बौद्ध धर्म पंथ : बौद्ध धर्मामध्ये बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सु. १०० वर्षांनी वैशाली येथे द्वितीय संगीती भरली, त्यावेळी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. बुद्ध विनयाच्या काटेकोर पालनाच्या जाचाला लोक कंटाळले व त्यातून सुटका झाली तर बेर, असे म्हणणारे बरेच लोक निघाले. उलटसनातनी पक्षाचे लोक विनयाच्या नियमांचे योग्य पालन व्हावे म्होणून परिषद भरवून, चुकार लोकांबद्दल नापसंती दाखवून, बुद्धाच्या आचार-नियमांना पुन्हा उजाळा देऊ लागले. मूळ संघातून फुटून बाहेर पडलेल्या लोकांना ‘महासंघिक’ असे नाव पडले व जुन्या सनातनी लोकांना स्थविरवादी किंवा थेरवादी असे नाव पडले. ह्या महासांघिकातून पुढे कालांतराने आणखी पाच संप्रदाय निघून ह्या फुटिरांचे सहा संप्रदाय बनले व जुन्या सनातनी लोकांचे बारा संप्रदाय बनले. अशोकाच्या काली हे अठरा संप्रदाय अस्तित्वात आलेले होते. (सोबतचा तक्ता पहा).

सामान्यणे असे म्हणता येईल, की पुढे बौद्ध धर्माचे जे दोन मुख्य पंथ म्हणून प्रस्थापित झाले, त्यांतील ‘महायान’ पंथ हा फुटीर संप्रदायातील लोकांचा होता व दुसरा ‘श्रावकयान’ (ज्याला महायानी लोकांनी अन्यायाने तुच्छतादर्शक ‘हीनयान’ असे नाव दिले) हा जुन्या स्थविरवादी लोकांचा होता [ →महायान पंथ हीनयान पंथ].

स्थविरवाद किंवा थेरवाद हा बुद्धाच्या कालाला व मताला सर्वांत नजीक आहे, त्यातूनच निघालेला ‘सर्वास्तिवाद’. ह्या श्रावकयानी पंथाचे तत्त्वज्ञान व महायान पंथाचे ‘माध्यमिक’ व ‘योगाचार’ किंवा ‘विज्ञानवाद’ संप्रदाय ह्यांचे तत्त्वज्ञान सविस्तर रीतीने ⇨बौद्ध दर्शन  ह्या लेखात दिलेले आहे. बाकीचे सर्व संप्रदाय ह्या दोन मुख्य पंथांपैकीच असल्याकारणाने त्यांची तात्त्विक विचारसरणी ह्या दोन पंथांच्या पैकी एकाच्या जवळपास असते किंवा श्रावकयानापासून महायानाकडे जाण्याच्या प्रवृत्तीची असते.

स्थविरवाद्यांपासून निघालेला महीशासक संप्रदाय हाही कौशांबी, अवंती व वनवासी (कर्नाटकातील) ह्या मार्गे श्रीलंकेपर्यंत पोहोचला होता, असे जातकट्ठ कथेच्या आरंभीच्या गाथांवरून स्पष्ट होते. हा संप्रदाय असंस्कृत धर्म नऊ प्रकारचे आहेत असे मानतो, तर स्थविरवादी संप्रदायाप्रमाणे एक, सर्वास्तिवाद्यांच्या मते तीन व योगाचारंच्या मते ते सहा आहेत.

