संन्यास : हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे मानवी जीवनाच्या चार अवस्थांपैकी शेवटची चौथी अवस्था. हिंदुधर्मशास्त्रानुसार मानवी जीवन हे बह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ आणि संन्यास अशा चार आश्रमांत विभागलेले आहे. वानप्रस्थ म्हणजे संसार सोडून देऊन वनात राहणे. वानप्रस्थी हा आपल्या भार्येसह आणि अग्नीसह वनात राहू शकतो. संन्यासी मात्र भार्या आणि अग्नीचा त्याग करून परिवाजक बनतो. वानप्रस्थ आणि संन्यास यांचे इतर नियम प्राय: सारखे आहेत. मनुष्याने चार आश्रमांचा एकापुढे एक अशा क्रमाने स्वीकार करावा किंवा तयारी असल्यास पूर्वीच्या कोणत्याही आश्रमातून एकदम संन्यासाश्रमात प्रवेश करण्यासही हरकत नाही.

आश्रमव्यवस्थेचा आरंभ भारतीय इतिहासाच्या कोणत्या कालखंडात झाला, हे निश्र्चित सांगणे कठीण आहे. संन्याशाने एके ठिकाणी कायम वस्ती करून राहू नये, असा नियम असल्याने त्याला परिवाजक अशीही संज्ञा आहे. छांदोग्य आणि बृहदारण्यक या उपनिषदांत संन्यासाची कल्पना आढळते. बृहदारण्यका चे ऋषी याज्ञवल्क्य स्वत: परिवाजक बनले होते. धर्मसूत्रां त संन्यासाश्रमाची विस्ताराने मांडणी केलेली आहे. बौधायन गृह्यशेषसूत्रा संन्यासधर्माचे विवरण केलेले आहे. जाबालोपनिषद, संन्यासोपनिषद आणि परमहंस परिवाजकोपनिषद यांत संन्यासधर्माचा विस्तृत विचार केलेला आहे. ही उपनिषदे अर्थातच प्रमुख उपनिषदांच्या नंतरच्या कालातील होत. मनु-याज्ञवल्क्या दी स्मृती, महाभारत, धर्मसिंधू , निर्णयसिंधू इ. गंथांत या विषयाचे विस्तृत वर्णन आढळते.

संन्यासाश्रम केवळ बाह्मणवर्णासाठी विहित आहे की, क्षत्रिय आणि वैश्य हेही त्याचे पालन करू शकतात, यासंबंधी गंथकारांत एकमत दिसून येत नाही तथापि महाभारता त (शांतिपर्व-अध्याय ६३) यात क्षत्रिय राजाला राजपुत्र गादीवर बसविल्यानंतर वानप्रस्थ व संन्यास घेण्याची अनुमती दर्शविली आहे आणि राजाची अनुमती असल्यास वैश्य व शूद्र यांनाही वृद्धापकाळी वानप्रस्थ व संन्यास घेण्याची अनुमती दिलेली आहे. अपत्य नसल्यास किंवा वयाच्या सत्तराव्या वर्षी, किंवा भार्या मृत झाली असता, किंवा पुत्रांना प्रपंचात स्थिर केल्यानंतर संन्यास घ्यावा, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. संन्यासगहणाचा विधी आणि संन्याशाने आचरावयाचे नियम निरनिराळ्या गंथांत तपशीलवार सांगितले आहेत. सर्वस्वाचा त्याग केल्याची भावना अंगी बाणविणे, हे संन्यासाश्रमाचे मुख्य तत्त्व आहे. अहिंसा, सत्य आणि अस्तेय या वतांचे संन्याशाने निष्ठापूर्वक पालन केले पाहिजे. सर्व प्राणिमात्रांमध्ये त्याच्यासंबंधी अभयाची भावना निर्माण झाली पाहिजे. परमतत्त्वांचे चिंतन त्याने अहर्निश केले पाहिजे. केवळ बाह्य विधी हे गौण स्वरूपाचे होत.

संन्याशांचे मुख्यतः चार प्रकार आहेत – (१) कुटीचक, म्हणजे झोपडी बनवून तीमध्ये राहणारा, भगवी वस्त्रे परिधान करणारा, स्वत:च्या आप्ताच्या घरी भोजन करणारा. (२) बहूदक, म्हणजे बांधव वर्ज्य करून इतर सात घरी भिक्षा मागून निर्वाह करणारा. (३) हंस, म्हणजे गावात एक रात्र आणि शहरांत पाच रात्री राहणारा व वर्षातील अकरा महिने भिक्षेवर राहणारा. (४) परमहंस, शिखायज्ञोपवीत आणि नित्यकर्म यांचा त्याग करणारा. हे चार प्रकार उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत. यांखेरीज तुरीयातीत आणि अवधूत हे आणखी दोन प्रकार संन्यासोपनिषदा त सांगितले आहेत.

त्रिदण्डी हादेखील संन्यासाचा एक प्रकार आहे. असा संन्यासी तीन एकत्र बांधलेले दण्ड उजव्या हातात धारण करतो. ते वाणी, मन आणि देह यांच्या निगहाचे द्योतक समजले जातात. ‘वाग्दण्डोऽथ मनोदण्डः कायदण्डस्तथैव च । यस्यैते निहिता बुद्घौ त्रिदण्डीति स उच्यते’ (मनुस्मृति १२.१०) अशी ‘त्रिदण्डी’ची व्याख्या मनुस्मृती त आढळते. हा संन्यासाचा गौण प्रकार होय. यात शेंडी, जानवे आणि वस्त्राचे कच्छ पद्धतीने नेसणे याचा त्याग करावा लागत नाही व परत गृहस्थाश्रम स्वीकारता येतो. सुभद्राहरणप्रसंगी अर्जुनाने या प्रकारचा संन्यास घेतला होता.

गावातील धर्मविषयक प्रश्नांचा निर्णय करण्यासाठी आणि अपराध्यास प्रायश्चित्त देण्याःसाठी राजाने दहापर्यंत सदस्यांची परिषद बोलवावी, असे स्मृतींत सांगितले आहे. या सदस्यांमध्ये एक संन्यासी असावा, असे सांगितले आहे. संन्याशाची वृत्ती निरभिलाष असते, हे याचे कारण आहे. आदय शंकराचार्यांनंतर भारतात धर्मपीठे निर्माण झाली, ती पुढे धर्मनिर्णयाचे काम करू लागली. पीठाधीश संन्यासी असले, तरी पीठे ही लौकिक संपत्तीची केंद्रे बनली. त्यांतून मोठया प्रमाणात सर्व समाजघटकांसाठी धार्मिक, शैक्षणिक संस्था व रूग्णालयेही सांप्रत चालविली जातात.

अर्वाचीन काळात संन्याशांचे नवे पंथ प्रचारात आले. त्यांपैकी काही संन्यासधर्माच्या आदर्शांपासून फार दूर गेल्याचे दिसते.

पहा : आश्रमव्यवस्था पुरूषार्थ.

काशीकर, चिं. ग.