बळी : सामान्यतः अतिमानवी शक्तीला अनुकूल करून घेण्यासाठी वा तिच्या अनुकूलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिला अर्पण केलेला पदार्थ म्हणजे बळी होय. भारतात अतिमानवी शक्तीप्रमाणेच मानवेतर प्राण्यांसाठीही बळी अर्पण करण्याचे विशिष्ठ कर्मकांडही रूढ आहे. बळी अर्पण करण्याची क्रिया ही धार्मिक वा यात्वात्मक कर्मकांडाचा एक भाग असते. बळी अर्पण करताना एखाद्या पदार्थाचा त्याग केला जात असल्यामुळे लक्षणेने ‘त्याग’ या अर्थानेही बळी हा शब्द वापरला जातो. बलिदानाची प्रथा फार प्राचीन असून ती जवळजवळ सार्वत्रिक आहे. बलिदान हे पवित्र व गूढ शक्तीने युक्त असे कृत्य मानले जाते. भारतातील यज्ञ हा व्यापक अर्थाने बळीमध्ये अंतर्भूत होत असला, तरी प्रत्यक्षात भारतात यज्ञ व बळी या दोन भिन्नभिन्न संकल्पना मानल्या जातात.

बलिदानाच्या प्रथेची उत्पत्ती : इतर अनेक गोष्टींप्रमाणे बलिदानाची प्रथाही ईश्वरनिर्मित आहे, असे पूर्वी मानले जात असे. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तुलनात्मक धर्मशास्त्राच्या अध्ययनाला प्रारंभ झाल्यानंतर बलिदानाची प्रथा कशी उत्पन्न झाली व तिचे प्रारंभीचे स्वरूप काय होते, याविषयी अभ्यासकांनी अनेक उपपत्ती मांडण्यास प्रारंभ केला. त्यांपैकी काही उपपत्ती पुढे दिल्या आहेत. देवतांची कृपा प्राप्त करणे वा त्याचे शत्रुत्व कमी करणे यासाठी त्यांना दिलेली देणगी, हे बळीचे आद्य स्वरूप होते, असे ⇨ ई. बी. टायलर (१८३२ – १९१७) यांचे मत आहे. देवतांच्या गरजा मानवांप्रमाणेच असतात. असे समजून देवतांना पदार्थ अर्पण केले जातात, असे ⇨ ई. ए. वेस्टरमार्क (१८६२ -१९३९) यांना वाटते. बळी दिलेला प्राणी म्हणजे पवित्र व लौकिक विश्वांना जोडणारा दुवा, हे बळीचे स्वरूप असल्याचे हेन्रीत ह्युबर्ट आणि मार्सेल मॉस यांनी म्हटले आहे. ‘तू परतफेड करावीस म्हणून मी देत आहे.’ या तत्त्वावर बळीची संकल्पना अधिष्ठित आहे, असेही मॉस यांनी म्हटले आहे. विल्यम रॉबर्टसन स्मिथ यांच्या मते बळीची प्रथा ⇨ देषक प्रथेतून निर्माण झाली आहे. जनसमूहाच्या सर्व सभासदांत तसेच हे सभासद व देवता यांतही संपर्क स्थापित व्हावा, हा बळी देण्यामागचा मूळ हेतू असतो आणि विशिष्ट दिवशी देवकप्राण्याचा बळी देऊन केलेल्या सहभोजनामुळे तो साध्य होतो, असे त्यांचे मत आहे. ⇨हर्बर्ट स्पेन्सर (१८२० – १९०३) यांच्या मते मृतांच्या कबरींमध्ये अन्नपेय ठेवण्याच्या प्रथेतून देवतांसाठी पदार्थांचा बळी देण्याची प्रथा निघाली. एलिअडच्या मते पेरणी वा कापणीच्या वेळी दिला जाणारा पशुबळी हा समाजाला शक्ती मिळावी म्हणून केला जाणारा नूतनीकरणाचा विधी आहे. ज्याची शक्ती क्षीण झाली आहे त्या राजाला (देवाला) मारून त्याच्या जागी शक्तिशाली अशा नवीन राजाला आणण्याच्या यात्वात्मक विधीतून बळीची प्रथा निर्माण झाली, असे ⇨ जे. जी. फ्रेझर (१८५४ -१९४१) यांचे मत आहे. फ्रॉइड यांनी बळीची संकल्पना ⇨ ईडिपस गंडाशी जोडलेली आहे. बळीची प्रथा म्हणजे प्राचीन काळात घडलेल्या पितृहत्येची एका प्रकारे पुनरावृती होय, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या मते त्या काळात मुलांनी पितृहत्या केली, परंतु नंतर पश्चात्ताप होऊन त्यांनी पशुबळीच्या रूपाने मृत पित्याशी समेट साधण्याचा प्रयत्न केला. बळी म्हणजे देवतेला दिलेली लाच आहे तो देवतेशी केलेला करार आहे बळीमुळे मानवांना देवतेबरोबर सहभोजन करता येते बळी दिलेला पदार्थ हा स्वतः देवताच असल्यामुळे तो खाणे म्हणजे देवतेचे भक्षण करून तिची शक्ती प्राप्त करणे होय बळीमुळे पीडादायक देवतेला आपल्यापासून दूर ठेवता येते बळी म्हणजे जे देवतेकडून मिळाले ते तिलाच परत करणे होय इ. विचारही बळीच्या संदर्भात अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आले आहेत. विशिष्ट जनसमूहातर्फे पुरोहित, राजा, जमातप्रमुख, कुटुंबप्रमुख इत्यादींपैकी कोणी तरी व्यक्ती बळी देण्याचा विधी करते. व्यक्ती स्वतःतर्फे स्वतःही बळी देऊ शकते. स्वतः देवांनी बळी दिल्याच्या काही ⇨ पुराणकथाही आढळतात. देवदेवता, पितर, चित्-शक्ती इत्यादींसाठी बळी दिले जातात. मारलेल्या शत्रूच्या आत्म्याने पीडा देऊ नये, म्हणून त्याच्यासाठीही बळी अर्पण करण्याची प्रथा काही ठिकाणी होती, असे जे. जी. फ्रेझर यांचे मत आहे. बॅबिलोनिया व ईजिप्त या ठिकाणी जिवंत राजांचे दैवतीकरण करून त्यांच्यासाठी बळी अर्पण केले जात.

