दर्शपूर्णमास :एक श्रौतयज्ञ. प्रत्येक पौर्णिमा आणि दर्श किंवा अमावस्या या दिवशी करावयाच्या यज्ञास दर्शपूर्णमास म्हणतात. अग्निहोत्री मनुष्याने हा यज्ञ यावज्जीव करावयाचा असतो. नित्यकर्मात या यज्ञाची गणना आहे. सोम व पशू यांव्यतिरिक्त हविर्द्रव्य असलेल्या यागास इष्टी म्हणतात. ही इष्टी सर्व इष्टींची प्रकृती आहे. दर्शेष्टी किंवा पूर्णमासेष्टी दोन दिवस मिळून करावयाची असते. पौर्णिमा किंवा अमावस्येला संकल्प व अन्वाधान करून प्रतिपदेला इष्टी करतात. अग्निहोत्र घेतल्यावर या इष्टींचा प्रारंभ पौर्णिमेपासून करतात. ब्रह्मा, होता, अध्वर्यू आणि अग्नीध्र हे चार ऋत्विज असतात. पुरोडाश हे मुख्य हविर्द्रव्य आहे. पौर्णिमासेष्टीत अग्नी व अग्निषोम आणि दर्शेष्टीत अग्नी व इंद्राग्नी या देवतांना हविर्भाग देतात. सोमयाग ज्याने केला असेल, अशा यजमानाच्या दर्शेष्टीत इंद्राग्नीऐवजी इंद्रदेवतेसाठी दूध व दही यांची आहूती देतात. अग्निहोत्र न घेतलेल्या गृहस्थाने आपल्या अग्नीवर पौर्णिमा अथवा अमावस्या या दिवशी त्या त्या देवतांना आहुती द्यायची असते.

संदर्भ : किंजवडेकर, वामनशास्त्री, दर्शपूर्णमासप्रकाश, आनंदाश्रम प्रेस, पुणे, १९२४.

जोशी, रंगनाथशास्त्री