महासंघिक संप्रदायही ते नऊ प्रकारचे मानतो  पण त्यांच्या यादीतील चार असंस्कृत धर्म ह्या संप्रदायाच्या यादी-पासून भिन्न आहेत. ह्या संप्रदायाच्या मते ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणून म्हटलेले आहे, तो खरोखर पंचांगिकच आहे. कारण सम्यक वाक्, सम्यक् कर्मान्त व सम्यक् आजीव हे मनाशी संबद्ध नसल्याकारणाने त्यांचा अंतर्भाव करण्याची जरूरी नाही. ह्या  संप्रदायामध्ये दोन प्रकार आहेत. त्यातील उत्तरकालीन संप्रदाय हा सर्वास्तिवाद्यांप्रमाणे भूत व भविष्यकारही अस्तित्वात असल्याचे मानतो. हैमवत संप्रदाय हा हिमवंत प्रदेशात प्रचलित होता. ह्या संप्रदायाच्या मतांपैकी काही मते श्रावकयानाला जवळ आहेत कारण हा संप्रदाय बोधिसत्त्वाला विशेष महत्त्व देत नाही पण भव्य आणि विनीतदेव ह्यांच्या मताप्रमाणे हा संप्रदाय महासंधिकांचीच एक शाखा आहे. कारण ज्या महादेव नावाच्या भिक्षूच्या पाच मतांमुळे बौद्ध संघात फूट पडली, ती मते ह्या संप्रदायाला मान्य आहेत.

वात्सीपुत्रीय किंवा साग्मितीय संप्रदाय हा मात्र बौद्धांच्या मध्ये बंडखोर म्हणून समजला गेलेला आहे. बुद्धाने अनेक ग्रंथांतून ‘पुद्गवल’ ह्या शब्दाचा उपयोग केवळ ‘व्यक्ती’ ह्या अर्थी केलेला आहे. एवढ्या आधारावरून ‘पुदगल’ हा अस्तित्वात आहे व तो ‘आत्म्या’ पासून काही भिन्न नाही व तोच माणसाचा जेव्हा एका जन्मातून दुसऱ्यात जन्म होतो त्यावेळी संक्रमण करतो, असे ह्या संप्रदायाचे मत आहे. महीशाकसापासून धर्मगुप्त संप्रदाय निघाला. हा संप्रदाय मध्य आशिया व चीनमध्ये विशेष रीतीने प्रचलित होता. ह्या संप्रदायाचे त्रिपिटकही अस्तित्तावत होते. स्तूपांची पूजा व स्तूपांना दान देणे असल्या कुशलकृत्यांना त्यांची पूर्ण संमती होती.

काश्यपीय संप्रदाय हाही स्थविरवाद्यांना अती जवळचा म्हणून त्याला ‘स्थावरीय’ असेही नाव आहे. ह्या संप्रदायाचेही स्वतंत्र धर्मग्रंथ होते. ह्यांच्या मताप्रमाणे ज्या भूतकालाचा विपाक होऊन तो नष्टही झाला आहे, तो भूतकाल अस्तित्वात नाही. पण ज्या भूतकालाचा विपाक अद्याप झाला नाही किंवा जो अद्याप नष्ट झाला नाही तो अस्तित्वाद आहे. वैभाषिकांच्या ग्रंथांतून हेच मत ‘विभज्जवादी’ संप्रदायाचे होते, असे म्हटलेले आढळते.

सौत्रांतिक संप्रदायांसंबधी ‘बौद्ध दर्शना’वरील नोंदीत सविस्तर लिहिलेले आहे. ह्याच्या मताप्रमाणे पुनर्जन्म होताना एका सूक्ष्म स्कंधाचे संक्रमण होते म्हणून त्याला ‘संक्रांतिवाद’ असेही म्हटले आहे.

मध्य भारतात हरिवर्मन नावाचा एक विद्वान होऊन गेला. चिनी ग्रंथाच्या आधारे बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर ८९० वर्षांनी तो होऊन गेला. त्याने तत्त्वसिद्धि (काही विद्वान त्याला सत्यसिद्धि  असेही म्हणतात) नावाचा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात श्रावकयानाकडून महायानाकडे जाण्याचाही प्रवृत्ति मोठ्या प्रमाणावर दिसते. पुदगल-नैरात्म्याच्या जोडीला धर्म-नैरात्म्यही तो मान्य करतो तसेच दोन सत्येही मान्य करतो व आत्म्याला सांवृत्तिक दृष्ट्या अस्तित्व असून परमार्थ सत्याच्या दृष्टीने मात्र अस्तित्व नाही हे मान्य करतो. तसेच जगाच्या बुडाशी ८४ तत्वे किंवा धर्म आहेत पण तीही, योगाचार संप्रदायाच्या मताप्रमाणे सांवृत्तिक दृष्ट्या, पारमार्थिक दृष्ट्या नव्हे. ह्या संप्रदायाच्या मते वर्तमानकाळच अस्तित्त्वात आहे. भूत व भविष्याला अस्तित्तव नाही. सौत्रांतिकवाद व तत्त्वसिद्धिवाद हो दोन्ही वाद श्रावकयान व महायान ह्यांना जोडणाऱ्या दुव्यांसारखेच वाटतात.