बळी द्यावयाचे पदार्थ : सामान्यतः मानवाला लागणाऱ्या सर्व वस्तू देवतेला बळी म्हणून दिल्या जातात. बळींचे रक्तमय व रक्तहीन असे दोन प्रमुख प्रकार पडतात. विशेषतः रक्त, फळे, धान्ये, शिजवलेले अन्न, मध, दूध, सोम, मद्य, पाणी, वस्त्रालंकार इ. वस्तू बळी म्हणून वाहिल्या जातात. पहिली फळे इ. पहिल्या वस्तूंना बळी म्हणून अत्यंत महत्त्व असते. मानव, पशु, पक्षी इत्यादींचे बळी दिले जातात. आत्मबलिदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. स्वतः देवतेचाही प्रतीकात्मक बळी दिला जातो. देवतेला बळी दिलेला प्राणी म्हणजे स्वतः ती देवताच असते, असे एक मत आहे. दुसऱ्या मतानुसार तो प्राणी म्हणजे त्या देवतेचा शत्रू असतो आणि त्याच्या हत्येने त्याच्यावर सूड उगवला जातो. उदा., ईजिप्तमध्ये दरवर्षी ⇨ ओसायरिससाठी डुक्कर मारले जाई. जे. जी. फ्रेझर यांच्या मते ते डुक्कर म्हणजे स्वतः ओसायरिसच होय. काहींच्या मते ते ओसायरिसचे शत्रू आहे. मुलाची ⇨ सुंता  करताना कापलेली इंद्रियाची त्वचा हा सुफलतेच्या देवीला दिलेला बळी आहे, असे काही जण मानतात. रोममध्ये सुफलतेसाठी पृथ्वीला गाभण गायींचा बळी दिला जात असे [⟶ सुफलताविधि]. सिरियन देवी अश्तार्ती तसेच सिबिल ही देवी यांच्यासाठी पुरूषत्वाचा बळी दिला जाई. पारशी लोकांत वेगवेगळ्या देवतांना बळीचे वेगवेगळे अवयव अर्पण केले जात. तिबेटमधील बौद्ध देवतांना ५ इंद्रियविषयांचा बळी दिला जात असे. आरसा, संगीतवाद्य, सुगंधी पदार्थ, शर्करादी पदार्थ आणि रेशमी वस्त्र या त्या वस्तू होत. तांत्रिक देवतांना कवटी व हृदय, जीभ, नाक, डोळे व कान यांच्या प्रतीकात्मक आकृती अर्पण केल्या जात. [⟶ तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म]. देवासाठी नर, देवीसाठी मादी, कृष्णशक्तीसाठी काळ्या रंगाचा प्राणी इ. प्रकारे ग्रीकांमध्ये बळी द्यावयाच्या पशूचे देवतेशी साम्य असे. काही वेळा देवतेला आवडणारा वा तिचा प्रतिनिधी असलेला पदार्थ तिच्यासाठी अर्पण केला जातो. बळी दिला जाणारा पदार्थ वरवर अचेतन वा मृत दिसत असला, तरी तो अत्यंत सामर्थ्यशाली असतो. त्यात ⇨ माना  शक्ती असते. तो अर्पण केला नाही, तर मानवाला अपाय होऊ शकतो. याउलट, अर्पण केल्यावर मानव व देवता यांच्यातील दुवा बनून तो त्या दोघांत बंध उत्पन्न करतो. बळी दिलेला पदार्थ ही एक प्रकारे दात्याचा एक अंशच असतो. दाता हा त्या पदार्थाच्या द्वारे स्वतःचेच बलिदान करीत असतो. बळी दिल्यामुळे दात्याची भौतिक हानी झाल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात त्यामुळे त्याचे सामर्थ्य वाढतच असते. देवता बळीवर अवलंबून असतात बळी न मिळाल्यास त्या क्षीण होतात त्या पदार्थाचे भक्षण करतात वा त्याचे फक्त सत्व वा गंध घेतात पशुबळीचा आत्मा देवतेकडे जातो त्याचे कल्याण होते इ. समजुती आहेत. प्रकार व पद्धती : सार्वजनिक व खाजगी, सामुदायिक व वैयक्तिक, नित्य व नैमित्तिक असे बळींचे विविध प्रकार आहेत. बळी द्यावयाच्या विविध पद्धतींपैकी बळी द्यावयाचा पदार्थ वेदीवर ठेवणे, ही मुख्य पद्धत होय. अग्नीत वा पाण्यात टाकणे, पुरणे, हत्या इ. अन्य पद्धतीही आहेत. काही ठिकाणी बळी देण्यापूर्वी दीक्षा द्यावी लागते व नंतर अवमृथस्नापन करावे लागते. बळी दिल्यानंतर अंगाला रक्त फासणे, भोजन करणे, सचैल स्नाणन करणे, त्याशिवाय गावात व घरात प्रवेश न करणे इ. प्रकारचे अनेक विधिनिषेध असतात [⟶ निषिद्धे]. बळीचे रक्त प्याल्यानंतर देवतेने अंगात येणे व नंतर त्या व्यक्तीने भविष्य सांगणे, असे प्रकारही आढळतात.


