच्या अनुग्रहाने प्राप्त (१) स्वानुभव, (२) तार्किक युक्तिवाद म्हणजे विमर्श, (३) आगमशास्त्र व (४) गुरूपदेश ही या तत्त्वज्ञानाची प्रमाणे होत.

ह्या दर्शनाची एकंदर छत्तीस तत्त्वे आहेत. त्यांतील पहिली अकरा वेगळी म्हणजे या दर्शनाची व पुढील पंचवीस तत्त्वे सांख्यांची होत [→ सांख्यदर्शन]. परमशिव हा विश्वमय व विश्वोत्तीर्ण असा आहे. शिवशक्तीरूप परमशिव हेच केवळ एक सत्य असून प्रमाता, प्रमेय व प्रमाण किंवा ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान ही त्रयी त्याचाच आभास आहे. शिव व शक्ती ही पहिली दोन तत्त्वे. वस्तुतः ती एकच आहेत. या शुद्ध शिवशक्ती स्वरूपातच तो ध्यानात घेतला असता, तो विश्वोत्तीर्ण आहे म्हणजे विश्वाच्या पलीकडे आहे. शक्ती ही पूर्ण स्वतंत्र चित‌्शक्ती आहे. त्या पूर्ण स्वातंत्र्यामुळेच ती एकच असूनही तिची पुढील चौतीस तत्त्वे बनतात. प्रथम तीच ‘नित्यकल्याणशील’ बनते. हे ‘नित्यकल्याणशील’ स्वरूपच ‘सदाशिव’ हे तिसरे तत्त्व होय. हा सदाशिव म्हणजे शिवशक्तीचे अहं अशी अंतःप्रतीती असलेले स्वरूप. ही अंतःप्रतीती म्हणजे निमेष. ईश्वर हे चौथे तत्त्व होय. ईश्वर म्हणजे शिवशक्तीत उद्भवलेले ‘इदं’ (हे) विश्व अशी अंतःप्रतीती म्हणजे ‘इदं’ असा उन्मेष. त्याच्यापासून निर्माण होणारे ‘शुद्ध विद्या’ हे पाचवे रूप आणि हेही तत्त्व होय. ‘अहमिदं’ (मीच हे विश्व) अशी प्रतीती म्हणजे ‘शुद्धविद्या’ किंवा ‘सद्विद्या’ होय. सहावे तत्त्व माया. विश्वातील भिन्न पदार्थ निर्माण करणारी ही चैतन्यशक्ती होय. या शक्तीच्या योगाने प्रकृती बारा आणि पुरुष तेरा असा भेद प्रगट होतो. पुरुष म्हणजे प्रत्येक जीवात्मा. प्रकृती म्हणजे सांख्यांनी सांगितलेली सत्त्व, रज, तम यांनी युक्त म्हणजे त्रिगुणात्मक जड प्रकृती होय. मायाशक्ती प्रकृती नव्हे. माया शक्तीतून काल, नियती, राग, विद्या व कला अशी अनुक्रमे सात ते अकरा म्हणजे एकूण पाच ‘कंचुके’ म्हणजे वस्त्रे शिवावर पडतात किंवा शिव ती कंचुके मायेच्या द्वारे परिधान करतो त्यामुळे तो विविध जीवात्म्यांच्या म्हणजे पुरुषांच्या रूपाने प्रगट होतो. शिव हा विविध जीवात्म्यांची रूपे घेतो, तेव्हा हे त्याचे वैविध्य या कंचुक्यांच्यामुळे दृष्टोत्पत्तीस येते. पहिले कंचुक काल. भूत, भविष्य व वर्तमान ह्या कालमर्यादा होत. क्षणनिमिषादी कालगणना हे कालरूपी कंचुकाचेच आविर्भाव होत. नियती हे दुसरे कंचुक. ते दिक‌्तत्त्व होय. पूर्वपश्चिमादी दिशा याच तत्त्वाचा आविर्भाव होत. राग हे तिसरे कंचुक. राग म्हणजे आसक्ती. प्रीती, द्वेष इ. विकार आसक्तीमुळेच उद्भवतात. विद्या हे चौथे कंचुक. काल, दिक् आणि राग यांचा अनुभव घेत जीवात्म्याला विश्वाचे ज्ञान प्राप्त होत असते. हे ज्ञान मर्यादित असते, ते अल्प विषयांचे असते. ह्या ज्ञानशक्तीस विद्यातत्त्व म्हणतात. जीवात्म्याला बद्धावस्थेत होणारे ज्ञान हे मर्यादित स्वरूपाचेच असते. विशिष्ट काल, विशिष्ट देश व विशिष्ट विषयाबद्दल राग ह्याच ह्या ज्ञानाच्या मर्यादा होत. कला हे पाचवे कंचुक. जीवात्म्याच्या ठिकाणी असलेली निर्मितीची शक्ती म्हणजे कलात्त्व.