महासंघिकांचा प्रभाव भारतात आंध्र वगैरेसारख्या पूर्वेकडील भागांत विशेष होता. ह्यांच्या मते बुद्धाला मानुषी अस्तित्तच नव्हते. तो लोकोत्तर होता व लोकोत्तर गुण त्याच्या ठायी होते. ह्यांच्या मते ‘अव्याकृत’ असा धर्माचा प्रकार नाही. हे मत तर स्थविरवाद्यांच्या मूळ तात्त्विक विचारसरणीच्या विरूद्ध आहे. कुशल, अकुशल आणि अव्याकृत अशी धर्मांची त्रिविध विभागणी हा तर स्थविरवादी अभिधम्माचा मूळ सिद्धांत. ह्या संप्रदायाच्या मते असंस्कृत धर्म नऊ प्रकारचे आहेत पण हे धर्म महीशासकांच्या नऊ असंस्कृत धर्मांशी सर्वस्वी जुळणारे नाहीत. सर्वास्तिवादी मानतात त्या प्रकारचा दोन जन्मांमधील अंतरभवही नाही.

ह्या महासंघिकांपासून ‘गोकुलिक’ हाही संप्रदाय निघाला. ह्यांच्या मते सर्व जग ‘कुक्कुळ’ किंवा जळजळीत अंगाराप्रमाणे दुःखदायक आहे. पंचस्कंधांपैकी रूपस्कंधच विपरिणामधर्मी आहे. चित्तामध्ये विस्तार पावण्याची व संकोच पावण्याची शक्ती आहे, असे मानणाराही एक गट होता. बहुश्रुतीय किंवा बहुलिय व बाहुलिक ह्यांच्या मते अनित्य, दुःख, अनात्म, शून्य व निर्वाण ह्या पाचा संबंधीची बुद्धाची शिकवण लोकोत्तर आहे. बाकीची शिकवण लौकिक आहे.

प्रज्ञप्तिवादी लोकांच्या मताप्रमाणे व्यक्तीतील पंचस्कंधांखेरीज बाह्य जगातील स्कंधांना खरे अस्तित्व नाही. आयतन, धातू वगैरेंना खरे अस्तित्व नाही. मरण अकस्मात आले असे म्हणता येणार नाही. ते केवळ स्वतःच्या कर्माचेच फळ म्हणून आहे. आर्यमार्ग हा स्वतःच्या कर्मानेच प्राप्त होतो आणि तो एकदा प्राप्त झाला म्हणजे, तो पुढे नाहीसाही होत नाही. आंध्र देशातील पूर्व-शैल व अपर-शैल ह्या पर्वतांवर किंवा त्यांच्या परिसरात राहणारे चैत्यपूजक होते. स्तूपपूजेने विशेष पुण्य मिळते अशी त्यांची श्रद्धा नव्हती. पण स्वतः मिळविलेल्या पुण्याचे दान दुसऱ्यास करता येते व दुसऱ्याच्या पुण्यात स्वतःला वाटा घेता येतो, अशी महायानी पंथाची विचारसरणी ह्या संप्रदायामध्ये दिसून येते.