पर्यायी बलिदान : आत्मबलिदान हे सर्वश्रेष्ठ मानले जात असले, तरी प्रत्येकाला ते शक्य नसल्यामुळे पर्यायी बळींची प्रथा निर्माण झाली. उदा., राजाऐवजी राजपुत्राचा, मानवाऐवजी पशुपक्ष्यांचा इत्यादी. संपूर्ण शरीराऐवजी एका अवयवाचे बलिदान करण्याची प्रथाही आहे. उदा., सुंता करताना अर्पण केला जाणारा त्वचेचा बळी हा संपूर्ण शरीराचा पर्याय असतो. बहुतेक सर्व मूळ अमेरिकन जमातींमध्ये या प्रकारचे बळी दिले जातात. माया लोक तसेच पेरू व मेक्सिकोतील लोक कान, नाक इ. अवयवांतून रक्त काढून ते देवतेला अर्पण करतात. दुसऱ्याच्या हितासाठी स्वतः बलिदान केल्याची उदाहरणेही आढळतात. पश्चिम आफ्रिकेतील काही जमातींत एखाद्या प्राण्यामध्ये आपली पापे संक्रांत करून त्याचा बळी देण्याची पद्धत आहे. प्राण्याच्या वधानंतर त्याचे अंत्यसंस्कार केले जातात. मग अपराधी मेला आणि निष्पाप व्यक्ती जिवंत आहे, असे मानले जाते.[⟶ पाप-पुण्य].