मायेच्या योगाने जीवात्म्याची ठिकाणी ‘आणव मल’, ‘मायीयमल’ व ‘कार्ममल’ असे तीन मल राहतात. जीवात्म्याला आपण मर्यादित व्यक्ती आहोत, इतरांहून वेगळे आहोत, लहान आहोत, असा अनुभव येतो. हे त्याचे वेगळेपण किंवा लहानपण म्हणजे ‘अणुत्व’ होय. तो आपण एखाद्या कणासारखे या विश्वात आहोत असे मानतो. याचे कारण त्याच्या ठिकाणी त्याला मर्यादित व्यक्तित्व देणारा ‘मल’ आहे. यास ‘आणवमल’ म्हणजे अणू बनविणारा मल म्हणतात. जिवाला शरीर प्राप्त करून देणारा मायामल वा मायीयमल होय. मायाशक्ती ही जीवात्म्याच्या ठिकाणी मलरूपाने राहते. धर्म आणि अधर्म किंवा पुण्य आणि पाप जीवात्म्याच्या कर्माने निर्माण होतात. हे पापपुण्यात्मक कर्म करण्याची प्रवृत्ती ज्या मलाने उत्पन्न होते, त्यास कार्ममल म्हणतात.

प्रकृतीपासून बुद्धी, अहंकार, मन, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, शब्दस्पर्शादी पंचविषय व आकाशादी पंचमहाभूते क्रमाने परिणत होतात. प्रकृती व पुरुष धरून ही पंचवीस तत्त्वे होतात. पहिली अकरा आणि ही पंचवीस मिळून छत्तीस तत्त्वे होतात. परंतु काही प्रत्यभिज्ञातत्वज्ञ परमशिव हे या छत्तीस तत्त्वांच्यापेक्षा अधिक सदतिसावे तत्त्व मानतात तर काही त्याहीपेक्षा अधिक तत्त्वे मानतात.

शिवशक्तिरूप परमशिव हा चिन्मय, स्वच्छ दर्पण. त्या दर्पणावर सदाशिवापासून पृथ्वीपर्यंतची तत्त्वे प्रतिबिंबरूपाने उभारली जातात. दर्पणातील ह्या उभारणीबरोबरच संहारणीही होत असते. हे उभारणीसंहारणीचे चक्र शिवाच्या चिन्मय अशा ज्ञानेच्छाक्रियाशक्तीमुळे चालू राहते. ह्या चक्राचे क्रमाने पाच भाग होत. उत्पत्ती, स्थिती, संहार क्रिया, लय अथवा सृष्टीची शून्यस्थिती आणि जीवात्म्यावर होणारा शिवानुग्रह. त्या शिवशक्तीचे वा अर्धनारीनटेश्वराचे हे सर्व नाटक किंवा नृत्य सतत चालू असते. हा पंचविधविश्वक्रम व्यष्टी व समष्टी या दोघांनाही लागू आहे. शिवाचे नित्यमुक्त स्वरूप हे विश्वोत्तीर्ण स्वरूप आहे. त्या विश्वोत्तीर्ण दर्पणामध्ये ईश्वर, जीव आणि जगत यांचा जो प्रपंच दिसतो तो आभास होय. हा आभास सत्यच आहे. तो चित्‌शक्तीचा उन्मेषनिमेषरूप प्रकाश्च आहे आणि दर्पणही चित्‌शक्तीचेच स्वरूप होय. ती चित्‌शक्ती पूर्णस्वतंत्र शक्ती असून ते पूर्ण स्वातंत्र्य विश्वाच्या उभारणी-संहारणीत प्रकट होते ही उभारणी-संहारणी हे स्फुरण आहे हे पूर्णस्वातंत्र्य, स्फुरण किंवा चैतन्य म्हणजेच `स्पंद’ होय. चित्‌शक्ती, चैतन्य, स्फुरत्ता किंवा आत्मा हे `स्पंद’ शब्दाचेच पर्याय होत. जीवात्म्याला अनुग्रहाच्या योगाने असे हे स्पंदतत्त्व ओळखता आले म्हणजे तो मुक्त होतो. त्याचे तिन्हीही `मल’ क्षीण होतात. नटाला ज्याप्रमाणे आपले सत्य स्वरूप माहीत असते. त्याप्रमाणे या जीवरूप नटाला जीवनमुक्तावस्थेत आपण महेश्वर आहोत, असे माहीत होते.

या प्रत्यभिज्ञादर्शनाच्या आधारे अभिनवगुप्ताने भरताच्या नाट्यशास्त्रावर अभिनवभारती ही टिका लिहून कलेचे व सौंदर्याचे तत्त्वज्ञान मांडले आहे. विश्रांतिमय, चमत्काररूप अलौकिक अनुभव हा सौंदर्यानुभव होय आणि शृंगारादी रसांचे अधिष्ठान असलेला असा हा अलौकिक अनुभव ‘महारस’ होय, असे त्याने प्रतिपादिले आहे. सगळ्या रसांचा अनुभव हा महारसानुभवच होय, असे त्याचे तात्पर्य आहे. नाट्यशास्त्रात उदाहरणादाखल भरताने जे श्लोक उद्‌धृत केले आहेत, त्यांतील बरेच श्लोक हे शिवविषयकच आहेत. ध्वन्यालोकनामक आनंदवर्धनाच्या ग्रंथावर अभिनवगुप्ताची लोचननामक टीका आहे. त्या टीकेतही प्रत्यभिज्ञादर्शनाच्या आधारेच काव्यतत्त्वाची मीमांसा केली आहे.

पहा : शैव संप्रदाय.

संदर्भ : 1.Kurt, F. Leidecker Trans. The Secret of Recognition (प्रत्याभिज्ञाह्रदयम्) Adyar, 1938.

2.Pandey, K.C. Abhinavagupta : An Historical and Philosophical Study, Banaras, 1963.

जोशी, लक्ष्मणशास्त्री