कथावस्तु  ह्या ग्रंथाच्या अट्ठकथेत वैतुल्यक किंवा महाशून्यता वादी लोकांचा उल्लेख असून त्यांच्यामध्ये असे काही लोक होते, की ज्यांना करूणायुक्त अंतःकरणाने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीशी अब्रह्मचर्यसेवन करण्यासही विधिनिषेध नव्हता. अशा प्रकारची सवलत गृहस्थाश्रमी बोधिसत्त्वाला होती हे बोधिसत्त्वभूमि (वोगिहार संपादित प्रत, पृष्ठ १६७) ह्या ग्रंथावरून स्पष्ट दिसते.

श्रीलंकेमध्ये दोन गट प्रामुख्याने प्रचलित होते. महाविहारवासी व अभयगिरिवासी. अभयगिरिवासी हा गट विशेषतः बाहेरच्या देशातून (भारतातून) आलेल्या लोकांचा होता व त्यात महायान पंथी, वैतुल्यवादी वगैरेंचाही समावेश होता. कित्येक शतकेपर्यंत ह्या दोन गटांमध्ये स्पर्धा लागून राहिली होती. ज्या गटाला राजसत्तेचे पाठबळ मिळे तो गट त्या वेळेपर्यंत बलिष्ठ राही. ह्या दोन गटांतील द्वंद्वातून शेवटी महाविहारवासी गट अभयगिरिवासी गटावर मात करून यशस्वी रीतीने बाहेर पडला व आता केवळ महाविहार संप्रदाय तेथे अस्तित्वात राहिला आहे. ब्रह्मदेशातही जे काही संप्रदाय अस्तित्तावत आहेत ते निव्वळ बाह्य वागण्याच्या प्रकारांवरून. चीवर दोन खांद्यांवरून घ्यावे, छत्री किंवा वहाणा (पादत्राण) वापराव्या की वापरू नये वगैरे मुद्यांवर हे भेद झाले. सध्या संख्याबलाने मोठा असलेला ‘सुधम्म’ संप्रदाय हा छत्री व वहाणा वापऱण्याला, पानसुपारी खाण्यास किंवा धूम्रपान करण्यास किंवा ‘पस्ति’ पाठ करताना पंखे वापरण्यास परवानगी देतो. पण ‘श्वेगिन’ संप्रदाय मध्यान्हानंतर पानसुपारी खाण्याला किंवा धूम्रपान केव्हाही करण्याला संमती देत नाही. ‘द्वार-निकाय’ नावाचा तिसरा संप्रदाय आहे. हा केवळ काय-कर्म, वाककर्म व मनो-कर्म ह्या शब्दांऐवजी कायद्वार, वाक्-द्वार व मनोद्वार हे शब्द वापरतो म्हणून तो वेगळा संप्रदाय मानला जातो.

थायलंड व कंबोडियामध्ये महानिकाय आणि धम्मयुत्तिकनिकाय असे दोन संप्रदाय आहेत. धम्मयुत्तिकनिकाय हा विनय-नियमांचे जास्त कडक रीतीने पालन करतो. तिबैटमध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश होण्यापूर्वी भूत-पिशात व मंत्र-तंत्र, जादूटोणा ह्यांच्यावरच भर देणारे ‘बोन’ नावाचा धर्म होता. त्यामुळे शांतरक्षित आठव्या शतकाच्या उत्तरार्धात तेथे गेला तेव्हा त्याची तेथे डाळ शिजेना. म्हणून त्यानेच प्रथम स्वात नदीच्या खोऱ्यातील उरग्यान प्रांतातून पद्मसंभवाला बोलावण्याची शिफारस केली. त्याप्रमाणे पद्मसंभवाच्या आगमनामुळे तिबेटमध्ये तांत्रिक  बौद्ध धर्माचीच भरभराट झाली व पद्मसंभवाला फार मोठे मानाचे स्थान मिळाले. पण पुढे अकराव्या शतकात विक्रमशील विद्यापीठातून आचार्य अतीश (९८२-१०५४) तेथे आल्यानंतर तेथे धर्मसुधारणेचे नवीन युग सुरू झाले [ → अतिश दीपंकर]. पद्मसंभवाचे अनुयायी असलेल्या लोकांनान्यिङ्-मा-पा (त्रिङ्-म-प) असे नाव पडले व त्यांची ओळख त्यांच्या तांबड्या रंगाच्या टौप्यांवरून होऊ लागली.