परिणाम : समुदायातर्फे बलिदान आणि सहभोजन यांमुळे जमातीचे ऐक्य साधते. बलिदानामुळे शत्रूंचा नाश होतो, मानवाला दैवी सामर्थ्य लाभते, तो दैवी जगात प्रवेश करतो, त्याचे पारलौकिक कल्याण होते इ. प्रकारे त्याचा उपयोग सांगितला जातो. तसेच, बलिदानामुळे देवांना सामर्थ्य लाभते, विश्वव्यवस्था अबाधित राहते इ. परिणामही सांगितले जातात. याउलट, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचाही बलिदानाच्या प्रथेवर परिमाण होत असतो. सामुदायिक बळी देण्याच्या प्रथेत व्यक्तीवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न असतो, असे ⇨ रेमंड फर्थ (१९०१) यांचे म्हणणे आहे. पर्यायी बळी देणे आणि देवतेला बळी दिलेले अन्न लोकांनी खाणे, या गोष्टी आर्थिक प्रभावामुळे घडल्या असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणतात.

विविध संस्कृतींमधील बलिदान : भारतात गृहस्थाच्या नित्यकर्मात ⇨ पंचमहायज्ञांचा अंतर्भाव केलेला असून भूतयज्ञ हा त्यांपैकी एक होय. यात प्राण्यांसाठी अन्नाचा बळी दिला जातो. कुत्रे, चांडाळ, कुष्ठरोगी, कावळे व कृमी यांच्यासाठी बळी द्यावा, असे ⇨ मनूने म्हटले आहे. सामान्य प्राण्यांपासून सर्वसाधारण माणसांपर्यंत सर्व प्राणिमात्रांविषयी आपल्याला काही कर्तव्य आहे, याची त्यातून जाणीव होते. वैश्वदेव केल्यावर उरलेल्या अन्नाचा काही भाग बळी म्हणून विशिष्ट देवतांना अर्पण केला जातो. देवपूजेतील उपचारांनाही बळी म्हटले जाते. नागहत्येच्या पापामुळे संतती होत नसेल तर ते पाप दूर व्हावे, म्हणून केला जाणारा नागबळी, मृताचा असंतृष्ट आत्मा अपत्यप्राप्तीला प्रतिबंध करीत असेल, तर तो दूर व्हावा म्हणून केला जाणारा नारायणबळी इ. प्रकारचे बळीही हिंदू लोकांत आढळतात. यज्ञात अर्पण केली जाणारी आहुती हादेखील व्यापक अर्थाने बळीचाच एक प्रकार आहे, असे म्हणता येईल. स्त्रीने अमंत्रक बळी द्यावा, असा नियम होता. पशुबळी हाही बळीचा एक प्रकार आहे. परंतु बौद्ध धर्माच्या उदयानंतर भारतात पशुबळींची संख्या कमी झाली. जातकांत ⇨ बुद्धाच्या आत्मबलिदानाच्या कथा आहेत. चीनमध्ये सार्वजनिक बळी देणे, हे राजाचे एक कर्तव्य मानले जाई. ईजिप्तमध्ये बळी हा होरस या देवाचा नेत्र मानला जाई. यहुद्यांमध्ये सर्व राष्ट्राच्या वतीने मंदिरात दैनंदिन बळी देण्याची प्रथा होती.[⟶ पापक्षालन दिन]. इ. स.७० मध्ये त्यांचे दुसरे मंदिर नष्ट होईपर्यंत बळी हाच त्यांच्या पूजेचा मुख्य भाग होता. मानवजातीच्या पापक्षालनासाठी ⇨ येशू ख्रिस्ताने   आत्मबलिदान केले, असे ख्रिस्ती लोक मानतात. ⇨ युखॉरिस्ट  हे येशूच्या बलिदानाशी संबद्ध असून त्या प्रसंगी अर्पण केली जाणारी भाकरी व द्राक्षारस म्हणजे मांस व रक्त होय, असे ते मानतात. पारशी लोकांत जरथुश्त्राच्या काळात पशुबळीची प्रथा थांबली परंतु त्याच्या मृत्यूनंतर ती पुन्हा सुरू झाली. हे बळी ⇨ अहुर मज्दाला न देता ‘यजता’ना देत असत. हओम अर्पण करणे, हा त्यांच्या बलिदानाचा मुख्य भाग होता. ⇨ बक्रईद  हा इस्लामी सण म्हणजे पशुबळी देण्याचा दिवस होय. बळी द्यावयाच्या पशूचे तोंड त्यात मक्केकडे केले जाते. ⇨ हाजयात्रेच्या शेवटी पशुबळी देण्याची प्रथा इस्लाममध्ये आहे.

पहा : नरमेध पशुपूजा यज्ञसंस्था.

संदर्भ : 1. Frazer, J. G. The Golden Bough, London, 1963.             2. James, E. O. Sacrifice and Sacrament, London, 1962.             3. Tylor, E. B. Primltlve Culture, 2 Vols, New York, 1920.

साळुंखे, आ. ह.