अतीशाच्या सुधारणवादी लोकांना का-दम-पा (बकह्-ग्दमस्-प) असे नाव मिळाले. ह्या लोकांचा ब्रह्मचर्याच्या पालनावर कटाक्ष असून जादूटोण्याला त्यांच्या जवळ स्थान नव्हते. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात क-ग्यु-पा (बकह्-र्ग्युद्-प) व सा-क्यपा (स-स्वय-प) ह्या नावचे दोन संप्रदाय अस्तित्तावत आले. तिबेटातील गूढवादी योगी व कवी मिल-र-प (मिल-रस्-प) हा पहिल्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून समजला जातो. हा अनेक दैवी शक्तींचा उपासक म्हणून समजला जात असे. तिबेटसारख्या अत्यंत कडक थंडीच्या मुलखात तो साध्या कपाशीपासून तयार झालेले कपडे वापरून पहाडांच्या गुहांतून, दऱ्याखोऱ्यांतून हिंडत असे. दुसरा सा-क्य-प संप्रदाय हा जुन्या न्यिङ् मा-पा संप्रदायाचा वारसदार म्हणून समजला जाई. ह्या संप्रदायाचे भिक्षू ब्रह्मचर्याचे पालन वगैरे करावयास तयार नसत.⇨नागार्जुनाच्या शून्यता तत्त्वाचा आधार घेऊन ते तांत्रिक धर्म पाळीत. त्यांच्यात बौद्ध धर्माचा इतिहास लिहिणारे फ्युतोन (बु-स्तोन्, तेरावे-चौदावे शतक), तारनाथ (ज. सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध) वगैरेंसारखे विद्वान निघाले. चौदाव्या शतकात त्सोङ्-खा-पा नावाच्या भिक्षूने अत्यंत यशस्वीपणाने का-दम-पा ह्या संप्रदायात आणखी सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्ना केले. नैतिक नियमांचे कठोरपणे पालन करून, अनेक गुंतागुंतीचे तांत्रिक विधी नाकारून ब्रह्मचर्यपालनावर त्याने जोर दिला. ह्या संप्रदायालाच गेलुग्पा (दगे-लुगस्-पा) असे नाव पडले. हे त्यांच्या पिवळ्या रंगाच्या टोपीवरून ओळखले जातात. ह्याच संप्रदायांतून दलाई लामासारखे धार्मिक व त्या अनुषंगानेच राजकीय प्रशासक निवडले जाऊ लागले. ह्याच संप्रदायाने चिनी लोकांचा अमल तिबेटात सुरू होईपर्यंत धार्मिक पुढारीपणा व राजकीय प्रशासन सांभाळले. [→ लामा धर्म].

सिक्कीम व भूतान ह्या देशांत लाल टोपीवाल्यांचाच संप्रदाय प्रचलित आहे.

भारतातून अनेक पंडित चीन देशात गेले व त्या देशातील तेथील विद्वान पंडितांच्या साहाय्याने तसेच चिनी पंडित भारतात येऊन येथील भाषा शिकून परत गेले व त्यांनीही स्वतंत्रपणे किंवा भारतीय पंडितांच्या साहाय्याने मूळ भारतीय ग्रंथांची चिनी भाषांतरे केली. तेथेही महायान व तांत्रिकांचाच प्रभाव होता. कित्येक वेळा एखाददुसऱ्याच महायान ग्रंथाला प्राधान्य देऊन त्याचेच सांप्रदायिक अनुयायी बनले. उदा., थ्येन-थाय संप्रदाय सद्धर्मपुंडरीकसूत्राला किंवा ‘छान’  म्हणजे ध्यान संप्रदाय लंकावतारसूत्राला मानतो किंवा सुखावतीव्यूह सूत्रावरून एक संप्रदाय झालेला आहे. नागार्जुन किंवा ⇨असंग (पाचवे शतक उत्तरार्ध) ह्याच्याही तत्त्वाचे अनुयायी होते. पण सध्या थ्येन-थाय संप्रदाय हाच तेथे विशेष प्रचलित आहे. ह्या सर्व संप्रदायांचे मूळ ग्रंथ जरी भारतातील असले, तरी चिनी पंडितांनीही त्यावर भाष्ये लिहिली आहेत व त्यांतून चिनी परंपरेला अनुसरून त्यांनी विचारांची मांडणी केली.

व्हिएटनाम हा चिनी संस्कृतीचा देश बनला आहे. येथेही बुद्धाच्या, बोधिसत्त्वांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. तेथे ⇨अमिताभाला वंदनात्मक प्रार्थना म्हटल्या जातात.

चीनमधून कोरियामार्फत बौद्ध धर्म जपानमध्ये गेला व तेथे अजूनही तेथील जनतेचा एक प्रमुख धर्म तो प्रचलित आहे. जपानातील बौद्ध धर्माचे तेरा संप्रदाय आहेत. ह्यातील ‘थ्येन-दाय’ संप्रदाय हा चीनमधील ‘थ्येन-थाय’ संप्रदायापासूनच निघाला असला, तरी ह्या बौद्धतंत्र व ध्यान आणि विनयालाही वाव दिला गेलेला आहे. हिए पर्वतावर ह्या संप्रदायाचे पीठ असून ते बौद्ध धर्माच्या अभ्यासाचे जपानमधील एक महत्त्वाचे केंद्र आहे. ‘शिन्गोन’ संप्रदाय हा तांत्रिकांचा आहे व ‘धारणी’च्या पठनाने बोधी प्राप्त होते असे त्यांचे मत आहे. ‘अमिताभ’ ह्या नावाच्या केवळ संकीर्तनाने सुखावतीच्या स्वर्गात आपल्याला प्रवेश मिळतो, अशी श्रद्धा बाळगणाऱ्या सामान्य जनांचाही एक संप्रदाय आहे. ‘शिन्रान’ नावाच्या संप्रदायाने सामाजिक वर्गावर्गांतील भेद अमान्य करून बुद्धाच्या दृष्टीने सर्व सामाजिक वर्ग समान असल्याचे प्रतिपादन केले. ‘झेन’ (ध्यान) संप्रदाय हा ध्यानावर विशेष भर देतो आणि बजावतो, की ‘अंतर्मुख व्हा म्हणजे बुद्धत्व तुमच्याच अंतःकरणात आहे, हे आढळून येईल’. सुशिक्षित समाजात ह्या संप३दायाला मोठी मान्यता आहे व जपानी संस्कृतीला ह्या संप्रदायाला फार मोठी मान्यता आहे व जपानी संस्कृतीला ह्या संप्रदायाची फार मोठी देण आहे [→ झेन पंथ]. ‘निचिरेन’ संप्रदायाने सद्धर्मपुंडरीकसूत्राला अत्यंत महत्त्व दिले. त्या सूत्राच्या पठनाने एवढेच नव्हे, तर त्या सूत्राचे नाव घेण्याने देखील बुद्धत्व मिळू शकते. ‘नेमु म्योहो रेन्गे क्यो’ (नमो सद्धर्मपुण्डरीकसूत्राय) हे ह्या संप्रदायाचे बीद्रवाक्य आहे. [→निचिरन पंथ].

पहा : बौद्ध धर्म.

संदर्भ :   1. Bapat, P. V. Ed. 2500 Years of Buddhism, Delhi, 1959.

2. Ch’en, Kenneth, K. S. Buddhism in China, Princeton, N. J., 1964.

3. Dutt, Nalinaksa, Early Monastic Buddhism, Calcutta, 1960.

4. Dutt, Sukumar, Buddhist Monks and Monasteries of India,     London, 1962.

5. Keith, A. B. Buddhist Philosophy in India and Ceylon, Oxford, 1923.

6. Steinilber-Oberlin, E. The Buddhist     Sects of Japan, 1938.

           7. Waddell L. A. Buddhism of Tibet or Lamaism, London, 1895.

बापट, पु. वि.